मोकळं आभाळ भाग ३

Hi ek samajik कथा eka strichya sangharshachi

मोकळं आभाळ.. भाग ३

पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की,  अनघा आणि रेवती एकाच लोकलने प्रवास करणाऱ्या सहप्रवासी होत्या.. रेवती आणि अनघाची छान मैत्री झाली होती.. बोलता बोलता अनघाला समजलं की, रेवती मूळची गुजरातमध्ये राहणारी युवती होती.. आईवडिलांच्या पसंतीने लग्न करून ती आपल्या पती, आकाश सोबत मुंबईत आली होती आता पुढे..


 

मोकळं आभाळ.. भाग ३

रेवती आणि अनघाची घट्ट मैत्री झाली होती. जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असावेत तशा त्या दोघी एकमेकींत मिसळून गेल्या होत्या. रेवतीही छान मुंबईत स्थिरावली होती.मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाची तिलाही आता सवय होत होती.. गर्दीत घाबरून जाणारी. भांबावून जाणारी रेवती न घाबरता प्रवास करत होती. आता ती मुंबईत छान रुळली होती.  अनघाला नेहमी तिचं कौतुक वाटायचं. अनघाच्या मनात विचार यायचा,'रेवती एक उच्चशिक्षित युवती, लाडकोडात वाढलेली आईवडिलांची एकुलती एक मुलगी, एका करोडपती उद्योगपतीची पत्नी, घरात सगळ्या सुखसोयी पायाशी लोळण असतानाही, रेवतीने स्वतःच्या करीयरचा विचार केला होता.एका मल्टिनॅशनल गारमेंटच्या कंपनीत 'सीनियर फॅशन डिझायनर' म्हणून काम पाहत होती.तिच्या कामावर सगळे वरिष्ठ खुश होते.तिच्या नवनवीन कल्पकतेने तयार केलेल्या डिझाइन्सना बाजारात प्रचंड मागणी येत होती. रेवतीही मनापासून काम करत होती.. पण तरीही किती शांत आणि सालस आहे रेवती.. कधीच तिच्या डोक्यात हवा गेली नाही.. पाय कायम जमिनीवर" अनघाला तिचं भारी कौतुक वाटायचं.. मैत्रिणी बद्दल अजूनच प्रेम,आदर वाढायचा. सगळं छान सुरळीत सुरू होतं. दिवसामागून दिवस सरत होते..

नेहमीप्रमाणे आजही अनघाने सकाळी ७.३० ची लोकल पकडली.,पण आज रेवती नेहमीच्या जागी दिसली नाही.. तिने आजूबाजूला पाहिलं.. रेवती दिसली नाही..अनघाला रोजची तिची सवय झालेली.. ती थोडी बैचेन झाली.. लगेच तिने रेवतीला फोन करून पाहिलं. तिचा फोन बंद येत होता."कदाचित काहीतरी काम असेल तिला.,उशिरा येणार असेल, किंवा ट्रेन चुकली असेल कदाचित.उद्या भेटेल" अनघाने स्वतःच्याच मनाची समजूत घातली. आणि ती तिच्या स्थानकावर, दादरला  उतरून ऑफिसला निघून गेली.. ऑफिसला पोहचल्यानंतरही अनघाने रेवतीला फोन करून पाहिलं पण रेवतीचा फोन बंद होता. मग अनघा तिच्या ऑफिसच्या कामात गढून गेली.. महिन्याचा पहिलाच आठवडा असल्याने खूप कामे तिच्याकडे 'आ' वासून पाहत होती. दिवसभर कामातून डोकं वर काढायलाही तिला वेळ मिळाला नाही. दुपारचं जेवण करायलाही तिला जमलं नव्हतं. आज एक क्षणभरही तिला तिच्या कामातून उसंत मिळाली नव्हती. सर्व कामे उरकून घरी यायला तिला आज खूप उशीर झाला होता. तरीही घरी आल्यानंतर अनघाने रेवतीला फोन करून पाहिलं पण तिचा फोन अजूनही बंदच होता.अनघा विचार करू लागली"असेल काहीतरी अडचण. कदाचित नवऱ्यासोबत बाहेर फिरायला वैगेरे गेली असेल..तिथे नेटवर्क नसेल.म्हणून फोन लागत नसेल.अरे.!  पण ती बाहेर जाणार असती तर मला सांगितलं असतं.असं कसं अचानक ठरलं असेल? नेहमी तर सगळं सांगते मला. मग यावेळीस काय झालं..थांब उद्या चांगलं खडसावून विचारते तिला." अनघा स्वतःशीच बडबडत होती. "उद्या विचारू रेवतीला" असं मनातल्या मनात ठरवून ती रात्री झोपी गेली. दुसऱ्या दिवशी अनघा नेहमीच्या लोकल ट्रेन मध्ये चढली.. तिची नजर रेवतीला शोधत होती. पण आजही रेवती दिसली नाही.तिने पुन्हा फोन करून पाहिलं पण अजूनही तिचा फोन बंदच होता. मग अनघा तिच्या स्थानकावर उतरून आपल्या ऑफिसला निघून गेली.

आजचा सलग पाचवा दिवस होता. आजही अनघाला रेवती तिच्या नेहमीच्या ट्रेनमध्ये दिसली नाही.तिच्या या पाच सहा महिन्यांच्या मैत्रीत आजवर कधीच असं घडलं नव्हतं.रेवती नियमित ऑफिसला येत होती.तिने कधीच सुट्टी घेतली नव्हती. अजूनही तिचा फोनही लागत नव्हता. अनघाने तिच्या नेहमी त्याच ट्रेनने प्रवास करणाऱ्या बाकीच्या सहप्रवासी मैत्रिणींजवळ रेवतीची विचारपूस केली. पण  कोणालाच ती दिसली नव्हती. कोणालाच तिच्याबद्दल काहीही सांगता आलं नव्हतं. नेमकं काय झालं होतं? कळायला काहीच मार्ग नव्हता.आता मात्र अनघा घाबरली.काय झालं असेल?, रेवती आजारी तर नसेल ना?"अनघा स्वतःशीच पुटपुटली." उगीच मनात शंका कुशंका येऊ लागल्या.अनघाला तिची काळजी वाटू लागली. मागे एकदा रेवतीने तिचा घरचा पत्ता अनघाला दिला होता. आणि मग अनघाने संध्याकाळी तिच्या घरी जाण्याचं ठरवलं..घरी आईला फोन करून  'उशीरा येतेय रेवतीच्या घरी जातेय' कळवून टाकलं..

रेवती नेहमी  'ठाणे'  स्थानकावर उतरायची. ठाण्यात तिचा स्वतःचा फ्लॅट होता. अनघा ऑफिसमधून थोडी लवकर निघाली. अनघाने ठाण्याला उतरून रिक्षा पकडली. रेवतीने दिलेल्या पत्त्यावर रेवतीला शोधत शोधत अनघा तिच्या घरी पोहचली..एक उच्चभ्रू आलिशान सोसायटी..समोर मोठं गार्डन.. खाली सोसायटीच्या आवारात सुरक्षारक्षकाने हटकले.. त्याला पत्ता दाखवला..अकराव्या मजल्यावर रेवतीचा फ्लॅट होता. अनघाने खाली व्हीझीटर रजिस्टरमध्ये नोंद केली. अनघा लिफ्टने अकराव्या मजल्यावर पोहचली. एका सदनिकेच्या बाहेर दारावर 'आकाश पारेख आणि रेवती पारेख' नावाची पाटी दिसली..हेच घर असावं म्हणून अनघाने दारावरची बेल वाजवली.दरवाजा उघडला. समोरचं दृष्य पाहून अनघा एकदम अवाक झाली..रेवतीचा चेहरा सुजलेला..एक डोळा काळानिळा झाला होता.. मानेवर,हातावर, मार बसल्याच्या खुणा दिसत होत्या. रेवती अनघाच्या अशा अनपेक्षितपणे येण्याने तिला पाहून एकदम भांबावून गेली.स्वतःला सावरत तिने अनघाला आत यायला सांगितलं.. अनघाने घरात प्रवेश केला..

सर्व सुखसोयींनी भरलेलं तिचं आलिशान घर..सुंदर कलाकृतीने सजवलेलं घर. रेवती अनघा साठी पाणी घेऊन आली. अनघाने तिला तिच्याजवळ बसायला सांगितलं आणि विचारलं," रेवा, काय झालंय? डोळा का असा काळा निळा? कसले व्रण आहेत हे?" रेवती अनघापासून नजर लपवत होती.,किंचित स्मित हास्य करत रेवती म्हणाली," काही नाही ग!! बाथरूम मध्ये पाय घसरून पडले आणि लागलं थोडं..म्हणून दोन दिवस सुट्टी घेतली..उद्यापासून येईन ग. आपल्या रोजच्या वेळेत.. नेहमीच्या लोकलमध्ये." अनघा तिच्याकडे पाहत होती.रेवतीच्या चेहऱ्यावर उमटलेलं खोटं हसू तिच्या नजरेतून सुटलेलं नव्हतं.अनघाला अंदाज येऊ लागला होता.तिला कळत होतं रेवती खोटं बोलतेय..या खुणा बाथरूममध्ये पडलेल्याच्या नव्हत्या. तिचा हात हातात घेत अनघा म्हणाली," रेवा, मी तुझी मैत्रीण ना ग!!मैत्रिणींनी पासून असं लपवतात का? या खुणा पडलेल्याच्या नाहीत.. तू माझ्याशी खोटं बोलतेय ना!!मला समजतंय"

अनघाच्या अशा या मायेच्या बोलण्याने रेवतीला भरून आलं. ती अनघाच्या गळ्यात पडून रडू लागली..अनघा तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. तिने तिला रडू दिलं..शांत होऊ दिलं. रेवती थोडी शांत झाली.मग पाण्याचा ग्लास पुढे करत अनघा रेवतीला म्हणाली,"आता खरं सांग रेवती, काय झालंय?"

काय झालं असेल रेवतीच्या आयुष्यात? पुढे रेवती काय करेल? पाहूया पुढील भागात…

क्रमशः

©® निशा थोरे( प्रत्युषा)

🎭 Series Post

View all