Login

मोलकरीण

It's about how a housemaid creates funny scene

मोलकरीण 

मोलकरीण या शब्दातच या व्यक्तिमत्त्वाचं महत्त्व लपले आहे. गृहिणींना आपल्या घरातील माणसांपेक्षा, प्रत्यक्ष नवर्‍यापेक्षाही अनन्यसाधारण महत्त्व या व्यक्तिमत्त्वाला द्यावे लागते. त्यांच्या शिवाय पान हालत नाही. घरातल्यांशी बायका गृहिणी नीट बोलणार नाहीत, घाबरणार नाहीत, उलट उत्तर करतील. परंतु एक मोलकरीण आपल्या मालकिणीला कशी ताब्यात ठेवते, वठणीवर आणते याची कितीतरी उदाहरणे नव्हे जवळपास 90 टक्के घरात हे घडते. काय जादू आहे नाही! ती आली की सखु आलीस का, बस जरा, पाणी देऊ का? आणि हे बघ गरम गरम चहा घे आणि मग बघू लाग कामाला. सखुबाई या सर्वांची वाटच बघत असतात. आपलं महत्त्व येणे किती महत्त्वपूर्ण आहे याची या व्यक्तिमत्वाला म्हणा किंवा सखुला पूर्ण जाणीव असते. आपण आलो नाहीतर काय केविलवाणी आपली मालकीण होईल हे तिला माहीत असते. मग ती म्हणते होऊ देत परवड! मला बाईसाहेब बोलल्या, माझा पगार कापला ना? एवढा त्रास सोसा, करा माझी सेवा, मग मी तुमची कामे करते. घरातील भांडणामुळे एकवेळ बीपी वाढत नसेल. पण अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती अनुपस्थित राहिली तर बिचाऱ्या मालकिणीचे बीपी किती किती वाढत असेल, किती डोके दुखेल याची कल्पनाच न केलेली बरी. आणि सखुबाई मात्र ढिम्म! थापा मारण्यात तरबेज आणि कशी जिरली मालकिणी ची या सुप्त हास्यात गुंग!! तर एवढा पंक्तिप्रपंच करण्याचे कारण म्हणजे माझ्याही आयुष्यात अशीच एक आजी मोलकरीण म्हणून आली होती. आम्ही पनवेलला होतो त्यावेळीची गोष्ट. मला कामाची सवय नव्हती. आईकडे धुणी-भांडी स्वयंपाक असं करण्याचा कधी प्रसंग आलेला नव्हता. लग्न झाल्यावर ही कामे म्हणजे मला संकटच वाटू लागले. काही सुचेनासे व्हायचे. अंथरुणातून उठले की बापरे आता केर काढायचा, कपडे धुवायचे, मग स्वयंपाक झाला, भांडी घासायची. हाय रे देवा काय करू असे व्हायचे. पण इलाज नव्हता. मी माझे पती आणि दीर तिघेच घरात. कामाला बाई कशाला पाहिजे आणि रिकामे बसून तू करणार काय? वेळ जायला नको का? वेळ जाणे, कामाची सवय त्याकरता धुणीभांडी माझ्या बोकांडी बसली. पण थोडे दिवसांनी बदल झाला. मला डोहाळे लागले. उलटया चक्कर यांनी बेजार. मग काय आमच्या घर मालकीण बाईंनी एका आजीला बोलावून आणले. म्हणाल्या या छान काम करतात. प्रामाणिक आहेत. यांचे वय पाहता मला वाटले या कसे काय करणार? पण आजीनाही कामाची गरज होती. त्या म्हणाल्या तुम्ही काळजी करू नका. मला सवय आहे कामाची. आणि हिची म्हणजे माझी लेकीसारखी मी काळजी घेईन. काय हवं, काय नको सगळं मी पाहिन. तिला खाऊ वाटेल ते करून खायला घालीन. मी मनात म्हटलं देवा माझी प्रार्थना ऐकलीस. मला पावलास. तुझ्या किती पाया पडू, किती आभार मानू! 
तर दुसऱ्या दिवसापासून आजी यायला सुरुवात झाली. हे प्राध्यापक होते सायन्स कॉलेजला. सकाळी साडेदहा वाजता जेवण करून जायचे. आजी अकरा वाजता यायच्या. सुरुवातीला आल्या की लगेच सगळा पसारा आवरून घर स्वच्छ करायच्या. मग धुणीभांडी आटपुन घ्यायच्या. त्या आल्या की मी त्यांची चौकशी करायची. काय म्हणता आजी, कसं काय असं बोलायची. नंतर हळूहळू त्या माझ्याशी गप्पा मारायला बसायला लागल्या. अर्धा तास तसेच. मग कसेतरी काम करायचे. नंतर नंतर माझ्याकडे त्या आल्या-आल्या चहा कर म्हणायला लागल्या. मीही भिडस्त स्वभावामुळे रोज त्यांना चहा करायचे. माझे दीर म्हणायचे वहिनी तुमची कसली ही रोजची सवय? तुम्हाला बरे नाही म्हणून त्यांना कामाला ठेवले ना? मला यांचाही धाक वाटायचा. एक दोन दिवस मी त्यांना चहा केला नाही. त्यांना खूप राग आला. आजींनी त्याच्या पुढची गंमत केली स्वतः साखर आणि चहा पावडर घेऊन आल्या. मला एवढे उकळून दे म्हणाल्या. मला कसेतरीच वाटले. तुझ्या घरचे नको बाई मला चहा. तुझी चहा पावडर साखर संपायला नको. मीच आणते एवढा उकळून तेवढे दे. मी पुरती खजील झाले. मी त्यांना म्हटले याची गरज नाही. मी तुम्हाला देते चहा. आता त्यांचा नेम झाला. चहा घ्यायचा आणी फक्त एवढ्यावरच थांबले नाही. मला म्हणायच्या तू आज काय भाजी केलीस गं? मला जरा वरण-भात दे.  त्यावर थोडंसं नको एवढं भरभरून तूप टाक. मला तर काही समजेना. हाही नेम झाला. वालाचे बिरडे केले की लगेच म्हणायच्या मला चपाती आणि बिरडं दे. हे सर्व अधिकारवाणीत करून घ्यायच्या. माझे दीर हा प्रकार बघून खूप चिडायचे. मला एकदा त्या म्हणाल्या गहू वाटीभर भिजत टाक. दोन दिवस झाले के त्याचा चीक काढून ठेव. तुझ्या तब्येतीला चांगला राहील आणि मलाबी होईल. मी ऐकुन न ऐकल्यासारखे केले. दोन दिवस वाट बघून त्यांनी तिसऱ्या  दिवशी स्वतः भिजत घातले. दोन दिवसांनी चीक काढून तो शिजवला. त्यात दूध घालून स्वतःला मोठ्या वाटीत आणि मला छोट्या वाटीत नेवेद्यासारखा दिला. माझ्या दिरांनी सर्व प्रकार यांना सांगितला. हे खूप चिडले. कसले डोहाळे तुझे अन कसला आळशीपणा? उद्या आजीला बंद कर. स्वत:काम करायचे. मला तर ऐकूनच चक्कर आली. हाय रे देवा. आता काय करू? इलाज नव्हता. दोन-तीन दिवसांनी मी आजीला सांगितले मी थोडे दिवस कोकणात गावाला जाणार आहे आल्यावर तुम्हाला बोलवीन. तसा त्यांना खुप राग आला. त्या मला म्हणाल्या खरं ना? मी म्हटलं हो. आलीस की लगेच मला बोलव असं म्हणाल्या. डिंकाचे लाडू करायचेत आपल्याला. मी तर घाबरले. दुसऱ्या दिवसापासून आजी यायच्या बंद झाल्या. तीन-चार दिवसांनी संकष्टी चतुर्थी आली. आम्ही नेहमीप्रमाणे संध्याकाळी गणपतीच्या मंदिरात दर्शनाला गेलो. गर्दी खूप होती. गर्दीत कुणीतरी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि माझे तोंड वळवले. बघते तर काय समोर आजी. माझ्याकडे पाहून म्हणते कशी मला फसवतआहेस ना? इथेच तर आहे तू आणि काय अवस्था झाली चार दिवसात तुझी. उद्यापासून मी येते, चांगलं चांगलं खाऊ घालून खाऊ घालीन माझ्या बाईला तयार करते. अगं बाळांतपण व्हायचंय तुझं. मला तर खरंच चक्कर येऊ लागली. मी गणरायाला म्हटले बाप्पा हिच्यापासून माझी सुटका कर नाही तर माझं काही खरं नाही. शेवटी हेच तिला म्हणाले माझी आई येणार आहे तिची काळजी घ्यायला तुम्ही निवांत राहा. तशी ती निघून गेली. खूपच मजेशीर प्रसंग घडले. पण आपले अनन्यसाधारण महत्त्व दाखवून देण्यात मोलकरणीला खरंच मानलं पाहिजे.

सौ सुखदा रवींद्र पाडळकर
विटा