आई ! आमचं चुकलंच ( भाग २ )

आपण आपल्या पालकांना गृहीत का धरतो ?
जलद कथालेखन स्पर्धा

विषय - अरे संसार संसार

कथेचे नाव- आई ! आमचं चुकलंच ( भाग २ )

आता कुसुमताईंचा वेळ चांगला जाऊ लागला होता. त्यात आता सोसायटीतील समवयस्क बायकांची त्यांची ओळख झाली. \" यंग लेडीज \" नावाचा त्यांचा ग्रुप होता. त्यात काही अमराठी बायकांची ओळख झाली. मग त्यांच्या खाद्यसंस्कृतीची ओळख झाली. दर महिन्याला एक दिवस ठरवून सोसायटीच्या हॉलमध्ये त्या बायका एकत्र जमत. त्यानिमित्ताने काही खेळ खेळायचे, गाण्याच्या भेंड्या, ज्यांच्याकडे जी कला असेल त्यांनी आपल्या कला सादर करायच्या, मग सरतेशेवटी प्रत्येक बाईंनी आपल्या घरातून खाऊचे डब्बे आणलेले असत. मग सगळ्याजणी एकत्रितपणे त्याचा आस्वाद घेत. अशा अनेक कार्यक्रमाने त्या दिवसाची सांगता व्हायची. कुसुमताई अतिशय सुगरण असल्याने त्यांनी साधे झुणका - भाकरी नेली तरी त्यांच्या डब्याचा लगेचं फडशा पाडला जाई. कुसुमताईंनी लग्न झाल्यापासून एकत्र कुटुंबात जास्त कष्ट उचलले असल्याने त्यांनी कधीच स्वतःची हौसमौज केली नव्हती. आता या हौशी बायकांमुळे कुसुमताईंना स्वतःची ओळख झाली. कुसुमताईंचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते ते सुद्धा त्यांच्या जिद्दीने. त्यांचे आईबाबा मुलींना शिक्षण देऊन काय उपयोग ? शेवटी त्या \" चूल आणि मूल \" सांभाळणार ह्या मताचे. कुसुमताईंनी हट्ट करून दहावीची पदवी पदरात पाडून घेतली होती. दहावीची परीक्षा झाल्या झाल्या कुसुमताईंच्या वडिलांनी दिनकररावांचे स्थळ आणले आणि लेकीचे लग्न करून दिले. सासरी एवढ्या मोठ्या गोतावळ्यात कुसुमताईंच्या पुढील शिक्षणाच्या सगळ्या इच्छा चुलीत राख झाल्या. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लेकीला तिला पाहिजे तितके शिक्षण घेऊ दिले आणि तिच्या योग्यतेचा मुलगा निवडून तिचे लग्न लावून दिले होते. लेकीच्या सासरी त्यांचा पिढीजात कपड्यांचा व्यवसाय असल्याने त्यांची लेक पूर्ण बिझिनेस अकाउंट सांभाळत असे. कुसुमताई लहान असताना त्या नकला खूप छान करत. आता इथे सगळ्या बायकांसमोर नकला करून त्या दाखवू लागल्या. सगळ्या बायका अगदी पोट धरून हसत. कुसुमताईंचा आवाज छान होता तर त्या गाणे सादर करत. एकंदर आता त्यांचा वेळ अतिशय छान जात होता.

जुई सकाळी दीपक आणि तिच्यासाठी पोळी - भाजी करून निघत असे त्यात कुसुमताईंसाठी दोन पोळ्या जास्त करून ठेवत असे. मग स्वतःसाठी घासभर गरमगरम वाफाळता वरणभात दुपारच्या वेळी कुसुमताई रांधत असत. संध्याकाळी पाच ते सात सोसायटीच्या बागेत फेरफटका मारल्यावर घरी येऊन देवापुढे दिवा लावणे, चुटकीसरशी संध्याकाळचा स्वयंपाक बनवणे, रात्री दीपक आणि जुईच्या ऑफिसच्या डब्याची तयारी म्हणून पीठ मळून ठेवणे, भाजी चिरून ठेवणे असा रोजचा दिनक्रम कुसुमताईंचा असे. कुसुमताईंची भरपूर मदत जुईला होत असल्याने जुईला कुसुमताईंचा आधार मिळाला होता. जुईचे आता ऑफिसमध्ये प्रमोशन झाल्या कारणाने तिला घरी यायला खूप उशीर होत असे. जुई गरोदर असल्याने कुसुमताई तिला खूप जपत. जुईला सातवा महिना चालू झालेला मग तिची ओटीभरणाची तयारी \" यंग लेडीज \" ग्रुपने खूप हौसेने केली. जुईचा ओटीभरणाचा कार्यक्रम अतिशय छान पार पडला. कुसुमताईंनी सुनेसाठी डोहाळजेवणाच्या निमित्ताने \" डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे \" हे सुंदर गाणे म्हटले. आईचा आवाज इतका मधुर आहे ही बाब पहिल्यांदाच दीपक, कुसुमताईंची लेक दक्षा आणि जुईला समजली. तिघांनाही आईचे कौतुक वाटले.

नववा महिना पूर्ण झाल्यावर जुईने एका सुंदर मुलाला जन्म दिला. जुई दोन महिन्यांकरिता बाळंतपणासाठी माहेरी गेली. माहेरी बाळाचे बारसे झाल्यावर जुई घरी आली. बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर जुई ऑफिसला जाऊ लागली. जुईने दोन वेळच्या स्वयंपाकासाठी एक बाई ठेवली. ती वेळेत येऊन स्वयंपाक करून निघून जात असे. आता बाळाची संपूर्ण जबाबदारी कुसुमताईंच्या अंगावर येऊन पडली होती. जुई कामावरून घरी उशिरा येत असल्याने आता त्यांना संध्याकाळी सोसायटीच्या आवारात फिरता येत नव्हते की त्यांच्या \" यंग लेडीज \" ग्रुपमध्ये जायला मिळत नव्हते.

आज कधी नव्हे ते कुसुमताई आपल्या सुनेवर रागावून बोलल्या होत्या. जुई बेडरूममध्ये रागावून बसली होती. दीपक घरी आल्यावर त्याला घरातले वातावरण बघून लगेच समजले की काहीतरी सासू सुनेमध्ये वाद झाले आहेत. एरव्ही आई आणि जुई दोघी हॉलमध्ये छान गप्पा मारत बसलेल्या असायच्या आणि आज मात्र स्वतःच्या बेडरूममध्ये जाऊन बसल्या होत्या. दीपकला मनातून वाटले की, \" जुईची काहीतरी चूक असेल अन्यथा आई जुईला किती समजावून घेते. आमच्या संसाराला आईचा खूप मोठा आधार आहे.\" दीपक फ्रेश होण्यासाठी बेडरूममध्ये गेल्यावर जुईला दोघींमध्ये काय झाले म्हणून विचारले असता जुई तावातावाने बोलू लागली.

क्रमशः

🎭 Series Post

View all