मोकळं आभाळ भाग २२

ही एक सामाजिक कथा..एका स्त्रीच्या संघर्षाची..

मोकळं आभाळ.. भाग २२

पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, ओंकारकडून झालेल्या तारखेच्या घोळामूळे रेवतीला प्रचंड मनस्ताप झाला होता. ती ओंकारवर चिडली होती. ओंकारने झालेल्या घटनेबद्दल, चुकीबद्दल माफी मागितली. आणि त्यासाठी बाहेर रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेण्यासाठी रेवतीला विनंती केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रेवती आणि ओंकार एका छानशा रेस्टॉरंटमध्ये भेटले. आता पुढे..


 

मोकळं आभाळ.. भाग २२

दुसऱ्या दिवशी रेवती ऑफिसमध्ये पोहचली. नेहमीपेक्षा आज थोडी जास्तच प्रसन्न वाटत होती. कालच्या संध्याकाळची रेस्टॉरंटमधली ओंकरसोबतची मिटिंग तीला पुन्हा पुन्हा आठवत होती. कालचे विनोद आठवून तिला आपसूकच हसू येत होतं. मनात येणारे विचार झटकून रेवती कामाला लागली. दोन दिवसांचा वाढवून मिळालेल्या अवधीमूळे सर्वांनाच दिलासा मिळाला होता. 

एक दोन दिवसांत मागवलेलं फॅब्रिक कंपनीत पोहचलं. सर्वजण पुन्हा कंबर खचून कामाला लागले. आणि चार दिवसांतच ‘लिटिल वर्ल्ड’ ची पहिली ऑर्डर पूर्ण झाली होती. सर्व माल पॅक करून गाडीत भरला. सर्वांच्या मेहनतीचं चीज झालं होती. तिच्या कंपनीने पहिल्यांदाच इतकी मोठी ऑर्डर पूर्ण केली होती.  रेवतीच्या डोळ्यांत आनंदाश्रू साचू लागले. तिने ओंकारला फोन  केला.

“हॅलो सर, रेवती बोलतेय. आपली ऑर्डर पूर्ण झाली सर. आताच काही वेळापूर्वी मालाची गाडी तुमच्याकडे पाठवून दिलीय. थोड्याच वेळात गाडी तुमच्याकडे पोहचेलच”   रेवती म्हणाली.

“अरे व्वा! एकदम छान! अभिनंदन! पण तू अजूनही अहो जावो करतेयस” 

ओंकार मिश्कीलपणे हसत म्हणाला.

“ओह्ह सॉरी! विसरलेच सर” 

स्वतःच्याच डोक्यात टपली मारत रेवती जीभ चावत म्हणाली.

“पुन्हा सर.” - ओंकार 

“ओके सॉरी.बरं बाबा ओंकार.. एक काम कर पूर्ण माल चेक करून घ्यायला सांग. काही प्रॉब्लेम असतील तर पुन्हा फॅक्टरीला पाठवून दे. ठीक आहे न” - रेवती

“हो चालेल. मी कळवतो तुला आणि आजच ठरल्याप्रमाणे उर्वरित रक्कम ट्रान्सफर करतो. तुझ्या कंपनीचे बँक डिटेल्स पाठवून दे. आणि हो पुन्हा एकदा खूप अभिनंदन” 

इतकं बोलून ओंकारने फोन ठेवून दिला. पण ओंकारला खूप अस्वस्थ वाटत होतं. उदास वाटत होतं.

“ऑर्डर तर पूर्ण झाली. यानंतर परत असंच बोलणं होईल का?. की इथपर्यंतच होता प्रवास? किती सवय होते न आपल्याला एखादया व्यक्तीची! कालपर्यंत अनोळखी वाटणारी रेवती आज किती जवळची वाटायला लागलीय. कमाल आहे न! इतक्या लवकर या मुलींने मला वेड लावलंय. प्रेमात पडलोय का मी?”

त्याच्यासमोर प्रश्नांची मालिका फेर धरू लागली. दुपारच्या सुमारास रेवतीने सांगितल्याप्रमाणे मालाची गाडी  ‘लिटल वर्ल्ड’ च्या आवारात येऊन थांबली. ओंकारने त्याच्या माणसांना सांगून माल उतरवून घेतला. चेक करून घेतला. सगळा माल चांगला होता. त्याने रेवतीला फोन करून तसं तिला कळवलं आणि उर्वरित रक्कम तिच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा केली. 

सगळं ठरल्याप्रमाणे सुरळीत झालं होतं. रेवतीने जे करून दाखवलं होतं ते खरंच खूप कौतुकास्पद होतं. आज रेवती खूप आनंदात होती. रेवतीच्या, सर्व कामगारांच्या परीश्रमाचं चीज झालं होतं. सर्वांनीच मेहनत घेतली होती. रेवतीने अभ्यंकर सरांना फोन लावला. 

“हॅलो सर, खूप अभिनंदन सर, आपली ‘लिटल वर्ल्ड’ ची ऑर्डर पूर्ण झाली. सर्वांच्या मेहनतीने आपण ही ऑर्डर पूर्ण करू शकलो” - रेवती

रेवतीच्या बोलण्यात आनंद झळकत होता. 

“अरे व्वा अभिनंदन रेवती! यु डिड इट.. गुड जॉब रेवती. मी खूप आनंदी आहे तुमच्यासाठी!”

अभ्यंकरसर आनंदाने उद्गारले. त्यांनाही खूप आनंद झाला होता.

“थॅंक्यु सो मच सर, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात म्हणून हे शक्य झालं. खरंच सर तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर”

रेवतीच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. तिचा आवाज थरथरला. 

“अरे असं काय बोलताय रेवती! मी काहीच केलं नाही. तुमचा प्रामाणिकपणा, कामातली सचोटी, भान हरपून काम करण्याची पद्धत हे सारे गुण आहेत तुमच्याकडे. म्हणूनच तुम्ही हे काम करू शकलात. सर्व श्रेय तुमचंच आहे” 

अभ्यंकरसर खूप कौतुकाने बोलत होते. 

“सर, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. आपल्या इथल्या महिला कामगारांनी, माझ्या सहकाऱ्यांनी खूप सहकार्य केलं आहे. दिवसरात्र सारेजण काम करत होते. त्यांच्याशिवाय हे यश मिळणं निव्वळ अशक्य होतं. सर त्यांचीसाठी मला एक पार्टी आयोजित करायची आहे. आणि त्यांना पगारवाढही. सर तुमचं काय मत आहे? तुम्ही म्हणाल तसाच निर्णय घेतला जाईल” 

रेवतीने प्रस्ताव मांडला. 

“हो, पार्टीची छान आयडिया आहे. त्या निमित्ताने आपल्या कामगारांचं सेलिब्रेशन होईल आणि त्यांचं मनोबलही वाढेल. या पार्टीतच पगारवाढीचीही घोषणा करू. म्हणजे त्यांचा आनंद द्विगुणित होईल. तुम्ही नियोजन करा आणि पगारवाढीचं प्रपोजल मला मेल करा. मी उद्याच बोर्ड ऑफ डिरेक्टर्स च्या मीटिंग मध्ये हा प्रस्ताव मांडेन. तुम्ही काळजी करू नका” 

अभ्यंकरसरांनी रेवतीला परवानगी दिली. रेवतीने त्यांचे आभार मानून फोन ठेवून दिला. रेवतीने कंपनीतल्या सर्वाना ही आनंदाची सांगितली आणि ०१ जानेवारी ही पार्टीची तारीख फायनल केली. वर्षाच्या सुरूवातीलाच एक जोरदार धमाका होणार होता. रेवती पुढच्या तयारीला लागली. समारंभाच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी रेवतीवर आली होती. तिच्याच कंपनीच्या समोर मोकळ्या गार्डनमध्ये तिने पार्टी आयोजित करण्याचं ठरलं. सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण कंपनीला फुलांच्या माळा, इलेक्ट्रिक लायटिंग केली. रात्रीच्या जेवणाचा चांगला मेनू फायनल करून चांगल्या  कॅटरिंगला ऑर्डर दिली. सर्व कामगारांना आपल्या कुटुंबासमवेत निमंत्रित करण्यात आलं. रेवतीने अनघाला आईबाबांना घेऊन कार्यक्रमाला घेऊन यायला सांगितलं. खरंतर अनघा आणि तिचे आईबाबा यांच्याशिवाय तिचं वेगळं कुटुंब असं आता कुठे राहिलं होतं!! तिच तर होती तिच्या जिवाभावाची माणसं! ज्यांनी तिच्या पडत्या काळात साथ दिली. आधार दिला. रक्ताची नाती कुठे उरली होती! 

रेवतीने मुंबईच्या ऑफिसमध्ये सर्व एम.डी. ना आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती केली. काही मोजक्याच कस्टमर्सला आमंत्रणं देण्यात आली. रेवती स्वतः लक्ष घालून सर्व नियोजन करत होती. ज्या कंपनीमूळे हा सोन्याचा दिवस उगवला त्या कंपनीला आमंत्रित करणं गरजेचं होतं. रेवती ओंकारला फोन केला.

“हॅलो ओंकार, रेवती बोलतेय.”

“बोल रेवती, कशी आठवण झाली आज?” -ओंकार

“ओंकार मी  आमच्या कंपनीला मिळालेल्या यशाबद्दल ०१ जानेवारी रोजी एक छोटीशी पार्टी आयोजित केली आहे. आणि त्याचंच आमंत्रण देण्यासाठी कॉल केला आहे. तू येणार आहेस. तस निमंत्रण पत्रिका मी पाठवून देणारच आहे. कृतिकालाही यायला सांग” - रेवती

“हो नक्की येईन मी. निमंत्रण पत्रिका वैगेरे या औपचारिक गोष्टींची खरंच गरज नाही ग! आणि मी कृतिकाला स्वतः घेऊन येईल. मग तर झालं..” - ओंकार

“ हो हो चालेल! सर्वांना नक्की सांग. चल मी फोन ठेवते बोलू नंतर”

असं म्हणून रेवतीने फोन ठेवून दिला आणि आपल्या कामाला लागली.

१जानेवारी पार्टीचा दिवस उजाडला. रम्य संध्याकाळ.. कंपनी छान सजली. रोषणाईने नटली. कामगारांच्या कुटुंबासमवेत, कंपनीचे कस्टमर्स पाहुण्यांच्या उपस्थितीत गजबजली. शांत मधुर संगीत सुरू होतं. रेवतीच्या सहकाऱ्यांनी स्टेजवर काही खुर्च्या लावून घेतल्या. एकीकडे रात्रीच्या जेवणाची कॅटरिंगवाले तयारी करत होते. टेबल लावत होते. कंपनीच्या प्रवेशद्वारावर पानाफुलांची तोरणं सजली. महिला कामगारांनी सुंदर रांगोळी रेखली. येणाऱ्या पाहुण्यांचं गुलाबपुष्प आणि अत्तरदानीतलं अत्तराचं शिंपण करून स्वागत करण्यात येत होतं. मुंबईच्या ऑफिसमधून अभ्यंकरसर आणि रेवतीला कायम मार्गदर्शन करणारी तिचे वरीष्ठ मंडळी, अनघा आणि तिचे आईबाबा आले होते. थोड्याच वेळात ओंकार आणि कृतिका यांनीही हजेरी लावली. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार होता.

इतक्यात ओंकारला रेवती येताना दिसली. आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्यावर जांभळ्या रंगांचा घोळदार लेंहंगा उठून दिसत होता. भुरभरणारे गळ्यात मोकळे सोडलेले केस., ओठांवर दिसणारी गुलाबी रंगाची लिपस्टिक,चेहऱ्यावर हलकासा मेकअप. गळ्यात नाजूक मोत्यांच्या हार आणि हातात मोत्यांचं ब्रेसलेट तिच्या सौन्दर्यात अजून भर घालत होतं. दोन्ही हातांनी आपला लेंहंगा सावरत ती स्टेजवर आली. 

“ओह माय गॉड! सो प्रिटी!! कसली गोड दिसतेय यार.! साक्षात अप्सरा अवतरली जणू!” 

ओंकार तिच्याकडे पाहून अगदी मोहित झाला. 

रेवतीने कार्यक्रमाला सुरुवात केली. सर्वप्रथम तिने अभ्यंकरसर आणि तिच्या वरिष्ठांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली. मग ओंकार बाकीच्या मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली. तीने अभ्यंकर सरांना दीपप्रज्वलन करण्याची विनंती केली. सर्व मान्यवरांना  पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. रेवतीने मान्यवरांना दोन शब्द बोलण्याची विनंती केली. सर्वांनी रेवतीचं, तिच्या कंपनीचं भरभरून कौतुक केली. सर्वांत शेवटी अभ्यंकर सर बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“गुड इव्हीनिंग एव्हरीवन, सर्वप्रथम सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्षाच्या सुरुवातीलाच इतकं छान सेलिब्रेशन म्हणजे भरभराटीचा शुभारंभच. या यशात सहभागी असणाऱ्या आपल्या सर्व ग्राहकांचे मी सर्वप्रथम कंपनीच्या वतीने आभार मानतो. आपल्या कंपनीतल्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून जी कामगिरी केलीत त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप अभिनंदन. रेवती मॅडमच्या कर्तुत्वाला खरंच मानलं पाहिजे. आणि त्यात तुमची साथ म्हणजे ‘सोने पे सुहागा’च. विशेषतः महिलाकामगारांचं विशेष कौतुक वाटतं मला. स्वतःचं घर, नोकरी याचं शिवधनुष्य त्यांनी उत्तम रीतीने पेललं. खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे ही.. असंच परिश्रम घेऊन आपल्या सर्वांना आपल्या कंपनीला वृद्धिंगत करायचं आहे. तुम्ही सर्वांनी इतकी मेहनत घेतली म्हटल्यावर तुमच्या कष्टाचं फळ तुम्हा सर्वांना मिळायलाच हवं ना! म्हणूनच या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हा सर्वांच्या पगारवाढीची घोषणा मी करत आहे. याचं सर्व श्रेय तुम्हाला तुमच्या लाडक्या रेवतीमॅडमना द्यावं लागेल बरं का! त्यांनीच प्रस्ताव मांडला आणि मंजूरही झाला. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन.” 

अभ्यंकरसर भरभरून बोलत होते. रेवतीने त्यांची सर्वांशी ओळख करून दिली. ओंकार आणि अभ्यंकर सरांची ओळख झाली. अनघा आणि आईबाबांनी तिचं अभिनंदन केलं. रेवतीने त्यांची सर्वांशी ओळख करून दिली. ओंकार आणि अनघा यांचीही ओळख झाली. सर्वांनी पंचपक्वांनांचा मनमुराद आस्वाद घेतला. आणि पार्टीची सांगता झाली. सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन आनंदाने आपपल्या घरी परतले.

०१जानेवारी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पार्टी आणि सोबत पगारवाढ अश्या दुहेरी आनंदाने सगळेच खुश झाले. रेवतीबद्दल सर्वांना आता विश्वास आणि आत्मीयता वाटू लागली होती. रेवतीला कामगारांविषयी वाटणारी आत्मीयता पाहून ओंकारच्या मनात रेवतीबद्दलचा आदर अजूनच वाढला होता. त्यानेही तिचं मनापासून कौतुक केलं. तिचं अभिनंदन केलं.

सगळंच सुरळीत सुरू होतं.  सर्वजण रेवतीच्या कामगिरीवर खुश होते. रेवती आणि ओंकार यांच्या कामानिमित्त भेटीगाठी होतं होत्या. दोघांत मैत्री रुजू पाहत होती. 

एक दिवस रेवतीला ओंकारचा फोन आला. 

“हॅलो रेवती, काही दिवसांपासून मी एका गोष्टीचा विचार करतोय. एक महत्त्वाची गोष्ट तुझ्यासोबत बोलायची आहे. तुझा विचार घ्यायचा आहे. तू मला भेटू शकशील? भेटून बोलूया का?” - ओंकार

“ हो ठीक आहे. संध्याकाळी भेटूया. तुझ्याच ऑफीसमध्ये. असही दुसरी ऑर्डर पण पूर्ण झालीय. मी स्वतः येतेय. चल ठेवते बाय”

असं म्हणत रेवतीने फोन ठेवून दिला. काय बोलायचं असेल ओंकारला? तिला प्रश्न पडला. 

“जाऊ दे भेटल्यावर समजेलच ना!” 

असा विचार करून रेवती दुसऱ्या कामाला लागली

पुढे काय होतं? ओंकारला काय सांगायचं असेल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© निशा थोरे

🎭 Series Post

View all