मोकळं आभाळ.. भाग ६
पूर्वाध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, रेवतीची कहाणी ऐकून अनघा पेटून उठली. तिने रेवतीला पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिला. रेवतीला तो सल्ला योग्य वाटला. आणि तिने आकाशचं घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. रेवतीने पोलिसांत जाऊन मारहाणीची आणि मानसिक छळ केल्याची आकाश विरुद्ध तक्रार केली. अनघा रेवतीला घेऊन तिच्या घरी आली. आकाशाला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं आता पुढे..
मोकळं आभाळ.. भाग ६
दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश ठाणे पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. इन्स्पेक्टर राणेंनी त्याला थोडा वेळ बाहेर बसायला सांगितलं. त्यांनी आधीच रेवतीला फोन करून पोलीस स्टेशनला यायला सांगितलं होतं. इन्स्पेक्टर राणेंचा फोन झाल्यानंतर रेवती पटकन आवरून तयार झाली. अनघाला सोबत घेऊन ती पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघाली. थोड्या वेळाने इन्स्पेक्टर राणेंनी आकाशला आत बोलावून घेतलं. त्याला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं. आणि ते बोलू लागले," मि. आकाश तुमच्या पत्नीने तिला मारहाण आणि मानसिक छळ केल्याची तक्रार नोंदवलेली आहे. मी त्यांना फोन केलाय येतीलच त्या." आकाश काही बोलणार इतक्यात रेवती आणि अनघा दोघी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्या. रेवतीला समोर पाहताच आकाश रागाने चरफडत होता. त्याच्या हाताच्या मुठी वळू लागल्या होत्या. पण तो पोलीस स्टेशनमध्ये होता आणि समोर इन्स्पेक्टर साहेब बसले होते. म्हणून त्याने राग गिळून घेतला आणि जणू काहीच घडलं नाही असं इन्स्पेक्टर साहेबांसमोर भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.
रेवतीकडे पाहत खोट्या काळजीचा आव आणत आकाश म्हणाला," डार्लिंग, कुठे गेली होतीस? किती फोन केले मी तुला?एकतर तुला मुंबईतलं फारसं काही माहीत नाही.मला वाटलं हरवलीस की काय? किती घाबरलो होतो मी!! तुला काही झालं असतं तर घरच्यांना काय सांगितलं असतं मी?" डोळ्यांत खोटं पाणी आणत तो रेवतीकडे आशाळभूत नजरेने पहात होता. रेवती शांत बसून होती..थोडीशी भेदरलेली..अनघाच्या हात घट्ट धरून बसली होती..अनघाही तिच्या हातावर हात ठेवत तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. आकाशचं बोलणं मध्येच तोडत इन्स्पेक्टर राणे म्हणाले," हे पहा मि. आकाश तुमच्या पत्नीने तुमच्या विरुद्ध जी तक्रार नोंदवली आहे त्याबद्दल बोला.खरं आहे का हे?तुम्ही त्यांना मारहाण केलीत?" आकाश लगेच उद्गारला,"नाही..!! मी माझ्या बायकोला का मारहाण करेन? माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. रेवती,! तू सांग ना यांना मी काहीच केलेलं नाही" रेवती अजूनही शांतच होती. इन्स्पेक्टर राणे आकाशाला दरडावत मोठ्या आवाजात म्हणाले,"पण त्यांच्या शरीरावर दिसणाऱ्या खुणा तर वेगळीच कहाणी सांगत आहेत. काय मिसेस पारेख, खरं आहे ना..!" रेवती भेदरलेल्या जनावरांसारखी गांगरून गेली होती. अनघा तिला सावरत म्हणाली,"हो साहेब, यानेच माझ्या मैत्रिणींला जीव जाईपर्यंत मारलंय. आता खोट्या प्रेमाचं ढोंग करतोय. आणि हे आजचं नाहीये. या आधीही त्याने खूपदा रेवतीला मारहाण केलीय. साहेब, शरीरावरच्या जखमा तुम्हाला दिसल्या. पण मनाचं काय? त्या जखमा कशा दिसणार? आजवर केलेला मानसिक छळ कसा उमजणार? साहेब, याला इतक्या सहजासहजी सोडू नका. चांगलं कोठडीत डांबून चोप द्या म्हणजे याला कळेल काय आणि कशा वेदना होतात?" अनघाच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. इन्स्पेक्टर राणेंनी तिला शांत व्हायला सांगितलं. तिच्या पुढे पाण्याचा ग्लास सरकवत समजुतीच्या सुरात ते म्हणाले,"नक्कीच मॅडम, मी मिसेस पारेख यांचं दुःख समजू शकतो. पण ही त्यांची लढाई आहे. त्यांनी या अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहायला हवं.असं शांत बसून चालणार नाही.बाकी गुन्हेगारांना कसं वठणीवर आणायचं ते आम्ही बघूच"
इतका वेळ गप्प बसलेला आकाश एकदम चवताळून उठला आणि अनघाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून त्वेषाने म्हणाला,"या कोण? आमच्या घरगूती गोष्टीत नाक खुपसणाऱ्या? इतकी बाजू घेऊन बोलत आहेत.जणू काही याच रेवतीला पोसताहेत.आम्ही आमचं पाहून घेऊ? तुम्हाला माहीत नाही माझी पोच कुठपर्यंत आहे. कुठल्या कुठे फेकले जाल याची कल्पना नाही तुम्हाला. आईवडिलांना तुमचं नखसुद्धा नजरेस पडणार नाही" इतकं बोलून तो उपहासाने मोठमोठ्याने हसू लागला. इन्स्पेक्टर राणे मुद्दामच शांत होते. रेवतीच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते. अनघाविषयी अपशब्द ऐकून इतका वेळ शांत बसलेली रेवती त्वेषाने पेटून उठली. कुठून तिच्या मनगटात बळ आलं कोणास ठाऊक! तिने पूर्ण ताकतीनिशी रागाने आकाशच्या कानशिलात जोरात पेटवून दिली. भर दिवसा आकाशच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. तो आश्चर्यचकित होऊन रेवतीकडे पाहतच राहिला. रेवती रागाने थरथरत होती. "खबरदार माझ्या मैत्रिणीबद्दल वाईट बोललास तर..!! साहेब, यानेच मला मारहाण केली.. रोज करतो. शेजारच्या लोकांशी बोलू देत नाही.माझ्यावर संशय घेतो. माहेरून पैसे आण म्हणून रोज भांडण करतो. याला तुरुंगात डांबून ठेवा. चांगला चोप द्या.नाही राहायचं मला याच्यासोबत. जीव गुदमरतो माझा." इतकं बोलून रेवती त्राण गेल्यासारखी खुर्चीत पडली. इतका वेळ दाबून ठेवलेले अश्रू ढसाढसा मोकळे होऊ लागले. अनघा तिला जवळ घेऊन धीर देऊ लागली.
इन्स्पेक्टर राणेंनी बाहेर उभे असलेल्या हवालदार शिंदेंना आवाज दिला,
“शिंदे, घेऊन जा यांना आतल्या कोठडीत बंद करा.."
हवालदार शिंदे पटकन आत आले आणि आकाशच्या बकोटीला पकडून त्याला आत घेऊन जाऊ लागले.
“एक मिनिट साहेब, तुम्ही त्यांना अटक करू शकत नाहीत. मी त्यांचा वकील आणि हा माझ्या अशीलांचा जामीन.."
अँड. कटारिया हातात जामीन घेऊन आत येता येता म्हणाले.
पुढे काय होतं? ते पाहूया पुढील भागात…
क्रमशः
©® निशा थोरे( प्रत्युषा)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा