मोकळं आभाळ भाग २४

ही एक सामाजिक कथा.. एका स्त्रीच्या संघर्षाची..


 

मोकळं आभाळ.. भाग २४

पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, ओंकारच्या मदतीने, जुन्या कंपनीच्या परवानगीने रेवतीने स्वतःची कंपनी सुरू केली. ओंकारने सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. वर्षभरातच रेवतीच्या उद्योग भरभराटीला आला. रेवती आणि ओंकार यांच्यात मैत्रीचं नातं छान रुजू लागलं. ओंकारच्या मनात रेवतीबद्दल असलेलं प्रेम तिला सांगण्याचा ओंकारने ठरवलं. आता पुढे..


 

मोकळं आभाळ.. भाग २४


 

ओंकारने मनाशी निर्धार केला. आणि त्याने रेवतीला फोन लावला. रेवती कामात व्यस्त होती. 

“हॅलो रेवती, कशी आहेस? कामात आहेस का?” - ओंकार

“बोल ना. आहे काम थोडं. ते ‘करिष्मा ब्युटीक’ ची ऑर्डर पूर्ण करायची आहे ना! पण तू बोल” - रेवती

“नाही ग! बरेच दिवस झाले न! निवांत कुठे बसलोच नाही. मी काय म्हणतो आज संध्याकाळी भेटूया का? डिनर बाहेरच घेऊ. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी.” - ओंकार

रेवतीने थोडा विचार केला. आणि कामाचं वेळापत्रक पाहिलं. आणि 

“संध्याकाळी भेटूया आपल्या त्या नेहमीच्याच रेस्टॉरंटमध्ये. तू फक्त वेळेत ये म्हणजे झालं! उगीच वाट पहायला लावू नकोस” 

रेवतीने हसून उत्तर दिलं.

“हो ग! मी वेळेत पोहचेन. जास्त वाट पहायला नाही लावणार ” 

ओंकारने प्रतिउत्तर दिलं. 

संध्याकाळी भेटण्याचं ठरवून त्याने फोन ठेवून दिला. रेवतीही आपल्या कामात गडून गेली. ओंकार संध्याकाळी होणाऱ्या भेटीच्या स्वप्नांत रंगून गेला. उघड्या डोळ्यांना स्वप्नं पडू लागली. ऑफिसमधून घरी आल्यावर फ्रेश होऊन त्याने रेवतीच्या आवडीचा आकाशी रंगाचा शर्ट अंगावर चढवला. तिला आवडणारा परफ्यूम मारला. डोळ्यांवर गॉगल घातला. त्याची आवडती कार पार्किंगमधून बाहेर काढली. आणि तो ठरलेल्या रेस्टॉरंटच्या दिशेने निघाला. अर्ध्या रस्त्यात आल्यावर त्याला काहीतरी आठवलं. त्याने गाडी एका फुलांच्या दुकानासमोर थांबवली. रेवतीला आवडणाऱ्या फुलांचा एक सुंदर पुष्पगुच्छ घेतला. नेहमीच्या ज्वेलर्स कडे जाऊन रेवती साठी हिऱ्यांची अंगठी घेतली. जणू आज रेवतीला प्रपोज करून तिच्या बोटात ही अंगठी घालायचीच! त्याने आधीच ठरवून टाकलं होतं.  त्याने पेमेंट केलं. आज तो प्रचंड खुश होता. 

थोड्याच वेळात ओंकार रेस्टॉरंट मध्ये पोहचला. नेहमीच्या टेबलाजवळ येऊन खुर्चीत रेवतीची वाट पहात बसला. नेहमीपेक्षा तो आज लवकरच पोहचला होता. इतक्यात रेवती येताना दिसली. तिने रेस्टॉरंटच्या सिक्युरिटीला कारची चावी दिली आणि कार पार्क करायला सांगितलं. कार पार्क झाल्यावर त्याच्याकडून चावी घेत हसून त्याचे आभार मानले आणि ती ओंकारच्या टेबलाच्या दिशेने येऊ लागली. आणि ओंकार पुन्हा एकदा तिच्या सौन्दर्याच्या प्रेमात पडला. रेवती जवळ येताच ओंकार उठून उभा राहिला. स्मित हास्य करत त्याने तो पुष्पगुच्छ तिच्या हातात दिला.

“अरे व्वा! आज काय! स्वारी एकदम खुश दिसतेय. एकतर  आज ठरलेल्या वेळेच्या आधीच पोहचलास आणि हा बुके न ऑल! क्या बात है!” 

प्रसन्न मुद्रेने त्याच्याकडे पाहत रेवती उद्गारली. ओंकारनेही हसून तिच्याकडे पाहिलं. दोघांत “आधी कॉफी घेऊ आणि मग  डिनरसाठी ऑर्डर करू” असं ठरलं. त्याने वेटरला आवाज दिला आणि दोन कॉफी घेऊन यायला सांगितलं. रेवतीच्या गप्पा सुरू झाल्या. कॉफीचा आस्वाद घेत रेवती नवीन ऑर्डर्स, कस्टमर्स, नवीन प्लॅंनिंग, प्रोजेकॅशन्स अशा कितीतरी विषयावर भरभरून बोलत होती. ओंकार आज शांतपणे ऐकत होता. 

बराच वेळ शांत बसलेल्या ओंकारकडे पाहत रेवती म्हणाली.,

“काय झालं रे? बरं नाहीये का तुला? आज इतका शांत? तुला इतकं शांत पाहण्याची सवय नाही ना” 

या वाक्यावर रेवती आणि ओंकारही खळखळून हसले.  ओंकार थोडा गंभीर झाला म्हणाला,

“रेवती, आजपर्यंत मी कधीच तुला माझ्या खाजगी आयुष्याबद्दल सांगितलं नाही आणि तुझ्या आयुष्याबद्दलही जाणून नाही घेतलं. त्याचं कारणही तसंच आहे. पण आज मला ते सर्व तुला सांगावंसं वाटतंय. तुला पहिल्यापासून माझा स्वभाव विक्षिप्त वाटला असेल. हो आहे मी विक्षिप्त. आहे माझा स्वभाव तुसडा! आजवरच्या अनुभवांच्या निखाऱ्यावर चालून होरपळून निघालोय ग! आणि स्वभावही तसाच बनला” 

हे सांगताना ओंकारचे डोळे भरून आले होते. रेवतीही गंभीरपणे त्याचं बोलणं ऐकू लागली. डोळ्यातलं आभाळ सावरत त्याने पुढे बोलायला सुरुवात केली.

“रेवती, मी दोन वर्षांचा होतो. तेंव्हा माझी जन्मदाती, माझी आई मला आणि बाबांना सोडून गेली. तिचं प्रेम नव्हतं म्हणे माझ्या बाबांवर! तिने बाबांकडून घटस्फोट घेतला आणि तिच्या प्रियकरासोबत निघून गेली. माझा पुसटसा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. गेली सोडून! ती माझ्या आयुष्यातली पहिली ‘स्त्री’ जिच्यामूळे माझ्या मनात स्त्रियांच्या प्रती द्वेषाचं बीजारोपण झालं. मग बाबांनी दुसरं लग्न केलं. ती आई माझ्यावर सारखी रागावायची. शुल्लक गोष्टींवरून रोज मारायची. पोटभर खायलाही मिळायचं नाही. पण सांगणार कोणाला! आईच्या जाण्याने बाबा पुरते ढासळले होते. ते जास्तीतजास्त वेळ घराबाहेर ऑफिसच्या कामात व्यतीत करत. रात्री खूप उशिरा घरी येत. दारूच्या नशेत धुंद.. कशाचीच शुद्ध नसायची त्यांना. एक दिवस माझ्या सावत्र आईने बाबांचे कान भरले आणि तिच्या सांगण्यावरून मला हॉस्टेलला ठेवण्यात आलं. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी मी आई वडील असतानाही पोरका झालो होतो. ही सावत्र आई माझ्या आयुष्यातील दुसरी स्त्री जिने मला स्त्रियांचा द्वेष करण्यासाठी उद्युक्त केलं.” 

रेवतीने कंठात दाटून आलेला उमाळा आवरून धरला होता. पण डोळ्यातल्या आसवांनी बंड पुकारलं आणि वाहायला सुरुवात झाली. ओंकार बोलत होता.

“त्यानंतर शालेय शिक्षण संपवून मी कॉलेजमध्ये जाऊ लागलो. तिथे मला केतकी भेटली.  दिसायला सुंदर, गोरी गोमटी, निळ्या डोळ्यांची, काळ्याभोर लांबसडक केसांची.. पाहता क्षणीच कोणालाही पसंत पडावी अशीच होती. साऱ्या कॉलेजला तिने वेड लावलं होतं. पण तिला मी आवडायचो. मलाही ती खूप आवडायची. मग एकमेकांच्या कधी प्रेमात पडलो हे आम्हालाच समजलं नाही. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. कधीही दूर न जाण्याची वचनं दिली. पण ऐन वेळेस तिने माघार घेतली. परदेशात राहणाऱ्या युवकाशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली. ती माझ्या आयुष्यातली शेवटची स्त्री जीने माझा विश्वास तोडला. आणि माझ्या प्रेमाला सुरुंग लावला. त्यानंतर मग माझा कोणत्याच स्त्रीवर विश्वास उरला नाही आणि जो काही उरला सुरला विश्वास होता तो माझ्या सावत्र भावंडांनी संपुष्टात आणला. बाबांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते आम्हांला हे जग सोडून कायमचे निघून गेले. बाबांच्या हयातीत सावत्र आईने मोठ्या शिताफीने सर्व स्थावर संपत्ती, घर, जमीन जुमला, कंपनीचे शेअर्स सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं होतं.  आणि मग  बाबा गेल्यावर माझ्या सावत्र भावंडांनी मला वडिलोपार्जित संपत्तीमधून हद्दपार केलं. घरातून हाकलून दिलं. मित्रांनी आधार  दिला. मी माझ्या मित्रांसोबत त्यांच्या फ्लॅटमध्ये राहू लागलो”

ओंकारने दीर्घ श्वास घेतला. क्षणभर थांबला. जखमेवरची खपली निघाली होती. आणि जखम भळभळा वाहू लागली होती. तो बोलू लागला.


 

“‘लिटिल वर्ल्ड’ कंपनीत बाबांचे जे शेअर्स होते ते माझ्या सावत्र भावंडांनी कवडीमोल दामात विकून टाकले. माझ्याकडे काहीच शिल्लक उरलं नव्हतं. पितृछत्र हरपलं आणि खऱ्या अर्थाने पोरका झालो. डोक्यावर छप्पर राहिलं नव्हतं. पण मग म्हणतात न! सर्व दारे बंद झाली की, एक ईश्वर आपल्यासाठी एक दरवाजा उघडतो. तसंच काहीसं झालं. अशा कठीण परिस्थितीत एक व्यक्ती मदतीला देवासारखी धावून आली.  आमच्या कंपनीचे दुसरे डिरेक्टर सुशांत बजाज बाबांचे चांगले मित्र होते. नेहमी आमच्या घरी त्यांचं येणं व्हायचं. सुशांत बजाज यांना संतती नव्हती. मलाच आपला मुलगा मानायचे. बाबांच्या मृत्यूनंतर माझे होणारे हाल त्यांना पाहवत नव्हते. मि. बजाज यांनी ते सारे शेअर्स माझ्या भावंडांकडून विकत घेतले. आणि माझ्या नकळत माझ्या नावावर  ट्रान्सफर करून ठेवले. पण त्यांनी मुद्दामच  मला याची कल्पना दिली नव्हती. कारण त्यांना मला  इतकं सहजपणे आयतं काहीच द्यायचं नव्हतं. ते माझी परीक्षा घेत होते. माझी योग्यता पडताळून पाहत होते. त्यांनी मला नोकरीला ठेवून घेतलं. बारावी पूर्ण झाल्यानंतर लगेच नोकरीला लागलो. पगार मिळू लागला. मित्रांना राहण्याचे घरभाडे देऊ लागलो. हातात पैसे खेळू लागले पण शिक्षण अर्धवट राहिलं. जीव ओतून काम केलं. न दमता, न कंटाळता हा खडतर रस्ता चालत राहिलो. मग कष्टाला, संकटाशी दोन हात करण्याचं बळ मिळत गेलं. पुढे काही वर्षांनी नोकरी सांभाळत मी बाहेरून परीक्षा दिली आणि पदवीधर झालो. तब्बल दहा वर्षांनी माझ्या कष्टाचं चीज झालं. मी बिजनेस सांभाळण्यास सक्षम आहे याची खात्री पटल्यावर योग्य वेळ पाहून त्यांनी मला सत्य सांगितलं आणि माझे शेअर्स मला परत देत मला  कंपनीच्या ‘बोर्ड ऑफ डिरेक्टर्स’ मध्ये सामील करून घेतलं. आणि मी कंपनीचा एम.डी. झालो.”

“पुढे कंपनी मोठी होत गेली. कामाचा व्याप वाढत गेला. घर गाडी बंगला धनदौलत मिळवत गेलो. ऐश्वर्य पायाशी लोळण घालत होतं. पण मनात मात्र  कायम स्त्रियांविषयी  घृणा राहिली. प्रत्येक स्त्रीमध्ये मला माझी आई, केतकी दिसायची. मग मी सर्व स्त्रियांशी तुसडेपणानेच वागत राहिलो. नंतर मग माझा स्वभावच तसा बनला” 

रेवतीच्या डोळ्यांत ओंकारसाठी पाणी आलं. तिने उजव्या हाताने त्याचा डाव्यावर हातावर थोपटत धीर देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली,

“ओंकार, खरंच खूप खडतर प्रवास होता तुझा! इतक्या कठीण परिस्थितीतही तू मार्ग काढत पुढे पुढे जात राहिलास. तुझ्या आयुष्यात आलेल्या कटू अनुभवातून तू शिकत राहिलास. स्त्रियांविषयी तुझं कलुषित झालेलं मन मी समजू शकते. अनुभव माणसाला घडवत असतो हेच सत्य आहे बघ. पण माणुसकीवर विश्वास ठेव. जगात अजूनही माणुसकीचा ओलावा आहे रे” 

रेवती त्याला समजवत होती. रेवतीकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकत ओंकार म्हणाला,

“हो रेवती, जोपर्यंत जगात मि. बजाज आणि तुझ्यासारखी माणसं आहेत तोपर्यंत माणुसकी कधीच लोप पावणार नाही. आज मी तुला माझ्या मनातली अजून एक गोष्ट सांगणार आहे. खरंतर त्या साठीच हे भेटीचं प्रयोजन केलं होतं” 

शब्दांची जुळवाजुळव करत ओंकार बोलू लागला.

“रेवती, माझा स्त्रियांवरचा विश्वास पूर्ण उडाला होता. आणि एक दिवस तू आयुष्यात आलीस. पाहताक्षणीच तू मला आवडली होतीस. पण आता मला फक्त सौन्दर्याने भुरळ पडणार नव्हती. मी तुझ्यासोबत काम करू लागलो. बिझनेसच्या निमित्ताने भेटी होत होत्या. तूला जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. तुझी कामाबद्दलची आस्था कमाल होती.  इतरांच्याविषयी तुझ्या मनात असलेली ओल मला दिसत होती. तुला आठवतं, त्या पार्टीत कामगारांना पगारवाढीची घोषणा झाली. आणि तुझ्या मनात महिला कर्मचाऱ्यांविषयी असलेला जिव्हाळा, ती तळमळ मला स्पष्ट जाणवत होती. ‘लिटिल वर्ल्ड’ ची ऑर्डर पूर्ण झाल्यावर मी अस्वस्थ झालो. पुन्हा आपली भेट होईल का? या जाणिवेने बैचेन झालो. आणि माझ्या लक्षात आलं की मी तुझ्या प्रेमात पडलोय”

इतकं बोलून झाल्यावर ओंकारच्या घशाला कोरड पडली. क्षणभर थांबून त्याने टेबलवर ठेवलेल्या काचेच्या ग्लासमधले पाणी प्राशन केलं. ओंकार बोलू लागला. 

“रेवती, हो माझं तुझ्यावर प्रेम आहे. जी मुलगी इतरांना इतकं छान समजून घेते. ती मला नक्कीच समजून घेईल. तुझी साथ मला आयुष्यभरासाठी हवीय. देशील न साथ?” 

असं म्हणून तो उठून उभा राहिला. जीन्सच्या खिशात ठेवलेली डब्बी बाहेर काढली. डब्बीतली हिऱ्याची अंगठी बाहेर काढली. रेवती उठून ताडकन उभी राहिली. 

गुढघ्यावर अर्धवट बसत हातातली अंगठी तिच्यासमोर धरत ओंकार म्हणाला,

“रेवती, आय लव्ह यू सो मच.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग! मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारच करू शकत नाही. प्लिज मला समजून घेशील? माझ्याशी लग्न करशील? आयुष्यभर सोबत राहशील?” 

त्याच्या या बोलण्याने क्षणार्धात रेवतीच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली.

पुढे काय होतं? रेवती ओंकारच्या प्रेमाचा स्वीकार करेल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© निशा थोरे..

🎭 Series Post

View all