आई ! आमचं चुकलंच ( भाग ३ अंतिम )

आपण आपल्या पालकांना गृहीत का धरतो ?


जलद कथालेखन स्पर्धा

विषय - अरे संसार संसार

कथेचे नाव - आई ! आमचं चुकलंच ( भाग ३ )

" दीपक आई रिषभला घेऊन टी. व्ही. बघत बसतात. टी.व्ही. मुळे मुलांचे डोळे खराब होतात आणि त्यांच्यावर संस्कार तरी चांगले होतात का ? मी त्यांना ह्याबद्दल बोलले तर त्यांनी मला किती ऐकवून दाखवलं. त्यांनी बोलून दाखवलं की, त्यांना रिषभला सांभाळायला त्रास होतो. त्यांना रिषभमुळे स्वतःसाठी वेळ मिळत नाही. दीपक आजी - आजोबाचं सांभाळतात ना नातवंडांना. मग आईंनी सांभाळलं तर बोलून कशाला दाखवतात ? मान्य आहे की त्यांना त्रास होत असेल. म्हणून तर मी दोन्ही वेळच्या स्वयंपाकासाठी बाई लावली. आता आईंना फक्त रिषभला सांभाळायचं काम आहे ना ? घरात बाकीच्या कामांना देखील बाई आहे तर आईंना घरातलं काहीच काम करावं लागतं नाही ना ? जुई तावातावाने बोलत होती.

" जुई पहिलं तर तू शांत हो आणि आईच्या बाजूने विचार कर. माझ्या आईचं लग्न वयाच्या पंधराव्या वर्षी झालं. आईला शिक्षणाची खूप हौस. तिच्या आईवडिलांनी तिला जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण दिले आणि तिचं लग्न एका मोठ्या कुटुंबात लावून दिले. तिला पुढे शिकायची इच्छा होती तरी तिला संसाराच्या व्यापातून शिक्षण घेता आले नाही. संपूर्ण आयुष्य तिचं चुलीपाशी गेलं. \" रांधा, वाढा, उष्टी काढा \" ह्यातचं तिने स्वतःला झोकून दिलं. स्वतःची कुठलीही हौसमौज केली नाही. फक्त सगळ्यांसाठी करतचं राहिली. बाबा गेल्यावर थोडं तिला स्वतःसाठी हक्काचा वेळ मिळाला आणि मी तिला इथे मुंबईत आणले. थोडे दिवस तिला इथे नाही करमलं पण नंतर तिचा समवयस्क मैत्रिणींचा ग्रुप जमला. त्या ग्रुपमुळे तिला तिचं अस्तित्व समजलं. तिच्या कलागुणांना वाव मिळाला. पाहिलेस ना तुझ्या ओटीभरणाला तिने किती सुंदर गाणे म्हटले. किती खुश होती ती. किती हौसेने करायची सगळं. आता कुठे ती स्वतःसाठी जगत होती आणि पुन्हा रिषभमुळे तिला तिच्या जगण्यावर बंधने आली. आपण मुलं आपल्या आईवडिलांविषयी स्वार्थी होतो. आपल्याला वाटतं की, आपल्या आईवडिलांवर आपलाच हक्क आहे. त्यांनी त्यांच्या संसारात खूप खस्ता खाल्लेल्या असतात तरीदेखील आपण त्यांच्याकडून पुन्हा नातवंड सांभाळण्याची जबाबदारी टाकतो. किंबहुना नातवंड सांभाळणे हे त्यांचे परमकर्तव्य आहे असे आपण समजतो. आपल्या आईवडिलांना आपण गृहीत धरतो. आपण हा विचार करत नाही की, आपल्या आईवडिलांनी ज्या इच्छा मारल्या आहेत त्या त्यांच्या ह्या वयात त्यांना त्यांच्या इच्छेने जगावेसे वाटत असेल तर त्यात गैर काय आहे ? आईवडिलांनी आयुष्यभर केवळ मुलांसाठीच जगायचे असा शिक्का तर मारलेला नाही ना ? आईला आता रिषभमुळे कुठे बाहेर पडता येत नाही. रिषभच्या मागे पळावे लागते तर तिचे पाय दुखत असतील ह्याचा विचार कर ना. बसली असेल पाय दुखतात म्हणून रिषभला जवळ घेऊन टी. व्ही. बघत तर खूप मोठा गुन्हा नाही ना घडला तिच्याकडून ? मी सांगतो आहे ते पटतंय ना तुला ?" दीपकने खूप शांतपणे जुईला समजावले.

" हो दीपक, तू जे आता बोलतो आहेस त्यातील शब्द नी शब्द मला पटला आहे. खरंच आपण आपल्या आईवडिलांना गृहीत धरतो. त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो. खरंच माझी चूक झाली रे."

" तुला पटलं ना तुझी चूक झाली तर चल; आता आईकडे जा, तिची माफी माग आणि मग आपण तिघे मिळून जेवायला बसूया."

जुई सासूबाईंच्या रूममध्ये गेली. " सॉरी आई चुकलंच माझं. मला माफ करा. मी तुम्हाला बोलायला नको होते. मला दीपकने पटवून दिलं सगळं. खरंच आम्ही तुम्हा आईवडिलांना गृहीत धरतो. तुम्ही तुमचा संसार मोठया कष्टाने रेटलेला असतो आणि पुढे आम्ही आमच्या संसारात तुमच्याकडून कर्तव्यांची अपेक्षा करतो. आई, मी रिषभला सांभाळायला एक बाई ठेवेन. तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे जगा. तुम्हाला काश्मीर बघायचे आहे ना मग मी एका चांगल्या ट्रॅव्हलकडे तुमचे बुकिंग करते. मनसोक्त फिरा. आणि हो फिरायला जायच्या आधी मी तुम्हाला पंजाबी ड्रेस घेऊन देईन तेच घालायचे बरं का पूर्ण पिकनिकमध्ये. आई मला माफ केले ना ?"

" हो ग राणी, केलं तुला माफ. खरं सांगायचं जुई तर संसारात अशा छोट्यामोठ्या कुरबुरी हव्यातचं. त्यानेच तर आपली माणसं आपल्याला समजतात. दीपकने तुला समजावले आणि तू मला समजून घेतलेस ह्यात तुमच्या दोघांच्या मनाचा मोठेपणा दिसला. मी वेगळं काय काश्मीर बघू ? माझं नंदनवन इथेच आहे. हां ! पण जुई मला काश्मीर बघायला आवडेल बरं का. मी खूप भाग्यवान आहे की मला दीपकसारखा मुलगा आणि तुझ्यासारखी सून लाभली. देवाने मला सगळं भरभरून दिले आहे तर मी त्याच्याकडे वेगळं काय मागू ?" कुसुमताईंनी जुईला जवळ घेऊन तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.

" आई ! माहिती आहे तुझी सून खूप लाडकी आहे आणि मी गरीब मुलाने काय करायचं ?" दीपक चेष्टेने म्हणाला.

" तुम्ही दोन्ही मुले माझी लाडकी आहात बाबांनो." असे म्हणत कुसुमताईंनी दोघांना जवळ घेतले.

" आई ते जाऊदे सगळं, माझ्या पोटात तुमच्या दोघींमुळे कावळे ओरडू लागले आहेत त्याचं काय करायचं ?"

" हो दीपक, मी घेते आपल्या तिघांची पाने. चला जेवून घेऊया." जुई म्हणाली.

" जेवणानंतर आईस्क्रीम माझ्याकडून बरं का !" कुसुमताई म्हणाल्या. आईस्क्रीमचे नाव काढल्यावर जुईची कळी खुलली. तिघांनी हसतखेळत जेवणाचा आस्वाद घेतला.

( समाप्त )

🎭 Series Post

View all