Login

मोहाचा सापळा (भाग १)

ऑनलाइन गेमच्या नादात मोहाच्या सापळ्यात अडकून रसातळाला गेलेल्या तरुणाची कथा.
मोहाचा सापळा (भाग १)

लेखन - अपर्णा परदेशी

नकुल अजयच्या पायावर डोके ठेऊन गयावया करत होता. हॉटेलमध्ये त्या दोघांकडे पाहून कुजबूज सुरू होती. काहींना त्याची दया येत होती, तर काहींना त्याचा राग. जे लोक या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ होते, त्यांच्यासाठी तो तात्पुरता तमाशा होता.

"साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. माझ्या पोराचा खरंच अपघात झाला आहे. त्याची अवस्था फार वाईट आहे हो. डॉक्टरांनी दोन बाटल्या रक्त चढवायला सांगितले आहे."

"निघतो का इथून. लाज नाही वाटत तुला? तुझ्यामुळे माझ्या हॉटेलची इभ्रत दावणीला लागली आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या जवळपास सर्वच ग्राहकांनी तुझ्या तक्रारी केल्या होत्या. तू त्यांना काहीबाही कारण सांगून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करायचा. तुझ्या असल्या वागण्यामुळे माझ्या व्यवसायावर वाईट परिणाम व्हायला लागला होता, म्हणूनच मी तुझी टपरी कायमची काढून टाकली. आता तुझा माझा काही एक संबंध नाहीये. चालता हो इथून. परत मला तुझे तोंड दाखवू नको." अजय तावातावाने नकुलवर ओरडत होता.

"चूक झाली साहेब. माफ करा. पुन्हा असे होणार नाही. मला पैशाची खूप गरज आहे. दया करा माझ्यावर. माझ्या मुलाच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे." नकुल रडकुंडीला येऊन म्हणाला.

मदत आणि माफी दोन्ही मिळावी म्हणून तो अजय पुढे हातपाय पसरत होता. अजयने त्याला झिडकारले.

"मुलाचा वापर करून पैसे मागायला तुला लाज कशी वाटत नाही? मागच्या वेळी बायकोचा अपघात झाला म्हणून पैसे घेऊन गेला आणि ते एका फालतूच्या खेळात घालवून दिले. त्यानंतर ते पैसे परत करायचे नाव देखील काढले नाही. मी तुझ्यावर पुन्हा कसा काय विश्वास ठेवायचा? माझी मेहनतीची कमाई तुझ्यावर उधळायला मी काय वेडा नाही." अजय खूप चिडला होता.

"साहेब, हवं तर तुम्ही माझ्यासोबत दवाखान्यात चला. स्वतःच्या डोळ्यांनी बघा. " नकुल उठून उभा राहत डोळे पुसून म्हणाला.

"माझं हॉटेल सोडून तुझ्या मागे फिरायला मी काय तुला इतका रिकामटेकडा वाटलो काय? मला तुझ्या कोणत्याच भानगडीत पडायचे नाही. आत्ताच्या आत्ता तू इथून निघ. नाहीतर मी पोलिसांना बोलवेल. काही दिवस तुरुंगात खितपत पडशील तेव्हा तुला कळेल." अजयने स्वतःचा पिच्छा सोडवण्यासाठी त्याला धमकी दिली.

पोलिसांचे नाव काढताच नकुल खिन्न मनाने अजयच्या हॉटेलमधून बाहेर पडला. त्याच्यापुढे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. अजून कुणापुढे याचना करावी हेच त्याला समजत नव्हते. त्याच्या ओळखीचे लोक त्याला त्यांच्या सावलीत देखील उभं करायला तयार नव्हते.

साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट होती. नकुल एक पान विक्रेता होता. शहरात त्याचा उद्योग फारसा चालत नव्हता. मदतीच्या अपेक्षेने तो शहराबाहेर हायवेला लागून असलेल्या अजयच्या हॉटेलमध्ये आला. तिथे ग्राहकांची खूप वर्दळ असायची. त्या हॉटेलच्या एका कोपऱ्यात नकुलने अजयला स्वतःची पान टपरी टाकू देण्याची विनंती केली. अजय दयाळू स्वभावाचा असल्याने अडीअडचणीला तो बऱ्याच लोकांच्या मदतीला धावून जायचा. नकुलची हलाखीची परिस्थिती व जेमतेम शिक्षण पाहून अजयने त्याला परवानगी दिली. त्यानुसार नकुलने तिथे आपला पान विक्रीचा उद्योग सुरू केला.

हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांची पावले आपसूक टपरीकडे वळायची. त्यामुळे त्याचा धंदा बराच चालायचा. नकुलच्या घरी त्याची बायको सिद्धी आणि मुलगा विपुल असे त्याचे त्रिकोणी कुटुंब होते. छोटे कुटुंब असल्याने त्याच्या गरजा सहजगत्या भागत होत्या. एकंदरीत त्याचे सगळे काही व्यवस्थित सुरू होते.

पण म्हणतात ना, सरळमार्गी आयुष्याला खूप फाटे फुटतात. असेच काहीसे नकुल सोबत झाले.

एके दिवशी एक तरुण त्याच्याकडे पान घेण्यासाठी आला. नकुल पान बनवत असताना तो तरुण तिथेच उभा राहून त्याच्या मोबाईलवर कसला तरी गेम खेळत होता. अचानक तो तरुण खुशीत उड्या मारू लागला. ते पाहून नकुलच्या मनात उत्सुकता निर्माण झाली.

"काय झाले साहेब? एवढा कसला आनंद झाला?" नकुलने सहज विचारले.

"अरे, मी मोठा डाव जिंकलो. हे बघ मला दुप्पट पैसे मिळाले." त्या तरुणाने नकुलला आपला मोबाईल दाखवला.

नकुलच्या डोक्यावरून पाणी गेले.

"म्हणजे? मला नाही कळलं. तुम्ही कोणता डाव जिंकला? तुम्हाला दुप्पट पैसे कसे मिळाले?"

"सांगतो. हे बघ, आपण आपल्या घरात पत्ते खेळतो ना, अगदी तसेच मोबाईलमध्ये खेळायचे. प्रतिस्पर्धी म्हणून देश-विदेशातील लोक आपल्या सोबत खेळत असतात. आपण प्रत्यक्षात खेळताना जसे पैसे लावतो अगदी तसेच इथे पण लावायचे. जिंकल्यावर ते सर्व पैसे आपले होतात. या खेळात विदेशी चलनात पैसे मिळतात म्हणजे घरबसल्या दुप्पट-तिप्पट कमाई." तो तरुण उत्साहाने सर्वकाही सांगत होता.

"पण साहेब, अशा अनोळखी लोकांसोबत खेळताना पैसे बुडण्याची भीती नाही का वाटत?" नकुलने शंका बोलून दाखवली.

"अरे, नाही रे. मनात भीती बाळगायची नाही. आपला फायदा बघायचा. नंतर सरावाने आपण कुशल होत जातो. मी तर भरपूर फेऱ्या पार करून यात प्राविण्य मिळवले आहे. त्यामुळे मोठी रक्कम पण मी सहज जिंकतो. पैशासोबत इतर बक्षिसे देखील मिळतात. जिंकल्यावर तीच रक्कम पुढच्या डावात वापरायची. जितकी जास्त रक्कम तितका जास्त फायदा."

"साहेब, आतापर्यंत तुम्ही किती पैसे जिंकले?" नकुलने खात्रीसाठी विचारले.

"ही बघ, माझी आतापर्यंतची कमाई."

त्या तरुणाने त्याला मोबाईलमधला आकडा दाखवला.

ती रक्कम पाहून नकुलचे डोळे विस्फारले. त्याला त्याचा हेवा वाटला. मोबाईलमधे पत्त्यांचा खेळ खेळून इतके पैसे कमावता येतात यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. नकुल त्याच्या बोलण्याने हुरळून गेला. फावल्या वेळात विरंगुळा म्हणून खेळायला काय हरकत आहे, असे त्याला वाटायला लागले.

तो तरुण निघून जाताच नकुलने आपल्या मोबाईल मध्ये तो गेम डाउनलोड करून घेतला. काही दिवस जरा बिचकतच नकुल तो पत्त्यांचा खेळ खेळू लागला.

क्रमशः

🎭 Series Post

View all