मोकळं आभाळ.. भाग ८
पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, आकाशला अटकपूर्व जामीन मंजूर झाला. आणि त्याची सुटका झाली. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना त्याने रेवतीला धमकावले होते त्यामुळे रेवती खूप धास्तावली होती. अनघा आणि तिच्या कुटुंबियांना त्रास होऊ नये म्हणून तिने दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला. अनघाच्या मदतीने भाडेतत्वावर फ्लॅट पहायचं ठरलं. आकाशने रेवतीच्या माहेरी, सासरी ती घर सोडून गेल्याची बातमी सांगितली आता पुढे...
मोकळं आभाळ.. भाग ८
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून रेवती आणि अनघा ऑफिसला जाण्यासाठी तयारी करू लागल्या. पटकन आवरून दोघी प्लॅटफॉर्मवर पोहचल्या. नेहमीच्या ठरलेल्या वेळेनुसार 'लेडीज स्पेशल' लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. पटकन शिताफीने रेवती आणि अनघा ट्रेनमध्ये चढल्या.. तशीच तुडुंब गर्दी होती. पण तरीही रेवतीचा चेहरा प्रसन्न दिसत होता. अंगावरच्या खुणा पूर्णपणे गेल्या नव्हत्या. पुसटशा जखमा अजूनही दिसत होत्या. रेवतीचा थांबा आल्यावर 'संध्याकाळी भेटू' असं म्हणून रेवतीने अनघाचा निरोप घेतला. ती ट्रेनमधून खाली उतरली. आणि ऑफिसच्या दिशेने चालू लागली.
थोडे अंतर पार केल्यानंतर रेवती तिच्या ऑफिसमध्ये पोहचली. ऑफिसमधल्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तिच्या तब्बेतीची विचारपूस केली.चहा कॉफी घेऊन जो तो आपल्या जागेवर काम करण्यासाठी निघून गेला.. रेवतीही काम करू लागली.. जवळ जवळ एक आठवडा ती ऑफिसला आलेली नव्हती. त्यामुळे बरीच कामे मागे राहिली होती. ती उरकण्यासाठी तिच्या हातांनी वेग पकडला होता. इतकं काम बाकी होतं की ते करता करता जेवणाची वेळ कधी टळून गेली तिचं तिलाच समजलं नाही. तिच्याबरोबर काम करणाऱ्या तिच्या मैत्रिणीने, संध्याने तिला दुपारच्या जेवणाची आठवण करून दिली. जेवण करण्यासाठी तिने तिचा डबा उघडला. अनघाच्या आईने छान बटाट्याची भाजी आणि पोळी बनवून दिली होती. एक घास तोंडात टाकताच तिला तिच्या आईची खूप आठवण आली. तिची आई जशी भाजी बनवायची अगदी तशीच चव होती.तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं.,"काकू किती मायेने करतात सगळं.!थॅंक्यु काकू!!" ती मनातल्या मनातच बडबडली. जेवण करता करता तिने अनघाला फोन करून संध्याकाळी राजेशला भेटण्याची आठवण करून दिली. आणि मग जेवण उरकून पुन्हा तिच्या कामांमध्ये व्यस्त झाली.
संध्याकाळ उलटून गेली होती. अंधार पडू लागला होता. रेवतीने आता बऱ्यापैकी तिच्या हातातली कामे संपवली होती.ऑफिस सुटण्याची वेळ झाली. सर्वजण घरी जाण्यासाठी ऑफिसमधून बाहेर पडू लागले. रेवती आणि संध्या दोघीही ऑफीसच्या बाहेर पडल्या. घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची परतण्याची वेळ असल्याने ट्रेनसाठी प्रचंड गर्दी होती. नेहमीच्या सवयीप्रमाणे रेवती ठाण्याला जाणारी लोकल पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर एकच्या दिशेने चालू लागली. पण तिच्या लक्षात आलं आपण ठाण्याला, आकाशच्या घरी राहत नाही. तो प्रवास कधीचा संपलाय.. मनाची घालमेल सुरू झाली. डोळ्यांत आसवांची गर्दी झाली. आणि मग तिने प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. ट्रेन पकडून ती दादर स्थानकावर उतरली. अनघा आधीच तिची वाट पहात बसली होती. रेवतीने लांबूनच तिला हात हलवून तिच्याजवळ यायला सांगितलं.
जवळ येताच अनघा म्हणाली," काय रेवा, कसा गेला आजचा दिवस?" रेवती स्मित हास्य करत उत्तरली," छान गेला. खूप काम होतं. कधी संध्याकाळ झाली,कळलंच नाही" अनघा म्हणाली," व्वा छानच! बरं,! मी आताच राजेशला फोन केलाय. तो येईलच मग आपण सोबतच जाऊ आणि फ्लॅट बघून घेऊ". रेवतीने होकारार्थी मान डोलावली. आणि त्या दोघीजणी तिथेच एका बाकावर बसून राजेशची वाट पाहू लागल्या. अनघाने आधीच त्याला भेटण्याची जागा सांगून ठेवली होती. त्यामूळे राजेशला त्यांना शोधण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. थोड्याच वेळात राजेश तिथे पोहचला. अनघाने राजेश आणि रेवतीची ओळख करून दिली. अनघा राजेशला म्हणाली," हाय राजेश,ही माझी मैत्रीण रेवती. काल मी तुला हिच्याबद्दलच सांगितलं होतं. हिलाच फ्लॅट हवाय." राजेश हसत अनघाला म्हणाला," फिकर नॉट अनघा, मी आहे ना.! तुझी मैत्रीण म्हटल्यावर आपण तुझं काम करणारच ना..! फ्लॅट मिळालाच म्हणून समज." रेवती आणि अनघाचा चेहरा आनंदाने उजळून निघाला.
इतक्यात प्लॅटफॉर्मवर बदलापूरला जाणारी लोकल आली. रेवती आणि अनघा लेडीज डब्ब्यात आणि राजेश दुसऱ्या डब्ब्यात शिरला. प्रत्येक स्थानकावर जितकी माणसं उतरत होती त्यापेक्षा दुप्पट माणसं लोकलमध्ये चढत होती. तुडुंब गर्दी 'आ' वासून जणू वाट पाहत होती. घाटकोपर स्टेशन येताच तिघेही ट्रेनमधून खाली उतरले. राजेश सर्वांत पुढे चालत होता. रेवती आणि अनघा त्याच्या मागोमाग चालत होत्या. ते तिघे रेल्वेचा पूल चढून पश्चिमेला 'भारत कॅफे' हॉटेलच्या गल्लीतून आत चालत चालले होते. काही अंतर कापल्यानंतर ते गरोडीया नगरच्या परिसरात पोहचले. समोर एक उंच सोसायटी दिसली. 'कस्तुरबा पार्क' नावाचा मोठा फलक इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या दिसला. राजेश अनघाकडे पाहत म्हणाला," अनघा हीच सोसायटी आहे. रेल्वे स्टेशनपासून चालत अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर, हे बघ हे रिक्षास्टॅण्ड, थोडसं पुढे गेलीस की बसथांबा दिसेल, आणि पलीकडे भाजी मार्केट पण आहे. कुठेही लांब जाण्याची गरज नाही. लिफ्ट, जनरेटर, पाण्याची सोय उत्तम आहे. हे बघ चौथ्या मजल्यावर फ्लॅट आहे. चला, आपण फ्लॅट पाहून घेऊ." राजेश लिफ्टच्या दिशेने चालू लागला. तो अवांतर बोलत होता. नेहमीचंच काम त्याचं. एकदम बोलबच्चन.! रेवती त्याचं शांतपणे ऐकत होती. तिला तो परिसर आवडला होता. तिघेही चौथ्या मजल्यावर पोहचले. एका मजल्यावर मोजून सहा फ्लॅट होते. राजेशने स्वतःकडे असलेल्या चावीने फ्लॅटचं कुलूप उघडलं. ते आत आले. किचन, हॉल, बेडरूम तीन खोल्यांचा फ्लॅट होता. भरपूर प्रकाश, हवेशीर खोल्या होत्या. रेवतीला फ्लॅट खूप आवडला होता. तसं तिने अनघाला सांगितलं.
अनघाने फ्लॅट पाहून झाल्यावर राजेशकडे पसंती दर्शवली. ती म्हणाली," राजेश, आम्हाला फ्लॅट आवडला आहे. आता पुढच्या व्यवहाराचं बोलूया का?" राजेश लगेच म्हणाला," हो, हो! का नाही.! एक लाख रुपये डिपॉझिट आणि महिना पंधरा हजार रुपये भाडं. बोल मान्य असेल तर लगेच मालकाला फोन लावून व्यवहार निश्चित करतो." "एक लाख रुपये डिपॉझिट" रेवती जवळ जवळ किंचाळलीच. खूप मोठी रक्कम होती. आजवर रेवतीचा संपूर्ण पगार आकाशच घेत होता. तिच्याकडे तिची अशी काहीच बचत नव्हती. अनघाने हलकेच तिचा हात दाबून तिला शांत राहायला सांगितलं आणि ती राजेशला म्हणाली,"हे बघ राजेश, महिना पंधरा हजार भाडं ठीक आहे पण आम्ही इतकं डिपॉझिट नाही देऊ शकणार. तू घराच्या मालकाशी बोलून घे. पन्नास हजार डिपॉझिट घ्यायला सांग. बघ काय म्हणतात ते? नाहीतर मग दुसरा फ्लॅट बघू" राजेशने पडत्या फळाची आज्ञा मानून लगेच मालकाला फोन केला," हॅलो देशपांडे साहेब, एका कुटुंबाला तुमचा फ्लॅट आताच दाखवला. त्यांना फ्लॅट खूप आवडला आहे. पण ते डिपॉझिट पन्नास हजार बोलताहेत. काय करायचं?" फ्लॅटच्या मालकाने थोडा विचार केला. नाहीतर भाडेकरूला फ्लॅट सोडून जाताना डिपॉझिट परत करावं लागेल. आणि मग कशाला जास्तीची रक्कम घ्या. आणि मग त्यांनी राजेशला होकार कळवला. राजेशने लगेच अनघाला मालकाच्या मंजुरीचा निरोप दिला. राजेश रेवतीकडे पहात म्हणाला,"मॅडम, उद्याच भाडेकरार करून टाकू. तुम्ही येताना पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊन या आणि डिपॉझिटच्या रक्कमेचा चेक घेऊन या. मी घरमालकांना, देशपांडे साहेबांना बोलावून घेतो" "ठीक आहे मग भेटू उद्या..!" असं बोलून अनघाने आणि रेवतीने त्याचा निरोप घेतला.
पुढे काय होतं? ते पाहूया पुढील भागात…
क्रमशः
©® निशा थोरे( प्रत्युषा)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा