मोक्ष भाग 1

भयकथा

रात्री वाड्याचे दरवाजे बंद करायला आलेली जानकी दार ठोठावल्याच्या आवाजाने एकदम दचकली. नुकतेच दिवे गेले असल्याने हातात कंदील घेऊन थरथरत्या हाताने तिने दरवाजा उघडला. बाहेर मिट्ट काळोख पसरला होता. पावसाची सुरुवात होणार होती. त्याचा संकेत देणारा वारा जोराने वाहत होता. जवळपास कुठेतरी पाऊस पडला असावा. कारण दरवाजा उघडताच ओल्या मातीचा मंद सुगंध मगाशीच आत शिरला होता.

"कोण आहे?" दारात कोण उभं आहे, हे न दिसल्यामुळे तिने प्रश्न केला. इतक्यात वीज चमकली आणि आत्याबाईंचा चेहरा त्या प्रकाशात उजळून निघाला.

"आत्याबाई, आत्ता कसं येणं केलंत! तेही इतक्या रात्री?" जानकीच्या चेहऱ्यावर मोठं आश्चर्य उमटलं होतं. "एकट्याच आलात? आणि काकासाहेब कुठे आहेत?" तिच्या हातातल्या कंदीलाचा प्रकाश आत्याबाईंच्या चेहऱ्यावर पडला अन् जानकी अचानक मागे सरकली. त्यांचा चेहरा पाहून भीतीने तिच्या पोटात गोळा आला.
"अहो, आईसाहेब..लवकर या."

इतक्यात वाड्यावरून एक टिटवी कर्कश ओरडत पुढे गेली. ते ऐकून जानकीच्या अंगावर सरकन काटा आला.

जानकीच्या आवाजासरशी लक्ष्मीबाई, केशव, नारायणराव धावत आले.
"वन्स, इतक्या रात्री एकट्या कशा आलात? आणि हे काय? ही भराजरी साडी! डोक्यावर पदर नाही, कपाळावर कुंकू नाही अन् तुमच्या अंगावरचे दागदागिने गेले तरी कुठे? काय प्रकार आहे हा? केशवा, त्यांना आत घे आधी." लक्ष्मीबाई मधल्या चौकात उभ्या राहून मोठ्या आवाजात म्हणाल्या.

केशवने पुढे होत आत्याबाईंच्या हातातले सामान एका कोपऱ्यात नेऊन ठेवले.

"वहिनी, त्यांनी पुन्हा घरातून बाहेर काढलं." आत्याबाई तोंडात पदराचा बोळा कोंबत, रडत म्हणाल्या. मी माप विनंत्या केल्या. पण कोणीच बधलं नाही ओ. इतकंच काय तर, सकाळी निघून जाईन म्हणून सासुबाईंच्या पायाही पडले. पण काही एक ऐकलं नाही त्यांनी."

"आणि पुरुषोत्तमराव? नुसते पाहत होते की काय? आपल्या पत्नीची कढ घ्यावी असे वाटले नाही त्यांस? काय हा आगोचरपणा? एका स्त्रीला इतक्या रात्री घरातून बाहेर काढतातच कसे हे? मी म्हणतो, असा पुरुषार्थ काय कामाचा?" नारायणराव भराभर पुढे होत म्हणाले.
"यमुने, आत ये. सुनबाई आधी पाणी घेऊन या."

"पाणी नको दादा. ती दागिन्यांची थैली आधी आत ठेवा. कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून कशीबशी जपून आणली आहे. तुम्ही लग्नात मला घातलेलं स्त्री धन आहे ते आणि याबद्दल एक अवाक्षर कुठेही बोलू नका."

"आत्याबाई, इतक्या रात्रीच्या आलात कशा?"
जानकी न राहवून म्हणाली. तिची नजर सारखी आत्याबाईंच्या भेसूर दिसणाऱ्या चेहऱ्याकडे जात होती.

"नाथाच्या बैलगाडीतून आले. घरचा गोंधळ पाहून त्याला कल्पना आली असावी. गाडीला बैल जोडून आधीच तयार होते. मी बाहेर पडल्यानंतर नाथा हात जोडून पुढे आला. वहिनीसाहेब, इतक्या रातीचं जाऊ नगा म्हणू लागला. पण मी कुठली ऐकते? दोन-चार लुगडी हातात घेतली अन् दागिन्यांचा डबा हळूच थैलीत घातला. आज जीवाचं बरं -वाईट झालं तरी चालेल. या विचाराने मी पट्कन गाडीत बसले.
दादा, आता त्या घरी पुन्हा जाणे नाही." आत्याबाई डोळे पुसत म्हणाल्या.
त्यांचा आवाज काहीसा निराळाच भासत होता. हे लक्षण काही ठीक नव्हे, असा विचार राहून राहून जानकीच्या मनात येत होता.

"उगीच काहीतरी बोलू नका. सासर सोडून असं कुणी माहेरी परत येत नाही. आपण यातून काहीतरी मार्ग काढू." लक्ष्मीबाई त्यांच्या जवळ बसत म्हणाल्या.

"आईसाहेब, काय बोलता हे? त्यांनी आत्याबाईंना घराबाहेर काढायची ही काही पहिलीच वेळ नाही. आज तर हद्द झाली. इतक्या रात्री घराबाहेर काढताना त्यांना लाज कशी वाटली नाही? बाई माणसानं असं एकटं येणं म्हणजे.. वाटेत काही झालं असतं तर? ते काही नाही. उद्याच जातो अन् त्या काकासाहेबाची गचांडी धरतो आणि चांगला जाब विचारतो त्याला." धाकटा नीळकंठ म्हणाला.

"नीळकंठ, रागाला आवर घाला. आपल्यापेक्षा मोठ्या माणसांविषयी बोलायची ही रीत नव्हे." केशव शांतपणे म्हणाला.

"बंधुराज, कमाल आहे तुमची. आपल्याच घरातल्या बाई माणसावर अन्याय होत असताना आपण नुसतं पाहत राहायचं? तुझ्या स्वभावानुसार ते ठीक आहे. पण आम्हाला हे मान्य नाही." नीळकंठ बोलता बोलता
सोप्यात फेऱ्या घालू लागला.

"तुम्ही आत चला वन्स. विश्रांती घेऊन मग, उद्या काय तो सोक्षमोक्ष लावू." लक्ष्मीबाई यमुनेला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. जाताना दागिन्यांची थैली त्यांनी आपल्या सोबत आत नेली.

आता बाहेर जोरात पाऊस सुरू झाला. वाऱ्यासह पावसाचा येणारा आवाज मनात धडकी भरवणारा होता. जानकीच्या मनात नको त्या शंका येत होत्या. पण त्या सांगणार तरी कोणाला? ती गुपचूप केशवच्या मागोमाग खोलीत गेली.

----------------------------------------------

पहाटेची वेळ होती. नारायणराव नुकतेच उठले होते तर लक्ष्मीबाई देवपुजेची तयारी करत होत्या. दरवाज्यावर थापा पडल्याचा आवाज ऐकून लक्ष्मीबाईंनी पुढे जाऊन दार उघडलं. रात्री पडलेल्या पावसाचा मागमूस कुठेही शिल्लक नव्हता. वातावरण कसं अगदी स्वच्छ, मोकळं होतं.
"नाथा! यावेळी काय काम काढलंत?" लक्ष्मीबाई डोक्यावरचा पदर नीट करत म्हणाल्या.

"एक वाईट बातमी हाय म्हणून धावत आलो जी. यमुना वहिनीसाहेब.." नाथाच्या तोंडून शब्द फुटेना. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं.

"कसली बातमी? बोल घडाघडा. नक्की झालंय तरी काय? वन्स आत आहेत. त्यांच्याकडे काही काम आहे का?"

"त्या इथं कशापायी आल्या असतील? त्या तर
पहाटेच गेल्या."

"गेल्या म्हणजे?" लक्ष्मीबाई न समजून म्हणाल्या.

"जीव दिला त्यांनी, जीव.. सगळ्या पुरुष माणसांना बोलवा. गाडी आणली हाय मी." नाथा ओक्साबोक्शी रडत म्हणाला.

नाथाचा आवाज ऐकून नारायणराव लगबगीने बाहेर आले.
"काय चाललंय? कसला गोंधळ आहे?"

"अहो, नाथा काय म्हणतोय बघा. यमुना वन्स गेल्या म्हणे. अशा कशा जातील त्या! मग आत आहेत त्या कोण?" लक्ष्मीबाईंना काहीच कळत नव्हतं. त्या खोलीत बघायला धावल्या.

"दादासाहेब, अहो काल रातीला यमुनाबाईंना घराबाहेर काढलं. त्या हातापाया पडत होत्या तरी बी ऐकलं नाही कुणी. राव नेहमीप्रमाणे धिंगाणा घालत होते. त्याच नशेत त्यांनी अन् बाईसाहेबांनी यमुनाबाईंना बाहेर काढलं. रावांच्या चेहऱ्यावर काळजी, दुःख काहीच दिसत नव्हतं बघा.
म्या जाणाऱ्या बाईंना अडवायचा प्रयत्न केला. पण त्यांचं लक्ष नव्हतं माझ्याकडं. त्या बाहेर पडल्यानंतर मी त्यांच्या मागावर होतो. त्यांना इकडं घेऊन यायचा विचार होता माझा.
पण अचानक त्या गायब झाल्या अन् रात्री उशीरा त्या मागल्या तळ्याजवळ.." नाथा डोळे पुसत पट्कन गाडीत बसला. "चला जी. आणखी उशीर नग व्हायला."

"अहो, वन्स आत नाहीत." लक्ष्मीबाई घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या.

नारायणरावांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भीती, काळजी, भेदरलेपण दाटून आलं. आतल्या खोलीत जाऊन त्यांनी एक नजर टाकली आणि देवघरापुढे जाऊन शंभुरायापुढे हात जोडले. 'समजलो मी..पण हे असं व्हायला नको होतं.' स्वतःशी म्हणत ते पुन्हा बाहेर आले.

नुकतेच उठलेले केशव आणि नीळकंठ नारायणरावांच्या मागोमाग येऊन गाडीत बसले आणि नाथाने गाडीला वेग दिला. दरवाज्याच्या पायरीवर उभी असणारी जानकी हे ऐकून केव्हाच खाली कोसळली होती.

इकडे लक्ष्मीबाईंनी आकांत मांडला होता. 'काल रात्री वन्स खरंच आल्या होत्या? तो भास होता की त्यांचा आत्मा! की दागिने योग्य ठिकाणी पोहोचवण्याची त्यांची इच्छा होती ही? की त्यांना आम्हा सर्वांना शेवटचं भेटायचं होतं?' स्वतःला सावरावं की जानकीला? लक्ष्मीबाईंना कळत नव्हतं. मनात विचारांचं काहूर घेऊन लक्ष्मीबाईंनी आत जाऊन पुन्हा एकदा दागिन्यांची थैली तपासली. सगळे दागिने अगदी जसेच्या तसे होते.

'कसं शक्य आहे हे?' ते दागिने तळघरातल्या चोरकप्प्यात ठेऊन त्या घाईघाईने वर आल्या. वाड्याच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आपल्या भाडेकरूला वाड्यावर लक्ष ठेवायला सांगून त्या बाहेर आल्या. जानकी बऱ्यापैकी सावरली. तशा या दोघी अन् दोन गडी बायका नाथाने मागाहून धाडलेल्या गाडीत बसल्या.

"आईसाहेब, काय झालं हे? आत्याबाई खरंच आल्या होत्या की आपल्या सर्वांना भास झाला! तो भास होता तर ती दागिन्यांची थैली?"
लक्ष्मीबाईंनी जानकीच्या तोंडावर हात ठेवला. "सुनबाई, इथून पुढे याबाबत कधी कोणाशी चर्चा करू नका. ही आमची विनंती समजा नाहीतर आज्ञा." लक्ष्मीबाईंचे डोळे एकसारखे वाहत होते. या क्षणी काय खरं अन् काय खोटं, याचा विचार त्यांना अजिबात करावासा वाटत नव्हता. लेकीप्रमाणे लहानाची मोठी केलेल्या यमुनेच्या आठवणीत त्यांना खूप रडावसं वाटत होतं.
पण अश्रू डोळ्यांच्या कडांवर येऊन अडले होते. यमुनेच्या सासरी जाऊन नक्की काय झालं? हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात दाटून आली.

जानकी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मूकपणे रडत होती. आत्याबाई खरंच आल्या होत्या की ते आणखी काही होतं? भीतीने, दुःखाने तिच्या डोळ्यांवर झापड आली.

काही वेळाने अचानक गाडी थांबली आणि आणि समोरचं दृश्य पाहून जानकीच्या जीवाचा थरकाप उडाला.

क्रमशः


🎭 Series Post

View all