मोहात अडकवणारा तो एक क्षण ४

आयुष्य एवढे निष्ठुर का असावं?


भाग ४

एक एक करत लग्नानंतरचे सगळे कार्यक्रम सुद्धा छान पार पडले. या दरम्यान स्वस्तिका मात्र आपल्याच विश्वात रमली होती. तिला लग्नाची चाहूल लागली होती. ती सुद्धा आता तिच्या सोनेरी भविष्याचे स्वप्न रंगवू लागली होती.


असेच गप्पा गोष्टी करता करता सागर, स्वस्तिका आणि श्रीमेघ मोठ्यांच्या खोली समोरून जात होते. तर त्यांना थोडे मोठ्याने बोलण्याचा आवाज आला. आणि ते तिथेच खोलीबाहेर थांबले.

"आक्का,तुला सांगितले ना की, मला माझ्या मुलीचे लग्न करायचे नाही."स्वस्तिकाचे वडील विश्वास बोलत होते.

"अरे पण त्यांनी स्वतःहून स्वस्तिकाला मागणी घातली आहे. मुलगा पण किती छान राजस आहे.आपल्या स्वस्तिकाला सुखी ठेवेल.अग विजया तू तरी याला समजव.मला माहिती याचा जीव तिच्यात अडकला आहे. पण संसाररीत कोणाला चुकली काय?मुलींना एक ना एक दिवस बापाचं घर सोडून जावेच लागते."आक्का समजावत होती.

"आक्का,माझी मुलगी मला जड नाही.मी आयुष्यभर तिचा सांभाळ करू शकतो.ती कुठेही जाणार नाही. लग्नासाठी त्यांना नकार कळव."विश्वास जरा कडक आवाजातच म्हणाले.

"स्वस्तिकाला तरी एकदा विचार?तिला मुलगा नसेल आवडला तर जबरदस्ती नाही."आक्का.

"तिला विचारायची गरज नाही.तिचे बरेवाईट मी जाणतो. घरात माझा निर्णय शेवटचा निर्णय असतो." विश्वास.

" वंदू आक्का,हे बरोबर बोलत आहेत.तुम्ही नकार कळवून द्या." विजया स्वस्तिकाची आई म्हणाली.

"एवढा आडमुठेपणा बरा नव्हे.तू असेल महाश्रीमंत, पण म्हणून एवढे अहंकारी असू नये.पैशाने सगळं विकत घेता येत नाही.आपल्या लेकीसाठी असा कोणता राजकुमार शोधून आणणार आहेस?इतक्या चांगल्या स्थळाला नकार देतोय." आक्का थोडी चिडत म्हणाली.

"माझ्या मुलीसाठी काय विकत घ्यायचं काय नाही,माझं मी बघून घेईल. बाहेरच्यांनी सल्ले द्यायचं काम नाही." विश्वास.

विश्वासचे बोलणे ऐकूण आक्का रागाने बाहेर निघून गेली.

हे सगळं बोलणं पोरांनी ऐकले होते. लग्नासाठी नकार दिलेला बघून स्वस्तिकाचा चेहरा उतरला होता.

"काका काकू असे का करत आहेत?खरंच प्रेम चांगला मुलगा आहे.मी स्वतः त्याची माहिती काढली आहे.आपल्या मनुला खूप सुखात ठेवेल.मला पण आक्काचे म्हणणे पटते आहे. पैशाने सगळं विकत घेता येत नाही."श्रीमेघ बोलतच होता की आतून रडण्याचा आवाज ऐकू आला.बघितले तर चक्क विश्वास रडत होते. त्यांना रडतांना बघून स्वस्तिका, श्रीमेघ अवाक् झालेत.सागर मात्र दुःखी दिसत होता.


"मी खूप कमनशिबी बाप आहे.इतकी संपत्ती कमावली.पण माझ्या पोरीचे आयुष्य विकत घेऊ शकत नाही. तिचा आनंद विकत घेऊ शकत नाही. लहानपणा पासूनच तिला बिचारीला धाकात राहावं लागलं. किती बंधन लादली. तिला आवडणारा तिचा आनंद तिला नाही देऊ शकलो."विश्वास अगदी लहान मुलांसारखे रडत बोलत होते.


"नका मन छोटे करून घेऊ. तुमच्या परीने जे जे करता येईल ते सगळेच तुम्ही केले. देवाच्या इच्छेपुढे आपण काय करू शकतो."विजया त्यांना समजावत होती.

"दादा काय झालं आहे?बाबा असे का रडत आहेत?" स्वस्तिकाच्या डोळ्यात खूप प्रश्न जमा झाले होते.

"काही नाही.असेच ते आक्का बोलली म्हणून असेल."सागर नजर चुकवत म्हणाला.

"पण एवढे?"श्रीमेघ.

"तुला माहिती आहे ना,मनुची तब्येत लहानपणापासून किती नाजूक आहे.म्हणून बाबा लग्नासाठी नकार देत होते.

" पण मला तो मुलगा आवडला होता.मी माझी काळजी घेईल." स्वस्तिका म्हणाली.

"हो पण जेवढी आम्ही तुझी काळजी घेऊ शकतो तेवढी कोणी घेऊ शकतं काय?आणि सासू खाष्ट निघाली तर?तुला खूप कामं सांगितले तर?आईने काही शिकवले नाही,असे टोमणे दिले तर?तुला माहिती, मग आपल्या आईपुढे तो मुलगा पण आपल्या आईचीच बाजू घेतो.तुझी घेणार नाही.तू सद्ध्या लहान आहेस. म्हणून बाबा एवढया लवकर तुझे लग्न करायचं नाही म्हणतात. आता सारंग दादाचे लग्न झाले.मग माझे. मग या येड्याचे. मग तुझे बघू."सागर स्वस्तिकासोबत बोलत श्रीमेघला चूप रहा असे इशारे करत होता.

"हो बरोबर आहे.तिथे हीचे हिटलर बॉडीगार्ड नसणार.आणि त्या प्रेमची बॉडी पण खास काही मजबूत वाटत नव्हती.एका झापडीत लोळेल तो."श्रीमेघ बोलला.

"बरं आता तू आराम कर.संध्याकाळी दादाचे रिसेप्शन आहे." म्हणत सागर पाठोपाठ श्रीमेघ तिच्या खोलीबाहेर पडले.

"इकडे ये. सागर तुला सगळं माहिती आहे. माझ्यापासुन काही लपवायचे नाही." श्रमेघ सागरचा हात पकडत त्याला त्याचा खोलीत ओढत घेऊन आला.


"मला सगळं खरंखरं सांगायचं."श्रीमेघ सागरला थोडा दम देत म्हणाला.

"तुला तर माहितीच आहे, लहानपणापासून स्वस्तिकाची तब्येत किती नाजूक असायची."

"हो. लहानपणी बऱ्याच मुलांना खाण्यापिण्याच्या त्रास असतो. त्यात काय एवढे."

"हो पण स्वस्तिका थोडी जास्तच नाजूक आहे."

"हो पण त्याचा आणि लग्नाचा काय संबंध? तब्येत नाजूक आहे म्हणून लग्न करत नाही,असे कुठे असते."

"स्वस्तिकाचे हृदय खूप नाजूक आहे. तिला सांसारिक जीवन सहन होणार नाही."

श्रीमेघ प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होता.

"स्पष्टच सांगतो. नवरा बायकोतील शरिरक संबंध तिच्यासाठी हानिकारक आहेत. तिच्या हृदयाला तेवढा प्रेशर सहन करण्याची ताकद नाही.त्यामुळे तिचा जीव सुद्धा जाऊ शकतो.म्हणून बाबांनी तिचे लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे."

ते ऐकूण श्रीमेघच्या पायाखालून जमीनच सरकली. डोकं सुन्न पडलं. त्याला काहीच सुचत नव्हते.

"शारीरिक दगदग तिला सहन होत नाही. म्हणूनच लहानपणापासून आई तिला कुठे खेळायला जाऊ देत नसत. जड कामं करू देत नव्हती. खाण्यापिण्याचा तिचा सगळा टाइमटेबल ठरलेला असायचा. तिला थंड गोष्टी चालत नव्हत्या." सागर तिच्या लहानपणी सगळे तसे का वागत होते, याचे स्पष्टीकरण देत होता. तेव्हा श्रीमेघला आठवले की एकदा त्याने तिला आइस्क्रीम खाऊ घातले होते. दुसऱ्या दिवशी तिला खूप कफ झाला होता. आणि सगळे त्याच्यावर चिडले होते. तेव्हा त्याला सगळ्यांचा राग आला होता. आणि बरेचदा जेव्हा तिच्यावर रोकटोक व्हायची तेव्हा त्याला सगळ्यांचा खूप राग यायचा. आता त्याला ती सगळी कारणं कळत होती.

"लहानपणी मला सुद्धा माहिती नव्हते. आता मागे अचानक तिची तब्येत खूप खराब झाली होती, तेव्हा मग बाबांनी सांगितले. मनुला सुद्धा माहिती नाही."सागर.

"पण आता कळले आहे."श्रीमेघ दाराकडे इशारा करत म्हणाला.दारात स्वस्तिका उभी होती.तिच्याकडे बघितले आणि सागरच्या डोळ्यात आसवे जमा झाली.ते बघून स्वस्तिका पळत येत त्याला बिलगली.

"सॉरी दादा. मी सगळ्यांना खुप त्रास दिला. माझ्या मनासारखं नाही झाले की नको नको ते बोलत होती. सॉरी दादा, सॉरी दादा." ती रडत रडत त्याला आणखी बिलगत बोलत होती.

स्वस्तिकाला रडतांना बघून श्रीमेघच्या पण हृदयात दुखत होते.त्याला तिला रडतांना बघणं खूप जड जात होते.


(वर्तमान…)

"अरे तो अलार्म बंद कर."
आईचा आवाज आला तसा श्रीमेघ भानावर आला. बघतो तर सकाळ झाली होती. रात्र कशी सरली त्याचेच त्याला कळले नाही.

आजही त्याला तो दिवस, ती रडणारी स्वस्तिका जशीच्या तशी आठवत होती. तो क्षण त्याला सुद्धा घायाळ करून गेला होता. आणि काल रात्रीची स्वस्तिका बघून त्याला खूप हतबल वाटत होते.

"सागरकडे जायचं आहे ना?" आई.

"हो."

"तुझे डोळे का इतके सुजले आहेत?"आई त्याचा चेहरा निरखून बघत म्हणाली.

"जास्त झोपलो म्हणून असेल.मी आलोच आवरून."म्हणत तो सरळ बाथरूममध्ये घुसला.

आज सागरकडे घरगुती जेवण ठेवले होते.जवळचे लोकं जमले होते. पण श्रीमेघची नजर मात्र स्वस्तिकाला शोधत होती. काल रात्री तो तिला तसेच रडत एकटे सोडून आला होता.ती कशी आहे, एकदाच त्याला बघायचे होते.पण ती कुठे दिसत नव्हती.त्याचा फोन वाजला,तसे बोलायला म्हणून तो बाहेर गेला.फोनवर बोलणं आटोपून तो परत फिरला तर स्वस्तिका त्याच्या पुढे उभी होती.

"तू कुठे होती?" श्रीमेघ.

"श्रीमेघ सॉरी.मला माफ कर. काल मी मनात येईल ते बोलत सुटले होते.स्वार्थी झाले होते.मैत्रीची परिभाषा विसरले होते. प्लीज मला एकदाच माफ कर.आता परत असे काहीही बोलणार नाही."ती हात जोडून त्याचा पुढे उभी होती.

"वेडू बाई.अपनी दोस्तीका उसुल हैं ना."

"नो थँक्यू,नो सॉरी!" दोघंही एकत्र म्हणाले.

"मी आज रात्री निघतोय.तुझी काळजी घे."

तिने होकारार्थी मान हलवली. ती त्याच्या समोर कितीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असली तरी त्याला मात्र तिचे डोळे वाचता येत होते.चेहरा पण पूर्णपणे कोमजलेला दिसत होता.

"तू पण काळजी घे.दादा लोकं बिझी झालेत.तुझं लग्न झाले की तू पण बिझी होशील.त्या आधी येऊन जा."

"हो." तिचे ते शब्द ऐकून त्याचे डोळे पाणावले होते.लग्न हा शब्दच त्याला खूप टोचला होता.त्याने तिला आपल्या कुशीत घेतले आणि तिच्या नकळत पाणावलेल्या त्याचा डोळ्यांचा कडा पुसल्या.

"चल मेरी शेरनी, फिर मिलते हैं."

"हो."

*****

"मेघ्या, मेघ्या आपली मनु.." सागर फोनवर अडखळत बोलत होता.

"मनुला काय?अबे बोल." श्रीमेघच्या हृदयाचे ठोके जलद झाले होते.

"तिची तब्येत सिरीयस आहे. ICUमध्ये आहे."

"निघालोच."श्रीमेघने फोन आपटला.उपलब्ध असलेल्या विमानाने लगेच निघाला.तरी सुद्धा त्याला पोहचायला १८ तास लागले होते. तो सरळ हॉस्पिटलमध्ये गेला.सगळ्यांचे चेहरे उतरले होते.ते बघून त्याच्या हृदयात धस्स झाले.

"सागर,मनु?"

"डॉक्टर म्हणतात काहीच सांगू शकत नाही.चल भेटून घे."

दोघेही वरती ICU जवळ आले.श्रीमेघला आतमध्ये जाण्याची परवानगी मिळाली.स्वस्तिका खूप मशीन आणि नळ्यांच्या जाळ्यात निपचित पलंगावर पडली होती.नाकातोंडातून सगळीकडून नळ्याच नळ्या लागल्या होत्या.तिच्या चेहऱ्यावर वेदना जाणवत होत्या. तिथे भयाण शांतता पसरली होती. टूssss टूssss मशीनचा आवाज जीवघेणा वाटत होता. ते सगळं बघून त्याचे काळीज एकदम सुन्न पडले.डोकं थंडावले. डोळ्यात अश्रू जमा झाले.

"मनु.."हळुवारपणे आवाज देत त्याने तिच्या हातावर हात ठेवला.

"डॉक्टर,पेशंट हालचाल करत आहे."एक नर्स डॉक्टरला आवाज देत होती.

"तुम्ही बाहेर जा."डॉक्टर श्रीमेघला म्हणत स्वस्तिका जवळ आले.तिची नस तपासू लागले.

श्रीमेघ गोंधळला होता.तो बाहेर आला.बाहेरच्या काचेतून सगळे आतमध्ये काय सुरू आहे ते बघण्याचा प्रयत्न करत होते.

"तुझ्या एका छोट्याशा स्पर्शाने चार दिवसांपासून निपचित पडलेल्या स्वस्तिकाने हालचाल केली.बहुतेक तुझीच वाट बघत होती.तुझ्या स्पर्शाची.."
श्रीमेघच्या कानावर शब्द पडले तसे त्याने वळुन बघितले तर श्रुती वहिनी(सारंगची बायको) उभी होती.तिला असे बोलतांना बघून तो अवाक् झाला.

"तिने तुझ्या पुढे व्यक्त केलेली इच्छा मला माहिती आहे.मी तिथेच होते."

त्याने आपली नजर खाली केली.

"तिने जे मागितले त्यात काही गैर नाही.खरतर तिला मागायची गरज पण पडली नसती.पण तिचं बिचारीचं नशीबच खोटं निघालं. आणि तिचं म्हणणं बरोबर होतं, तिला जे हवे होते ते फक्त तूच देऊ शकतो."बोलून वहिनी निघून गेली.श्रीमेघ काचेतून तब्येतीमुळे तडपणारे तिचे शरीर बघत होता. हृदयात कळा उठत होत्या. तिला होणाऱ्या वेदना त्याच्या डोळ्यातून वाहत होत्या.

****
श्रीमेघने काय करायला हवे?

क्रमशः






🎭 Series Post

View all