मोकळं आभाळ भाग ३१ अंतिम भाग

ही एक सामाजिक कथा.. एका स्त्रीच्या संघर्षाची..

मोकळं आभाळ.. भाग ३१ (अंतिम)


 

पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की,  रेवतीच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. शालिनीताईंच्या प्रस्तावामुळे तिच्या आयुष्यात उलथापालथ होत होती. अनघाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी अनघाचं श्लोक सोबत लग्न झालं आणि ती सासरी निघून गेली. तिच्या सासरी जाण्याने रेवतीच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. एकटेपणा जाणवू लागला होता. एक दिवस रेवतीचे आईबाबा तिला भेटायला घरी आले. रेवतीला खूप आनंद झाला. आता पुढे..

मोकळं आभाळ.. भाग ३१ (अंतिम)

रेवती बोलता बोलता निमिषमात्र थांबली. आईबाबांकडे पाहत म्हणाली,

“जे झालं त्यात मी कोणालाच दोष देत नाही. दोष माझ्या नशिबाचा होता. आणि कोणीही सोबत नसलं तरी माझे  कान्हाजी माझ्या सोबत होते. त्यांनीच मला लढण्याची शक्ती दिली. सामर्थ्य दिलं. त्यांनीच हे आयुष्य दिलं. बापूजी, माझी काहीच तक्रार नाहीये” 

डोळ्यातलं पाणी पुसत रेवती बोलत होती. आईवडिलांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. पण आता वेळ निघून गेली होती. रेवती मागचं सारं विसरून पुन्हा आईवडिलांशी छान बोलत होती. तिच्या बिझनेसबद्दल, नवीन प्रोजेक्ट्स, नवीन प्लॅन्सबद्दल ती भरभरून सांगत होती. आईबाबांना तिच्या कामगिरीचा खूप अभिमान वाटत होता. चार दिवस लेकीच्या घरी राहून ते तिथल्या सुखाने तृप्त झाले. रेवती आईबाबांना तिच्या कंपनीत घेऊन गेली. संपूर्ण फॅक्टरी दाखवली. सर्वांशी ओळख करून दिली. ओंकारही त्यांना भेटायला आला होता. मुलीच्या उद्योगाचा पसरलेला विस्तार पाहून ते खूप सुखावले होते. मुलीचं ऐश्वर्य पाहून डोळ्यांत समाधान दाटून आलं होतं. एखाद्या पुरुषाला लाजवेल अशी उत्तुंग कामगिरी रेवतीने केली होती. अभिमानाने बाबांची छाती फुलून आली. 

अजून काही दिवस राहून रेवतीचे आईबाबा आपल्या गावी मुक्कामी परतले. रेवतीही आईबाबांसोबत आपल्या गावी गेली. सर्व नातेवाईक तिच्या भोवती गोळा झाले होते. रेवतीचा बदलेला चेहरामोहरा पाहून, तिचं ऐश्वर्य पाहून सर्वांना रेवतीचं आता कौतुक वाटत होतं. काय किमया असते नाही पैशांची! जवळ असतील तर सारे गोळा होतात. ते म्हणतात न! ‘असतील शिते तर जमतील भुते’ अगदी तसंच घडत होतं. इतके दिवस तिला नावे ठेवणारे आता तिचं गुणगान करत होते. 

सर्वांना भेटून रेवती आपल्या घरी पुण्याला परत निघाली. वाटेत येताना अजून एका नात्याच्या ऋणातून मुक्त व्हायचं होतं. जाता जाता रेवती आकाशच्या गावी गेली. तिथे आकाशच्या आईला भेटली. तिला समोर पाहून त्यांनी हात जोडले आणि त्या रडू लागल्या. त्यांना खूप पश्चाताप होत होता. सोन्यासारख्या सुनेची अवहेलना केली म्हणून त्याना वाईट वाटत होतं. पण रेवतीच्या मनात त्यांच्याविषयी काहीच राग नव्हता. कोणताही आकस नव्हता. सारी किल्मिषं गळून पडली होती. रेवतीने त्यांच्यासाठी आणलेली साडी आणि खाण्याच्या वस्तू त्यांच्या हातात दिल्या. पायाला स्पर्श करून नमस्कार केला. आणि त्यांचा निरोप घेतला. आता कोणतंच  शल्य मनात उरलं नव्हतं. रेवती आईबाबांच्या येण्याने सुखावली होती. नातेवाईकांना भेटून आनंदित झाली होती. पुन्हा एकदा नात्यांची साद ऐकून नव्याने बहरली होती.

रेवतीला महाराष्ट्र शासनाने ‘सर्वोत्तम उद्योजिका’ हा पुरस्कार जाहीर केला. रेवतीने ही बातमी अनघाला सांगितली. आणि रेवतीचा संपूर्ण जीवनपट अनघाच्या डोळ्यासमोर तरळून गेला. मैत्रीणीच्या यशाने आनंदित झालेल्या अनघाला रेवतीचं खूप कौतुक वाटलं. आणि ती तिच्या कौतुक सोहळ्याच्या दिवसाची वाट पाहू लागली. 

अखेरीस कौतुक सोहळ्याचा दिवस सुनिश्चित झाला. रेवती आणि तिच्यासारख्या बऱ्याच उद्योजकांना संयोजकांकडून निमंत्रणं पाठवण्यात आली होती. ओंकार आणि अभ्यंकरसर, शालिनीताईं यांनाही संयोजकानी आधीच आमंत्रणं दिली होती. रेवतीनेही अनघा आणि श्लोक, अनघाचे आईबाबा, तिचे आईबाबा यांना आमंत्रित केलं. अभ्यंकर सरांनी आकाशलाही सोबत यायला सांगितलं. 

कौतुकसोहळ्याची ती रम्य संध्याकाळ.. शांत मधुर संगीत सुरू होतं. सारं सभागृह श्रोत्यांनी, निरनिराळ्या क्षेत्रातल्या उद्योजकांनी भरून गेलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उद्योजक आले होते. पहिल्याच रांगेत विजेती उद्योजक मंडळी आपल्या जवळच्या नातेवाईकांना सोबत घेऊन बसली होती.  रेवती आणि तिचे आईबाबा, अभ्यंकरसर शालिनीताईं, ओंकार हेही येऊन बसले होते. मागच्या रांगेत अनघा,श्लोक, अनघाचे आईबाबा बसले होते. आणि  एका कोपऱ्यात आकाश गुपचूप येऊन बसला होता. अभ्यंकर सरांच्या आग्रहाखातर आकाश कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. 

आणि कार्यक्रम सुरू झाला. संयोजकांनी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केलं. मान्यवरांना व्यासपीठावर बोलवण्यात आलं. सन्मानाने व्यासपीठावर स्थानापन्न करण्यात आलं. पुष्पगुच्छ देऊन आदरतिथ्य करण्यात आलं. सर्व मान्यवरांनी दोन शब्द व्यक्त करून विजेत्या उद्योजकांचे अभिनंदन केलं. त्यानंतर एक एक करून  पुरस्कार जाहीर करण्यात येत होते. प्रत्येक विजेत्या उद्योजकांला  श्रीफळ,गौरवचिन्ह आणि मानधन देऊन गौरविण्यात येत होतं. प्रत्येकजण थोडक्यात आभार व्यक्त करत होता. आपल्या यशाचे श्रेय आपल्या जवळच्या व्यक्तींना, गुरुजनांना देत होता. आणि मग संयोजकांनी घोषणा केली, 

“आणि या वर्षीचा  ‘सर्वोत्तम उद्योजिका’ हा पुरस्कार जातोय पुण्याच्या ‘रेवती गारमेंट’ या कंपनीच्या  सर्वेसर्वा ‘रेवती कांकरिया’ यांना. प्लिज त्यांनी व्यासपीठावर येऊन पुरस्कार स्वीकारावा आणि मी मान्यवरांना विनंती करतो की रेवती कांकरिया मॅडम ना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करावा.”

संयोजकांनी घोषणा करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वांनाच खूप आनंद झाला होता. तिच्या आईवडिलांना लेकीचा अभिमान वाटत होता. रेवतीच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. रेवतीने व्यासपीठावर येऊन श्रीफळ आणि मानचिन्ह याचा स्वीकार केला. पुरस्कार स्वीकारताना रेवतीला मनापासून आनंद होत होता. डोळ्यातलं तळ ओसंडून वाहू लागलं. संयोजक महोदयांनी तिला दोन शब्द बोलण्याची विनंती केली. आणि रेवतीने त्यांचा मान ठेवून बोलायला सुरुवात केली. 

“गुड एव्हनिंग फ्रेंड्स, आज हा अवॉर्ड स्वीकारताना खूप खूप आनंद होतोय. माझ्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान वाटतंय. 

फ्रेंड्स,मी रेवती कांकरिया,गुजरातमधल्या छोट्या खेड्यातून मुंबईसारख्या महानगरीत आलेली, रूढी, परंपरा,पुरुषप्रधान संस्कृती यांचा कायम पगडा असलेल्या कुटुंबात जन्म घेतलेली मी एक सर्वसामान्य मुलगी. चूल आणि मूल, आपला संसार इतकंच माझं विश्व होतं. पण आयुष्यात एक घटना घडली आणि माझं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं. माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्यावेळीस माझ्या आयुष्यात भगवंताने, माझ्या श्रीरंगाने एका कृष्णसखीला पाठवलं. आणि तिने  माझ्या जीवनात  अमुलाग्र बदल घडवला. ती कृष्णसखी म्हणजे माझी जिवलग मैत्रीण अनघा. ती सोबत होती म्हणूनच मी इतका मोठा निर्णय घेऊ शकले. तिनेच मला अन्यायाविरुद्ध लढण्याची ऊर्मी दिली.”

रेवतीने कृतज्ञपणे अनघाकडे पाहिलं. नजरेतूनच तिचे मनोमन आभार मानले. आणि रेवती पुढे बोलू लागली

“फ्रेंड्स, हा प्रवास माझ्यासाठी नक्कीच सोप्पा नव्हता. खडतर वाटेवर चालताना मला साथ दिली, मला सावरलं,  ते म्हणजे माझ्या पहिल्या कंपनीचे एम.डी. अभ्यंकर सरांनी. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. स्वतःला सिद्ध करण्याची मला संधी दिली. म्हणूनच मला हे साध्य करता आलं. अभ्यंकरसर या उपकाराची परतफेड होऊच शकत नाही. मी कायम तुमची आभारी आहे.  त्याचबरोबर माझे वरिष्ठ, गुरुजन ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यांना मनापासून धन्यवाद”

रेवतीने अभ्यंकरसरांकडे आणि तिच्या दृष्टीक्षेपात असणाऱ्या सर्व गुरुजनांकडे पाहिलं. आणि हात जोडून आभार मानलं. रेवती पुढे बोलत होती.

“आणि सर्वात महत्वाचं, ज्याचा उल्लेख केल्याशिवाय माझ्या यशाला पूर्णत्व प्राप्त होऊच शकत नाही. माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझा मित्र ओंकार दवे. त्याच्याशिवाय या प्रवासाची सुरवातही झाली नसती आणि सांगताही होऊ शकणार नाही. त्याने मला माझ्यातल्या 'मी' शी ओळख करून दिली. माझ्या प्रत्येक संकटात, सुखदुःखात सावली सारखी साथ दिली. पण त्याचे आभार मानून मी त्याच्या स्नेहाचा मी अवमान करणार नाही” 

रेवतीने हसून ओंकारकडे पाहिलं. त्यानेही हसून प्रतिसाद दिला. रेवती पुढे बोलत होती.

“फ्रेंड्स, माझे आईबाबा, माझे शुभचिंतक त्याचबरोबर माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट लोकांचे मी आभार मानते. त्यांनी अनुभव दिला, धडा दिला. म्हणूनच तर मी घडू शकले. आज मी तुमच्यासमोर उभी आहे ते केवळ त्या सर्व लोकांनी दिलेल्या अनुभवांच्या शिदोरीमूळेच. आज तुम्ही मला बोलवलंत. माझा सत्कार केलात त्याबद्दल मी कार्यक्रमाचे संयोजक आणि आणि इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार मानते. तुम्हा सर्वांच्या मी कायम ऋणात. पण हा पूर्णविराम मुळीच नाही, हा एक छोटासा स्वल्पविराम आहे. अजून खूप लांबचा पल्ला मला गाठायचा आहे. आणि त्यासाठी मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ओंकार तुझी साथ हवीय. तुझ्या साथीने मला माझ्या नवीन आयुष्याची, एका नवीन पर्वाची सुरुवात करायची आहे.  कदाचित हाच आमच्या भावी आयुष्याचा शुभारंभ असेल. आणि म्हणूनच मी माझ्या यशात तितकाच सहभाग असणाऱ्या माझ्या मित्राला ओंकारला व्यासपीठावर येण्याची विनंती करते. या पुरस्काराचं पूर्ण श्रेय त्यालाच जातं.. ओंकार प्लिज व्यासपीठावर येशील?”

रेवतीने ओंकारकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला. ओंकार उठून उभा राहिला. व्यासपीठाच्या दिशेने येऊ लागला. रेवतीने दिलेल्या सन्मानाने तो प्रचंड आनंदात होता. तो  व्यासपीठावर येताच टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला. रेवतीने ओंकारच्या हाती ट्रॉफी दिली. ओंकार सद्गदित होऊन म्हणाला,

“गुड एव्हनिंग एव्हरीवन, रेवती मॅडमनी ह्या पुरस्काराचं श्रेय मला दिलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा! पण याचं पूर्ण श्रेय रेवती तुझंच आहे. तुझे कष्ट, अविश्रांत परिश्र, तुझी जिद्द यामुळेच तू हे ध्येय गाठू शकलीस. मला मनापासून आनंद होतोय आणि तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाहीये. मला तुझा खूप अभिमान वाटतोय.. खूप खूप अभिनंदन रेवती!

आणि इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे आभार” 

इतकं बोलून त्याने माईक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीकडे दिला. ओंकार रेवतीचा सत्कार पाहून भारावून गेला होता. तो रेवतीविषयी बोलताना भरभरून बोलत होता. सूत्रसंचालकाने त्या दोघांचे आभार मानले आणि आपल्या जागेवर स्थानापन्न होण्याची विनंती केली. दोघांनी मान झुकवून त्यांचे आभार मानले. आणि ते दोघे व्यासपीठावरून खाली उतरू लागले. रेवतीने ओंकारचा हात आपल्या हातात घेतला. आणि ती ओंकरसोबत व्यासपीठावरून खाली येत होती. अजूनही टाळ्यांचा गजर सुरूच होता. अभ्यंकरसरांना रेवतीच्या नजरेत ओंकारविषयी वाटणारं प्रेम स्पष्ट दिसत होतं. आपल्या भावनांपेक्षा त्यांना रेवतीचा आनंद जास्त मोलाचा वाटला. शालिनीताईंही रेवतीसाठी आनंदी होत्या. आतापर्यंत सोसलेल्या दुःखाचा अंत होणार होता. आकाश एका कोपऱ्यात मान खाली घालून उभा होता. भुतकाळात केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप होत होता. तो खजील झाला होता. 

रेवतीचे आई बाबा, अनघा श्लोक, अनघाचे आई बाबा सर्वजण रेवतीच्या उत्तुंग यशाने भारावून गेले होते. तिच्याकडे कौतुकाने पाहत होते. आणि आजही अनघा आपल्या मैत्रीणीच्या निर्णायक घडीची साक्षीदार होती. तिने घेतलेल्या निर्णयात तिच्या सोबत होती. त्या निर्णयामुळे ती रेवतीसाठी खूप आनंदी होती.

अजूनही रेवतीचा हात ओंकारच्या हातात होता. ओंकारने हाताची पकड अजूनच घट्ट केली. त्याच्या त्या आश्वासक स्पर्शाने रेवती मोहरत होती. एक मोकळं आभाळ तिला खुणावत होतं. उंच भरारी घेण्यासाठी.. उत्तुंग गरुडझेप घेण्यासाठी.. ओंकारच्या साथीने एका नवीन आयुष्याला सुरुवात होणार होती. नैराश्याचा अंधःकार दूर होऊन नवीन प्रत्युषा वाट पाहत होती.. 

पूर्णविराम

© निशा थोरे

प्रिय वाचक मित्रमैत्रिणींनो, 

माझ्या लिखाणातून मी नेहमीच सामाजिक विषयांवर लिहीत असते. समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी, समस्या कथास्वरूपात  मांडत असते. ‘मोकळं आभाळ’ ही एक सामाजिक कथा.. एका स्त्रीच्या संघर्षाची.. तिने दिलेल्या सत्त्वपरीक्षेची. सर्व स्त्रियांची हीच कथा मग ती विधवा असो, घटस्फोटीता असो, वा कोणी परित्यक्ता असो किंवा लग्न न झालेली एकटी रहाणारी स्त्री असो प्रत्येंकीची कहाणी थोड्या फार फरकाने सारखीच. खरच आजही स्त्री बंदिनीच. कधी संपणार हे सगळं? कळेल का कोणाला तिची ही कथा.. तिच्या मनाची व्यथा..

खूप साऱ्या प्रश्नांचा ससेमिरा मागे लागलाय. आजही मला उत्तरं नाही मिळली. आपल्या समाजात एकट्या राहणाऱ्या, विधवा, घटस्फोटीता स्त्रियांच्या विवंचना मांडण्याचा एक अल्पसा प्रयत्न केलाय. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा..तुमच्या प्रतिक्रिया माझे लिखाण प्रगल्भ करतील, लेखनास नवी ऊर्मी देतील यात शंकाच नाही.. 

आपली शब्दसखी

©निशा थोरे





 

🎭 Series Post

View all