मोकळं आभाळ भाग ५

ही एक सामाजिक कथा.एका स्त्रीच्या संघर्षाची कथा


 

मोकळं आभाळ.. भाग ५

पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की,  रेवतीची चार पाच दिवस भेट न झाल्याने अनघा तिला भेटायला घरी आली. रेवतीच्या चेहऱ्यावरच्या मार लागलेल्या खुणा पाहून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आकाशच्या घरच्यांनी फक्त हुंडयासाठी आकाश आणि रेवतीचा विवाह लावून दिला होता. आकाश एक व्यसनी, बाहेरख्याली, कर्जात बुडालेला युवक होता. तो रेवतीला 'माहेरून पैसे आण' म्हणून तगादा लावला होता. तो रेवतीला त्रास देत होता. मारहाण करत होता. आता पुढे..


 

मोकळं आभाळ.. भाग ५


 

रेवतीने अनघाला तिची कथा, व्यथा सांगितली. ऐकून अनघाला खूप वाईट वाटत होतं. डोळ्यांतून पाणी वाहत होतं.आता मात्र अनघाच्या अश्रूंची जागा रागाच्या अंगाराने घेतली होती.. अनघाच्या हाताच्या मुठी वळू लागल्या होत्या..तिचं सर्व कहाणी ऐकून झाल्यावर अनघा तिला संतापून म्हणाली," रेवा, का हे सगळं सहन केलंस? करत आहेस? आकाश तुला मानसीक त्रास देतच आहे त्याच बरोबर आता तुला शारीरिक इजा पण करतोय. हे चुकीचं नाही का? एखादं नातं सांभाळता येत नसेल तर तर ओझं का बाळगावं? झुगारून का नाही टाकायचं? अग रेवा!!अशाने तू हुंडाबळीला खतपाणी घालत आहेस.. का नाही आकाशविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केलीस? लोक काय म्हणतील म्हणून? हे असलं सहजीवन? हा असला कसला  संसार?" 

रेवती रडवेली होऊन म्हणाली,"अनघा काय करू ग? आईवडिलांनी माझ्यासाठी घरचे दरवाजे कधीच बंद करून घेतलेत ग! मुंबई सारख्या एवढ्या मोठ्या शहरात कुठे जाऊ? कोणाचा आधार घेऊ? मला काहीच समजत नाहीये" 

अनघा बोलू लागली," रेवा, तू सुशिक्षित, उच्च पदावर नोकरीला.. स्वावलंबी स्त्री.! मग का ही भीती? लोक काय म्हणतील? म्हणून तू जगणं सोडून देणार आहेस का? आणि का सोडावं? का तुला कोणाचा आधार हवाय? तू करू शकतेस सगळं? तुला काहीही सहन करण्याची गरज नाही. आणि तुझी इच्छा असेल तर नक्कीच मार्ग मिळेल. तू आजवर हे सगळं सहन केलंस.. तुझी काहीही चूक नसताना.. यापुढे तू हे सहन करणार नाहीस..मी तुला ते सहन करू देणार नाही..उठ..चल..आपण आकाश विरुध्द पोलिसांत तक्रार दाखल करणार आहोत.. तू स्वावलंबी आहेस.. स्वतःच्या पायांवर उभी!! झुगारून दे ही नको असलेली बंधन..तोडून टाक या नात्याच्या बेड्या..एक लक्षात ठेव..हिंसा, अन्याय करणारा जितका गुन्हेगार असतो तितकाच तो सहन करणाराही गुन्हेगार असतो ग राणी..!! आता तू सहन करणार नाही..तू मुळीच घाबरायचं नाही.. मी कायम आहे तुझ्यासोबत.."

रेवती रडत रडत म्हणाली," पण आकाशची पोलिसांत तक्रार करायची म्हणजे माझ्याच नावाची बदनामी.. माझा संसार मोडेल ग..आणि परत याच घरी परतायचं म्हटल्यावर कशी तक्रार करू ग.?  अनघा त्वेषाने तिला म्हणाली,"अग मग काय आयुष्यभर असंच सहन करत राहणार का? त्याला शिक्षा नको व्हायला? आणि तू सहन करत राहिलीस तर तो अजूनच चिथावेल. तुला त्रास देईल. आणि कोणता संसार मोडण्याची तुला भीती वाटते? हा असला.!!  जिथे जोडीदाराला गुलामासारखं वागवलं जातं. तो तुझ्या चारित्र्यावर शंका घेतो? कोणाशी बोलू देत नाही. जनावरांना मारावं तसं मारतो. अशा माणसासोबत तू कशी राहू शकतेस? ते काही नाही.. ज्याने तुला इतकी मारहाण केली. त्याला शिक्षा व्हायलाच हवी."

अनघाच्या बोलण्याने रेवतीला कोण उभारी आली कोण जाणे!! एक नवचैतन्य संचारलं. अनघाच्या रूपाने तिला एक दिव्यशक्ती लाभली जणू.! तिच्यातला आत्मविश्वास जागवणारी,अन्यायाविरुद्ध लढायला शिकवणारी, आकाशने केलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध उभं राहायला बळ देणारी एक दुर्गा रेवतीला गवसली होती. तिने घर सोडून जाण्याचा निश्चय केला.माहेरच्या घरून आणलेल्या काही मोजक्या साड्या, ड्रेस घेतले.तिने तिची बॅग भरली.  एकवेळ शेवटचं सर्वत्र घरभर नजर फिरवली. स्वतःच्या हाताने सजवलेल्या संसार सोडून जायचं तिच्या थोडं जीवावर आलं होतं. पण तिने मनाशी दृढ निश्चय केला होता. रेवतीने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून टेबलवर ठेवून दिलं.ते नको असलेलं बंधन तोडून टाकलं होतं.. निदान तसं पाऊल तरी उचललं होतं. अनघाने रेवतीचा हात धरून तिला घराबाहेर आणलं.दरवाजाला कुलूप लावून रेवतीने घराची किल्ली शेजारच्या काकूंकडे दिली आणि अनघाचा हात धरून ती निघाली नव्या वाटेने, नव्या दिशेच्या शोधात.. आज तिने घराचा उंबरठा ओलांडला होता.

थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांना ठाणे पोलीस स्टेशन लागले.त्यांनी आकाशविरुद्ध  मारहाणीची, मानसिक छळ केल्याची तक्रार नोंदवली. रेवतीने घाबरत घाबरत सर्व कथा पोलीस अधिकाऱ्यांना सांगितली.त्यांनी रीतसर तक्रार नोंदवून घेतली आणि लवकरच कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं.. आता पुढे काय? रेवती समोर यक्षप्रश्न उभा होता. घर तर सोडलं होतं. पण पुढे कोणतं संकट दबा धरून बसलं होतं? तिला काहीच कल्पना नव्हती.  आकाशाला हे सारं समजल्यावर तो कसा वागेल? तिचे सासू सासरे, आईवडील काय म्हणतील? अशा अनेक प्रश्नांची मालिका डोळ्यांसमोर फेर धरून नाचू लागली. पण आता  तिला आकाशसोबत राहणं असह्य झालं होतं. म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. उर्वरित आयुष्य तिला तिच्या मनाप्रमाणे जगायचं होतं. आणि म्हणूनच ती पुढे काय होईल? याची तमा न बाळगता घराबाहेर पडली होती. आज रेवती खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली होती.. मोकळा श्वास घेणार होती.

अनघा आणि रेवती पोलीस स्टेशनमधून आकाशविरुद्ध रीतसर तक्रार करून बाहेर पडल्या. बरीच रात्र झाली होती. अनघा रेवतीला म्हणाली,"रेवा, तू आज माझ्या घरी चल, उद्या ठरवू काय करायचं ते.यातून नक्कीच मार्ग निघेल" रेवतीने होकारार्थी मान डोलावली आणि त्या दोघी अनघाच्या घराकडे निघाल्या. घरी आल्यानंतर अनघाने सर्व वृतांत तिच्या आईबाबांना सांगितला. त्यांनाही खूप वाईट वाटलं. अनघाची आई रेवतीला म्हणाली," मुली, जशी आम्हाला आमची अनघा तशीच तू.. तुला हवे तितके दिवस तू निश्चिंत रहा.. अजिबात काळजी करू नको. चल पटकन आवरून ये. जेवायला पानं वाढते. आणि झोपताना तुला प्यायला  हळद घालून गरम दूध देते. म्हणजे तुला थोडं बरं वाटेल" अनघाच्या आईच्या बोलण्याने रेवतीला गलबलून आलं आणि तिने आईला घट्ट मिठी मारली. रेवतीला तिच्या आईच्या कुशीत असल्याचा भास झाला. अश्रूंना मोकळी वाट मिळाली. इतके दिवस साचलेलं दुःख वाहून जायला लागलं.आसवांची  बरसात झाली.

आकाशला नेहमीप्रमाणे कुठल्याशा बारमध्ये मद्याचे प्याले रिचवत होता. इतक्यात त्याला एक फोन आला. त्याने 'हॅलो'  म्हणताच समोरून एक व्यक्ती बोलू लागली. "हॅलो,  मि. आकाश, मी ठाणे पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर राणे बोलतोय. तुमच्या विरुद्ध तुमच्या पत्नीने,म्हणजेच रेवती पारेख यांनी मारहाणीची, मानसिक छळ केेल्याची तक्रार  नोंदवली आहे. ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये या. नाहीतर तुमच्या विरुद्ध अटक वॉरंट जाहीर करावं लागेल. आकाश नशेत धुंद होता. तरीही त्या अवस्थेतही तो त्यांना म्हणाला," नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझी बायको असं काही करूच शकत नाही. दुसरं कोणीतरी असेल साहेब". यावर इन्स्पेक्टर राणेंनी आकाशाला त्याच्या घरचा पत्ता सांगितला. काही गोष्टींची माहिती दिली. आता मात्र आकाशची खात्री पटली की पोलीस तक्रार रेवतीनेच केलीय. डोळ्यावर चढलेली नशेची धुंदी खाडकन उतरली. आणि " लगेच येऊन भेटतो" असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला.

आकाशाची कार भरधाव वेगाने घराच्या दिशेने  निघाली होती. घरी परतत असताना आकाशच्या मनात पूर्ण रस्ताभर तोच विचार येत होता.  त्याला संभ्रमात टाकत होता. "खरंच रेवतीने पोलीस तक्रार केली?कधीही तोंड वर करून न बोलणारी रेवती, कुठून आली तिच्यात इतकी हिंमत? नाही काहीतरी गल्लत होत असावी." तो स्वतःशीच बडबडत होता. विचारांच्या तंद्रीत तो घरी कधी पोहचला त्यालाच समजलं नाही. कार पार्किंगमध्ये त्याने गाडी लावली. आणि तो लिफ्टने अकराव्या मजल्यावर पोहचला. त्याच्या घराच्या दारावर कुलूप होतं. आता मात्र त्याच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. म्हणजे इन्स्पेक्टर राणे म्हणत होते ते खरं होतं?  खरंच रेवतीने पोलीस तक्रार केली होती? इतक्यात शेजारच्या काकू आल्या आणि त्यांनी आकाशाला त्याच्या घराची चावी दिली. आकाशने दार उघडलं. घरात प्रवेश केल्यावर टेबलावर पडलेलं रेवतीचं मंगळसूत्र पाहून तर त्याला खात्रीच झाली होती. रेवतीने पहिल्यांदाच इतकं मोठं पाऊल उचललं होतं. त्याने रागाने रेवतीला फोन केला. पण तिचा फोन बंद होता. ती कुठे गेली हे त्याला काहीच कळायला मार्ग नव्हता. "उद्या पोलीस स्टेशन जावं लागेल" तो स्वतःशीच पुटपुटला.आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच आकाश ठाणे पोलीस स्टेशनमध्ये पोहचला.

पुढे काय होतं? आकाशला शिक्षा होते का? रेवती कोणता  निर्णय घेईल? पाहूया पुढील भागात…

क्रमशः

©® निशा थोरे( प्रत्युषा)

🎭 Series Post

View all