श्रीमेघ पण सतत तिथेच तिच्या आजूबाजूला होता. तिला आणि सर्वांना लागेल ती मदत करत होता. पण सागरच्या लग्नाच्या वेळेस स्वस्तिका आणि त्याच्यामध्ये झालेल्या संभाषणा नंतर ती त्याचापासून दूर दूर राहू लागली होती. कमी बोलू लागली होती. त्याला सुद्धा तिच्यातील हा फरक जाणवू लागला होता. तिच्यात अपराधीपणाचे भाव आले आहेत, हे त्याच्या लक्षात आले होते.
पंधरा दिवसांनी स्वस्तिकाला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. तब्येतीत सुद्धा बरीच सुधारणा झाली होती. आता घरी तिला बरे वाटत होते.
******
"श्रीमेघ, तुला कळत तरी आहे काय तू काय बोलतोय ते?" सागर चांगलाच चिडला होता.
श्रीमेघने स्वस्तिकाच्या पूर्ण परिवारासमोर लग्नासाठी तिला मागणी घातली होती. ते ऐकून घरातील सगळेच त्याच्यावर खूप चिडले होते.
"हो. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे." तो सरळ सरळ बोलत होता.
"श्रीमेघ, आता कुठे ती बरी झाली आहे. आता परत का तिच्या जीवावर उठतो आहेस?" सारंग चिडला.
"अबे साल्या, तू माझा मित्र असून माझ्याच बहिणीवर वाईट नजर ठेवली? तुला काय वाटले आधी हीचा उपभोग घेऊ. तशीही ही मरणारच. मग दुसरी." सागरने त्याची कॉलर पकडली आणि त्याचा पोटात एक गुद्धा मारला.
"मैत्रीच्या नावावर कलंक आहेस तू. तुझ्या सारख्या लोकांमुळेच मैत्रीसारख्या पवित्र नात्याला लोकं नाव ठेवतात." सागर त्याला मारत मारत बोलत होता.
"चल घराच्या बाहेर व्हायचं. निघायचं." सारंग सुद्धा त्याचावर धावून आला.
"चल घराच्या बाहेर व्हायचं. निघायचं." सारंग सुद्धा त्याचावर धावून आला.
"या मुलाला मी आपल्या मुलासारखे समजले. आणि हा मलाच धोका देत आहे." विश्वास सुद्धा चिडले.
सगळे त्याला नको नको त्या शिव्या देत बोलत, मारत त्याचा अपमान करत होते. तो मात्र सगळ्यांची बोलणी ऐकत होता. मार खात होता. त्याने पलटून कोणालाही काही उत्तर दिले नाही.
तेवढयात टीव्ही वर एक व्हिडिओ लागला. त्यात स्वस्तिका शाल पांघरून, कोमेजलेली दिसत होती. मागे कधीतरी तिची तब्येत बिघडली होती. तिचा परिवार तिच्या काळजीत होता, तेव्हाचा तो व्हिडिओ होता. व्हिडिओ मधुन तिचा आवाज आला, तसे सगळे जागीच शांत झाले.
"बाबुमोशय, जिंदगी बडी होनी चाहिए रे.. लंबी नही. आई, बाबा, आजी, दादा, वहिनी मी किती लकी आहे मला इतकं प्रेम करणारा, जीव लावणारा परिवार मिळाला. इथली सगळी लोकं माझ्या आनंदासाठी जीव सुद्धा देऊ शकतात. अगदी या माझ्या नवीन आलेल्या वहिन्या सुद्धा. सांगा बरं आणखी काय पाहिजे आयुष्यात? सगळी नाती मी भरभरून जगलिये. जे हवे होते, ते सगळेच मिळाले आहे. आता मरण आले तरी गम नही. मला सांगा कोण इथे अमृत पिऊन आलेलं? सगळेच एक ना एक दिवस मारणार आहे. पण जर तुम्ही सतत असे दुःखी राहिलात, तर मग मी आनंदी कशी राहणार? चला चला सगळेजण हसा आता. मला पण माझी लग्नाची स्वप्न बघायची आहेत. सत्यात तर हे माझे दादा लोकं माझं कन्यादान करणार नाही. (थोड्या पॉझ नंतर) अरे गमत होती.आणि ती खळखळून हसायला लागते."
इथे सुरू असलेली मारामारी बघून श्वेताने तो व्हिडिओ सुरू केला होता. सगळेजण तो व्हिडिओ बघत होते. आणि एकदम शांतता पसरली.
"बाबा, आई लहान तोंडी मोठा घास घेते. पण आपण लग्नासाठी होकार द्यायला हवा. प्रत्येक स्त्रीचे हे गोड स्वप्न असते, तिच्या लग्नाचे, तिच्या संसाराचे. गोष्टींच्या पुस्तकात वाचलेल्या पांढऱ्या घोड्यावरील राजकुमाराचे स्वप्न. आपण तिला सगळं देऊ शकतो पण तरीही आपण अपूर्ण पडतो. आपल्या सर्वांसाठी ती हसते, नाचते. पण मी तिला एकट्यात रडतांना बघितले आहे. हम आपके है कौन, विवाह सारखे चित्रपट तिला का आवडतात? तिला लव्ह स्टोरीच वाचायला का आवडतात? कारण त्यात ती स्वतःला बघत असते. जे तिच्या आयुष्यात अपूर्ण आहे, ते ती त्यातून पूर्ण करत असते. मी एक मुलगी म्हणून तिच्या भावना समजू शकते." श्रुती सर्वांसमोर मोठ्या धीराने बोलत होती.
"सूनबाई, आम्हा आई वडिलांच्या भावना तुम्ही नाही समजू शकणार. आम्ही आपल्या हाताने तिला मृत्युच्या दरीत नाही ढकलू शकत. आणि तिच्याविना आम्ही कसे जगणार?" विश्वास.
"बाबा, तुमचा त्रास कळतोय हो. तुम्ही तिला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. लोकं काहीही बोलले तरी तुम्ही अगदी तिची ढाल बनून होते. आतापर्यंत आपण सर्वांनी तिच्या आयुष्याचे निर्णय घेतले. आता ती सज्ञान आहे. फक्त एकदाच तिला तिच्या आयुष्याचा निर्णय विचारायला हवा, असे मला वाटते.
"म्हणजे तुला वाटते, आम्ही जे करतो, ते चुकीचे आहे?" सारंग श्रृतीवर थोडा चिडत म्हणाला.
"आम्ही सगळे एवढे प्रेम करणारे लोकं असताना,तिला दुसऱ्या कोणाची गरज नाही." सागरने सरळ निर्णय दिला.
"मी जरा स्पष्टच बोलते. आपण जरी तिला सगळं देऊ शकत असलो तरी, तिला ते नाही देऊ शकत जे तिच्या पतीकडून तिला मिळेल. त्या व्हिडिओमध्ये तिचं वाक्य ऐकले नाही का.. जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं. मनासारखं आयुष्य जगता यायला हवे, मग ते दोनच दिवसाचे का नाही. ती हे पण म्हणाली सगळी नाती भरभरून जगली आहे. फक्त हे एकच राहिले ना? हे पण नातं तिला जगू देत. जरा कडू वाटेल पण डॉक्टरांनी सुद्धा तिच्याजवळ आता वेळ खूप कमी आहे, असे सांगितले आहे." श्वेता.
"श्वेता.." सागर तिच्यावर हात उचलणार होता की विजयाने त्याचा हात रोखून धरला.
"आई तुम्ही एक स्त्री आहात, त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे तुम्ही तिची आई आहात. तुम्हीच सांगा काय करायला हवे?" श्रुती.
बराच वेळ सगळे शांत होते. विजया मात्र एकटक श्रीमेघकडे बघत होती. त्याचा तो केविलवाणा दिसणारा चेहरा, लाचार झालेली नजर वाचण्याचा ती प्रयत्न करत होती. कधी काळी त्याचे इशारे समजणारी ती, आज मात्र tila त्याचे निरागस डोळे वाचणे जड जाऊ लागले होते.
"आपण एकदा मनुला लग्नाबाबत विचारू." विजया म्हणाली. तसा श्रीमेघचा चेहरा आनंदाने फुलला.
"आई तू काही काय म्हणतेय? दुसरा व्यक्ती तिची काळजी घेणार का? आपण दुसऱ्या कोणावर कसा विश्वास ठेऊ शकतो?" सागर.
"म्हणूनच श्रीमेघ. जेवढा जीव तो तुला लावतो तेवढाच मनुला सुद्धा लावतो. लहानपणापासून त्याला बघितले आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणीच बेस्ट असू शकत नाही." श्वेता.
"अहो, एकदा मनुला विचारुया." विजया म्हणाली म्हणून विश्वास तयार झाले. पण तरीही त्यांचा या गोष्टीसाठी विरोध होता.
****
"मनु बाळा." आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी ती जागी झाली.
"आई, तुम्ही सगळे? इथे?" ती जागेवर उठून बसत म्हणाली.
"हो, थोडं महत्वाचं बोलायचं आहे." आई.
"हो बोलना."
"मन्या, श्रीमेघने तुला लग्नाची मागणी घातली आहे. तुझ्यावर प्रेम आहे म्हणतोय. लग्न करायचं म्हणतोय." आई.
"काय? हे शक्य नाही." ती म्हणाली.
"बघ मी म्हणालो होतो, कोणी माझं ऐकले नाही. आता तुझं इथे काही काम नाही." सगर परत त्याची कॉलर पकडत त्याला बाहेर ओढत नेत म्हणाला.
"दादा, तू त्याच्या सोबत हे असे कसे वागतोय?" स्वस्तिका ओरडली.
"मी तर याचा जीवच घेतला असता. पण कधीकाळी हा माझा मित्र होता, म्हणून सोडतोय." सागर.
"दादा, आधी त्याची कॉलर सोड. आणि तुम्ही सगळे बाहेर जा. मला त्याच्यासोबत बोलायचं आहे." स्वस्तिका सुद्धा लग्नाचं ऐकून अवाक् झाली होती.
तिच्या इच्छेचा मान ठेवत श्रीमेघ सोडून सगळे बाहेर गेले.
"हे काय सुरू होते? आणि दादा असे का वागत होता?"
"मित्र आणि भाऊ आहे तो, दुखावला गेला." तो तिच्या पुढ्यात बसत म्हणाला.
"म्हणजे?"
"मनु, विल यू मेरी मी?" इकडचे तिकडचे काहीही न बोलता त्याने विषयात हात घातला.
"काय? तू पागल झाला आहेस?" ती त्याच्या अशा अचानक प्रश्नाने गोंधळली होती.
"आय लव्ह यू."तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुढे बोलला.
"यू आर आऊट ऑफ युअर माईंड."
"मी खरं बोलतोय. मला कळलेच नाही मी तुझ्यात कधी एवढा गुंतलो. आता तुला बरं नव्हते तर माझा सुद्धा जीव जात होता ग."
"तो तर तुझा तसाही जात असतोच. जेवढा माझ्यासाठी तुझं जीव तुटतो तेवढाच तुझा तुझ्या इतर मित्रांसाठी पण तुटतो."
"नाही. हे वेगळे आहे. प्लीज लग्नासाठी हो म्हण."
"तू पागल आहेस का श्रीमेघ? मी तुला संसाराचे कुठलेही सुख देऊ शकत नाही. माझ्यासोबत तुझं भविष्य फक्त अंधारात असणार आहे. आणि मी तुझी किती सोबत करू शकते, हे काहीच माहिती नाही. मी कदाचित उद्या पण नसू शकते. हे बघ तुला खूप छान मुलगी भेटेल अगदी बिपाशा. पण हा हट्ट नको."
बिपाशा शब्द ऐकून तो किंचितसा हसला.
"आयुष्याची गॅरंटी कोणाजवळ आहे? कदाचित मी पण उद्या नसेल. एक्सिडेंट, हार्ट अटॅक असे काहीही, केव्हाही होऊ शकतं."
"श्रीमेघ.." जोराने ओरडत तिने अक्षरशः त्याच्या गालांवर खूप मारले. त्याचा मरणाच्या गोष्टी ऐकून तिच्या डोळ्यातून वेदना तो स्पष्टपणे वाचू शकत होता.
"लग्नासाठी होकार दे. मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत."
त्याच्या शब्दांनी तिला रडू कोसळले. आणि रडतच तिने त्याला मिठी मारली. आणि खूप रडत बसली.
*****
परत एकदा घर फुलांनी न्हावून निघाले होते. आज त्यांच्या लाडक्या मनुचे लग्न होते. हो श्रीमेघ सोबत. घरीच, जवळच्या लोकांच्या आशीर्वादाने दोघांचे लग्न पार पडले. लग्नाच्या सगळ्या विधी आटोपल्या. मनुची पाठवणी करतांना बाबा, तिचे दादा सगळेच खूप रडले.
तिच्या नवीन घरी खूप उत्साहात तिचा गृहप्रवेश झाला. पूजा आटोपली. आणि आता वेळ झाली होती मधुचंद्राची. जसजशी वेळ जवळ येत होती, श्रीमेघचे हृदय बंद पडतेय की काय असे वाटू लागले. तो सर्वांमध्ये बसला तर होता पण त्याचं मन सैरभैर झाले होते. वारंवार पहिली रात्र असे शब्द ऐकून त्याच्या हृदयात कळ उठत होती. ही वेळ संपू नये, असेच त्याला वाटत होते. तो काही ना काही बहाणा करत उशीर करत होता. खरेतर लग्न झाल्यावर या क्षणांची दोघंही खूप आतुरतेने वाट बघत असतात. पण त्याला हा क्षण नको होता.
तिकडे स्वस्तिका मात्र खूप खुश होती. ती खूप छान तयार झाली. पहिल्या रात्रीचे नाव निघाले की ती लाजून चुरचुर होत. श्रीमेघचे नाव निघाले की लाजेने तिचे गाल लाल लाल होत होते.
बहिणी वहिनींच्या घोळक्यात ती श्रीमेघच्या खोलीत आली. आईने दोघांना औक्षणसाठी पाटावर बसवले. श्रीमेघ फक्त तिच्याकडे बघत होता. त्याला असे एकटक बघतांना पाहून तीने स्मित हास्य केले. झाले तो त्या गोड हास्यात हरवला. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तिची सगळी स्वप्न जी पूर्ण झाली होती.
थोड्या वेळाने सगळे बाहेर निघून आले. आता खोलीत फक्त ते दोघेच होते. तो सोफ्यावर बसला होता. पलांगजवल जायला त्याचे पाऊल पुढे पडत नव्हते. बसल्या बसल्याच त्याचा डोळा लागला. त्याच्या छातीवर कोणीतरी बोटाने नक्षी काढताय, असे त्याला जाणवले आणि त्याने खाडकन् डोळे उघडले. बघतो तर मनु त्याच्या जवळ येऊन बसली होती.
"तू?"
"मी तुझ्या कुशीत बसू?"
त्याने होकारार्थी मान हलवली. तसे ती त्याच्या गळ्याभोवती हातांचे वेढे घेत त्याच्या मांडीवर बसली. आणि त्यांच्या खूप गप्पा सुरू झाल्या. ती त्याला भविष्यात काय काय करायचे, त्याचसोबत स्वप्न रंगवू लागली. तो सुद्धा तिला तिच्याच आवडीचे उत्तरं देत होता. अगदी घर कसे सजवायचे, मुलगा की मुलगी, त्यांची नावं, त्यांना कुठल्या शाळेत पाठवायचे, त्यांची लग्नं, मग म्हातारपण, असे सगळं ती अगदी स्वप्नवत सांगत होती. बोलण्यात ती इतकी गुंग झाली होती की तिला सुद्धा तिच्या बिमारीचा विसर पडला होता.
" माझं आयुष्य इतकं सुंदर बनावण्याकरीता, थँक्यू!" म्हणत त्याला काही कळायच्या आतच तिने त्याच्या ओठांवर किस करत त्याचे ओठ आपल्या ताब्यात घेतले. झालं ज्या क्षणापासून तो पळत होता, तोच तिने गाठला होता.
"मनु आता नको. खूप थकलोय." तो खोटं बोलला.
पण तिला ऐकू तरी कुठे गेले होते. ती तर त्याचा सहवासात धुंद झाली होती. तो नाही नाही म्हणत होता. पण तिला मात्र तो हवा होता. तिने त्याचा चेहरा अजिबात सोडला नव्हता. तो मात्र स्वतःच मन ताब्यात ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होता. पण शेवटी पुरुषच तो, काही क्षणानंतर त्याचा संयम ढळला. आता तो पण तिला प्रतिसाद देऊ लागला होता. त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतले आणि पलंगावर आणून झोपवले. लाइट्स बंद केले. मंद मंद आवाजात गाणे सुरू होते. आणि इकडे हळूहळू तो तिचे शरीर ताब्यात घेत होता.
ती आता पूर्णपणे त्याची झाली होती आणि तो तिचा. ती त्याच्या मिठीत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्णत्वेचे हसू उमलले होते. तर त्याच्या बंद डोळ्यांत अश्रूंची धार लागली होती.
*********
"तिच्या चेहऱ्यावरील हा आनंद बघण्यासाठी तू लग्न केले होते ना?" लग्नाचा फोटो अल्बम बघत बसलेल्या श्रीमेघ जवळ येत विजया म्हणाली.
"खूप सुंदर दिसतेय ना या लाल रंगाच्या साडीत. आणि हा बघा हा , हातातील हिरवा चुडा किती सुंदर खणखणतोय. हा बघा, मंगळसूत्र घालतांना किती गोड हसतेय. तिची ही पायावरची मेहंदी, आणि ती पैंजण, कानात अजूनही आवाज घुमतोय.."श्रीमेघ विजयाला एक एक फोटो दाखवत होता.
"तिच्यावर तुझं प्रेम नव्हते ना? मग का केलं लग्न?\"
"कोण म्हणे? मी तिच्या खूप प्रेम करतो."
"जेव्हा तिला लग्नासाठी प्रपोज केले, तेव्हा होते प्रेम? तेव्हा तुझी मैत्री बोलत होती. मैत्रिणीच्या आनंदासाठी केलेले ते एक नाटक होते."
"असे नाही."
"डायरेक्ट लग्न म्हणाला असता तर तिला तिच्यावर दया करतोय, असे तिला वाटू नये. म्हणून तू तिला आय लव्ह यू म्हणाला होता ना?"
"नाही. मी खरंच तिच्यावर प्रेम करतो."
"श्रीमेघ.. खोटं बोलू नको. आई आहे मी. सगळ्यांचा नकार होता तेव्हाच तुझ्या डोळ्यात वाचलं होते. तुझ्या डोळ्यात मैत्रिणीच्या आनंदासाठी जळणारे हृदय दिसत होते. त्यानंतर शृतीने पण सगळं सांगितले आहे."
तो आपली नजर चोरत होता.
"अरे बाळा, लग्न न करताच तिला जे हवे होते ते देऊन द्यायचं असतं. त्यात आपलं आयुष्य का खराब केलंस?"
"आई, तिच्या चारित्र्यावर कोणी एकही शब्द उच्चारलेला मला चालला नसता."
"मैत्रीत कोणी इतकं पागल असतं का? त्या दिवशी सागर पण किती आरोप करत होता. तरी मुक गिळून बसला होता."
"आई, फक्त मुलींनाच "सौभग्यावती भव" चा आशीर्वाद का देतात? आम्हा मुलांना पण हवा असतो हो असाच आशीर्वाद." त्याच्या डोळ्यांत आसवे जमा झाली होती. आवाज थरथरत होता. लग्नातील मोठ्यांना नमस्कार करतांनाचे फोटो बघत तो बोलत होता.
"श्रीमेघ, तू खरंच तिच्या प्रेमात पडला काय?" विजयाच्या हृदयात आता भीतीने कापरे भरू लागले होते.
"सप्तपदी चालताना, मंगळसूत्र घालताना, अग्नी भोवती फेरे घेताना.. तिचा नाजूक हात हातात घेतांना, कधी प्रेम झाले कळलेच नाही. बहुतेक त्या अग्नीत, त्या मंगळसूत्रातच एवढी ताकद असते."त्याच्या डोळ्यांतील पाणी अल्बमवर पडू लागले. तो आपल्या पालथ्या हाताने वारंवार पुसत होता. पण अश्रू थांबत नव्हते.
"श्राद्ध विधीची वेळ झाली." गुरुजींचा आवाज आला.
"जायला हवे." म्हणत त्याने अल्बम बाजूला ठेवला.
**********
समाप्त.