मोकळं आभाळ भाग ३०

ही एक सामाजिक कथा.. एका स्त्रीच्या संघर्षाची..

मोकळं आभाळ.. भाग ३०

पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की,  रेवतीचा  आकाशप्रती निर्विकार वागण्याचं अभ्यंकर सरांना खूप कौतुक वाटलं होतं. अभ्यंकरसरांनी त्यांच्या आईला म्हणजेच शालिनीताईंना रेवतीबद्दल,तिच्या भूतकाळाबद्दल सर्व  सांगितलं. अभ्यंकरसरांना रेवती आवडत असल्याचं त्यांनी आपल्या आईला सांगून टाकलं. शालिनीताईंनी रेवतीला भेटून आपल्या मुलासाठी लग्नाची मागणी घातली आता पुढे..


 

मोकळं आभाळ.. भाग ३०

शालिनीताईंनी त्यांचं रेवतीला भेटण्याचं प्रयोजन स्पष्ट केलं. शालिनीताईंचं बोलणं ऐकून रेवती आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागली. अनपेक्षितपणे ओढवलेल्या या प्रसंगामूळे ती भांबावून गेली होती. शालिनीताईंना तिला दुखवायचं नव्हतं. रेवती त्यांना शांतपणे म्हणाली,

“आई, मी अभ्यंकरसरांविषयी कधीच हा विचार केला नव्हता. त्यांनी वेळोवेळी मला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं हे मी कधी विसरू शकणार नाही. मी आजन्म त्यांच्या ऋणातच. पण हे नातं माझ्यासाठी खूपच अनपेक्षित आहे” 

रेवती अडखळत बोलत होती.तिची अवस्था शालिनीताईंच्या ध्यानात आली. आणि त्या म्हणाल्या.

“रेवती, तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे विचार करून उत्तर दे. आम्ही वाट पाहतो. आम्हाला लगेच उत्तर अपेक्षित नाहीये. तू वेळ घे. आणि कळव मला..चल आता मी निघते. पुन्हा घरी मुंबईला जायला उशीर होईल” 

असं म्हणत त्यांनी रेवतीसाठी आणलेलं गिफ्ट तिच्या हातात दिलं. रेवतीनेही शालिनीताईंसाठी पैठणी घेतली होती. ती त्यांच्या हातात दिली. वाकून नमस्कार केला. शालिनीताईंनी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत  “उदंड आयुष्य लाभो, सुखी रहा” असा आशिर्वाद दिला आणि त्या ड्राइव्हर काकांसाठी आणलेलं गिफ्ट सुध्दा त्यांच्याच हाती दिलं. आणि शालिनीताईंनी तिचा निरोप घेतला.आणि आनंदी मुद्रेने आपल्या घराकडे परतल्या. 

रेवती चिंतेत पडली. एक नवीन संकट ‘आ’ कडून तिच्याकडे चालून आलं होतं. रेवतीला काहीच समजेना. अभ्यंकरसरांच्या मनात असं काही असेल तिला स्वप्नांतही वाटलं नव्हतं. तिने कधी तसा विचारच केला नव्हता. मनाची चलबिचलता वाढू लागली. 

“अभ्यंकरसरांनी संकटात आपली साथ दिली. लढण्याची ऊर्मी दिली. पुण्यात युनिट सांभाळायला देऊन स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली. ‘रेवती गारमेंट्स’ला उभं करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सहकार्यानेच आज आपण उभे राहू शकलो हे विसरून कसं चालेल? खूप उपकार आहेत त्यांचे आपल्यावर! ”

रेवती आपल्याच विचारात मग्न झाली. मोबाईलची रिंग वाजली आणि ती भानावर आली. अनघाचा फोन होता. एक आनंदाची बातमी होती. अनघाचं लग्न ठरलं होतं. तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी अनुरूप मुलगा पसंत केला होता. ‘श्लोक’ नाव होतं त्याचं. आय टी इंजिनिअर. शिवाय मुंबईत स्वतःचा फ्लॅट. गावाकडे शेतीवाडी. छान स्थळ होतं. अनघा आणि तिच्या घरच्यांना श्लोक पसंत पडला. लग्नाची तारीख काढली. हेच सांगायला अनघाने कॉल केला होता. बोलता बोलता रेवतीने अभ्यंकरसर आणि शालिनीताईंविषयी अनघाला सांगितलं. आणि घडलेला संपूर्ण वृतांत कथन केला. अनघा शांतपणे ऐकत होती. रेवतीचं बोलून झाल्यावर तिने बोलायला सुरुवात केली.

“रेवती, तू तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात करावी असं मला मनापासून वाटतं ग! पण कोणत्याही दडपणाखाली तू कोणताही निर्णय घेऊ नकोस. अभ्यंकरसरांनी जी मदत केली., मार्गदर्शन केलं ते खरंच कौतुकास्पद. कोणीही एका कर्मचाऱ्यासाठी इतकं करणार नाही जे त्यांनी तुझ्यासाठी केलं. पण रेवती या उपकाराच्या ओझ्याखाली तू लग्नासारखा मोठा निर्णय तू घेणार आहेस का? की ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे. प्रत्येक संकटात तो सावलीसारखा तुझ्यासोबत असतो. प्रत्येक सुखदुःखाचा तो भागीदार असतो त्याला निवडायचं? हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. 

रेवती, फार कमी लोकांच्या नशिबात निखळ प्रेम असतं ग! जे तुला मिळालं आहे पण तुला समजत नाहीये. तुझं मन काय सांगतंय? त्याचं ऐक.. ते जे सांगेल तेच कर. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सोबत असेन. काळजी करू नको. मी कायम तुझ्या सोबत आहे. ”

अनघा रेवतीला समजावत होती. अनघाच्या बोलण्याने रेवतीला धीर आला. मग अनघाच्या बाकीच्या गप्पा, लग्नाची खरेदी, दागिने, मेहेंदी, हॉल, आदी गप्पा सुरू झाल्या. थोडा वेळ बोलून रेवतीने फोन ठेवून दिला. आणि ती विचार करू लागली. मनातला संभ्रम दूर झाला होता.

काही दिवसांनी अनघाचा शुभविवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरी झाला. अनघा एकुलती एक असल्याने आईवडिलांनी लग्नात तिची प्रत्येक हौस पुरवली होती. रेवतीही लग्नात उपस्थित होती. अनघाच्या पाठच्या बहिणीसारखी तिच्यासोबत होती. अनघाला लग्नाच्या बोहल्यावर चढताना पाहिल्यावर अनघाच्या आईचा ऊर भरून आला. अश्रू अनावर झाले. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लेकीला सासरी पाठवताना दोघांनाही भरून आलं होतं. रेवतीला तिच्या आईबाबांची खूप आठवण आली. रेवतीला तिचा लग्न सोहळा आठवू लागला. आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अनघाची पाठवणी करताना रेवती अनघा गळ्यात पडून खूप रडल्या होत्या. मैत्री कायम राहणारच होती. पण आता अनघाच्या जबाबदाऱ्या वाढणार होत्या. सासर माहेर या दोन घरांना, घरांच्या माणसांना तिला जपायचं होतं. अगदी स्वतःच्या हौसेला मुरुड घालून.  मग अशा वेळीस मैत्री बाजूला पडणार होती. या कल्पनेने दोघींनाही खूप वाईट वाटत होतं. पण अनघाच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती. आपल्या जोडीदारासोबत एका छान सूंदर नवीन विश्वात ती प्रवेश करणार होती. मग अशावेळीस डोळ्यांत पाणी नाही आणायचं. रेवतीने स्वतःची समजूत काढली. आणि हसऱ्या चेहऱ्याने अनघाला सासरी जाताना निरोप दिला. लग्नसोहळा संपन्न झाला. अनघा सासरी निघून गेली.

अनघाच्या लग्नानंतर मात्र रेवतीच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. रेवतीला आता एकटं वाटू लागलं. आपलं ऐकून घेणारं माणूस दुरावलं की जी अवस्था होती. तशी अवस्था रेवतीची झाली होती. अधून मधून फोनवर बोलणं व्हायचं. पण रेवतीला तिची उणीव जाणवू लागली. प्रत्येक लहानसहान गोष्टीत रेवतीला अनघा लागायची. काही झालं तरी ती पहिलं अनघाला सांगणार, तिला विचारणार, तिचं मत विचारात घेणार आणि मग निर्णय घेणार हे ठरलेलं असायचं. रेवती मुंबईला अनघाच्या आईवडिलांही कॉल करायची त्यांची विचारपूस करायची. काळजी घ्यायची. अनघा संसारात रमली. श्लोकच्या प्रेमात न्हाऊन निघाली. सासरची माणसंही खूप चांगली होती. ते अनघाला आपल्या मुलीप्रमाणे जपत. रेवतीची जिवाभावाची मैत्रीण, अनघा सुखात होती.  आणि म्हणून मग रेवतीही अनघासाठी खुश होती. 

काळ पुढे सरत होता. रेवती आपल्या कंपनीच्या कामात व्यस्त झाली. अधून मधून ओंकारचा फोन यायचा. त्याच्याशी बोलताना रेवतीला प्रसन्न वाटायचं. प्रत्येक समस्यांवर त्याच्याकडे तोडगा असायचा. या गोष्टीचं नेहमीच रेवतीला आश्चर्य वाटायचं. कंपनीच्या प्रगतीसाठी त्याच्या सल्ल्याने रेवती प्रत्येक पाऊल टाकत होती. कधी  कधी ओंकार भावुक व्हायचा. त्याचं रेवतीबद्दल असलेलं प्रेम डोळ्यांत तरळायचं. रेवतीला जाणवायला लागलं होतं. त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून तिला उमजू लागलं होतं. पण भूतकाळ पाठलाग सोडत नव्हता. इतकं काही आयुष्यात घडून गेलं होतं की, तिला प्रत्येक नात्याची भीती वाटू लागली होती. नव्याने नात्यांना स्वीकारण्याचं धारिष्ट तिच्यात नव्हतं. आता कुठे ती उभी राहिली होती. तिला पुन्हा त्या दुःखात जायचं नव्हतं. प्रत्येक नात्यांचा खरा चेहरा समोर आला होता. प्रत्येक नात्याने तिला नाकारलं होतं. आणि ती नाकारण्याची भावना तिला अस्वस्थ करत होती. ते तिच्या मनातलं भय संपत नव्हतं. शालिनीताईंनी टाकलेला प्रस्ताव अधूनमधून डोकं वर काढत होता. आणि त्यामुळे रेवती कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हती. 

दिवसांमागून दिवस जात होते. आणि एक दिवस हरवलेल्या नात्यांनी साद घातली. सुट्टीचा दिवस होता. रेवती निवांत वर्तमानपत्र वाचत बसली होती. दारावरची बेल वाजली. रेवतीने दरवाजा उघडला. आणि समोर पाहिलं. चेहऱ्यावर आश्चर्य आणि डोळ्यांत आनंदाश्रू जमा होऊ लागले. अनपेक्षितपणे एक सुखद धक्का तिला मिळाला होता. तिचे जन्मदाते आईवडील तिच्या समोर तिच्या दारात दत्त म्हणून उभे होते. मन भरून आलं. तिने दारातच आईला मिठी मारली. कितीतरी वर्षांनी ती आपल्या आईवडिलांना पाहत होती. रेवतीला खूप आनंद झाला होता. तिने त्यांना आत बोलावलं. बसायला सांगितलं. 

आईबाबांना असं अचानक समोर पाहून तिला खूप आश्चर्य वाटत होतं. आईकडून तिला समजलं की आकाशने फोन करून रेवतीबद्दल सर्व सांगितलं होतं. बाबांना रेवतीला भेटण्याची खूप इच्छा होती. म्हणून आकाशकडून ऑफिसचा पत्ता घेतला. तिथून रेवतीच्या घरचा पत्ता मिळाला. आणि मग ते इथे रेवतीला भेटायला आले होते. रेवतीने आईबाबांना वाकून नमस्कार केला. त्यांनी पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद दिला. बाबा काहीच बोलत नव्हते. मुलीने उभं केलेलं साम्राज्य पाहून ते अवाक झाले होते. लेक आणि पित्याचा मुकसंवाद सुरू होता. मौनातला संवाद दोघांनाही उमजत असावा. अश्यात आसवांनी साथ दिली. मुक्तपणे ते बरसू लागले. 

रेवतीने डोळे पुसले. तिने आईबाबांना फ्रेश व्हायला सांगितलं आणि ती स्वयंपाकघरात जाऊन आईबाबांच्या आवडीचा नाश्ता बनवायला लागली. 

सर्वांचा नाश्ता उरकला. रेवती तिच्या बाबांजवळ जाऊन बसली. वडिलांचा हात हातात घेऊन म्हणाली,

“बापूजी केम छो? मजामा छो ने!”

तिच्या प्रश्नाने रेवतीच्या वडिलांचा आसवांचा बांध फुटला.  

“मने माफ कर दिकरा,मै तारी साथे खूबच अन्याय कर्यो छे” 

असं म्हणून बाबांनी रेवतीला जवळ घेतलं आणि आसवांना वाट मोकळी करून दिली. त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होतं होता. आपल्या मुलीची माफी मागत ते पुढे बोलू लागले. 

“रेवती बेटा, तुझ्या दुःखाच्या, संकटसमयी मी तुला एकटं सोडलं. जुन्या परंपरा, रूढी, खोट्या प्रतिष्ठेला जपण्यासाठी तुझ्यावर अन्याय केला. मुलीचं लग्न केलं म्हणजे आमची जबाबदारी संपली. असं म्हणून मी तुला वाऱ्यावर सोडलं. मला माफ कर दिकरा. तू एकटीने झुंज दिलीस. अन्यायाविरुद्ध लढलीस. आणि जिंकलीसही. बेटा मला तुझा खूप अभिमान वाटतोय बेटा! ” 

वडिलांचे शब्द ऐकून रेवतीचेही डोळे पाणावले. आई सुद्धा रडू लागली. अश्रूंना आवरत रेवती म्हणाली.

“बापूजी, जे झालं ते झालं. आता मागचा विषय काढुन दुःखी का व्हायचं? आकाशने मला मानसिक, शारीरिक त्रास दिला. माहेरून पैसे आण म्हणून मारहाण केली. मला तुम्ही लग्नात इतकं दिलं होतं. अजून तुम्ही कुठून आणून देणार होतात? मला तुमची काळजी वाटली. म्हणून मी त्याचा मार सहन करत राहिले. पण माझ्या आयुष्यात अनघा आली. आणि तिने या नरकातून बाहेर काढलं. माझ्या पायावर उभं केलं. हो खरंय तुमचं म्हणणं! त्यावेळी मला तुमची खूप गरज होती बापूजी! पण नाही  साथ दिली कोणी! 

बापूजी, आजही मी ‘रेवती कांकरिया’ हेच नाव लावते. माझ्या नावाचा मला अभिमान आहे. मुलीचं लग्न झालं की ती माहेरच्या लोकांसाठी परकी का होते? का नाही तिला सांगितलं जात की बेटा तू नवऱ्याच्या घरी सर्वांचा मान  ठेव. पण तुझ्या सन्मानाला धक्का लागला तर तो मात्र तू सहन करू नकोस. सासरच्या लोकांना मायेने वागाव पण त्यांनी अन्याय केलाच तर मात्र माँ दुर्गा होऊन त्या अन्यायविरुद्ध लढ. आणि घाबरू नकोस तुझ्या या लढाईत आम्ही तुझ्या सोबत आहोत. का नाही सांगितलं जात बापूजी? प्रत्येक मुलीच्या आईवडिलांनी ही भूमिका घेतली तर दुसरा आकाश त्याचे घरचे जन्म घेणारच नाहीत. आणि कोणत्याच रेवतीचा नाहक बळी जाणार नाही. माझ्या आयुष्यात काही चांगली माणसं आली म्हणून मी उभी राहू शकले पण बापूजी प्रत्येक मुलीला अशी माणसं मिळतीलच याची काय शाश्वती? म्हणून मुलीच्या आईवडिलांनी स्ट्रॉंग व्हायला हवं ना!आपल्या मुलीसोबत उभं राहायला हवं ना!” 

रेवतीचं बोलणं तिच्या आईबाबांना पटत होतं. स्वतःच्या वागण्याने ते खजील झाले होते. पश्चाताप डोळ्यावाटे वाहत होता.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© निशा थोरे

🎭 Series Post

View all