मोकळं आभाळ भाग ४

ही एक सामाजिक कथा.. एका स्त्रीच्या संघर्षाची कथा..

मोकळं आभाळ.. भाग ४

पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की,  रेवती आणि अनघा जिवलग मैत्रिणी झाल्या होत्या. रोज ट्रेन मध्ये भेटणारी रेवती गेली पाच सहा  दिवस दिसली नव्हती. अनघाची भेट झाली नव्हती. रेवतीचा फोन लागत नव्हता.अनघाला रेवतीची काळजी वाटत होती म्हणून ती रेवतीला भेटायला तिच्या घरी गेली.रेवतीची अवस्था पाहून ती संभ्रमात पडली आता पुढे..


 

मोकळं आभाळ.. भाग ४

अनघाच्या प्रेमळ बोलण्याने रेवतीला भरून आलं. ती अनघाच्या गळ्यात पडून रडू लागली.. अनघा तिला प्रेमाने थोपटत होती. तिचं सांत्वन करत होती.. रेवतीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. रेवतीने आपली कर्मकहाणी सांगायला सुरुवात केली.. 'रेवती' आईवडिलांची एकुलती एक म्हणून खूप लाडात तरीही चांगल्या संस्काराच्या छत्रछायेखाली वाढलेली गुणी मुलगी. वडिलांच्या 'किड्स गारमेंटस' च्या छोट्या धंद्यात डिझाईनिंग विभागात काम पाहून ती आपल्या वडिलांना हातभार लावत होती. मुंबईत राहणाऱ्या 'आकाश पारेख'चं स्थळ आलं आणि तिचे आई वडील हुरळून गेले.. एक कोट्याधीश उद्योगपतीशी नातं जोडलं जाणार म्हणून खूप आनंदात होते.. त्यामुळे जास्त काही चौकशी न करता त्यांनी रेवतीचा विवाह ठरवून टाकला होता. त्यांच्या बाह्य बडेजावाची भुरळ पडली. आणि तिचा विवाह सूनिश्चित झाला. रेवतीच्या वडिलांच्या उद्योगधंद्याच्या निमित्ताने जोडली गेलेली बरीच मान्यवर माणसांनी लग्नात लक्षवेधी उपस्थिती दर्शवली होती..लग्नात सर्वांची उत्तम सोय करण्यात आली होती. सर्वांचा योग्य तो मानपान राखला होता.पंचपक्वांनांची हजारो पानं उठली होती. मोठ्या  थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. रेवतीची पाठवणी करण्याची घटिका जवळ आली.आईवडिलांच्या गळ्यात पडून डोळ्यातलं आभाळ रितं करून, मोठ्या कष्टाने रेवतीने आपल्या सगेसोयऱ्यांचा, मित्रमैत्रिणींचा  निरोप घेतला होता. 

आईवडिलांचं मायेचं अंगण सोडून रेवती सासरचं माप ओलांडून, डोळ्यांत नव्या संसाराची स्वप्नं घेऊन, आशा आकांक्षांची कास धरून आपल्या नव्या घरी आली होती. पण नव्या घरी आल्यावर रेवतीचा पुरता भ्रमनिरास झाला. नव्याचे नऊ दिवस फारच लवकर संपुष्टात आले होते. आणि पदोपदी 'मोठा घर पोकळ वासा' या उक्तीचा प्रत्येय येत होता. लक्ष्मीच्या सोनपावलांनी आलेल्या रेवतीचा पदोपदी अपमान होऊ लागला. लग्नात रेवतीच्या आईवडिलांनी आपली मुलगी सुखात राहावी म्हणून दागदागिने,उंची भेटवस्तू, रोख रक्कमेच्या स्वरूपात हुंडा दिला होता. पण सासरचे लोक एवढ्यावर समाधानी नव्हते. त्यांची लालसा दिवसेंदिवस वाढत चालली होती. रोज नवनवीन मागण्या वाढत चालल्या होत्या.त्यामुळे गावावरून आलेले तिचे सासू सासरे तिला त्रास होते.. एवढ्या कोट्यवधीची संपत्ती असणाऱ्या आकाशच्या आईने म्हणजेच तिच्या सासूबाईंनी  आपल्या मुलाचं रेवतीशी लग्न केल्यानंतर घरकामासाठी नेमलेल्या बायकांना काढून टाकलं होतं. सगळी घरातली कामे रेवतीला करावी लागत होती.. इतक्या आलिशान घरात तिची जागा फक्त एक मोलकरीण  इतकीच राहिली होती.

रेवतीला वाटलं,आकाश सुशिक्षित आहे. त्याला चांगलं वाईट, योग्य अयोग्य याची समज असेल. पण  सासू सासरे परत गावी निघून गेल्यावर निदान आकाश तरी समजून घेईल. पण तसं घडलं नाही.तिने आकाशबद्दल जी कल्पना केली होती त्यापेक्षा तो खूप वेगळा होता.. लग्नानंतर त्याने घातलेला सभ्यतेचा मुखवटा काही दिवसांतच उतरला होता.धंद्यातही त्याचं फारसं लक्ष नव्हतं. तो कर्जात पूर्णपणे बुडालेला होता. आणि लग्नात हुंडयाच्या स्वरूपात सासरच्यांकडून पैसे उखळायचे. धंद्यात झालेले कर्ज फेडायचे. अशी त्याची योजना होती. त्याचसाठी त्याने रेवतीशी लग्न केलं होतं. रेवतीच्या वडिलांनी त्यांना शक्य होईल तितकं तिच्या लग्नात दिलं होतं.पण आकाश आणि त्याच्या घरच्यांच्या मागण्या संपतच नव्हत्या. त्यासाठी त्यांनी रेवतीला सतत त्रास देण्यास सुरुवात केली होती. आकाशने रेवतीला नोकरी करण्याची अनुमती दिली कारण तिचा पैसा,पगार त्याला हवा होता. एका लालची माणसासोबत तिची लग्नाची गाठ बांधली गेली होती. उद्योगधंद्याच्या नावाखाली रोज पार्ट्या, घराबाहेर राहणं नित्याचंच झालं होतं. कामाच्या निमित्ताने रोज कोणत्या ना कोणत्या बाईला घरी घेऊन यायचा. 'सोशल स्टेटस'च्या  नावाखाली रोज मद्यपान करून येत होता.. रेवती गावाकडून आलेली म्हणून सतत तिला गावंढळ म्हणून उपेक्षा करायचा. रेवतीच्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग फक्त तिच्या वडिलांच्या गारमेंट पुरताच मर्यादित आहे असं तो तिला वारंवार बोलून हिनवायचा. आकाश तिच्याशी नीट वागत नव्हता...सतत तीच्यावर संशय घ्यायचा.. शेजारच्या लोकांशी बोलू द्यायचा नाही..रोज तिला त्रास देण्यासाठी नवनवीन कारणं शोधू लागला. भाजीत मीठ कमी पडलं,तरकधी कपड्यांची इस्त्री नाही, काही ना काही फालतू कारणं शोधून तिला  शिवीगाळ करत राहायचा.. आणि आता तर त्याने मारहाण करायला सुरुवात केली होती..

रेवतीने माहेरी, तिच्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण "कितीही शिकलीस तरी बाईच्या जातीला नवऱ्याशिवाय गत्यंतर नसतं.  इतकं तर कोणालाही सहन करावं लागतंच. सगळं ठीक होईल. नवऱ्याने टाकलेल्या बाईला समाजात काहीच स्थान नसतं. तू घरी निघून आलीस तर तुझ्या वडिलांची काय किंमत राहील समाजात?  नातेवाईकांत छिथू होईल. काय प्रतिष्ठा राहील त्यांची? आता नवऱ्याचं घरच तुझ्यासाठी सर्वस्व.. उंबरठा ओलांडून कधीच येऊ नकोस" म्हणून तिच्या आईने बजावले होते.. मग ती कुठे जाणार होती? रेवतीला हे सगळं सहन करण्यापलीकडे कोणताच मार्ग दिसत नव्हता..आईवडिलांच्या इभ्रती साठी ती  निमूटपणे सगळं सहन करत होती. रेवतीच्या आईवडिलांनी नाईलाजाने समाजातल्या लोकांच्या भीतीने तिच्यासाठी माहेरचे दरवाजे बंद केले होते..

तीची ही स्थिती आकाश ओळखून होता.. ती त्याला सोडून कुठे जाणार नाही त्याला पक्की खात्री होती.. तिच्या माहेरच्या परिस्थितीचा फायदा करून घेतला होता. आकाश रोज तिच्याशी नवनवीन कारणं शोधून वाद घालत होता..आणि आता तर माहेरून "व्यापारासाठी पैसे आण" म्हणून तगादा लावला होता.. रेवतीने पैसे आणण्यास नकार दिला म्हणून त्याने तिला मारलं होतं अगदी मरेपर्यत.. काळीनिळी होइपर्यंत.. 

रेवती तिची कर्मकहानी सांगत होती, अनघाच्या डोळ्यांतून मेघ झरत होते..


 

पुढे काय झालं असेल रेवतीच्या आयुष्यात? आता रेवती काय करेल? पाहूया पुढील भागात…

क्रमशः

©® निशा थोरे( प्रत्युषा)

🎭 Series Post

View all