मोहाचा सापळा (अंतिम भाग ३)
लेखन - अपर्णा परदेशी
एके दिवशी संध्याकाळी सिद्धी घरी येताच नकुलने तिच्याजवळ दारूसाठी पैशाची मागणी केली. आधीच लोक त्यांच्या मागे पैशाचा तगादा लावत. त्यामुळे सिद्धी खूप वैतागली होती. भरीस भर नकुल देखील काहीही उद्योगधंदा न करता हातात जेमतेम येणारे दोन पैसे दारू मध्ये उडवायला लागला होता. त्यामुळे दोघांमध्ये टोकाचे भांडण होऊ लागले. कुणीच माघार घेईना. लहानगा विपुल ते सोडवायचा निष्फळ प्रयत्न करत होता. परंतु, दोघांनी त्याला ढकलून दिले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असताना विपुलची होणारी ओढाताण त्यांना दिसत नव्हती.
त्या दोघांच्या भांडणाला कंटाळून विपुल तिथून तावातावाने निघून गेला. त्याच्या डोक्यात एकच गोष्ट सतत फिरत होती की, कुठून तरी पैसे आणून त्या दोघांच्या हातावर टेकवले तर ते दोघे शांत बसतील. परंतु, इतके पैसे त्याला देईल तरी कोण?
अचानक त्याचे लक्ष समोरच्या किराणा दुकानावर गेले. दुकानाचा मालक व समोर असलेला माणूस त्या दोघांमध्ये कसली तरी आर्थिक देवाण-घेवाण सुरू होती. त्या माणसाच्या हातात पैशाचे भले मोठे बंडल होते. तो त्या नोटा मोजत होता.विपुलच्या डोळ्यांना फक्त ते नोटांचं बंडल दिसलं. त्यावर पाळत ठेवून तो त्या माणसाकडे जाऊ लागला. त्याने आजूबाजूला पाहिले. रस्त्यावर फारसे लोक नव्हते. संधी साधून त्याने त्या माणसाच्या हातावर झडप घातली. ते नोटांचे बंडल हातात येताच विपुलने धूम ठोकली.
जीवाची बाजी लावून वाट फुटेल तिकडे तो सुसाट पळत सुटला होता. पळता पळता तो मुख्य रस्त्यावर कधी आला ते त्याला देखील समजले नाही. तेवढ्यात समोरून भरधाव वेगाने एक कार आली. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तिने विपुलला हवेत उडवले. वर जाऊन विपुल धाडकन रस्त्याच्या मधोमध आपटला. क्षणार्धात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. ह्या गदारोळात ते नोटांचे बंडल दूरवर कुठेतरी उडालं होतं. त्या माणसाने ते ताब्यात घेऊन तो तिथून पसार झाला. एव्हाना तिथे गर्दी झाली होती. कुणीतरी धावत जाऊन नकुलच्या घरी ही दुःखद बातमी दिली.
नकुल आणि सिद्धी जीव मुठीत घेऊन घटनास्थळी धावले. या दोघांनी ताबडतोब त्याला दवाखान्यात दाखल केले. तिथे घडलेला प्रकार त्यांच्या कानावर पडला होता. आपल्या मुलाने आपल्यामुळे चोरी केली व ते त्याच्या जीवावर बेतले, हे ऐकून त्यांना मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. परंतु, आता पश्चातापाशिवाय त्यांच्या हातात काहीच उरले नव्हते.
विपुलची अवस्था फारच बिकट झाली होती. पैसे भरल्याशिवाय डॉक्टर उपचार सुरू करायला तयार नव्हते. सिद्धीने तिचे मंगळसूत्र मोडून पैसे जमा करून आणले. डॉक्टरांच्या हातावर पैसे पडताच विपुलवर उपचार सुरू झाले. अपघातात खूप रक्तस्राव झाल्याने दोन बाटल्या रक्त द्यावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच काही महागड्या चाचण्या देखील करायला सांगितल्या. शिवाय पुढील उपचारासाठी देखील जास्तीचे पैसे लागणार होते. त्यासाठी नकुल वणवण भटकत होता. त्याची अवस्था लांडगा आला रे आला अशी झाली होती. तो मदतीसाठी याचना करत फिरत होता. मात्र कुणीच त्याच्या मदतीला यायला तयार नव्हते. अंतिम आशा म्हणून तो अजयच्या हातापाया पडायला गेला. मात्र अजयने देखील त्याला घालवून दिले.
निराश आणि हतबल मनाने तो दवाखान्यात परतला. सिद्धी त्याच्या वाटेकडे डोळा लावून बसली होती. सर्व सोंग घेता येतात पण पैशाचे नाही. त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच ती सर्व काही समजून चुकली. आता काय करायचे? हा यक्षप्रश्न त्या दोघांच्या डोळ्यांसमोर उभा होता. अश्रुधारा थांबायच नाव घेत नव्हत्या. दोघं मनातल्या मनात स्वतःला कोसत होते.
त्यांच्या बेजबाबदारपणामुळे विपुलची ही अवस्था झाली होती. एकीकडे जीवन-मृत्यूशी झुंज देणारा एकुलता एक मुलगा व दुसरीकडे त्याच्या उपचारासाठी लागणारी रक्कम जमा न करू शकणारे आई-बाप याहून मोठा पराभव दुसरा काय असू शकतो?
पण म्हणतात ना, देव इतका निष्ठुर नसतो. तो अजयच्या रूपाने धावून आला. अजयमध्ये माणुसकी शिल्लक होती त्यामुळे तो त्या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी दवाखान्यात आला होता. नकुलचा मुलगा जीवन- मरणाच्या दाराशी उभा असलेला पाहून अजयला त्याची दया आली. उपचारादरम्यान लागणारा सर्व खर्च करण्याची तयारी त्याने दर्शवली. त्या दोघांना तो एखाद्या देवदूताप्रमाणेच भासला.
आर्थिक अडचण दूर झाल्यामुळे विपुलवर झटपट उपचार सुरू झाले. सर्वांच्या प्रार्थनेला व डॉक्टरांच्या हाताला यश मिळत गेले. विपुल संकट काळातून बाहेर पडला. आपल्या आई-वडिलांची वागणूक बघून त्याच्या प्रकृतीत अजून सुधारणा होत गेली.
झालेल्या प्रकरणात नकुलचे चांगलेच डोळे उघडले होते. त्याने सर्वांसमक्ष शपथ घेतली की तो यापुढे कोणत्याही वाममार्गाने पैसा कमावण्याचा विचार करणार नाही. लागलेली व्यसने कायमचे सोडून देईल. सरळ मार्गाने मेहनतीच्या जोरावर आपला संसार पूर्ववत करण्याचा प्रयत्न करेल. कारण त्याला आयुष्याने फार मोठा धडा शिकवला होता.
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा