Login

आई ! आमचं चुकलंच ( भाग १ )

आपल्या पालकांना आपण का गृहीत धरतो ?


जलद कथालेखन स्पर्धा

विषय - अरे संसार संसार

कथेचे नाव - आई ! आमचं चुकलंच ( भाग १ )

" आई ! तुम्हाला समजत नाही का ? रिषभ किती लहान आहे अजून आणि त्याच्यासमोर तुम्ही टी. व्ही. लावून बसलात ? लहान मुलांसाठी चांगला असतो का टी. व्ही. बघणं ? त्यांच्या डोळ्यांना त्रास होतो आणि चांगले संस्कार घडतात का त्यांच्यावर टी. व्ही.मुळे ?" जुईने खांद्यांवरची पर्स टेबलवर टाकली आणि सासूवर प्रचंड तोंडसुख घेतले.

" अग तू असतेस का ग घरी ? मी रिषभला कसे सांभाळते बघायला ? तू माझ्यावर त्याला टाकून निघालीस की आत्ता उगवतेस. रिषभच्या पाठी फिरून फिरून माझे पाय दुखायला लागतात. त्याची शी - शू काढणं, त्याला वेळेवर भरवंण, त्याच्याशी खेळणं, त्याला अंगाईगीत गाऊन झोपवंण ह्यात माझा पूर्ण दिवस निघून जातो. रिषभ एक ठिकाणी शांत बसत नाही. त्याच्यामागे मला किती धावायला लागतं. आता कुठे मी जरा टी.व्ही. बघत बसले तर लागलीस लगेच शहाणपणा शिकवायला. फक्त टी. व्ही.वरची चित्र हलताना दिसतात म्हणून रिषभ बसून राहतो माझ्या पुढ्यात. तेवढाच माझ्या हाता - पायांना आराम मिळतो. पण तुला काय त्याचं ? तुला सासूचे कष्ट दिसत नाहीत. घरातली दहा कामे पत्करतात पण लहान मुलांना सांभाळणं म्हणजे मोठे जिकरीचे काम असते. मी रिषभला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते आणि त्याच्या बदल्यात तू मला ताडताड बोलतेस. मला कुठे जायला - यायला मिळत नाही. किती महिने झाले मी देवळात किंवा आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा गेले नाही. मी कधी तुम्हा लोकांना बोलून पण दाखवले नाही. प्रेमाने करते सारं रिषभचं. पण माझी कदरचं नसेल तर काय फायदा. मी गावाला होते तेच बरं होतं. मला स्वतःसाठी वेळचं वेळ होता. उगीच आले तुमच्यामध्ये." कुसुमताईंनी मनातला राग ओकला. कुसुमताईंनी तोंड सोडलं तसं जुई फणकाऱ्यात बेडरूममध्ये निघून गेली.

कुसुमताईंना आठवलं त्यांचं एकत्र कुटुंब. सासू - सासरे, दोन मोठे दिर, दोन जावा, त्यांची मुलं, एक लहान दिर आणि नणंद किती मोठं कुटुंब होतं त्यामुळे सगळ्यांची लहान मुले एकत्र वाढली. घरात भरपूर माणसे असल्याने लहान मुलांकडे लक्ष देणे सोपे होऊन जायचे. मुलांना घरातच इतकी भावंड असल्याने त्यांना बाहेर खेळायला जाण्याची गरजच भासत नसे. मोठं कुटुंब असलं तरी त्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा होता. तुझं - माझं हा भेदभाव नव्हता. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार घडवले गेले. काही कालांतराने सासू - सासरे निर्वतले. प्रत्येकाची मुले मोठी झाली. काही शिक्षणासाठी बाहेरगावी निघून गेली. दिरांनी मुलांच्या भविष्यासाठी वेगळे संसार मांडले. धाकटा दिर परदेशी निघून गेला. फक्त कुसुमताई आणि त्यांचे पती दिनकररावांनी आपलं मूळ घर सोडले नाही. लेकीचे लग्न शेजारच्याच गावातील एका चांगल्या घराण्यात लावून दिले. मुलगा दीपक मुंबईत शिक्षणासाठी निघून गेला आणि कॉलेजमध्ये त्याची ओळख जुईशी झाली. दोघांमध्ये प्रेम जमले. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीधंद्यात जम बसल्यावर दोघांनी लग्न केले. सणासुदीला संपूर्ण कुटुंब गावच्या घरात एकत्र येत असत. सगळ्यांच्या येण्याने वाडा पुन्हा गजबजून जात असे. दोन वर्षांपूर्वी कुसुमताईंच्या पतीचे निधन झाले तेव्हा जुईला नुकतेच दिवस गेले होते. दीपकचा कुसुमताईंकडे लकडा सुरू झाला की, आता एवढया मोठ्या गावच्या घरात तू एकटी कुठे राहणार ? ये मुंबईत आमच्याकडे निघून. तुला आमचा आणि आमचा तुला आधार मिळेल. कुसुमताई गावाची वेस ओलांडून कधीच बाहेर पडल्या नसल्याने त्यांना गाव सोडून मुंबईत जाणे जीवावर आले होते. कुसुमताई भल्या पहाटे उठून देवळात जात. देवाचे नामस्मरण करून घरी आल्यावर घरातली आवराआवर, स्वयंपाक - पाणी, कोणाची लेकसून बाळंत झाली असेल तर तिला बाळंतविडा तयार करून देणे असा त्यांचा दिनक्रम असे. नवऱ्याची इतक्या वर्षांची साथ सुटली असली तरी त्यांना स्वतःसाठी जगायला भरपूर वेळ मिळाला होता. शेजारीपाजारी लोकं इतकी चांगली होती की कुसुमताईंना एकटेपणाची जाणीव होत नव्हती. दीपकच्या वारंवार आग्रहानंतर त्या शेवटी दीपकबरोबर मुंबईत येण्यास तयार झाल्या.

मुंबईत आल्यावर कुसुमताईंची घुसमट सुरू झाली. मुळात मुंबईचं घर गावच्या घरापेक्षा लहान. त्यात दीपक आणि जुई दोघे सकाळी कामावर निघून गेले की घर खायला उठे. ब्लॉक सिस्टिममुळे आणि हाय सोसायटी असल्यामुळे शेजारची दारे बंद. आजूबाजूला बोलायला कोणी नाही. बरं देवळात जावे म्हटलं तर देऊळ दूर. त्यात रस्ता क्रॉसिंग करणं कुसुमताईंना जमत नसे. एक महिना काढला कसातरी मग सोसायटीच्या आवारात छोट्याश्या बागेत लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोपाळा, सीसॉ इत्यादी खेळण्याची सोय होती तिथे संध्याकाळी पाचच्या सुमारास जाऊन कुसुमताई एका बाकड्यावर बसून मुलांचे खेळ बघण्यात दंग होऊ लागल्या.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all