मोकळं आभाळ भाग १८

ही एक सामाजिक कथा.. एका स्त्रीच्या संघर्षाची

मोकळं आभाळ.. भाग १८

पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता रेवतीने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. नवीन शहर, नवीन माणसं सारं काही नवीन होतं. नव्या युनिटची जबाबदारी होती. संपुर्ण नवा सेटअप करायचा होता. नवीन कामगार भरण्यापासून सुरुवात करायची होती. रेवतीने पूर्ण शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावर घेतलं. आणि तिने त्या दिशेने वाटचाल करू लागली. आता पुढे..


 

मोकळं आभाळ.. भाग १८

रेवती आता छान पुण्यात रमली होती. लोकांची बोलणी सोडली तर बाकी तिला कोणताच त्रास नव्हता. तिने तिच्या फॅशन डिझायनिंगच्या कामात स्वतःला वाहून घेतलं होतं.  उद्योग कसा वृद्धिंगत होईल याकडे तिचं संपूर्ण  लक्ष होतं. तिच्या कंपनीत बनवलेल्या ड्रेसेसना बाजारात प्रचंड मागणी होती. चांगला खप होत होता. कामाचा व्याप वाढत होता. उद्योग वाढवण्याच्या प्रयत्नात ती बाहेर मोठमोठ्या व्यापाऱ्यांना भेटत होती. आपल्या कंपनीचे सॅम्पल दाखवून ऑर्डर्स मिळवत होती. 

आजही तीला एका मोठ्या कंपनीत मीटिंगसाठी जायचं होतं. ‘लिटिल वर्ल्ड’ नावाच्या पुण्यातल्या मोठ्या नामांकित कंपनीच्या उद्योजकसोबत मीटिंग होती. ही मीटिंग यशस्वी झाली तर खूप मोठी ऑर्डर मिळणार होती. पाचशे कोटीं रुपयांची उलाढाल करणारी आपला माल मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशात पाठवणारी एक नामांकित कंपनी होती. तिने सोबत आपले सॅम्पल घेतले बॅगत ठेवले. काही डिझाईन्सचे काढलेले स्केचेस घेतले. प्रेझेन्टेशन दाखवण्यासाठी तिचा लॅपटॉप घेतला. मोबाईल घेतला. घरातलं सगळं आवरून ती मिटींगला जाण्याची तयारी करू लागली. रेवती पांढऱ्या रंगाच्या घोळदार लॉंग स्कर्ट, आणि ब्लॅक टॉपमध्ये खूपच मोहक दिसत होती. चेहऱ्यावर हलकासा मेकअप चढवला. आणि ती घराबाहेर पडली.

खरंतर एवढया मोठ्या कंपनीच्या मालका सोबत टायअप करण्याची मोठी संधी चालून आली होती. सकाळी दहा वाजताची मीटिंग होती. पण बराच वेळ बस थांब्यावर थांबूनही बस आली नव्हती. घड्याळ जणू वेगाने पळत होतं. शेवटी रेवतीने कंटाळून रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. तिने रिक्षा थांबवण्यासाठी हात केला. एक रिक्षा तिच्यासमोर येऊन थांबली. ती रिक्षात बसणार इतक्यात एका सव्वीस सत्तावीस वर्षाचा उंचपुरा, रुबाबदार तरुण धावत आला आणि त्याने पटकन येऊन तिच रिक्षा पकडली आणि तो रिक्षात येऊन बसला.

रेवती चिडून त्याला म्हणाली,

“ओ मिस्टर, तुम्ही का बसलात रिक्षात? मी तुमच्या आधी रिक्षा बोलावली होती. मला घाई आहे. तुम्ही उतारा खाली. मी जाणार आहे.”

तो तरुण तिच्याकडे पाहतच राहिला. रेवतीचं सौन्दर्य पाहून मोहित झाला. थोड्या वेळाने भानावर येत तो उत्तरला,

“मॅडम तुम्ही जरी रिक्षा बोलावली असेल तरीपण मी  तुमच्या आधी येऊन रिक्षा बसलोय. त्यामुळे मीच जाणार रिक्षाने. तुम्ही दुसरी रिक्षा बघा. मला जाऊ द्या. आज माझी एक महत्वाची मीटिंग आहे” 

दोघेही ऐकायला तयार नव्हते. शब्दांशब्दाने वाद वाढू लागला. शेवटी तो तरूण ऐकत नाही म्हटल्यावर कंटाळून रेवतीने दुसऱ्या रिक्षाला आवाज दिला. आणि ती काहीशी रागाने त्याच्याकडे पाहत दुसऱ्या रिक्षात बसून निघून  गेली.  

रिक्षा  'लिटिल वर्ड’ कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर येऊन थांबली. रेवतीने रिक्षावाल्याला रिक्षाभाडं दिलं. तो भाडं घेऊन निघून गेला. रेवतीने विझिटर रजिस्टर मध्ये एन्ट्री केली. रिसेप्शनिस्टने स्वागतकक्षात बसायला सांगितलं. आणि तिने साहेबांच्या पर्सनल सेक्रेटरीला फोन करून रेवतीच्या मीटिंगची कल्पना दिली. शिपायाकरवी तिचं व्हीझिटिंग कार्ड साहेबांच्या केबिनमध्ये पाठवून दिलं. थोड्याच वेळात रेवतीला बोलवण्यात आलं. शिपायाने रेवतीला साहेबांची केबिन दाखवली रेवती त्या दिशेने जाऊ लागली.

“मे आय कम इन सर?” 

आत जाण्यापूर्वी केबिनचा दरवाजा जरासा उघडून तिने आत येणाची परवानगी मागितली. खुर्चीत पाठमोऱ्या बसलेल्या साहेबांनी आवाज दिला.

“येस, प्लिज कम इन” 

साहेबांची परवानगी मिळताच ती आत गेली. साहेबांच्या सेक्रेटरीने रेवतीला बसायला सांगितलं आणि ती फाईल ठेवून केबिनच्या बाहेर निघून गेली.

“गुड मॉर्निंग सर, आय अँम रेवती कांकरिया” 

“येस प्लिज” अस म्हणत पाठमोऱ्या साहेबांची खुर्ची गर्रकन फिरवली. समोरच्या युवकाला पाहताच रेवती ताडकन उभी राहिली. आश्चर्यचकित होऊन आपुसक तोंडात शब्द बाहेर पडले.

“तूम्ही! इथे?” 

रस्तात रिक्षात भेटलेला युवक तिच्या समोर बसला होता. रेवतीला समोर पाहून तोही आश्चर्यचकित झाला. त्याने रेवतीला बसायला सांगितलं. स्मित हास्य करत तो म्हणाला,

“अरे व्वा! तुम्ही इथे? तुम्हाला परत भेटण्याची इच्छा होतीच. पण इतक्या लवकर भेट होईल असं वाटलं नव्हतं. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज! मी ‘ओंकार दवे’ या कंपनीचा एम.डी. खरंतर सकाळी याच मीटिंग साठी घाईने येत होतो. नेमकी रस्तात कार बंद पडली. मग ड्राइव्हरला गाडी गॅरेजला घेऊन जायला सांगितलं आणि मी ऑटोने आलो. मग तिथे आपली भेट झाली. बाकी पुढची कहाणी तुम्हाला माहीत आहेच” 

या वाक्यावर तो खळखळून हसला. तो अवांतर बडबडत होता. अगदी अवखळ वाऱ्यासारखा सैरावैरा धावत होता.

“किती बोलतो हा” रेवती मनातल्या मनात पुटपुटली. 

तरीही ती शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. 

विझिटिंग कार्डवर नजर टाकत त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली,

“येस, मिस रेवती! तुम्ही काही सुरुवात करण्याआधी मी बाकीच्या डिरेक्टरांना कॉन्फरन्समध्ये बोलावून घेतो आपण तिकडेच पाहू ते. तोपर्यंत तुम्ही काय घेणार? चहा कॉफी?” 

रेवतीने नको म्हणून सांगितलं. पण तिचं काही ऐकून घेण्याआधीच त्याने कॉल करून “दोन कॉफी आत पाठवून द्या” असं सांगून मोकळा झाला.

रेवतीला त्याचं हे वागणं खूप विचित्र वाटलं. पण ती ग्राहकाच्या दारात होती. त्यामुळे शांतपणे ती फ़क्त पाहत होती. थोड्याच वेळात कॉफी आली आणि दोघांनीही कॉफी संपवली. आणि ते कॉन्फरन्स च्या दिशेने निघाले.

दोघे कॉन्फरन्समध्ये पोचले. त्यांच्या येण्याआधीच बाकीचे डायरेक्टर्स आधीच येऊन बसले होते. ओंकारने रेवतीची सर्वांची ओळख करून दिली. आणि तो म्हणाला,

” बोला मिस रेवती, काय आहे तुमचं प्रपोजल?”

रेवतीने सर्वांचे धन्यवाद मानून बोलण्यास सुरुवात केली,

“गुड मॉर्निंग एव्हरीवन, आय एम रेवती कांकरिया. न्यूली स्टारटेड अ युनिट इन पुणे. आय हॅव द बेस्ट प्रपोजल फॉर युवर कंपनी. मे आय प्रोसीड?”

सर्वांनी होकारार्थी माना डोलावल्या. रेवती आपल्या कंपनीबद्दल सर्व माहिती दिल्यावर तिने आणलेल्या प्रपोजल विषयी बोलू लागली. सर्वात आधी रेवतीने तिच्याकडचे सॅम्पल्स दाखवले. नवीन डिझाईन्सचे स्केचेस दाखवले. सर्वांनाच तिने दाखवलेले सॅम्पल्स, नवीन डिझाईन्स खूप आवडले. नंतर रेवतीने लॅपटॉप बाहेर काढला. पूर्ण प्रेझेन्टेशन दाखवलं. ह्या प्रपोजलमूळे त्यांच्या कंपनीला कसा आणि  किती नफा होईल ही आकडेवारी समजावून सांगितली. रेवती तिचं प्रपोजल सांगत होती. पण ओंकार तिच्याकडेच पाहत होता. तिचं देखणं रूप, तिचं बोलणं, देहबोलीतून दिसणारा आत्मविश्वास त्याला प्रभावित करत होतं. त्याचं तिच्याकडे टक लावून पाहणं  रेवतीच्याही लक्षात आलं होतं. पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि ती  माहिती देत होती.

प्रेझेन्टेशन संपलं तसा तो भानावर आला. आणि  म्हणाला,

“मिस रेवती, प्लिज तुम्ही दहा मिनिटं बाहेर बसा.आम्ही थोडा विचार करून सांगतो”

“ओके, थॅंक्यु सर” 

असं म्हणून रेवती कॉन्फरन्सच्या बाहेर आली. आणि स्वागत कक्षेत येऊन बसली. मनात विचार घोळू लागले

“प्रेझेन्टेशन तर छान झालं. माहीत नाही पुढे काय होईल? पण ही ऑर्डर मिळाली तर आपल्या कंपनीचा खूप मोठा फायदा होईल. मुंबईच्या एम.डी. नी,  अभ्यंकर सरांनी जो विश्वास ठेवून मला पुण्यात पाठवलं आहे त्या विश्वासाचं सार्थक होईल. कंपनीतल्या  गरीब मजूर बायकांचे पगार वाढवून देण्याचा प्रस्ताव अभ्यंकर सरांसमोर मांडता येईल. हे कृष्णा!! प्लिज माझ्या कंपनीला ही ऑर्डर मिळू दे!”

तिने मनोमन तिचा आराध्य कृष्णभगवंताजवळ प्रार्थना केली. 

थोड्याच वेळात रेवतीला आत बोलवण्यात आलं. तिला बसायला सांगितलं. आभार मानत रेवती खुर्चीत बसली. ओंकारने बोलायला सुरुवात केली.

“मिस. रेवती आम्ही तुमच्या प्रपोजलचा नीट विचार केला. या प्रपोजल प्रमाणे काम केलं तर हे नक्कीच छान धंदा होऊ शकेल. आणि यात सर्वांचाच फायदा होईल. अभिनंदन मॅडम! आम्ही तुमच्या कंपनीला ऑर्डर देण्याचा निर्णय घेतला आहे” 

ओंकारने उभं राहून रेवतीला हस्तोलंदन करत तिचं अभिनंदन केलं. रेवतीही उठुन उभी राहिली. सर्व  डायरेक्टर तिचं अभिनंदन करत होते. तिचा तिच्या कानावर विश्वासाच बसत नव्हता. तिच्या कंपनीला ऑर्डर मिळाली होती. रेवतीला प्रचंड आनंद झाला होता.

“थॅंक्यु, थॅंक्यु सो मच सर” 

रेवतीच्या तोंडून उद्गार निघाले. 

तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. रेवतीने त्या सर्वांचा निरोप घेतला आणि ती कॉन्फरन्सरूमच्या बाहेर आली. इतक्यात ओंकारही बाहेर आला. 

“ पुनश्च अभिनंदन! रेवती मॅडम”  

तिला पुन्हा थोडं विचित्र वाटलं.

“आताच तर आतमध्ये अभिनंदन केलं होतं! परत अभिनंदन करायची काय गरज?” 

पण तिने मनातला विचार झटकला. आणि पुन्हा धन्यवाद म्हणून त्याचा निरोप घेतला. 

रेवतीने  जाता जाता ही आनंदाची बातमी अभ्यंकर सरांना कळवली. कंपनीचा नफा दुप्पट होणार होता. त्यांनाही खूप आनंद झाला. रेवतीचं अभिनंदन करत त्यांनी फोन ठेवून दिला. आज रेवती खूप आनंदात होती.

पुढे काय होईल? पाहूया पुढील भागात 

क्रमशः

© निशा थोरे

🎭 Series Post

View all