Jan 22, 2022
General

मोगरा फुलला मोगरा फुलला

Read Later
मोगरा फुलला मोगरा फुलला

मोगरा फुलला..

मुग्धा,भारी गोड मुलगी. आईवडिलांच्या छत्राला लहानपणीच पारखी झालेली ती. मुग्धाची आजी मात्र तिला तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपायची. 

शाळेतही ओवी,गीतापठण,मनाचे श्लोक या सर्व स्पर्धांत ती अग्रेसर असायची. याचं कारण..रोज संध्याकाळी सांजवात लावली की आजीसोबत सुस्पष्ट उच्चारात ती श्लोक म्हणायची. याचा फायदा तिला अभ्यासातही होत होता. तिचं पाठांतर चांगलं होतं. बऱ्यावाईटाची समज लवकर आली तिला कारण आजी प्रत्येक श्लोकाचा अर्थही समजावून सांगायची.

आजीच्या घरासमोर बाग होती. ज्यात मोगऱ्याचा वेल होता..वरवर गेलेला..अगदी ते गाणं आहे ना
मोगरा फुलला मोगरा फुलला
फुले वेचिता  बहरु कळीयांसि आला

इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलु गेला गगनावेरी

तशी. मुग्धा दहावी झाली. तिला शिकवण्याची,भाषा विषयाची फार आवड म्हणून अर्थातच तिने कलाशाखेत प्रवेश घेतला. ती बीएबीएड झाली. तिला तिच्याच शाळेत नोकरीही मिळाली.

एव्हाना तिची आजी मात्र अगदीच म्हातारी झाली होती. तोंड जमिनीला लागत होतं तिचं. मुग्धा घरातलं सगळं आवरायची. आजीला नाश्ता,आंघोळ देऊन मग शाळेत जायची. 

सहावीचा वर्ग होता तिचा. मुलं धड मोठीही नाहीत नि लहानही नाहीत. अगदीच अडनिड्या वयाची. बेंचवर नावं कोरणं,बाई वर्गात नसल्या की बेंचवरून उड्या मारणं,ग्रुहपाठाची वही घरी विसरुन येणं,केसांना जेल लावणं,कुणा दोघांच्या शुजच्या नाड्या हळूच बेंचखाली जाऊन बांधून ठेवणं..असे विद्यार्थ्यांचे उद्योग चालू असत.

गोऱ्यापान,गोड स्वभावाच्या मुग्धाबाईंशी मुलांची खास गट्टी होती. शिकवून झालं की मुग्धा मुलांना एखादी गोष्ट सांगायची,कधी हलकेफुलके विनोद सांगायची तर कधी एखादं गाणं गायची. ती गाणं गाऊ लागली की अख्खा वर्ग त्या स्वरांनी मंत्रमुग्ध व्हायचा. 

मुग्धाच्या आजीला ताप येऊ लागला. तिचा कफही बळावला. आता ती अंथरुणावरुन उठेनाशी झाली. मुग्धाने सुट्टी घेतली आणि ती आजीची सेवा करु लागली.

 आजीला ओल्या फडक्याने पुसून काढणं,तिला हवं नको ते थोडंथोडं का होईना करुन घालणं,मुग्धा अगदी मन लावून करत होती. 

देवाला विनवीत होती,"देवा,ही एकच तर आहे माझी अशी. आईवडील तर कधीच तुझ्याकडे गेले. आजीला तरी माझ्यासोबत राहूदेत. लवकर बरं वाटूदे आजीला."

 पण म्हणतात ना जो तो आपले भोग भोगण्यासाठी या प्रुथ्वीतलावर येतो. आजीचे भोग बहुदा भोगून झाले होते. आजी मुग्धाला सोडून गेली आणि.आणि..तो आजीच्या बागेतला मोगऱ्याचा वेलही सुकला,वाळून गेला. आता तिथे मोगऱ्याचा फुलांचा सुगंध नव्हता..होतं ते दुपारचं भकभकीत ऊन न् रात्रीचे दाबून घेतलेले मुग्धाचे हूंथके.

मुग्धाच्या सोबतच्या शिक्षिकांनी तिची समजूत घातली नि ती परत शाळेत जाऊ लागली. पण तिचं हसणं कुठे हरवून गेलं होतं. चेहऱ्यावरचं तेज मावळलं होतं. 

आता तिने विनोद सांगितले तरी मुलांना हसू यायचं नाही. तिच्या गोष्टींतही उदासिनता भरु  लागली. गाण्याने तर मुग्धाच्या कंठाशी असहकार पुकारला होता. 

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले. आभाळ ढगांनी व्यापून गेलं होतं. मुग्धाच्या मनाचं आभाळही आजीच्या आठवणींनी व्यापून गेलं होतं.

 याच पावसात ती अंगणात रिमझिम पाऊसधारा झेलू लागली की आजीचा ओरडा सुरु असायचा,"मुग्धे ,अगो बाधेल ते पाणी तुला. तापसरी सुरु आहे. नको अशी पाण्यात खेळू. लहान का आता तू." मुग्धा तिच्या पावसासोबत थिरकत असायची. मग पाऊस गेला की आजी तिला कढत पाण्याने न्हाऊ घालायची. तिचे केस पंचाने अगदी कोरडे करायची. सुंठ,चहाची पात घालून चहा करु द्यायची तिला. 

मुग्धाला आजीच्या हातचा चहा आठवला. स्वैंपाकघरातून चहाचा सुवास घरभर दरवळू लागला. मुग्धाला वाटलं,आपण स्वप्नात तर नाही ना. तिने डोळे उघडले तर बाजूला बेंद्रे सर बसले.होते. तिच्या अंगावर मऊ रजई होती. 

बेंद्रे सर म्हणाले,"अहं,काही बोलू नका. मी सांगतो. मी आलो तर तुम्ही ओसरीतल्या कठड्यापाशी टेकला होता,अर्धवट ग्लानीत होता..आजी गं भिजले मी. चहा कर फक्कड." म्हणत होता. सॉरी मी तुम्हाला उचलून आत  दिवाणावर ठेवलं. पांघरुण घातलं नि आत चहा करण्यासाठी गेलो."

बेंद्रेसरांनी  मुग्धाच्या कपाळाला हात लावला न् म्हणाले,"हं,आता उतरलाय ताप. अशा कशा ओ तुम्ही न भिजताही तापलात. बाकी तुम्ही भाषाप्रेमी माणसं..न भिजता भिजणं केवळ तुम्हालाच ठाऊक. आमच्यासारख्या गणिताची आकडेमोड शिकवणाऱ्यांना कुठून यायचं असं भिजायला!"

बेंद्रे सरांनी मग वाफाळता चहा दोन कपात ओतला नि घेऊन आले. मुग्धाने चहाचे दोन घोट घेतले. तिला खरंच बरं वाटलं. 

"थँक्यू बेंद्रे सर," ती क्रुतज्ञतापुर्वक म्हणाली.

"मला अहोजाहो करु नका. एवढीही मोठी नाही मी." ती इवलंस हसत म्हणाली.

"मुग्धा,माझं तुझ्याकडे कामं होतं,त्यासाठी आलेलो." बेंद्रे सर म्हणाले.

"कोणतं?"

"तू पुन्हा मोगरा माळू लागशील? प्लीज..गैरसमज नको."सर खाली फरशीकडे बघत म्हणाले.

मुग्धा उसासा टाकत म्हणाली,"ते शक्य नाही सर. आजीसोबत  मोगऱ्याचा वेलही वाळला."

सरांनी हिरव्यागार पानात आणलेले टपोरे मोगऱ्याचे कळे तिच्यासमोर धरले. फुलपुडी उघडताच..मुग्धाच्या डोळ्या़तले दोन टपोरे मोती त्या फुलांवर सांडले. 

"आजी गं.."एक आर्त हुंदका तिच्या मुखातून निघाला.

बेंद्रे सर म्हणाले,"मुग्धा मी लग्न करु इच्छितो तुझ्याशी. तुला वचन देतो की या मोगऱ्याच्या फुलांसारखा सदैव तुझ्या ह्रदयापाशी राहीन."

मुग्धाने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. तिला त्यांत फक्त प्रेम,आर्जव दिसलं तरी ती म्हणाली,"उद्या सांगते."

सर म्हणाले,"हरकत नाही. तू नाही म्हंटलस तरी आपण चांगले मित्र बनून राहू."

"आता या घराचं काय? खरंच करायचं का बेंद्रे सरांशी लग्न?" या विचारातच मुग्धा झोपी गेली. 

रात्री स्वप्नात मुग्धाची आजी तिच्या कपाळावरुन हात फिरवत होती व सांगत होती," मुग्धे,ते सर चांगले आहेत. किती दिवस अशी एकलकोंड्यासारखी झुरत रहाणारैस. अगं जाणारा जातोच. त्यासाठी तू पुरं आयुष्य का घालवणारैस?
तो समर्थांचा श्लोक आठवतो नं तुला..

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । 
आकस्मात तोही पुढे जात आहे ।। 
पुरे ना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते   ||१६||

समर्थ म्हणतात,कोणी मरण पावला तर दुसरा त्याच्याबद्दल शोक करतो पण पुढे कधीतरी त्या शोक करणाऱ्यालाही मरणे आहेच. म्हणून माणसांची माया लावून घेतलेली नसावी कारण मायेपोटी मनस्ताप होतो आणि पुन्हा जन्म  घ्यावा लागतो.

नुसतं पाठ करायचं नसतं बाळा हे. समर्थांनी जीवनाचं सार स़ागितलंय श्लोकातून. ते समजून घ्यावं,आचरणात आणावं.

 तू अशी दु:खात राहिलीस तर मला मुक्ती कशी मिळेल? तुझे दोनाचे चार हात झालेले पाहिले की मी माझ्या वाटेला लागेन बघ."

पहाटवारा सुटला. पक्षी फांद्यांवर किलबिलू लागले. त्याने मुग्धाला जाग आली. आजी खरंच आपल्याशी बोलून गेली..मुग्धाला खूप खूप बरं वाटलं. ती न्हाऊन आली. ओलेते केस पुसून तिने बटवेणी घातली. सरांनी दिलेली फुलपुडी उघडली. सगळ्या टपोऱ्या कळ्या उमलल्या होत्या..जणू चांदणफुलं का प्रीतफुलं! 

आजीच्या बटव्यातला दोरा घेऊन तिने एकेक फुल गुंफलं. छान दुपदरी गजरा तयार झाला. आकाशी रंगाची मऊसुत साडी ती नेसली,केसांत गजरा माळला. थोडी पाऊडर,गंध लावलं. ओठ तर गुलाबाच्या पाकळ्याच जणू. त्यांना विकतचा रंग लावायची गरजच नव्हती. 

ती टिचररुममधे गेली तेव्हा फक्त बेंद्रे सर आले होते. मुग्धा त्यांच्या टेबलापाशी जाऊन बसली. सर आता थरथरत होते. त्यांच्या प्रेमाचा निकाल जो लागायचा होता. 

दोन मोगऱ्याची फुलं सरांच्या हातात ठेवत मुग्धा म्हणाली,"तुम्ही पास झालात सर. मला आवडेल तुमची सहचारिणी बनायला."

मुग्धा व मुकुंद बेंद्रे सरांचं लग्न झालं. आजीच्या घरात ती दोघं गरजू विद्यार्थ्यांसाठी शिकवण्या घेऊ लागली.

 मुग्धाने नर्सरीतून हिरव्यागार पानांचं मोगऱ्याचं रोपटं आणलं आणि आधीच्या वेलाजागी लावलं. 

त्या रोपट्याला आलेलं पहिलं फुल त्या दोघांनी आजीच्या फोटोपाशी ठेवून आजीला नमस्कार केला. 

आजी जणू सांगत होती,"मुग्धे,आता मला तुझी काळजी नाही हो. या मुकुंदरावांचा मोगरा मात्र आयुष्यभर बहरत ठेव. माझा आशिर्वाद आहेच तुम्हा दोघांच्या पाठीशी."

----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now