Jan 19, 2022
नारीवादी

आई ही आईच असते

Read Later
आई ही आईच असते

 


सिद्धी भुरके ©®


"प्रिया.. अगं उठ.. दार लावून घे.. मी निघालोय ऑफिसला. "
अमितच्या आवाजाने प्रिया जागी झाली.
"अरे आज तुला लवकर जायचं होतं का? "प्रियाने विचारले.
"अगं लवकर कुठे.. मला खूप उशीर झालाय आज. 10 वाजून गेले.. चल बाय.. मी निघतो. "
"अरे बापरे.. "प्रिया एकदम उठली. "मला उठवलं का नाहीस.. थांब जरा तुला पटकन डब्यासाठी काहीतरी करून देते. "
"अगं रात्री स्वरामुळे तुला जागरण झालं होतं म्हणून नाही उठवलं.. आणि राहू दे.. मी ऑफिसमध्ये खातो काहीतरी.. चल बाय.. "
अमित ऑफिसला गेला. आता उठून कामाचा उरका पाडूया असं तिने ठरवलं. रात्रभर जागरण करून आता निवांत झोपलेल्या स्वराकडे तिने पाहिलं.. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि कामाला लागली.
किचनमधे येऊन बघते तर रात्री न आवरलेला ओटा तसाच होता..
गेले तीन चार दिवस मशीनला लावायचे कपडे खुर्चीवर पडून होते.. घरात जिकडे तिकडे स्वराची खेळणी पडली होती..
घराचा अवतार पाहून प्रिया स्वतःशीच म्हणाली.. "ही   इनटीरीयर डीझायनरच्या घराची अवस्था बघा.. "
प्रिया आज घरातूनच काम करणार होती.  चार दिवसांपासून अर्धवट राहिलेले ऑफिसचे काम करावे म्हणून तिने लॅपटॉप उघडला. पण काही छान डीझाइन सुचेना. कॉलेजमधे टॉपर असणाऱ्या मुलीला साधं डीझाइन सुचू नये या गोष्टीवर प्रियाला स्वतःचा राग आला. ती डोक्याला हात लावून बसली आणि तिला रडू कोसळले. मन हलक करायला तिने आईला फोन केला.
"बास झालं आता.. मला नाही सहन होत.. घर.. ऑफिस आणि बाळ सांभाळणं खूप अवघड जातंय मला "
रडत रडतच प्रिया आईला म्हणाली.

"अगं पण झालं काय..??
स्वरा आणि अमितराव ठीक आहेत ना??"अशी का रडतीयेस तू?? " आईने काळजीने विचारले.

"आई अगं तसं काही झालं नाहीये.. पण मला हे आईपण फार अवघड वाटतंय. "

"अगं अवघड वाटायला तो काय परीक्षेचा पेपर आहे का?  मला नीट सांग काय झालंय तुला. "

"आई तुला तर माहितीये काही महिन्यापूर्वी मॅटर्निटी लिव्ह संपली माझी आणि मी ऑफिस सुरु केलं. पण अगं मला काही नवीन डीझाइन सुचत नाही.. छोट्या छोट्या गोष्टींवर अडून राहते मी.. आणि कामाचा वेग पण कमी झालाय. हे सगळं ऑफिसमधलं टेन्शन... आणि घरी इथे स्वरा मला इतका त्रास देतीये ना... नीट काही खात पीत नाही.. रात्री नीट झोपत नाही.. दिवसभर किरकिर करत असते.. तिचं वेळापत्रक बिघडलं कि माझं पण बिघडतं गं.. आणि हे घर.. किती पसारा.. कधी आवरू सगळं.. नाही जमत मला सगळं.. काहीच परफेक्ट नाहीये माझ्या आयुष्यात.. "

सगळा विषय आईच्या लक्षात आला.. "अगं परफेक्ट कोणाचंच आयुष्य नसतं.. माणूस आहोत आपण.. मला एक सांग स्वराला दात येत आहेत का??? "

"हो अगं आई.. खूप चीड चीड करतीये ती आणि त्यामुळे माझी पण चीड चीड होतीये.. डॉक्टर कडे जाऊन आले परवा.. त्यांनी हिरड्यांना मसाज करायला पावडर दिली आहे. "

"अगं दात येताना मुलांना त्रास होतो.. आणि ते वर्षाचं मुलं काय सांगणार तुला.. त्यांना काही खायची इच्छा होत नाही.. नीट पोट भरत नाही म्हणून रात्री झोपत नाही आणि मग दिवसभर किरकिर करतात ती..."

"हो आई.. स्वरा आता चपाती..भाजी..  भात खायला नकोच म्हणतीये.. "

"अगं दाताचा त्रास जर आपल्याला होत असेल तरी डॉक्टर मऊ काहीतरी खा असचं सांगतात ना. मग तू तिला खीर.. शिरा वगैरे का देत नाहीस?
का वरण भात आणि पोळी भाजीच्या मागे लागलीयेस?? पौष्टिक खीर बनवून दे तिला. त्यातून तिला सत्व मिळेल.. जरा तिच्या कलाने घे प्रिया ".

"आई मी असा विचार केलाच नाही गं.. उगाच तिने सगळं व्यवस्थित खाल्लं पाहिजे असा हट्ट धरून बसले..मी नाही गं तिच्या कलाने घेतलं.. " प्रिया हिरमुसली.

"आता आलं ना लक्षात.. मुलांना त्यांच्या आवडीचा पदार्थ आपल्या पद्धतीने पौष्टिक बनवून द्यायचा बघ..
आता तुझ्या ऑफिसाच्या प्रॉब्लेम विषयी बोलूया.. "

"हो आई.. प्लीज त्या वर काहीतरी उपाय सांग ना.. मला परत पूर्वी सारखं काम करायचंय.. "प्रिया म्हणाली.

"अगं उपाय काय वेडे.. तुला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे बघ तुला आधी बाळाची जबाबदारी नव्हती.. त्या मुळे तू पूर्ण लक्ष देऊन काम करू शकत होती.. आता काय म्हणता तुम्ही ते.. हा.. तुझ्या प्रायोरिटी बदल्या आहेत.. स्वराची जबाबदारी आहे.. आणि आई झाल्यावर शारीरिक आणि मानसिक बदल होतात गं आपल्यात.. लगेच आधीसारख वेगात कसं काम करता येईल तुला?? "

"मग???? आता काय करू??? " प्रियाने विचारले.

"अगं याचं उत्तर मी आधीच दिलं आहे. स्वरा नीट जेवली, खेळली कि छान झोपेल.. किरकिर करणार नाही.. आणि मग तू बिनधास्त ऑफिसमधे कामावर लक्ष देऊ शकतेस. कारण तुला स्वरांचं फारसं टेन्शन राहणार नाही. "

"अरेच्या.. आई हे सगळं इतकं सोपं होतं आणि मी बसले रडत." प्रिया जरा हसली. "आई प्लीज प्लीज तो घर आणि पसारा हा प्रॉब्लेम पण सॉल्व कर ना गं ".

"अगं काय हे प्रिया.. सुट्टीच्या दिवशी थोडा वेळ काढायचा घर आवरण्यासाठी... आणि खरं सांगू का लहान मूल घरात असलं ना मग कितीही पसारा आवरला तरी तो कमीच असतो . म्हणून कधीतरी दुर्लक्ष करायचं.. तुला सगळंच परफेक्ट मिळणार नाहीये. आणि अमितराव करत असतील ना थोडी मदत तुला? "

"थोडी???? खूप मदत करतो तो मला. स्वरा रात्री उठली कि तिला घेऊन बसतो.. तिला अंघोळ घालणे आणि माझी विनाकारण चीड चीड सहन करणे असं सगळं करतो. तो काही बोलत नाही गं..  माझे सगळे मूड स्विंग सहन करतो आणि मी त्याला गृहीतच धरते. " प्रिया जरा गंभीर झाली...

"खरंच आई मी चुकले.. प्रोब्लेमचं सोलुशन माझ्याकडे होतं तरी मी ते शोधण्यापेक्षा चीड चीड करत बसले. स्वरा आणि अमितसोबत मी खूप चुकीचं वागलीये. मला फार वाईट वाटतय गं. "

"असू दे गं.. आता तुला समजलं ना काय चूक झाली ते.. बास झालं "आई म्हणाली.

"आई अगं मी तुझ्यासारखी चांगली आई कधी बनणार?? तुझ्यासारखं चुटकीत प्रॉब्लेम सॉल्व कधी करणार?? "प्रियाने विचारले.

"अगं आई कधी चांगली किंवा वाईट नसते गं.. ती फक्त आणि फक्त 'आईच ' असते ..आणि अनुभवातून शिकशील गं...
आता बघ तू 30 वर्षांची आहेस म्हणून मी 30 वर्षांची आई आहे.. स्वरा वर्षाची आहे म्हणून तू एक वर्षाची आई आहेस.  बाळा सोबतच आईचा देखील जन्म होतो गं आणि मग हळू हळू अनुभवातून ती आई पण शिकते आणि बाळाला पण घडवते. काही वर्षांनी मागे वळून पाहिलंस ना कि तुला या आपण काय वागलो याचं हसू येईल.. कारण तेव्हा तुझ्याकडे अनुभवाची शिदोरी असेल. "

प्रियाला आपली चूक समजली होती... ती आईला म्हणाली, "खरंच मातृत्वाचा  अनुभव किती काय शिकवून जातो ना.. हे आईपण आपल्याला काही शाळा कॉलेजमधून शिकवले जात नाही.. ना काही पालकत्वाचा कोर्स असतो. हा सगळा अनुभवाचा खेळ असतो ना गं आई. . या पालकत्वाच्या रस्त्यात उद्या काय अडचण येईल हे माहित नाही .. पण त्याचा सामना करायला मी नव्या जोमाने तयार झालीये.. हे आईपण कोणतीही तक्रार न करता यातला प्रत्येक क्षण अनुभवणार आहे मी."

"प्रिया खरंच तू खूप नशिबवान आहेस कारण या सगळ्यात अमितराव तुझ्या सोबत उभे आहेत ही फार मोठी गोष्ट आहे. या प्रवासात त्यांची साथ खूप महत्वाची आहे....मला वाटते आजचे lecture पुरे झाले तुला. " आई हसतच म्हणाली.

प्रिया सुद्धा हसली.. "खरंच ही कानउघाडणी करायला आईच लागते... कारण आई ही आईच असते... I love you आई ".

माझ्या या दोन वर्षाच्या मातृत्वाच्या प्रवासात मी खूप चढ उतार पाहिले आहेत.. त्यातूनच आलेला अनुभव वरील कथेद्वारे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलाय. आवडला तर like आणि कंमेंट नक्की करा.
धन्यवाद..
सिद्धी भुरके©®

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Siddhi Gautam Bhurke

Interior designer

Hello everyone.. My self Mrs.siddhi Bhurke. I'm an interior designer and a co owner at studio intelize. I'm a trained bharatnatyam dancer. And a proud mommy of two years old daughter.. Recently I've started writing blogs..