Dec 03, 2020
सामाजिक

मोकळं आभाळ भाग ७

Read Later
मोकळं आभाळ भाग ७

मोकळं आभाळ.. भाग ७


पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की,  आकाश ठाणे पोलीस स्टेशनला पोहचला. रेवती आणि अनघाही तेथे हजर झाल्या. सुरुवातीला आकाश सभ्यतेचा आव आणत काहीच घडलं नाही असं भासवत होता. पण रेवतीने स्वतःहून सर्व सांगितल्यावर इन्स्पेक्टर राणेंनी त्याला अटक करून तुरुंगात घेऊन जायला सांगितले. हवालदार शिंदे आकाशाला घेऊन आत जाणार इतक्यात आकाशचे वकील पोलीस स्टेशनमध्ये पोहचले.. आता पुढे..

मोकळं आभाळ.. भाग ७

“एक मिनिट साहेब, तुम्ही त्यांना अटक करू शकत नाहीत. मी त्यांचा वकील आणि हा माझ्या अशीलांचा जामीन.." सर्वांच्या नजरा त्या आवाजाच्या दिशेने वळल्या. आकाशचे वकील कटारिया आत येत होते. आकाशच्या वकिलांनी जामीनाचे कागदपत्रं इन्स्पेक्टर राणेंसमोर आदळले आणि मोठ्या तोऱ्यात आकाशाला म्हणाले," पारेख साहेब, तुम्ही बिलकुल चिंता करू नका.. जो पर्यंत तुमचा वकील जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही" आकाशने अँँड. कटारियांना हसत हस्तोलंदन केलं.आकाशने आधीच तरतूद करून ठेवली होती. त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.

इन्स्पेक्टर राणेंनी जामीनाचे कागदपत्रं नीट तपासून पाहिली. आता मात्र त्यांचा नाईलाज झाला. आकाशला सोडून देण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता. हताश होऊन इन्स्पेक्टर राणे म्हणाले, “पाहिलंत मॅडम, यांच्यासारख्या लोकांमुळेच या मॅडमसारख्या स्त्रियांना न्याय मिळत नाही. कटारिया साहेब, घेऊन जा तुमच्या अशिलाला." आणि त्यांनी हवालदार शिंदेंना आकाशला खुणेनेच सोडून द्यायला सांगितले. 

हवालदार शिंदेचा हात झटकत आकाश छद्मीपणे हसत म्हणाला,“मला तुरुंगात डांबून चोप देणारा अजून जन्माला यायचा आहे.. समजलं का? आता बघशील रेवती तू पूढे काय होतंय ते. बघू कोण तुला वाचवतं ते! फिरून तुला माझ्याकडेच यावं लागेल.."आणि तो त्याच्या वकिलांसोबत तिथून तडक बाहेर पडला. अनघा आणि रेवती इन्स्पेक्टर राणेंकडे पाहत राहिल्या. राणे साहेबांच्या डोळ्यांत चीड आणि असहाय्यतेची भावना स्पष्ट दिसत होती. रेवती आणि अनघा दोघीही नाराज झाल्या. आकाशला असं निघून जाताना पाहून रेवतीची हिंमत ढासळू लागली होती. आंधळी न्यायदेवता रेवतीच्या डोळ्यांसमोर पटकन तरळून गेली. निर्ढावलेल्या जनावरांच्या समोर हात टेकावेत आणि माघार घ्यावी तसंच काहीसं रेवतीच्या मनाला वाटू लागलं. पुढचा विचार करतच दोघी पोलीस स्टेशन मधून बाहेर पडल्या.

'काय करावं?' रेवतीला काहीच समजत नव्हतं. विचारांच्या तंद्रीतच दोघी घरी पोहचल्या. रेवतीला असं सैरभैर झालेलं पाहून अनघाचा जीव तुटत होता. पण तिला रेवतीला कोसळू द्यायचं नव्हतं. अनघा रेवतीला धीर देत म्हणाली," रेवा, तू अजिबात घाबरायचं नाही. काही होणार नाही उद्यापासून तुला ऑफिसला जायचं आहे. आपल्या नेहमीच्या 'लेडीज स्पेशल'ने. सगळ्या मैत्रिणी तुझी किती वाट पाहत आहेत माहिती का तुला..!. रेवा, तुला आता खंबीरपणे उभं राहायचं आहे. ही तुझ्या अस्तित्वाची लढाई आहे, तुलाच लढायची आहे. आकाश सारख्या नराधमांना शिक्षा व्हायलाच पाहिजे हे अगदी खरं आहे.. आणि ती त्याला झालीही तुझ्या सारख्या सुंदर आणि सोज्वळ पत्नीला त्याला गमावावं लागतंय हेच त्याचं दुर्दैव..!  आता तू मागे वळून पाहायचं नाही. मी तुझ्या सोबत कायम आहे. हे कधीच विसरू नकोस. कळतंय का? मी काय म्हणतेय ते?" आणि तिने हसून रेवतीचा हात हातात घेतला.

अनघाच्या त्या आश्वासक स्पर्शाने रेवतीला जणू लढण्याची ऊर्मी मिळाली. काहीही न बोलताच फक्त डोळ्यांच्या भाषेने तिने अनघाचे मनोमन आभार मानले. मनात पक्का निर्धार केला.. रेवतीने तिच्या ऑफिसमध्ये फोन केला प्रकृती ठीक नसल्याचं आधीच कळवलं होतं. 'उद्यापासून कामावर रुजू होतेय' असा निरोप तिच्या वरिष्ठांना कळवला. आणि ती आपल्या पुढच्या तयारीला लागली. अनघाची आई नको नको म्हणत असताना रेवती स्वयंपाकघरात आईला स्वयंपाक बनवण्यासाठी मदत करत होती. अनघानेही आज ऑफिसला सुट्टी घेतली होती. रेवती आणि अनघाने मिळून स्वयंपाक केला. दुपारच्या जेवणाची तयारी झाली. सर्वांची जेवणं झाली. रेवतीने उर्वरित कामे उरकून घेतली. भांडी घासून किचन ओटा स्वच्छ पुसून घेतला. त्यानंतर त्या दोघी  वामकुक्षी घेण्यासाठी अनघाच्या खोलीत गेल्या. बिछान्यात पडल्यावर रेवतीच्या मनात विचार घोळू लागले., अनघामुळे तिच्या राहण्याचा प्रश्न तात्पुरता मिटला होता. अनघामुळे निदान डोक्यावर छप्पर तरी लाभलं होतं. नाहीतर कुठे गेली असती मुंबईच्या गर्दीत.? पण तिला आकाशचे पोलीस स्टेशनमधले शब्द आठवत होते. त्यामुळे ती पुरती घाबरली होती. आकाश अनघाला, तीच्या आईवडिलांना त्रास देईल की काय? ही  शंका तिला त्रास देत होती.  तिला अनघाला, आपल्या जिवलग मैत्रिणीला आणि तिच्या कुटुंबियांना संकटात टाकायचं नव्हतं. त्यामुळे लवकरात लवकर तिला स्वतःची दुसरीकडे सोय करणं निकडीचं होतं." काहीतरी मार्ग शोधला पाहिजे" ती स्वतःशीच पुटपुटली. 

वामकुक्षी झाल्यानंतर चहा घेता घेता रेवतीने अनघाकडे तिच्या दुसरीकडे राहण्याचा विषय काढला.," अनु एक बोलू का ग? तू आजवर माझ्यासाठी खूप केलंस ग.! तुझ्या खंबीर आधारामुळे मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. पण अनु, मला तुला कोणत्याही संकटात टाकायचं नाहीये. तुला आठवतंय ना! आकाश पोलीस स्टेशनमधून जाताना काय म्हणाला होता?, प्लिज समजून घे अनु, आणि माझ्यासाठी तुझ्या घराजवळच दुसरं भाड्याचं घर पाहून दे. प्लिज रागावू नकोस माझ्यावर" रेवती काकुळतीला येऊन तिला विनंती करत होती. आधी अनघा तिच्यावर रागावली. पण नंतर रेवतीचं म्हणणं तिने मान्य केलं. अनघाने तिच्या मित्राला, राजेशला फोन केला. राजेश जागेच्या, फ्लॅटच्या खरेदीविक्रीचे व्यवहार, भाडेतत्त्वावर प्लॅट मिळवून देणे, अशी कामे करायचा. त्याच्या मोबदल्यात कमिशन घ्यायचा. राजेशची बोलल्यानंतर अनघाच्या घराजवळ एक वन बीएचके फ्लॅट उपलब्ध असल्याचं समजलं.' उद्या फ्लॅट पाहायला येतो तेव्हाच बाकीच्या व्यवहाराचं बोलू' असं सांगून अनघाने फोन ठेवून दिला. रेवतीलाही तिने ही बातमी दिली. "उद्या ऑफिस सुटल्यावर जाऊन बघून येऊ. आता खुश ना राणी सरकार.!" असं म्हणत तिने प्रेमाने रेवतीला मिठी मारली. रेवतीच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. 

एव्हाना रेवती घर सोडून गेल्याची बातमी रेवतीच्या माहेरी पोहचली होती. आकाशने त्याच्या आईवडिलांना आणि  सासूसासऱ्यांना आरडाओरडा करून कळवलं होतं. रेवती कशी वाईट आहे, त्याचा किती छळ करते अगदी रंगवून सांगितलं होतं. 

पुढे काय होतं? रेवतीच्या माहेरची, सासरची माणसं तिला समजून घेतील का?  पाहूया पुढील भागात…

क्रमशः
©® निशा थोरे( प्रत्युषा)

Circle Image

Nisha Sanjay Thore

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.