मोकळं आभाळ भाग ९

ही एक सामाजिक कथा..एका स्त्रीच्या संघर्षाची..

मोकळं आभाळ.. भाग ९

पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, पोलीस स्टेशनमध्ये आकाशने रेवतीला धमकवल्यामूळे रेवती खूप घाबरली होती. अनघा आणि तिच्या कुटुंबियांना त्रास नको म्हणून तिने दुसरीकडे राहायला जाण्याचा निर्णय घेतला. अनघाने तिच्या मित्राच्या ओळखीने एक फ्लॅट भाडे तत्व करारावर घेण्याचे ठरवले. आता पुढे..

मोकळं आभाळ.. भाग ९

राजेशचा निरोप घेऊन अनघा आणि रेवती आपल्या घरी परतल्या. घरी परतत असताना रेवतीच्या डोक्यात फ्लॅटच्या डिपॉझिटचा विषय घोळत होता. अनघाच्या ओळखीमुळे डिपॉझिटची रक्कम एक लाखवरून  पन्नास हजार  झाली खरी पण तितकीही रक्कम तिच्याजवळ नव्हती. इतकी सुशिक्षित असूनही तिने कधीही बँकेच्या व्यवहारात लक्ष घातले नव्हते. सगळं आकाशच पाहत होता. मोजक्याच कपड्यांनिशी ती घराबाहेर पडली होती. काय करावं? उमजत नव्हतं.. त्याच विचारात ती घरी पोहचली. अनघाला मैत्रीणीच्या मनात चाललेली चलबिचल समजत होती. अनघाही नुकतीच नोकरीला लागली होती. त्यामुळे तिच्याकडेही फारशी बचत नव्हती.तिलाही खूप चिंता वाटत होती. 

रात्रीची जेवणं आटोपली.उरलेली सर्व कामे उरकून रेवती आणि अनघा झोपण्यासाठी आपल्या खोलीत निघून गेल्या. खोलीत आल्यावर अनघा म्हणाली,"रेवा, तुझी चिंता मी समजू शकते. तू काळजी करू नकोस. अशा कठीण परिस्थितीतून नक्कीच मार्ग निघेल. हे बघ माझ्याकडे हे दहा हजार रुपये आहेत बाकीच्या रक्कमेचीही सोय होईल काळजी करू नकोस". रेवतीच्या डोळ्यांत पाणी आलं. अनघाशी रक्ताचं नातं नसतानाही वेळोवेळी ती मदतीला धावून आली. कसले हे ऋणानुबंध..!! तिने साश्रुपूर्ण नयनांनी अनघाकडे पाहिलं. मनोमन तिचे आभार मानले. चेहऱ्यावरून हात फिरवत असताना सहज तिचं लक्ष तिच्या हातातल्या आईने दिलेल्या सोन्याच्या बांगड्याकडे गेलं. पाठवणीच्या वेळीस तिच्या आईवडिलांनी तिला दिल्या होत्या. सासरी आल्यानंतर तिच्या सासुसासऱ्यांनी तिच्या अंगावरचे सगळेच दागिने सुरक्षिततेचं कारण सांगून काढून घेतले होते. त्या बांगड्या मात्र तिने त्यांच्यापासून सांभाळून किंबहूना लपवूनच ठेवल्या होत्या. काचेच्या हिरव्या बांगड्यामध्ये घातल्यामुळे त्या उतरवायच्या राहून गेल्या होत्या.  तिने विचार केला," उद्या सोनाराकडे जाऊ आणि या बांगड्या मोडून किती पैसे येतात ते बघू. अशा कठीण परिस्थितीतच सोनंनाणं उपयोगी पडतं ना..!!  जास्त रक्कम आली तर अनघाचे दहा हजार रुपये परत देऊन टाकू" मनात मांडे सुरू झाले. मार्ग मिळाला म्हणून तिला थोडं हायसं वाटलं होतं. तिने अनघाला तिच्या मनातला विचार बोलून दाखवला. तिनेही सारासार विचार करून रेवतीच्या या विचाराला दुजोरा दिला. 

दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यापूर्वी अनघा आणि रेवती अनघाच्या ओळखीच्या सोनाराकडे गेले. अनघा म्हणाली," नमस्कार काका, तुमच्याकडे एक काम घेऊन आलेय. ही माझी मैत्रीण रेवती. तिला थोड्या पैशांची गरज होती म्हणून तिला तिच्या बांगड्या मोडायच्या आहेत बघा बरं किती रक्कम होतेय?" रेवतीने हातातल्या बांगड्या काढून सोनराला दिल्या. "मोडीचे किती पैसे होतील?" तिने सोनराला प्रश्न केला. सोनाराने बांगड्या नीट तपासून पाहिल्या. "पावती आहे का याची?" त्याने प्रश्न केला. "नाही" रेवतीने उत्तर दिलं. सोन्याच्या चार बांगड्या होत्या. जवळजवळ तीन-चार तोळ्याच्या.,कमीतकमी लाखभर तरी त्यांची किंमत होती"पावती असती तर जास्त रक्कम मिळाली असती. पण पावती नसल्याने तुम्हाला याचे साठ हजार देतो. बोला मोडायची का? मोडीचा भाव पंधरा हजार रुपये तोळा आहे.तुम्ही अनघाताईंच्या ओळखीने आलात म्हणून जास्त काही बोलत नाही. देऊ का पैसे?" रेवतीने 'हो' म्हटलं  तसं सोनाराच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली.कारण त्याच्यासाठी हा नुकसानीचा व्यवहार मुळीच नव्हता. त्याने त्यांना थोडावेळ बसायला सांगितलं आणि आपल्या घरी फोन करून त्याच्या मुलाला येताना साठ हजाराची रक्कम आणायला सांगितली.  थोड्याच वेळात सोनाराचा मुलगा रोख रक्कम सोबत घेऊन आला. सोनाराने ती रक्कम रेवतीकडे दिली. आईची आठवण असलेल्या बांगड्या मोडताना रेवतीचा जीव व्याकुळ होत होता. पण तिच्याकडे पर्याय नव्हता. दोघींनी सोनाराचे आभार मानले आणि तिथून ऑफिसला जाण्यासाठी निघाल्या. जाताना रेवतीने अनघाने दिलेले दहा हजार रुपये परत केले आणि सोनाराने दिलेली रक्कमही अनघाला देऊन टाकली आणि सुरक्षित व्यवहार म्हणून अनघाच्या अकाउंटमधून चेक देण्याचं ठरवलं. 

दोघीही आपपल्या ऑफिसला गेल्या. अनघाने ती रक्कम बँकेत तिच्या अकाउंटला जमा केली. आणि देशपांडेच्या नावाने चेक बनवून पर्समध्ये ठेवून दिला. राजेशला फोन करून करारपत्र करून ठेवायला सांगितलं. आणि संध्याकाळी भेटण्याची वेळ निश्चित केली. ऑफिसवरून सुटल्यावर अनघाने उरलेली दहा हजाराची रक्कम रेवतीला दिली. पुढील काही दिवस त्याच पैशांवर तग धरून राहायचं होतं. थोड्या वेळाने अनघा आणि रेवती तडक राजेशसोबत वकिलांकडे गेल्या. घराचे मालक देशपांडेही तिथे पोहचले.  वकिलांनी आधीच कागदपत्रं बनवून ठेवली होती. देशपांडे आणि रेवतीकडून पॅनकार्ड, आधारकार्डच्या छायाप्रती घेतल्या. त्या करारपत्रासोबत जोडल्या. दोघांनी त्यावर सह्या केल्या. अनघाने सोबत आणलेला चेक देशपांडे यांना दिला. आणि देशपांडेनी घराची किल्ली रेवतीच्या हाती दिली. एक व्यवहार झाला. आता रेवतीकडे घराचा ताबा असणार होता. रेवतीने राजेशला त्याचं कमिशन देऊन टाकलं.  आभार मानत राजेश कमिशन घेऊन निघून गेला. सर्व गोष्टी तडीस जात होत्या. एकेक प्रश्न सुटत चालला होता. 

सुट्टीचा दिवस, रविवार पाहून रेवतीने नवीन घरी जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी रेवती अनघाला सोबत घेऊन नवीन घरी आली. अनघाच्या आईने रेवतीला जाताना तिच्या सोबत थोडी भांडी किरकोळ किराणा माल, एक छोटा गॅस स्टोव्ह, थोडं अंथरूण आणि गरजेच्या वस्तू दिल्या. तिला मदत करण्याचा छोटासा प्रयास.. आणि आशीर्वाद म्हणून तिच्या हातावर बाळकृष्णाची पंचधातूंची मूर्ती हातावर ठेवत आई म्हणाली,"आता हाच तुझं रक्षण करेल मुली..!" रेवतीने आईला घट्ट मिठी मारली. डोळ्यातलं तळं रीतं होऊ लागलं. अनघाचेही डोळे भरून आले. अनघाने नवीन घरी आल्यावर सर्व वस्तू जागच्या जागी लावून दिल्या. छोट्याशा पाटावर  बालकृष्णाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, स्थापना केली. गोड शिऱ्याचा नैवेद्य केला. अनघाने एक दिवस तिथे मुक्काम केला. आणि मग रेवतीचा निरोप घेऊन अनघा आपल्या घरी परतली. 

रेवतीच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली. एक टप्पा तिने पार केला होता पण अजून बराच लांबचा पल्ला तिला गाठायचा होता. पुढे अजून एक नवीन संकट दबा धरून बसलं होतं. त्याच रात्री रेवतीच्या आईचा फोन रेवतीच्या मोबाईलवर आला. रेवतीला आईचा फोन आलेला पाहून  अतिशय आनंद झाला.पण तिचा तो आनंद फार काळ टिकला नाही. क्षणाचाही विलंब न करता तिने फोन उचलला. रेवती घाईघाईने म्हणाली," हॅलो आई, कशी आहेस?" तिचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच पलीकडून रेवतीची आई रेवतीच्या अंगावर खेकसून म्हणाली,"रेवती, काय नाटक आहे हे? तू नवऱ्याचं घर सोडलंस? जावईबापूनी आम्हाला सगळं सांगितलं आहे.ही सगळी थेरं बंद कर आणि गुपचूप आपल्या घरी परत जा. तेच तुझं घर. त्या घरातून तुझी अंतिमयात्राच निघेल. हे लक्षात ठेव. छोटीमोठी भांडणं होतच राहतात. म्हणून काय कोणी घर सोडतं?" 

आईचा रागाचा पारा चढलेला होता. तिला समजावण्याचा सुरात रेवती म्हणाली," आई, तो मला जनावरांसारखा मारत होता ग..! सतत वाद घालायचा, कमी लेखायचा, संशय घ्यायचा, कोणाशी बोलायचं नाही,  काही संबंध नाही शेजाऱ्यांशी.. कोणी चुकून बोललं तरी घरी आल्यावर खूप मारायचा. दोन दोन दिवस उपाशी ठेवायचा. कशी राहू त्याच्या सोबत? नोकरी करायला पाठवलं मला त्याने. कारण त्याला माझा पगार हवा होता. आणि मग दिवसभर राबायचं मी आणि हा माझा सगळा पगार घ्यायचा. त्याचं पण काही नाही ग.. पण माहेरून पैसे आण म्हणून त्याने तगादा लावला. मी नकार दिल्यावर त्याने मला मरेपर्यंत मारलं ग..!!अनघा होती म्हणून मी उभी राहतेय आई..!!"

रेवतीची आई पुन्हा तिला म्हणाली," अग रेवती, हे सगळ्याच स्त्रियांना थोड्या फार प्रमाणात सहन करावंच लागतं. तेच त्यांचं प्राक्तन. आम्ही नाही का सहन केलं? असं तुझ्यासारखं घर सोडून नाही गेलो. थोडं मारलं म्हणून बिघडलं कुठं? नवऱ्याचा अधिकारच तो. म्हणून काय असं घर सोडायचं? लोक काय म्हणतील? 'नवऱ्याने टाकलेली बाई' म्हणून सगळे तुझी अवहेलना करतील.  आमची समाजात काय प्रतिष्ठा राहील? कशी राहशील? कशी जगशील? इतकं सोप्प नाही एकट्या स्त्रीने असं एकटं राहणं? ते काही नाही तू आताच्या आता तुझ्या घरी निघून जा"  

आईचं बोलणं रेवतीच्या जिव्हारी लागत होतं. एक स्त्री म्हणून आपली आई आपल्याला समजून घेत नाही या गोष्टीचं तिला खूप वैषम्य वाटलं. पण तिने मनाशी पक्का  निर्धार केला होता. ती ठामपणे आईला म्हणाली,"नाही आई, हे कदापिही शक्य नाही. मी परत त्या नरकात कधीच जाणार नाही." तिचं बोलणं ऐकून आई खूप चिडली आणि संतापाने रेवतीला म्हणाली," ठीक आहे, तुला तुझ्या मनाचंच करायचं असेल तर खुशाल जा. पण या पुढे तुझे आईवडील तुझ्यासाठी कायमचे दूर गेले., स्वर्गवासी झाले असं समज आणि यापुढे परत कधीही फोन करू नको. माझाही हा शेवटचा फोन असेल. यापुढे तू आणि तुझं नशीब.. आमचा तुझ्याशी कोणत्याही संबंध नाही" आणि तिच्या आईने खाडकन फोन ठेवून दिला. 

रात्र बरीच झाली होती. रेवतीला नीज येत नव्हती. दुःखाच्या काजाळीने सारं अंधारून आलं होतं. डोळ्यातला श्रावण अविरत बरसत होता.आईचे शब्द पुन्हा पुन्हा तिला आठवत होते. रक्ताची नाती दुरावली होती. 

पुढे काय होतं? रेवती यातून कसा मार्ग काढेल? ते पाहूया पुढील भागात…

क्रमशः

©® निशा थोरे( प्रत्युषा)

🎭 Series Post

View all