Mom's Unplanned Leave (विनोदी कथा)

Story Of Every New mother


"आय लव्ह यू" ह्या पेक्षा जास्त महत्वाचे कुठले तीन शब्द आहेत जे नवऱ्याने बोलल्यावर बायकोला आनंद होतो?
असा प्रश्न कोणी विचारला तर हमखास सगळ्या बायका उत्तर देतील "उद्या डबा नकोय"..
तर झालं असं, आमच्या पतिराजांनी ह्या तीन शब्दांचा उच्चार केला, आणि त्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटन का काय म्हणतात त्यातली एक उकळी माझ्या मनात फुटली.

"उद्या आमच्या ऑफिस मधे एकाच्या वाढदिवसाची पार्टी आहे. मग डबा देऊ नकोस" - इति पतिराज

चला म्हणजे उद्या आराम. असं ही आमच्या बाळराजाचं आयुष्यात आगमन झाल्यापासून मनासारखा आराम झालाच नव्हता. म्हणून म्हणल, "उद्याचा दिवस माझा".

जेवण नाही त्यामुळे नवऱ्याला भरपेट नाश्ता देऊयात म्हणून इडली चं पीठ भिजत घातलं. उद्या सकाळी इडली केली की दिवसाची जुजबी कामं करून बाळाला झोपवून मस्त लॅपटॉप वर एखादा पिक्चर बघायचा. असं प्लॅनिंग माझ्या डोक्यात करून घेतलं. हॉस्टेल च्या दिवसांची आठवण झाली. दिवस दिवसभर पाय पसरून लॅपटॉप वर पिक्चर बघत बसायचे.

जाने कहा गये वो दिन...ssss
असं गाणं म्हणत मी उद्याच तो दिन असं मनोमन ठरवून टाकलं.

आणि तो दिवस उगवला. सकाळी सकाळी इडली सांबर च्या वासाने पतीराजाला जाग आली.

भरपेट नाश्ता करून नवरा आपल्या कामाला निघाला.

"एक होती इडली
ती होती चिडली"
असं गाणं म्हणत बाळराजाला इडली खाऊ घातली. घरातली जुजबी कामं करून झाली होती. आता बाळाला झोपवलं की आपलं काम झालं.
इडली ची भांडी घासून झाली. झाडू, फरशी सगळ करून आता मोर्चा बाळा कडे वळवला.

पण त्याचा झोपायचा मूड काही दिसत नव्हता.
त्याच्या बरोबर थोडं खेळून झालं. बिल्डिंगच्या खाली न्हेऊन फिरवून आणलं. तरीही डोळ्यावर झोप काही येईना.
शेवटी बाळाला घेऊन परत घरी आले.
आणि जमेल तेवढ्या चांगल्या आवाजात अंगाई म्हणायला चालू केली.

"आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही..?"
असं म्हणताच आमचं पाडस मोठमोठ्याने भोंगा पसरायला लागलं.
त्याच्या जन्म झाल्या पासून त्याने हे गाणं किमान ३६५७ वेळा तरी ऐकलं असेल. त्यात त्याची काय चूक.
शेवटी गाणं बदलून बघितलं.
एका नंतर एक अश्या साडे सात अंगायांनर बाळाला एक जांभई आली.
त्याला आलेली जांभई बघून मला जरा हायस वाटलं.
हळूहळू बाळाने डोळे झाकले.
चला म्हणजे आता २-३ तास तरी आपल्याला काही टेन्शन नाही. असं मनात म्हणून बाळाला पाळण्यात टाकणार तोच बाल्कनी च्या खाली उभं असलेलं कुत्र जोरात विव्हळलं
अन् बाळाची झोप उडाली.
परत येरे माझ्या मागल्या असं म्हणत अंगाई गायला लागले. पण आमच्या बाळाला २ सोसायटी मधल्या कुत्र्यांच्या भांडणात जास्त इंटरेस्ट होता. जवळजवळ १५-२० मिनिट त्यांची जुगलबंदी बाळ बघत राहिलं.
आणि ते बघत बघत तसच झोपी गेल. माझ्या साडे सत अंगायंपेक्षा कुत्र्याची भुंकणी जास्त इफेक्टिव पडली.
असो, बाळ झोपलं ना. झालं आपलं कामं.

एव्हाना १ वाजले होते. नवरा तर ऑफिस मध्ये जेवणार होता. माझ्या जेंवनाच काय?
इडलीच्या भरपेट नाष्ट्यांनंतर जेवायला काहीतरी लाईट म्हणजे खिचडी भात किंवा मसाले भात अशी सालाबाद प्रमाणे चालू असणारी परंपरा मी पुढे न्यायचं ठरवलं.
पण भात म्हणलं की कुकर आला आणि पर्यायानं शिटी.
कुकरची शिटी वाजून उठलेल्या बाळाच्या आवाजाची कल्पना करूनच मी ह्या सालाबाद च्या परंपरेला छेद दिला.

आता काय करायचं असा विचार करत असतानाच किचन ट्रॉली मधून मॅगी च पॅकेट केविलवाण्या अवस्थेत किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघताना मला दिसलं.
खरतर हॉस्टेलला असताना सकाळ पासून रात्री पर्यंत मॅगी खाणाऱ्या मला बाळ झाल्यापासून ती खायलाच मिळाली नव्हती.
मग मॅगी चा बेत ठरला. वेळ पण कमी लागेल आणि लगेच पिक्चर पण बघता येईल.

”२ मिनिट मे अभी बनाती
प्रोटीन कॅल्शियम से भरी मॅगी
थोडी सब्जी थोडा प्यार
झट से हो जाये तय्यार
मॅगी मॅगी मॅगी.ssss"
अशी जींगल गात मी मॅगी बनवली आणि तेवढ्याच वेगात ती संपवून टाकली.
आता एवढी भांडी घासली की झालं आपल काम.
बाळ अजून ही झोपल होतं.

तेवढ्यात दारावरची बेल जोरात वाजली.
आता ह्या वेळेला कोण कडमडल असा विचार करत असतानाच दुसरी बेल वाजली.
तिसरी बेल वाजून बाळ उठायच्या आत मी दार उघडलं.

बाहेर सेल्समन उभा होता.
नमस्कार ताई, मी हवाहवाई कंपनी मधून आलोय.
आमच्या कंपनीने ही हवेची पोर्टेबल उशी तयार केलीय. जी वापरून तुम्ही कुठेही झोपू शकता.

"तुम्हाला मुलं किती हो..??"ह्या माझ्या अनपेक्षित प्रश्नाने सेल्समन गडबडला.

" अहो ताई, अजून माझ लग्न व्हायचंय". - इति सेल्समन

"मग एक काम करा. आधी लग्न करा. आणि तुम्हाला जेव्हा मुलं होतील तेव्हाच तुम्हाला कळेल. जेव्हा खरच झोप आलेली असते तेव्हा असल्या उष्यांची गरज पडत नाही. तुम्ही कुठेपन झोपू शकता.". - इति मी.

माझ्या तिरसट पणाचा त्याला राग आला असावा. पण मला त्याची काही पर्वा नव्हती.

ह्या बाईशी बोलून काही उपयोग नाही. असा विचार करून सेल्समन ने काढता पाय घातला.

मी सुटकेचा निःश्वास सोडला.
आणि मॅगी ची भांडी घासून laptop कडे वळले. बाळाला आवाज जाऊ नये म्हणून हेडफोन्स होतेच.

बाळ नीट झोपलाय ह्याची एकदा नीट खात्री करून मी laptop चालू केला.
कुठला पिक्चर बघायचा ह्याचा विचार करण्यात माझा अर्धा तास निघून गेला.
शेवटी ह्या आधी ४५ वेळा बघून झालेला अन् तोंडपाठ असलेला "मुंबई पुणे मुंबई ३" चालू केला.

थोडा वेळ पिक्चर बघून झाला तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. मी वेगाने बाळा जवळ आले.
बघते तर बाळ झोपलेलंच होतं.
बहुतेक मला भास झाला होता.
चला बाळ अजून झोपलाय म्हणजे तासभर तरी अजून मला आराम आहे असा विचार करत एवरेस्ट सर केल्यावर लोक जसा दोन्ही हात उंचावून फोटो काढतात तसच हात उंचावून मी हीप हिप हूर्रे म्हणायला गेले अन्
खळळळळ खट्याक असा आवाज करून माझ्या बाजूला असणारा काचेचा फ्लॉवरपॉट फुटला.
आणि तिकडे आवाजाने ट्याट्या करत बाळ पण उठलं.

फ्लॉवरपॉट तुटणे से डर नही लागतं सहाब
बच्चे के उठणे से लगता हे

असं म्हणत मी बाळाकडे गेले.

तिकडे earphones लावलेल्या लॅपटॉप मध्ये मुंबई पुणे मुंबई ३ तसाच चालू होता अन् त्यातले गौतम आणि गौरी पसारा भरलेल्या घरामध्ये पिझ्झा अन् बिअर चा कॅन हातात घेऊन पाय पसरून आरमात पडले होते.

- सायली गणेश गोंदकर.