मोकळं आभाळ भाग २७

ही एक सामाजिक कथा.. एका स्त्रीच्या संघर्षाची..



 

मोकळं आभाळ.. भाग २७

पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, रेवतीने आपला भूतकाळ ओंकारला सांगितला.ओंकारसाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. तरीही तो रेवतीच्या होकाराची शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहणार होता. रेवतीचा बिझनेस झपाट्याने वाढत होता. सर्वत्र देशभर रेवती गारमेंट चे नाव प्रसिद्ध होतं होते. जम बसू लागल्यानंतर बाजारात मागणी वाढू लागली. कंपनीचा व्याप वाढू लागला. म्हणून मग ओंकारच्या सल्ल्याने रेवतीने सध्याची भाड्याची जागा विकत घेण्याचा निर्णय घेतला. जागा विकत घेतली, यंत्रसामुग्री वाढवली. माणसं वाढली. जबाबदाऱ्या वाढल्या. ओंकार,अभ्यंकरसर यांच्यासारख्या अनेक गुंतवणूकदारांनी ‘रेवती गारमेंट’ मध्ये आपले पैसे गुंतवले. आणि त्यांना योग्य तो परतावा मिळत गेला. रेवतीने आता आपले लक्ष एक्सपोर्टच्या बिझनेसकडे वळले. आणि तिथेही आपले पाय रोवायला सुरुवात केली. हळूहळू धंदा वाढत होता. नावलौकिक मिळत होता. सर्व छान सुरळीत सुरू होतं. एक दिवस सिक्युरिटीच्या केबिनमधून रेवतीला फोन आला. कोणीतरी व्यक्ती नोकरीसाठी तिला भेटायला आली होती आता पुढे..

मोकळं आभाळ.. भाग २७


 

रेवतीला तो आवाज परिचित असल्याचा भास झाला आणि   पटकन तिने मागे वळून पाहिलं. समोर बसलेल्या व्यक्तीला पाहून एकदम तिचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. हाताच्या मुठी वळू लागल्या. डोळ्यांतून अंगार बरसू लागला. 

“तू आणि इथे?” 

रेवती जवळजवळ किंचाळलीच.

तिच्या समोर आकाश बसला होता. रेवतीला समोर पाहून तो एकदम आश्चर्यचकित झाला. ज्या स्त्रीला आपण  दुय्यम दर्जा दिला. तिला राहत्या घरातून हाकलून दिलं. आज तिच स्त्री एका कंपनीच्या मालकाच्या खुर्चीत विराजमान होती. आणि आकाश कधी काळी तिच्यावर हुकूमत गाजवणारा, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणारा, सतत रेवतीला अपमानित करणारा तिच्या गतकाळातला नवरा तिच्याकडे नोकरी मागायला आला होता. रेवतीला समोर पाहताच तो गोंधळून उभा राहिला. रेवती त्याच्याकडे  पाहत राहिली. होय! तोच आकाश पारेख!! कधी काळी सुटाबुटाशिवाय बाहेर न पडणारा, एकदम तोऱ्यात असणारा, संपत्तीचा माज असणारा तिचा नवरा आज एकदम साधारण वेषात होता, केस, दाढी वाढलेली, डोळ्याभोवती काळी वर्तुळं दिसू लागलेली, प्रकृती ढासळलेली, अगदी दयनीय अवस्थेत तो तिच्या समोर ओशाळून उभा होता. रेवतीला तो त्याच्या वयापेक्षा जास्तच प्रौढ दिसत होता


 

रेवती अशा रीतीने त्याच्या समोर येईल असं आकाशला कधी स्वप्नांतही वाटलं नव्हतं. त्याची रेवतीच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत होत नव्हती. भांबावलेल्या नजरेने तो इकडे तिकडे पाहत होता. काय बोलावं त्याला समजत नव्हतं. रेवतीच्या अशा अकस्मात समोर येण्याने आकाश  गोंधळून गेला होता. शब्दांची जुळवाजुळव करत त्याने रेवतीला प्रश्न केला.

“अरे रेवती, तू! काय आश्चर्य!  योगायोग म्हणावा का हा! मला कधीच वाटलं नव्हतं की तू मला पुन्हा भेटशील. कशी आहेस तू?” 

“तू इथे का आला आहेस? अजून त्रास देण्याचं काही बाकी आहे का?” रेवती संतापून म्हणाली.

“रेवती, मी तूला काय त्रास देऊ? मी आधीच माझ्या समस्यांनी जखडलो गेलोय. माझ्या कर्माची, तुला त्रास दिल्याची शिक्षा भोगतोय. तुला काय त्रास देणार मी?“

आकाश  डोळ्यांत पाणी आणून म्हणाला. 

रेवतीने त्याच्याकडे पाहिलं. तो बोलतोय त्यात तथ्य होतं. त्याची अवस्था खरंच दयनीय झाली होती. 

“कोणे एके काळचा मोठा उद्योगपती  आणि आज तोच नोकरीसाठी असा वणवण भटकतोय? कामासाठी माझ्याकडे याचना करतोय? असं कसं झालं? एवढी अधोगती का झाली असेल? ही अशी वेळ का आली असेल?”

रेवतीच्या मनात प्रश्नांनी गर्दी केली., उत्सुकता दाटून आली. तिने आकाशला बसायला सांगितलं. आकाशने बोलायला सुरुवात केली.

“रेवती, तुझ्या मनात अनेक प्रश्न आले असतील ना! मी इथे असा कसा? ही अशी अवस्था कशी झाली? 

रेवती, ही माझ्या कर्माची शिक्षा आहे. तुला दिलेल्या त्रासाची परमेश्वराने दिलेली परतफेड! तू निघून गेलीस आणि तुझ्या पावलांनी माझ्या घरात आलेली लक्ष्मीही माझ्यावर रुष्ट होऊन निघून गेली. परदेशातील्या एका मोठ्या कंपनीची मोठी ऑर्डर मिळाली होती. कस्टमर कडून पन्नास टक्के ऍडव्हान्स रक्कम सुद्धा माझ्या कंपनीला मिळाली होती. आणि मग  मी माझे, सर्व गुंतवणूकदारांचे पैसे त्यात गुंतवून ती ऑर्डर पूर्ण करत होतो. ऑर्डर पूर्ण होतच होती की एक दिवस अचानक फॅक्टरीच्या गोडाऊनला आग लागली आणि तयार झालेला सगळा माल जळून खाक झाला. आणि तिथेच नशिबाचे फासे उलटे पडले” 

आकाश बोलता बोलता थांबला. आवंढा गिळत पुढे सांगू लागला.

“सगळंच संपलं होतं. विम्याच्या मिळालेल्या रक्कमेतून परदेशातल्या कस्टमरचे पैसे परत केले. बँकेच्या कर्जाचे हप्ते फेडता येत नव्हते म्हणून मग बँकेने सगळी स्थावर मालमत्ता जप्त केली. गाडी, घरदार सगळं जप्त झालं. गुंतवणूकदारही गुंतवलेली रक्कम परत मागू लागले. पैशांसाठी त्यांनी माझ्या मागे तगादा लावला. काय करावं समजेना. मी गावी आईवडिलांना सांगितलं. गावाकडची जमीन विकून त्यांचे पैसे परत केले. गावी फक्त राहतं घर उरलं होतं. मी आधीच व्यसनाधीन होतो. त्याचा फायदा मित्रपरिवारांनी घेतला. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. धंद्यात नुकसान झाल्यानंतर मित्र म्हणवणारे हात सोडून निघून गेले. सर्वांनीच पाठ फिरवली. मी आता कफल्लक झालो होतो. दरिद्री झालो होतो. 

‘शैली’ माझी सेक्रेटरी, आधी माझ्यासाठी सगळं घरदार सोडून यायला तयार होती. पण नंतर ती मला टाळू लागली. 

“तू तुझ्या लग्नाच्या बायकोला सोडून देऊ शकतोस तर मला का नाही सोडून जाणार?.आता मला तुझ्यासोबत राहायचं नाही. आपलं नातं संपलं” असं म्हणून एक दिवस तीही माझ्या आयुष्यातून निघून गेली. मी परत गावी आईवडिलांकडे गेलो. पण तिथेही काही काम करता येईना. या सर्व धक्क्यांनी बाबा आजारी पडले. त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठीही पैसे शिल्लक उरले नव्हते. नातेवाईकांनीही पाठ फिरवली होती. शेवटच्या दिवसात बाबा  तुझी सारखी आठवण काढत होते. सारखा तुझ्या नावाचा जप लावला होता. मी तुझ्या आईवडिलांना फोन केला आणि तुझ्या बद्दल चौकशी केली. पण त्यांनाही तुझ्याबद्दल काहिच माहीत नव्हतं. मग माझा नाईलाज झाला. शेवटच्या क्षणी बाबा म्हणत होते.,

“रेवती, मुली! पैशाच्या मोहापाई आम्ही तुझा छळ केला. तुझ्या सारख्या पतीव्रता मुलीवर नाही नाही ते आरोप केले. तुला दिलेल्या त्रासाची ही फळ आहेत. सुनबाई, मला माफ कर ग! नाहीतर मला कधीच मुक्ती मिळणार नाही असं म्हणून अखेरीस त्यांनी आपला प्राण सोडला.”

आकाशचे डोळे वाहू लागले. रेवतीलाही वाईट वाटत होतं. कितीही नाही म्हटलं तरी रेवती तिच्या सासूसासऱ्यांवर तिच्या आईवडिलांइतकंच प्रेम करत होती. तिच्याही डोळ्यांत पाणी आलं. 

“पुण्यात राहणाऱ्या माझ्या मित्राच्या मित्रानं तुझ्या या कंपनीत भरती सुरू आहे असं सांगितलं आणि मी काहीही न पाहता, विचार न करता गावावरून तडक इथे आलो. मला मुळीच माहीत नव्हतं की ही कंपनी कोणाची आहे. नाहीतर इथे नसतो आलो ग! आता शरमेने जीव जातोय माझा. तुझ्यासमोर उभं राहण्याची सुद्धा माझी लायकी नाही. तुझ्याकडे नोकरी कोणत्या तोंडाने मागू? आजवर मी तुला फक्त मनस्तापच दिलाय. अजून तुला माझा त्रास नको. निघतो मी.. शेवटची एक विनंती करतोय जमल्यास एकदा आपल्या घरी जाऊन ये. माझी आई तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलीय. तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप होतोय. एकदा तिला भेटून ‘मी तुम्हाला माफ केलंय’ इतकंच सांग. शेवटच्या क्षणी तरी सुख लाभेल तिला. मला माहित आहे माझा अपराध क्षमा करण्याजोगा नाहीये पण तरीही प्लिज फक्त एकदा मला माफ कर.. येतो मी..”

डोळ्यातलं पाणी लपवत आकाश खुर्चीतून उठून जाऊ लागला. 

“थांबा आकाश” 

रेवतीने आवाज दिला तसं आकाशने मागे वळून पाहिलं. रेवतीने थोडा विचार केला आणि तिने तिच्या टेबलवरचं एक व्हिझिटिंग कार्ड आकाशसमोर सरकवलं आणि निर्विकारपणे म्हणाली,

“आकाश, आपल्यात असलेलं नातं केव्हांच संपलंय हे अगदी खरंय. प्रेम वाटावं असं काहीच उरलेलं नाही. पण तरीही माणुसकीच्या नात्याने अजून तरी प्राण सोडलेले नाहीत. त्याच माणुसकीच्या नात्याने मी तुमची मदत करतेय. माझी कंपनी खूप लहान आहे. इथे तुमच्यायोग्य काम नाही. आणि माझ्या आयुष्यात मला पुन्हा तुमची सावलीही नकोय. पुन्हा माझ्या आयुष्यात वादळं नकोय. पण माझ्या कंपनीत जरी तुम्हाला नोकरी नाही मिळाली तरी हे व्हिझिटिंग कार्ड घ्या. यांना भेटा. ते तुमचं काम नक्की करतील या तुम्ही..” 

डबडबल्या नयनांनी आकाशने रेवतीकडे पाहिलं. तिने दिलेलं व्हिझिटिंग कार्ड हातात घेत कृतज्ञतापूर्वक त्याने हात जोडले आणि तो तडक रेवतीच्या केबिनबाहेर पडला. मनात शरम आणि पश्चाताप घेऊन.. 

रेवती शांत बसून होती. आकाशच्या येण्याने पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सगळं आठवत होतं. पण आकाशला त्याच्या कर्माची ईश्वराने खूप मोठी शिक्षा दिली  होती. म्हणून रेवतीने त्याला मदत करायचं ठरवलं होतं. माणुसकीच्या नात्याने.. 

तिने अभ्यंकर सरांना फोन लावला. 

“हॅलो सर, रेवती बोलतेय” -रेवती

“हॅलो, बोला मॅडम, कशी आठवण झाली आज? कसं चाललंय सगळं? तुम्ही ठीक आहात ना?”- अभ्यंकर सर

“हो सर, मी ठीक आहे आणि तुमच्या कृपेने सर्व छान चाललंय. एका कामानिमित्त मी तुम्हाला कॉल केला होता”- रेवती 

“हो बोला ना मॅडम, काय सेवा करू?” अभ्यंकर सर मिश्कीलपणे हसत म्हणाले. 

“सर, आकाश आले होते. त्यांना नोकरी हवीय” 

आणि मग रेवतीने आकाशची सर्व कहाणी अभ्यंकर सरांना सांगितली. तिने आकाशला अभ्यंकर सरांकडे पाठवलं होतं. 

“ठीक आहे मॅडम, मी पाहतो काय करू शकतो का?” 

असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला आणि ते विचार करू लागले. 

पुढे काय होतं? अभ्यंकरसर आकाशला मदत करतील का? पाहूया पुढच्या भागात..

क्रमशः

© निशा थोरे

🎭 Series Post

View all