मोकळं आभाळ भाग १६

ही एक सामाजिक कथा..एका स्त्रीच्या संघर्षाची..

मोकळं आभाळ.. भाग १६

पूर्वार्ध: कथेच्या मागील भागात आपण पाहिलंत की, न्यायालयाने रेवती आणि आकाशचा घटस्फोट मंजूर केला. रेवतीच्या बाजूने निकाल लागला होता. रेवती आणि अनघा यांना खूप आनंद झाला. रेवतीने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. तिच्या घटस्फोटाची बातमी संपूर्ण ऑफिसभर पसरल्याने तिच्याविषयीच्या चर्चेला उधाण आलं. पण रेवतीने पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. डायरेक्टरांनी तिला कॉन्फरन्स रूम मध्ये  मीटिंगसाठी बोलावलं. आता पुढे..


 

मोकळं आभाळ.. भाग १६

समोरची खुर्ची पुढे ओढून “थँक्यु सर” असं म्हणत रेवती खुर्चीत बसली. 

कंपनीच्या एम.डी.नी बोलायला सुरुवात केली. 

“रेवती मॅडम, मी सरळ मुद्याचंच बोलतो. आज एक विशेष विषयावर निर्णय घेण्यासाठी ही मिटिंग बोलावली आहे. तुम्ही आपल्या कंपनीत रुजू झाल्यापासून तुमची आजवरची कामगिरी खूपच छान आहे. तुमचा कामातला प्रामाणिकपणा, तुमची सचोटी खरंच खूप कौतुकास्पद आहे. आपल्या कंपनीच्या व्यवसायात होणाऱ्या भरभराटीत तुमचाही तितकाच महत्वाचा सहभाग आहे. आजच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मिटिंगमध्ये एक खूप महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला बढती देण्याचं ठरवलं आहे. हां पण यात थोडा ट्विस्ट आहे तो असा की आपल्या कंपनीचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका युनिट मध्ये प्रोडक्शन होणं कठीण दिसतंय. अजून एक नवीन युनिट सुरू करण्याचा विचार याआधीच आमच्या सर्वांच्या मनात होता. त्या अनुषंगाने पाऊलं उचलली होती. आपण पुण्यात आपलं नवीन युनिट सुरू करत आहोत आणि तुम्हाला त्या नवीन युनिटची पूर्ण जबाबदारी देण्याचा विचार आहे. आणि त्यानुसार तुमच्या आताच्या पगारातही पन्नास टक्के वाढ करणार आहोत. पुण्यात कंपनीकडून तुमची राहण्याची सोय केली जाईल. तुम्ही विचार करून आपला निर्णय आम्हाला कळवा. म्हणजे आम्हाला पुढच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करता येतील. थॅंक यू, अँड यू मे गो नाऊ.." 

रेवती धन्यवाद म्हणून कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडली. आपल्या जागेवर येऊन बसली. डोक्यात विचारचक्र सुरू झाले. खरंतर ही खूप आनंदाची गोष्ट होती. एका नवीन शहरात एक नवीन ओळख निर्माण करण्याची ही एक नामी संधी होती. ज्या नवऱ्याच्या नावाने तिला फक्त मनस्तापच दिला ते नाव कायमचं आयुष्यातून पुसून टाकण्याची संधी. ‘रेवती पारेख’ ही जुनी ओळख पुसुन ‘रेवती कांकरिया’ या नावाची नवीन ओळख बनवण्याची एक संधी. एक नवीन शुभारंभ करण्याची संधी प्राप्त होणार होती. पण एका अनोळखी शहरात, अनोळखी लोकांत तिचा निभाव लागू शकेल का? या विचारांनी रेवती थोडी धास्तावली होती. संभ्रमात पडली होती. आणि त्या दिवशी घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. त्या दिवशीच्या घटनेने ती पूर्णपणे हादरून गेली. नात्यांवरचा विश्वास उडून गेला.

त्या दिवशी सुमारे रात्रीचे साडे नऊ-दहा वाजले होते. सुरेंद्र रेवतीच्या घरी तिला भेटायला आला होता. याआधीही तो आकाशच्या बातम्या द्यायला वरचेवर घरी यायचा. सुरेंद्र हा आकाशचा जिवलग मित्र. रेवतीपेक्षा एक दोन वर्षांनी लहानच.  तो रेवतीला ताई म्हणायचा. राखी पौर्णिमेला रेवतीने त्याला राखी बांधली होती. दोघांत बहीण भावाचं पवित्र नातं होतं. त्यामुळे कोणतीही शंका घेण्याचं काही कारणच नव्हतं. रेवतीही त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलायची. मुंबई सारख्या मोठ्या शहरात भावाच्या मायेने चौकशी करणारा तो एकमेव होता असं रेवतीला वाटायचं. पण त्या दिवशी तिच्या त्या विश्वासाला सुरेंद्रने सुरुंग लावला. त्या दिवशी सुरेंद्र रेवतीला भेटण्यासाठी घरी आला. रेवती त्याला म्हणाली,

“सुरेंद्रभैया, आला आहेस तर जेवूनच जा. पटकन मुगाची डाळ टाकून खिचडी बनवते. आणि कढी बनवते. आवडते न तुला?”

“नको ग! मला भूक नाही लागली. घरी जाऊन जेवीन.  नाहीतर घरचं जेवण शिल्लक राहिलं म्हणून आई रागवायची  मला” तो हसून म्हणाला. 

त्याच्या या वाक्यावर हसत रेवती उत्तरली,

“नको रे बाबा! माझ्यामुळे तुला मार बसायला नको. तू घरी जाऊनच जेव. पण थांब मग मी आपल्यासाठी कॉफी करते. कॉफी घेऊ” 

कॉफी घ्यायला सुरेंद्र तयार झाला. त्याने होकारार्थी मान डोलावली. आणि रेवती कॉफी करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. पटकन दुधाचं पातेलं गॅसवर ठेवलं. लायटरने गॅस पेटवला. दुधात साखर घालून दूध उखळवायला ठेवलं. इतक्यात सुरेंद्र तिच्या मागोमाग स्वयंपाक घरात आला. किचन ओट्याला रेलून तिच्याशी गप्पा मारत उभा राहिला. हे त्याचं नेहमीचं होतं. म्हणून रेवतीला यात काहीच गैर वाटलं नाही. तीही त्याच्याशी हसून बोलत होती. इतक्यात सुरेंद्र तिच्या जवळ येऊन उभा राहिला. भांडयांच्या मांडणीवरची कॉफीची बॉटल त्याने काढून रेवतीच्या हातात दिली. रेवतीने गप्पा मारत दुधात कॉफी घातली. आणि ती कॉफी तयार होण्याची वाट पाहू लागली. 

सुरेंद्र रेवतीच्या अजून जवळ आला. त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला. त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या उरोजाना होत होता. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच लालसा तिला जाणवत होती.  रेवतीला एकदम विचित्र वाटलं. त्याच्या खांद्यावरचा हात बाजूला करत रेवती थोडी दूर उभी राहिली. अचानक सुरेंद्र पुन्हा तिच्या जवळ आला. तिच्या कमरेत हात घालून तिला कवेत घेण्याचा प्रयत्न करू लागला. तिच्या शरीराशी झोंबू लागला. रेवतीला काहीच सुचेना. स्वतःला सोडवून घेत रेवतीने पटकन गॅस बंद केला आणि ती स्वयंपाकघरातून बाहेर आली. हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसली. तिचं डोकं सुन्न झालं होतं. हे काय घडतंय? तिला काहीच उमजत नव्हतं. सुरेंद्रचं हे वागणं इतकं अनपेक्षित होतं. सुरेंद्र अशा रीतीने तिच्याशी सलगी करेल तिला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. डोळ्यासमोर तिच्या फक्त अंधार दाटून आला होता. सुरेंद्र बाहेर आला. तिच्याजवळ बसत छद्मीपणे स्मित हास्य करत तो धिम्या स्वरात म्हणाला,

“रेवती, खूप छान दिसतेस तू.! आवडतेस मला. आकाश बिनडोक होता. इतकी सुंदर बायको घरात असताना का कोणास ठाऊक! त्याला बाहेर शेण खायची बुद्धी सुचली.  बायकोच्या शारिरीक, मानसिक, लैंगिक बऱ्याच गरजा असतात ज्या जो पुरुष पूर्ण करतो तोच खरा पुरुष. नेमकं हेच आकाश विसरला. मूर्ख होता तो! 

रेवती, इतकं मौल्यवान सौंदर्य तुझं का अशी जाळतेस? देहाचीही एक विशिष्ट भूक असते. ईश्वराने दिलेला इतका अमूल्य देह त्याच्या इच्छा अपेक्षा आपणच पूर्ण करायला हव्यात न! बघ म्हणजे तुझी काही हरकत नसेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी तयार आहे तुझ्या सगळ्या गरजा भागवायला. तुझी भूक, तुझ्या देहाच्या मागण्या मी पूर्णपणे भागवू शकतो” बोलता बोलता त्याने त्याचा हात तिच्या मांडीवर ठेवला आणि तो तिला जवळ ओढून कवेत घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्या  घाणेरड्या स्पर्शाने रेवती रागाने पेटून उठली. खाडकन जागेवरून उठून उभी राहिली. 

“चालता हो! माझ्या घरातून ताबडतोब निघ. नाहीतर मी काय करेन सांगता येत नाही.अरे, ताई म्हणतोस ना मला! हे असलं काही बोलताना तुझी जीभ कशी झडली नाही रे! नीच माणसा! बहीण भावाच्या नात्याचाही तू मान ठेवला नाहीस. निघ इथून, परत तुझं हे तोंड दाखवू नकोस मला” 

रेवती रागाने थरथरत होती.,डोळ्यांतून अंगार ओसंडून वाहू लागला. दरवाजा उघडून तिने बाहेरच्या दिशेने बोट दाखवत त्याला जायला सांगितले. तिचा तो रुद्र चंडिकेचा अवतार पाहून सुरेंद्र वरमला आणि लगेच तिच्या घरातून काढता पाय घेतला आणि  तो  तिथून निघून गेला. 

रेवती बाथरूममध्ये गेली. शॉवर सुरू केला. आणि त्याखाली उभी राहिली. इतक्या थंडीतही ती थंड पाण्यात नखशिखांत भिजत होती. डोळ्यातनं कढत आसवं ओघळत होती. मनातला अग्नी शांत होत नव्हता. सुरेंद्रचा स्पर्श तिला पुन्हा पुन्हा आठवून ती स्वतःवरच चिडत होती. त्याचा स्पर्श खरडून काढण्याचा प्रयत्न करत होती. ब्रशने अंग घासून घासून लाल झालं होतं. पण तो किळसवाणा स्पर्श काही केल्या जात नव्हता. कितीतरी वेळ ती पाण्याखाली तशीच उभी होती रडत होती. 

टेबलवरचा फोन खणाणला आणि रेवती भानावर आली. तिने फोन घेतला. कामाच्या काही सूचना दिल्या आणि रिसीव्हर ठेवून दिला. काही केल्या  तो प्रसंग रेवतीच्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. ऑफिस सुटण्याची वेळ झाली होती तरी रेवतीच्या मनातले विचार काही केल्या थांबत नव्हते. 

“एखादी स्त्री रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करते, एकटी राहते, स्वतः कमावून खाते तर ती वाईटच असते का? मग हाच प्रश्न पुरुषांना विचारला जातो का? त्यांच्या एकटे राहण्यावर कोणी आक्षेप घेतलाय? त्याच्या स्वैर वागण्याला आजवर कोणी जाब विचारलाय? तो अविवाहित वा विदुर आहे म्हणून कोणी त्याचा उपहास केलाय? त्याला नसेल का अपूर्णत्वाची जाणीव? की मलाच सगळे प्रश्न? का मला द्यावी लागते अग्निपरीक्षा सीतेसारखी? का माझ्या अब्रूचे धिंडवडे द्रौपदी सारखे? का माझ्या चारित्र्यावर शिंतोडे? एकटी ‘स्त्री’ म्हटली की सगळे लचके तोडायला तयार.. जंगली श्वापदे सारी. पण खरंच प्रत्येक घराला पुरुषाचं संरक्षण हवंच का? मी नाही का तितकी सक्षम स्वतःचं रक्षण करण्यासाठी? मी स्वतःसाठी जगायचं ठरवलं तर काय चुकलं माझं? का माझ्या हसण्यावर निर्बंध? का आनंदावर विरजण? माझं छान राहणं, माझं असणं, माझं दिसणं का डोळ्यांत खुपतंय साऱ्यांच्या?”


 

‘का’ च्या प्रश्नांची मालिका काही संपत नव्हती. मनातल्या विचारांचं वादळ शमत नव्हतं. पुन्हा मनातल्या विचारांनी वेग घेतला. प्रश्नांचा ससेमिरा संपत नव्हता. 

रेवतीने आपल्या टेबलवरचे पेपर्स आवरले. फाईल्स जागेवर ठेवून दिल्या. तिची पर्स उचलली आणि घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने अनघाला कॉल केला आणि ऑफिसमध्ये झालेल्या मीटिंगबद्दल सांगितलं. 


 

पुढे काय होतं? रेवती कोणता निर्णय घेईल? ते पाहूया पुढील भागात…

क्रमशः

© निशा थोरे

🎭 Series Post

View all