Login

मोफत अंतराळ सफर

मोफत अंतराळ सफरत्या दिवशीची ती खळबळ जनक बातमी मी वाचली आणि घरात एकच गोंधळ उडाला.बातमी एकदम छोटीशी, कोणाला दिसेल ना दिसेल अशा टाईप मध्ये होती. पण होती मात्र एकदम खास . स्पेसएक्स नावाची एक कपंनी चार सामान्य लोकांना मोफत अंतराळ सफर करवणार होती अर्थात मोफत हा शब्द जास्त महत्वाचा होता. मोफत म्हटलं की मला तर आनंदाची समाधीच लागते. मोफत आणि ती पण अंतराळ सफर. मग तर माझा आनंद गगनात मावेना. मी गॅलरीत उभं राहून पृथ्वी कडे पाहावं तशा नजरेने खाली रस्त्याकडे पाहात होतो. रस्त्यावरचे सामान्य माणसं पायांनी चालत होते. मला क्षणभर माझ्याच भाग्याचा हेवा वाटला. कुणास ठाऊक मला असं आतून खूप वाटायला लागलं की आमचीच निवड होणार या सफारी साठी. मी लगेच ती बातमी सगळ्यांना वाचून दाखवली. पोरींनी आणि बायकोने तर उडया मारून, आरोळ्या मारून आनंद व्यक्त केला.
मोफत अंतराळ सफर


त्या दिवशीची ती खळबळ जनक बातमी मी वाचली आणि घरात एकच गोंधळ उडाला.बातमी एकदम छोटीशी, कोणाला दिसेल ना दिसेल अशा टाईप मध्ये होती. पण होती मात्र एकदम खास . स्पेसएक्स नावाची एक कपंनी चार सामान्य लोकांना मोफत अंतराळ सफर करवणार होती अर्थात मोफत हा शब्द जास्त महत्वाचा होता. मोफत म्हटलं की मला तर आनंदाची समाधीच लागते. मोफत आणि ती पण अंतराळ सफर. मग तर माझा आनंद गगनात मावेना. मी गॅलरीत उभं राहून पृथ्वी कडे पाहावं तशा नजरेने खाली रस्त्याकडे पाहात होतो. रस्त्यावरचे सामान्य माणसं पायांनी चालत होते. मला क्षणभर माझ्याच भाग्याचा हेवा वाटला. कुणास ठाऊक मला असं आतून खूप वाटायला लागलं की आमचीच निवड होणार या सफारी साठी. मी लगेच ती बातमी सगळ्यांना वाचून दाखवली. पोरींनी आणि बायकोने तर उडया मारून, आरोळ्या मारून आनंद व्यक्त केला.

बायकोने तर तितक्या देव देवतांना आमचा नंबर लागावा म्हणून गुपचूप नवस देखील केले. त्या सोळा सोमवारचे, पांढऱ्या बुधवाराचे, गुरुवारच्या लक्ष्मीचे, प्रदोष वगैरे व्रत पण करण्याचा संकल्प केला.

तसे ती वरवर जणू काही ही गोष्ट इतकी महत्वाची नाही असं दाखवत होती आणि पोरांनाही या बद्दल काहीच बोलायचं नाही असा दम देऊन झाला. त्या बातमी खाली एक नंबर कॉन्टॅक्ट करायला दिलेला होता. घाटपांडे उठायच्या आत पेपर वाचून ठेवून द्यायचा होता. ती बातमी घाटपांडेला जर कळू द्यायची नसेल तर पेपर गायब करून टाकणं हाच एक राजमार्ग होता. आणि एक दिवस पेपर वाचायला मिळाला नाही तर घाटपांडेवर काही आभाळ कोसळणार नव्हतं. आता काही काही दिवशी पेपर येतच नाही. मग आपण काय करतो. ऍडजेस्ट करतोच ना.आणि पेपर काय करोडोची गोष्ट नाही.कामं झाल्या नंतर परत करून टाकू असा उदात्त विचार करून मी पुन्हा एकदा अगदी बारकाईने ती बातमी वाचली. बातमी अगदी स्पष्ट परंतु कोपऱ्यात छोटया चौकोनात छापलेली होती. इच्छुक व्यक्तींनी तात्काळ संपर्क साधायला सांगितलेला होता.

त्या दिवशी बायकोने स्वतः मला चहा बनवून दिला आणि गोड गोड हसत मला म्हणाली,

" अहो, ऐका ना. मला काय वाटत की तुम्ही वेळ न घालवता ही संधी सोडू नये. लगेच फोन करा. देवाच्या मनात नक्कीच काहीतरी चांगलं करायचं असेल. माझा भाऊ मागेच मला म्हणतं होता की ताई तुला मी एकदा माझ्या खर्चाने विमान प्रवास करवून देईल. पण एक दोन दिवसाच्या विमान प्रवासा साठी कशाला कोणाचे उपकार घ्यायचे ना. त्या पेक्षा संधी आलीच आहे तर सगळे मिळून अवकाशात फिरून येवू ना. सध्या या कोरोना मुळे सारखं मेलं घरातल्या घरात मुस्कट बांधून बसाव लागतं.कोणाकडे येणं नाही की जाणं नाही. जाम कंटाळा आला घरात बसून बसून. अहो, बघत काय राहिला आहात माझ्या कडे. हिरे नाही लागले काही माझ्या तोंडाला. उठा ना. हा घ्या फोन आणि लावा बरं घाटपांडे उठायच्या आत. "

बायकोने मला नुसताच फोन नाही दिला तर नंबर पण डायल करून दिला. सगळ्या पोरी आजूबाजूला येऊन बसल्या.

" हॅलो, स्पेसएक्स कपंनी आपले सहर्ष स्वागत करत आहे " मी काही बोलायच्या आत पलीकडून एका गोड आवाजाच्या सुंदर मुलीने उत्तरं दिलं. आता तुम्ही म्हणाल की ती मुलगी सुंदर होती हे कशावरून मला समजलं. तर स्त्रियांसारखं माणसांना पण एक सहाव्व इंद्रिय असतं.शिता वरून कशी भाताची परीक्षा होते ना. तसं आवाजावरून सौंदर्याची कल्पना येते. असतो अभ्यास एकेकाचा.

" मॅडम, मी तुमची आज जाहिरात वाचली आणि... " मी बोलायला लागलो तर माझं बोलणं मध्येच तोडत ती म्हणाली.

" सर, यू आर टू लकी. मला तुम्हाला कळवण्यास खूप आनंद होतो आहे की फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या धोरणा अंतर्गत तुमचं ऑलरेडी सिलेक्शन झालंय. तुम्ही आज दुपारी ऑफिस मध्ये येऊन फॉर्मॅलिटी पूर्ण करणार का प्लीज. "

" हो हो, का नाही मॅडम. मी लगेच येतो. " माझा आवाज बाहेरच्या बायकांशी बोलतांना कसा काय एव्हढा गोड होतं असतो मलाच समजतं नाही.

" पण सर तुम्ही खरोखरचं सामान्य आहात ना. कारणं आमची ही योजनाच मुळी सर्वसाधारण लोकांसाठी आहे. श्रीमंत माणसं तर केंव्हाही जावू शकतात. पण आम्हाला जनसामान्य लोकांना अंतराळ सफर कारवायची आहे. "

" मॅडम, मी खरोखरचं सामान्य आहे हो. मी ही जाहिरात देखील आमच्या बाजूच्या घाटपांडेच्या पेपर मधून वाचली. अगदी सामान्य माणसाप्रमाणे मी थुंकू नये तिथं थुंकतो. मेंटेनन्स भरत नाही. बसचं, रेल्वेच तिकीट काढत नाही. टॅक्स भरत नाही. भाजीवाल्यांशी घासाघीस करतो.  साहेबांशिवाय आणि बायको शिवाय मी कोणालाच घाबरत नाही. सर्वसामान्य नवऱ्याप्रमाणे घरातली धुणी, भांडी, केर काढणं, स्वयंपाक करणं ही काम विनातक्रार करतो. कोणी अन्याय केला तरी जास्त कुरकुर करत नाही. सरकारी नोकरी असूनही जास्त पैसे खात नाही.... " मी माझं गुणगान गात असतांना त्या मुलीने मला मध्येच थांबवलं.

" समजलं सर मला. तुम्ही खरोखरचं सामान्य आहात याची खात्री पटली मला. तुम्ही या दुपारी. "

" मॅडम, मी एकटा येवू की मिसेसलाही घेऊन येवू " मी आवाजात प्रचंड गोडवा आणून विचारलं.

" एकटेही आलात तरी चालेल सर. नुसतं रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय "

मला एकदम आठवलं, हिची लग्नात गुलाबी साडी नेसलेली मामे बहीण, तिच्या नवऱ्याची कुठंतरी दुरवर बदली झालेली असल्याने सध्या एकटीच घरी राहात होती. माझा स्वभाव असा साधा भोळा ना की मला कोणी एकटं दूकटं असलं की वाईटच वाटायला लागतं. म्हणून आजूबाजूला ही नाही असं पाहून मी अगदी हळू आवाजात त्या पोरीला विचारलं, " मॅडम, ही स्कीम फक्त चारच लोकांसाठी आहे का. जर मला अजून कोणाला सोबत न्यायचं असेल तर, चालेल का ? "

तिकडून ती खुदकन गालात हसली असावी असं मला वाटलं.
" सर जर तुम्ही अजून कोणाला सोबत नेऊ इच्छित असाल तर, काही गोपनीयतेच्या अटी अंतर्गत   आणि माझ्या अख्त्यारीत मी तुम्हाला अजून एक दोन जणांना सोबत घेऊन जायला परवानगी देऊ शकते. पण ही गोष्ट तुमच्या आणि माझ्यातच राहिली पाहिजे सर "

ती असं बोलली आणि
माझ्या डोळ्यासमोर गुलाबी गुलाबी प्रकाश पसरला.
मी दिवसा ढवळ्या मनातल्या मनात मांडे खायला लागलो. काय धमाल होईल ना. जर बायकोला काही कामं निघालं आणि जर फक्त हिची लग्नात गुलाबी साडी नेसलेली मामे बहीण सोबत आली तर काय धमाल येइल ना.मी मनात ठरवूनच टाकलं काहीही करायचं पण जमलं तर हिच्या त्या मामे बहिणीला घेऊन या वेळी अंतराळात सफर करावूनच आणायची.

" बरं आता मी काय काय सोबत घेऊन येवू मॅडम. " मी पुन्हा एकदा फोन करून चौकशी करून घेतली.

" काही नाही हो. अगोदर तुम्ही एकटे येऊन तर भेटा. मग मी सगळं समजावून सांगते. आणि हो, सर ही बातमी शक्यतो कोणाला सांगू नका. कारणं आम्ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या बेसिस वर तुमची निवड केलेली आहे. येतांना तुमचे पासपोर्ट फोटो आणि इतर डिटेल्स लागतील. तेव्हढे घेऊन या. मी वाट बघते हं. साधारण किती वाजेपर्यंत पोहोचाल तुम्ही. "

" अकरा वाजे पर्यंत मी येतोच मॅडम "

" नक्की या हं. मी अकरा वाजे पर्यंत तुमचा नंबर रिझर्व ठेवेल. त्या नंतर मात्र तुमचा नंबर तुम्हाला इंटरेस्ट नाही असं समजून दुसऱ्या फॅमिलीला दिला जाईल. "

" मी कसा पोहोचू तिथं "

" अहो, आपल्या बस स्टॅन्डच्या मागच्या बाजूला हॉटेल गुलमोहर आहे. त्याच्या तिसऱ्या मजल्यावर तीनशे एक नंबर रूम मध्ये आमचं ऑफिस आहे. बरं ठेवा लवकर. मला फोन येताहेत. "
ती बाई ( म्हणजे मुलगीच ) फारच घाईत होती असं मला वाटलं. म्हणून मी पण जास्त वेळ बोलण्यात न दडवता करण्यात घालवायचं ठरवलं.

सगळ्यात आधी दाढी वगैरे करून मी टापटीप दिसण्याचा प्रयत्न करायला लागलो. तर बायको एकदम चावताळलीच अंगावर,

" अहो, कशाला एकदम टापटीप बनून जाताय. चुकून ते तुम्हाला श्रीमंत समजून बसले ना की होईल पंचाईत. त्या पेक्षा तुम्ही लग्नात जसे गबाळे दिसतं होता तसेच जा. आणि माझ्या बारामतीच्या भावसमोर कसे गरीब दिसतात ना तसे जा. आणि हो, जरा सांभाळून उत्तरं द्या. अजिबात संशय येइल असं वागू नका. " बायको असं मला समजावून सांगत असतांना अनिताने माझ्या अंगावर एक फाटकं बनियन फेकलं. खरं तर ते बनियन आम्ही धुळवडीच्या दिवशी वर्षानुवर्षे वापरत असतं. अर्थात कधी कधी पाय पुसणं किंवा फरशी पुसायलाही आम्ही वापरत असू.

" बाबा, हेच बनियन घालून जा तुम्ही. म्हणजे गरिबीचा पुरावा मागितला की लगेच तुम्हाला दाखवता येइल " स्वतः मात्र आरशात पाहात लिपस्टिक लावत मला ती सांगत होती.

अमृता पण काय मागे थोडीच राहणार. तिने थोडं भस्म आणून माझ्या कपाळाला फासलं. त्या मुळे मी फारच विचित्र दिसायला लागलो.

" वर अंतराळात असल्या भस्माचीच गरज असते बाबा. माणसं नसतात तिथं " ती काहीतरी पुटपुटायला लागली.

" बूट बिट नका घालू बाबा. लुकिंग व्हेरी ऑड " मांडीवरच्या कुत्र्याचे लाड करत प्रियाने सूचना दिली. " बाबा, त्यांना प्राण्यांना पण नेता येतं का सोबत ते पण विचारा. "

असा सूचनांचा पाऊस पडत असतांना मी तो पेपर घाटपांडेच्या दाराला गुपचूप लावून टाकला. कारणं आता मला त्याची गरजच नव्हती. माझं बुकिंग ऑलरेडी झालं होतं. मग कशाला एखाद्याचा पेपर घ्यायचा ना. छे,छे. कोणाला असं पेपर गायब करून फसवण आपल्या मनाला पटतच नाही ."

मी जायला निघणार तेव्हढयात आमची सख्खी शेजारीण सोनाली आलीच की सकाळी सकाळी दारात.

" अय्या काका, आज ऑफिसला इतक्या लवकर निघालात. "

" नाही ग जरा त्या बस स्टॅन्ड जवळ कामं होतं. तिथं... " पूर्ण वाक्य बोलणारच होतो. तेव्हढ्यात आत मध्ये जोरात भांड आदळलं गेल्याचा आवाज आला.

मी धावतच आत गेलो. बायको जेव्हढ्या रागात बघता येइल तेव्हढया रागात डोळे मोठे मोठे करून पाहात म्हणाली,

" अहो, नुसतं सांगता कशाला सोबतच घेऊन जा ना तिला तुमच्या. तूम्हीच बोंबलत होता ना कोणाला सांगायचं नाही. सांगायचं नाही म्हणून. आणि इथं तुम्हीच गावभर धिंडोरा पीटवता आहात. जरा तोंडाला आळा घालायला शिका ना . बाई दिसली रे दिसली की अमूल बटर सारखे वितळता लगेच. हे घ्या दही,दूध आणि द्या तिला. मला तर डाऊट आहे. तुम्ही मागच्या जन्मी बोका बनून तिच्या घरचं दही दूध दाबून बळकावल असेल दाबून . त्याचाच सूड घेते आहे ती. " मी गोरा मोरा चेहरा करून दही दूध तिला द्यायला आलो. ते तिने घेतलं आणि विचारलं,

" काका, स्टॅन्डच काय म्हणाला तुम्ही. जर स्टॅन्ड वर जाणारच असाल तर माझ्या साठी सरस्वती डेरी मधून चक्का घेऊन याल का एक किलो. आज यांचा वाढदिवस आहे हो . मीच गेले असते. पण आता तुम्ही जाताच आहात तर माझ्या साठी आणा हं प्लीज. मी तुम्हाला आल्याबरोबर पैसे देते. मागचे पण बाकी आहेत. लक्षात आहे माझ्या. "

" बाबा, येतांना माझ्या साठी फेंट पिंक कलरची लिपस्टिक आणा हो " अनिता.

" आणि हे बघा कामं झालं की जवळच भाजी मार्केट आहे. माहिती आहे ना. घरात भाजीचा कणं नाही. येतांना काही स्वस्त भाज्या भेटल्या तर घेऊन या.फक्त भाजी चांगली आणि ताजी आहे की नाही एव्हढंच बघा. भाजीवाली कडे बघत बघत भाजी घेऊ नका. शिळा माल भरून देईल तुम्हाला ती, कळणार पण नाही. नीट समजलं ना मी काय सांगितलं ते "

" बाबा, मला चॉकलेट " आमची सगळ्यात धाकटी कन्या चारू म्हणाली.

" मला एक बॅट बॉल पाहिजे चंद्रावर खेळायला " आमचा वंशाचा दिवा म्हणाला.

अशा अनेक सूचनांचा मारा डोक्यात ठेवत मी बस स्टॅन्ड वर गेलो. जवळच हॉटेल गुलमोहर होतं. गावातल्या गावात कधी अशा हॉटेल मध्ये जाण्याचा संबंध आला नव्हता. त्या मुळे तिथं काउंटर वर एक माणूस बसलेला होता त्यालाच विचारलं,

" रूम नंबर तीनशे एक " मी विचारलं.

" वर तिसऱ्या मजल्यावर डाव्या बाजूची खोली " त्याने निर्वीकार पणे माहिती दिली.

मी वर गेलो. आत मध्ये स्पेसएक्स कंपनी आणि कंसात एफ.ए.एस. असं लिहिलेलं होतं. भिंतीवर अनेक विमानांची चित्रं आणि भीती वर अवकाश यात्री घालतात तसे सूट होते.

मी गेल्याबरोबर एक चंट दिसणारी मुलगी माझ्या कडे बघून चक्क हसली. क्षणभर तर मला भोवळच आल्या सारखं झालं. कदाचित बीपी पण हाय किंवा लो काहीतरी झालाच असावा कारणं अचानक हाता पायाला कंप सुटला आणि तोंडाला कोरडं पडली. काय बोलावं तेच समजेना.

"वेलकम सर, एफ.ए.एस.मध्ये तुमचं स्वागत आहे. "

"एफ. ए. एस. म्हणजे काय हो," मी असं विचारल्या वर ती फारच गोड हसली. मला तर माझी शुगर लेव्हल कमालीच्या बाहेर जाते की काय असंच वाटायला लागलं.

" स्मार्ट गाय हं, सर एफ ए एस म्हणजे फुकट अंतराळ सफर. फार थोडे लोक असे हुशार असतात. तुम्हाला अंतराळ सफर घडवून आणण्यात आम्हाला खूप आनंद होईल." असं म्हणत तिने माहिती सांगायला सुरुवात केली.

" सर, सर्व प्रथम तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. तुमची या सफारी साठी निवड झालेली आहे. पुढच्या महिन्यात श्री हरी कोट्यावरून तुमचं अवकाश यान अवकाशात उड्डाणं करेल.श्री हरी कोट्या पर्यंत तुम्हाला तुमच्या खर्चाने जावं लागेल.पहिला मुक्काम तीन दिवसानंतर चंद्रावर दोन दिवसा साठी राहिलं. दोन दिवसात तिथली प्रेक्षणीय स्थळ पाहण्याचा खर्च मात्र तुम्हाला करावा लागेल. चंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला तिथल्या आमच्या कपंनीच्या ब्रँच मध्ये एक फीडबॅक फॉर्म भरून द्यावा लागेल. मग तिथून तुम्हाला अजून कोणत्या ग्रहावर जायचं असेल तर ते ठरवता येइल. या प्रवासा दरम्यान चहा पाणी नाश्ता जेवणं आणि प्रवास खर्च सगळ आमच राहिलं. तुम्ही फक्त किती जण येणार आहात. त्यांच्या बद्दलची माहिती या फॉर्म मध्ये भरून द्या. "
मी फॉर्म पहिला. अगदी साधा  सरळ नाव, गावं, वय, शिक्षण आणि पत्ता अशी माहिती असलेला फॉर्म होता. फॉर्म भरून दिल्यावर त्या मुलीने तो बारकाईने वाचला आणि मला फारच गोड आवाजात म्हणाली,

"सर, तुम्हाला प्रत्येकी पाच हजार रुपये डिपॉजिट भरावं लागेल.".

" अहो पण तुम्ही तर ही सफर मोफत आहे असं म्हटलं आहे जाहिरातीत " मी खिशातली नाणी मोजत त्या मुलीला म्हटलं.

" मोफतच आहे सर. हे पैसे आम्ही सिक्युरिटी डिपॉजिट म्हणून घेत आहोत. तुम्ही परत आलात की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. कारणं लोक फुकट आहे म्हणून नाव नोंदवून जातात आणि वेळेवर नाही म्हणून जातात. त्या मुळे कपंनीला खूप नुकसान सोसावं लागतं. सर तुम्ही जर एक तासाच्या आत हे पैसे भरले तर तुमचं श्रीहरी कोट्या पर्यंतचं विमान तिकीट कॉम्प्लिमेंटरी म्हणून कपंनी तुम्हाला देईल. त्याची रीतसर रिसीट तुम्हाला मिळेल. एक मिनिट हा सर, तुमची तिकीट तुम्हाला कधी मिळतील हे पण मी तुम्हाला सांगते. " असं म्हणतं तिने लॅपटॉप उघडून काहीतरी शोधायला सुरुवात केली. ती शोधत असतांना मी उगाचच सगळं समजतं असल्या सारखं तिच्या तोंडाकडे कुतूहलाने पाहात होतो. थोडया वेळाने तिने मला हसत हसत सांगितलं की मी जर एक तासाच्या आत पैसे भरले तर एक तासाच्या आत तुमची तिकीट कन्फर्म होऊन जातील. "

मी थोडा घुटमळत विचार करत होतो ती म्हणाली "सर, तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर आग्रह नाही.दुसरे बरेच लोक वेटिंग लिस्टवर आहेत. "

"नाही नाही तसं नाही पण मी पैसे आणलेले नव्हते ना. "मी चाचरत म्हणालो.

" अहो सर, आजकाल पैसा कॅश मध्ये थोडाच लागतो. कार्ड तर असेल ना तुमच्या कडे. मी लगेच तुम्हाला तिकीट पण काढून देते. मग तर झालं "

तिने असं म्हटल्यावर मला वाटलं फक्त एक शब्द पिंकूला विचारून घ्यावा. म्हणून मी त्या पोरीला म्हटलं, " मॅडम मला फक्त दहा मिनिट द्या "

मला वाटलं ती शक्यतो नाहीच म्हणते की काय. पण तिने हसत हसत परवानगी दिली. मी गुपचूप घरी फोन लावला आणि सहज विचारल्या सारखं म्हणून विचारलं, "अग पिंकूला पण न्यायचं का आपल्या सोबत अंतराळात.बिचारी नाही तरी एकटीच आहे तिच्या घरी "

मला वाटलं होतं बायको भडकेल. पण उलट तिचं मला हसत हसत म्हणाली, " इश्श त्यात काय विचारायचं. विचारा ना तिला. म्हणजे सगळ्यांना करमणूक होईल. पोरी पण खूष होतील मावशी सोबत असल्यावर "

मग मी निर्धास्तपणे पिंकूला फोन लावला.

"पिंके, आता सोमवार पासून महिनाभर तू आमच्या सोबत राहायचं. समजलं का "

" अरे जिज्जू,आता मी तुमचा आणि ताईचाच विचार करत होते. अजित पण येथे नाहीये.मला जाम कंटाळा आलाय. येते मी तुमच्या सोबत. पण कुठं जायचं ते तर सांगा "

" चंद्रावर " मी असं म्हटल्यावर ती खदाखदा हसायलाच लागली.

" तुम्ही पण ना जिज्जू. असे लबाड आहात ना. चंद्रावर कशाला मधुचंद्रा साठी का ", असं तिने म्हटल्यावर मी तर एव्हढा लाजलो की कदाचित माझे गाल लाल झाले असावे असं मला वाटलं. बरीच स्वप्न एका क्षणात डोळ्यासमोरून तरंगून गेली आणि त्या भारलेल्या क्षणात मी केंव्हा कार्ड दिलं आणि माझ्या हातात त्या पोरीने एअर इंडिया कपंनीची तिकीट हातात केंव्हा ठेवली हेच मला समजलं नाही.

त्या तिकिटा सोबत त्या पोरीने मला चांगले नऊ अंतराळ पोशाख फ्री दिले. त्यात गॉगल, हात मोजे, पायमौजे सगळं काही होतं. ते पोशाख पाहून मी एकदम खट्टू झालो. अशा पोशाखात कोण कोणाला कसं बरं ओळखू येणारं तेच समजतं नव्हतं.

किरकोळ बेसिक गोष्टी त्या पोरीने समजावून सांगितल्या. घरी येतांना मी हवेतच तरंगत होतो. पण न विसरता सोनालीसाठी चक्का, अनिता साठी लिपस्टिक, हिच्या साठी आणि पिंकू साठी एक ड्रेस घेतला. भाजीपाला न विसरता घेतला. आणि घरी आलो.

मग सगळ्यांची तयारी सुरु झाली. साडया, ड्रेस, झगे,लिपस्टिक, पावडर, नेलपेंट, फेसपॅक, टिकल्या, बांगडया वगैरे सामान सुटकेस मध्ये आठवून आठवून भरलं गेलं.मी माझ्या कपड्यांबद्दल कोणते कपडे घेऊ विचारलं तर, कोणतेही घ्या ना. नाहीतरी अंतराळात कोण बसलंय तुमच्या कडे बघायला.असं उत्तरं मिळालं. नाही म्हटल्या अमृताने एक जपाची माळ आणून माझ्या हातात दिली आणि म्हणाली, " बाबा ही माळ असू द्या. कोणती वेळ केंव्हा येइल सांगता येतं नाही. " मी तिच्या कडे बघतच राहिलो. मला तिच्या निरागसपणाचा राग करावा की कीव करावी तेच समजेना.

आम्ही अंतराळात जाणार आहोत ही गोष्ट मोठया कष्टाने लपवून ठेवली. दुधवाल्याला फक्त काही दिवस आम्ही येई पर्यंत दुध टाकू नको म्हणून निरोप देऊन ठेवला.

रविवारी पोरांची मावशी आली. सकाळी सात वाजता फ्लाईट होतं. म्हणून आम्ही पहाटेच उठलो. विमान तळावर पोहोचलो. आमचं विमान उभेच होतं. सगळे सोपस्कार पार पाडून आम्ही ते पोशाख घालून विमानात जाऊन बसलो. मला तर एकदम हृदय भरून आलं. आता पुन्हा कधी या धरती मातेच दर्शन होईल कुणास ठाऊक असं म्हणत मी जमिनीला डोकं टेकवून नमस्कार केला. माझ्या त्या कृतीने सगळ्यांना माझ्या बद्दल आदर वाटलेला दिसला. कारणं एक हवाई सुंदरी पाण्याचा ग्लास घेऊन माझ्या जवळ आली आणि,

" डोन्ट वरी अंकल, आवर जर्नी इज अल्वेज सेफ " असं म्हणाली.

" चंद्रावर जायला किती वाजताच फ्लाईट आहे, " असं मी त्या हवाई सुंदरीला विचारलं तेंव्हा तिने काहीच समजलं नसल्या सारखां चेहरा केला. त्या मुळे मी पण जास्त खोलात चौकशी केली नाही.

दोन अडीच तासात आमचं विमान श्री हरी कोट्याला पोहोचलं. तिथं गेल्यावर विमान तळाच्या बाहेर आल्यावर दूर वर एका माणसाला बघितल्या बरोबर पिंकू धावतच सुटली आणि त्याच्या गळ्यात पडून, हाय अजित असं म्हटल्यावर माझं तोंड तर पाहण्या सारखं झालं.

माझ्या कडे खट्याळपणे पाहात खी खी हसत पिंकू म्हणाली,

" जिज्जू, तुम्हाला श्री हरी कोट्याला घेऊन येण्यासाठी अजितनेच ही आयडिया केली होती. कारणं आमची आता इथेच बदली झाली आहे. आणि तुम्ही इथं यायसाठी मीच अजितला ही आयडिया सांगितली.बारामतीच्या मामांनी फुकटात त्या पेपरात ती जाहिरात छापून दिली होती. आता इथंच पंधरा दिवस थांबायच आणि आजूबाजूची ठिकाण पाहायची . आणि हो एक गोष्ट सांगायची तर राहिलीच हे अंतराळ पोशाख नाही. तर पीपीइ किट्स आहेत. आणि ती अंतराळ कपंनी नव्हती. तर विमान एजन्टच ऑफिस होतं बरं.  " बोलतं बोलतं पिंकू अजितच्या हातात हात घालून चालायला लागली.

मला माझं तोंड, पोट आणि ढेरी असे सगळे अवयव चंद्रा सारखे गोल गोल दिसायला लागले होते .सगळं अंतराळच माझ्या भोवती फिरत आहे की काय असं वाटत होतं. माझं तोंड तर चंद्र ग्रहण लागल्या सारखं दिसायला लागलं होती.

दत्ता जोशी, अंबरनाथ