मोहात अडकवणारा तो एक क्षण २

मुलींची पण शारीरिक गरज मुलांसारखी नैसर्गिक असते काय?


मोहात अडकवणारा तो एक क्षण
भाग २


"मला ते..ते हवय." ती सागरच्या खोलीकडे बोट दाखवत म्हणाली. तिथे वरती छतावरून सागरची खोली स्पष्ट दिसत होती.

"साग्याची रूम? अग तुझा दादाच आहे तो. तू त्याला सांगून तर बघ. तो त्याची सुहागरात कॅन्सल करून आधी रूम रिकामी करून देईल." तो मस्करी करत म्हणाला.

"नाही."

"मग?"

"तिथे जे सुरू आहे ते.."

"म्हणजे?"

" जे तू तुझ्या गर्लफ्रेंड सोबत करतो ते."

त्याला तिचे ते बोलणे ऐकून अचानक धक्का बसला. तरी तो न समजल्यासारखे भाव आणत तिच्याकडे बघत होता. कारण ती जे बोलत होती, ते ऐकणे त्याला जड जात होते.

"प्रेम?" तो अडखळत म्हणाला.

"शारीरिक प्रेम." ती त्याच्याकडे बघत खूप अपेक्षेने म्हणाली.

"लग्न करायचं आहे?"

"नाही. आणि माझ्यासोबत लग्न तरी कोण करणार? घरचे पण करू देणार नाही. आणि ठीक आहे, मला सुद्धा लग्न करून कुणाचे आयुष्य खराब करायचे नाही. पण मला ते हवय. एकदाच अनुभवायचं आहे."

तिची नजर त्याला वेगळीच जाणवत होती. नेहमीच्या मैत्रीपूर्ण नजरेत आज काहीतरी वेगळं होते. काहीतरी वेगळी मागणी जाणवत होती.

"मनु?" तो भांबावल्या नजरेने तिला बघत होता.

"मला तुझ्याकडून हे शारीरिक सुख हवय." ती आता स्पष्टच बोलली.

"मनु.." तो थोडा जोराने ओरडला. त्याचा हात तिच्यावर उठणाराच होता की तिच्या डोळ्यात त्याला खूप लाचारी दिसली. सोबतच तिच्या चेहऱ्यावरील निरागसता बघून त्याने आपला हात खाली केला. तिचा तो केविलवाणा चेहरा त्याचा जीव घेत होता.

"मनु, असे काही नाही होऊ शकत." तो बऱ्यापैकी स्वतःला शांत ठेवत म्हणाला.

"का? का नाही होऊ शकत?"

"आपण फ्रेंड्स आहोत. तू माझी मैत्रीण आहे. आणि मैत्रीचे नाते खूप पवित्र नाते असते. त्यात मनाची ओढ असते. शरीराची नाही. मला माझ्या मैत्रीला कलंक लावायचा नाही."

"मैत्री मध्ये मित्राने तिला तिच्या स्वपनांना, इच्छांना पूर्ण करण्यात मदत केली पाहिजे."

"तू जे म्हणशील ते सगळं करायला मी तयार आहे. पण हे नाही."

"माझ्या शरीराला बाहेरून काही जखम झाली, तर तू मलम लावतोस ना. आता माझ्या मनाला, माझ्या आंतर शरीराला जखम झालीये आणि त्याला ठीक करायचे आहे, असे समज. हे प्रेम तुझ्याशिवाय कोणीच नाही करू शकत रे. दोन्ही दादा माझ्या आजूबाजूला एकही मुलाला भटकू सुद्धा देत नाही. फक्त तूच एक आहेस जो माझ्या सोबत असला तरी कोणाला काही प्रोब्लेम नसतो. तू माझा मित्र ना? मी तुझ्या जवळच मला जे हवे ते मागू शकते ना? मी तुझ्या आयुष्यात काहीच घोळ घालणार नाही. तुझं आयुष्य जसे सुरू आहे तसेच राहील. मला फक्त तुझ्या आयुष्यातले हे काही गोड क्षण दे." ती विनवणीच्या सुरात म्हणाली.

"मनु, काय हे असे पागल झाल्यासारखे बोलते आहे. कोणावरही असा विश्वास ठेवायचा असतो काय? लग्न झाल्याशिवाय आपलं शरीर असे कोणाच्याही स्वाधीन करायचं नसतं." तो तिला समजावत म्हणाला.

"तू करतो ना? तुमची मुलांची काय तर म्हणे ती नैसर्गिक गरज आहे. तुम्हाला चालतं. मग मला का नाही? माझी पण ही नैसर्गिक गरजच आहे ना."

"मनु आता ही बकवास बंद कर. " तो थोडा चिडत म्हणाला.

"तुझा ब्रेकअप झाला आहे. मी तुला तुझ्या कुठल्या गर्लफ्रेंडला धोका द्यायला सांगत नाहीये."

"गर्लफ्रेंड असो नसो. तरी मी हे असे काही करू शकत नाही." तो थोड्या कडक आवाजातच म्हणाला.

"का? मी सुंदर नाही? तुझ्या आतापर्यंत झालेल्या ४-५ गर्लफ्रेंडपेक्षा कितीतरी पटीने मी अधिक सुंदर आहे. तुला विश्वास नाही बसत? थांब दाखवते." असे म्हणत तिने त्याच्या पुढ्यात तिने घातलेल्या घागऱ्या वरील ओढणीचा पदर दूर सारत ओढणी खाली जमिनीवर टाकली.

"बघ नाजूक, सुंदर आणि मुलायम आहे.." ती आपल्या पोटावर हात ठेवत म्हणाली. तो मात्र तिचे हे असे वागणे बघून निशब्द झाला होता. तो फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत होता.

"मला पण वाटतेय कुणीतरी मला मिठीत घ्यावे. मला पण तो पौरूषी स्पर्श हवाय. मला पण वाटतेय कुणी माझ्या इथे कपाळावर कीस करावे. नंतर इथे डोळ्यांवर, इथे नाकावर. इथे ओठांवर. इथे गळ्यावर. इथे.."

"मनु शट अप!" बोलता बोलता तिचा कपळापासून, डोळ्यांवर , मग नाकावर असा हळूहळू खाली येणारा हात त्याने पकडला आणि दूर झटकला.

"यू आर आऊट ऑफ यूअर माईंड." तिची खाली पडलेली ओढणी उचलत तिच्या दोन्ही खांद्यावरून नीट पांघरून देत तिला रागावला. आणि झपझप पावले टाकत तिथून घरी निघून गेला. स्वस्तिका मात्र तिथे एकटी आपल्याच हातांची स्वतःभोवती मिठी मारत रडत बसली होती.


झोपायला तो पलंगावर तर पडला होता. गेल्या चार पाच दिवस सागरच्या लग्नाची बरीच धावपळ झाली होती. खूप थकला होता. पण काही केल्या झोप मात्र येत नव्हती. वारंवार त्याचा डोळ्यांपुढे स्वस्तिकाचा तो केविलवाणा चेहरा येत होता. तिच्या डोळ्यातील लाचारी दिसत होती. ते सगळं आठवून त्याच्या हृदयात कळ उठत होत्या. कंठ दाटून आला होता. डोळ्यातील अश्रू कधी गालांवर ओघळू लागले त्याचे त्याला सुद्धा कळले नाही. त्याने डोळे बंद केले आणि अचानक हसरी, ती लहानपणीची स्वस्तिका त्याच्या डोळ्यांपुढे येऊ लागली. आणि आपसूकच त्याच्या ओठांवर हसू उमलले. तो जुन्या आठवणीत रममाण झाला. त्याला सगळं जसेच्या तसे आठवू लागले.

भूतकाळ…

"स्वस्तिका" त्याने घरावरील नाव वाचले.

"हम्म माझ्या लहान बहिणीचे नाव आहे. तिचा जन्म झाला आणि आमची परिस्थिती एकदमच बदलली. ती लक्ष्मीच्या पावलाने घरात आली, असे बाबा म्हणतात. बाबांचा तिच्यावर खूप जीव आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांचीच ती खूप लाडकी आहे. मग हे नवीन घर बांधले तर तिचेच नाव दिले." सागर माहिती पुरवत होता.

"स्वस्तिका नावच किती भारी आहे. मला जाम आवडले." तो म्हणाला.

"हो हो. बरं चल आता पटकन." सागर त्याचा हात ओढत त्याला आतमध्ये नेऊ लागला.

"आई, हा माझा बेस्ट फ्रेंड, काही दिवसांपूर्वीच शाळेत आला आहे. खूप हुशार आहे. सगळ्या प्रश्नांची भरभर उत्तरं देतो." सागर घरात सगळ्यांसोबत त्याची ओळख करून देत होता.

"आणि ही माझी बहिण स्वस्तिका." डायनिंग टेबलवर दूध पित बसलेल्या स्वस्तिका जवळ जात सागर म्हणाला.

"मनु, हा माझा बेस्ट फ्रेंड."

"दादा त्याला नाव नाहीये का? मघापासून माझा बेस्ट फ्रेंड , बेस्ट फ्रेंड करूनच सर्वांसोबत ओळख करून देतो आहेस?" स्वस्तिका हसत म्हणाली.

"सागर, हे घे नाश्ता घेऊन जा." आईने आवाज दिला तसे सागर स्वयंपाकघरात पळाला.

"श्रीमेघ. श्रीमेघ नाव आहे माझं." तो म्हणाला.

"श्रीमेघ? हे कसं नाव? मी कधीच कुठे ऐकले नाही की वाचले नाही. " ती हसत म्हणाली.

"मला मोठा भाऊ आहे. मग माझ्या आईला मुलगी हवी होती. तिला तिचे मेघा नाव ठेवायचे होते. पण मी टपकलो. म्हणून मग तिने मेघाचे श्रीमेघ नाव केले." त्याने हसत उत्तर दिले.

"कूछ भी?" तिला त्याचा नावाची कथा ऐकून हसू आले.

"अरे सच्ची. बरं तुला ते दुधाची मिशी आलीय. फनी दिसतेय." तो हसू लागला. मिशी पुसत पुसत ती पण हसू लागली.

"बरं मी ११वी मध्ये आहे, तुझ्या दादा सोबतच. तू?"

"मी आठवीत."

"मी तुझ्या दादा.."

"तू खूप फनी आहेस. माझा फ्रेंड होशील? मला मैत्रिणी आहेत. पण एकही मित्र नाही." त्याचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच ती म्हणाली.

"हो हो नक्कीच. फ्रेंड्स?" म्हणत त्याने हात पुढे केला.

तिने सुद्धा आनंदाने हात मिळवला.

"मेघ्या, चल क्रिकेट खेळायला. सगळे आलेत." सागरने आवाज दिला.

"दादाला पण माहिती वाटते तुझ्या नावाची स्टोरी?" ती म्हणाली.

"हो मनु. म्हणूनच मला मेघा म्हणून चिडवतात." हसत तो बाहेर पळाला.

घराबाहेरील पटांगणात सागरचे सगळे मित्र मैत्रिणी जमले होते. त्यांचे दोन गट पडले. सगळे मिळून लगोरी खेळू लागले. स्वस्तिका दूर एका बाकावर बसून त्यांचा खेळ बघत होती.

"हे मनु, तू पण चल की खेळायला." श्रीमेघ तिला एकटीला बसलेले बघून तिच्या जवळ येत म्हणाला.

"नाही नको. आई रागावते." स्वस्तिका म्हणाली.

"अग आई का रागवेल? आमच्या सोबत आमच्या मैत्रिणी पण खेळत आहेत. चालते." तो तिच्यापुढे हट्ट करू लागला.

"नाही. मला हा गेम खेळायला जमत नाही."

"मग तुला कुठला खेळ आवडतो?"

"बुद्धीबळ."

"हा?" तो आ करत तिच्याकडे बघत होता.

"चेस. खेळणार का?"

"हो हो नक्की नक्की. पण आता नाही. रविवारी येतो." म्हणत तो परत खेळायला पळून गेला.


*****
तो स्वस्तिकाची मागणी पुरवेल काय? काय असेल स्वस्तिकाची लाचारी?


क्रमशः

🎭 Series Post

View all