Jan 28, 2022
नारीवादी

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..

Read Later
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा..

(सत्य घटनेवर आधारीत)

 

स्मिता लग्न होऊन खेडेगावातून मुंबईला आली. घरच्या परिस्थितीमुळे तीच शिक्षण सातवी पर्यंतच झालं होतं. तिचा नवरा राजेश बारावी शिकलेला. स्मिता आणि राजेश खुप समजूतदार होते. त्या दोघांच्याही त्यांच्या जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा नव्हत्या. एकमेकांना समजून घेऊन आदराने आयुष्य व्यतीत करावे एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. राजेश एका ट्रॅव्हल कंपनी मध्ये नोकरी करत होता. त्यांच्याकडे खुप पैसे नसेल तरी ते समाधानाने आणि मनाने जगात होते.राजेश आणि स्मिताचा संसार फुलत होता. दिवसा गणीक एकमेकांची ओढ वाढत होती. लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. ते दोघेही खूप आनंदात होते. मुली मोठ्या होत होत्या. सारे काही खुप छान सुरू होते. नुकताच त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस त्यांनी साजरा केला. सेलिब्रेशनसाठी दोघांचे ही आई वडील खास गावावरून मुंबईला आले होते. अशा प्रकारे कुटुंबीय आणि थोड्या फार मित्र मंडळींच्या उपस्थितीत एक छोटेखानी सोहळा झाला. सगळं कसं अगदी पिक्चर परफेक्ट सुरू होतं.

 

२०२० मार्च महिन्यात कोरोना भारतात दाखल झाला. हळू हळू मार्च संपे पर्यंत भारत सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. इतरांप्रमाणेच राजेश आणि स्मिताला वाटले हे सारं पधरा एक दिवसात संपेल आणि सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल. पण तसे झाले नाही. पहिला महिना राजेशचा पगार पूर्ण आला. दुसऱ्या महिन्या त्यात पन्नास टक्के कपात करण्यात आली. या अशा परिस्थिती नोकरी आहे आणि पन्नास टक्के का होईना पगार तर मिळतोय याचे त्यांना समाधान होते. बघता बघता तिसरा महिना सुध्दा उजाडला. त्याही महिन्यात पन्नास टक्के पगारच हातात आला. कंपनी कॉस्ट कटिंग मुळे लोकांना नोकरी वरून काढता असल्याची खबर अधून मधून राजेशच्या कानावर येत होती. राजेश त्यामुळे थोडा फार घाबरला होता. 'आपल्या सोबत असे झाले तर पुढे काय करायचे, पदरात दोन मुली त्यांचा सांभाळ कसा करायचा, त्यात आता त्याच्या बारावी पर्यंतच्या शिक्षणाला फारसे कोणी विचारत नाही हे सुध्दा त्याला ठाऊक होते. आणि या वयात नोकरी तरी कोण देणार'. हे सगळे विचार त्याला भेडसावू लागले. असे होऊ नये यासाठी तो सतत देवा कडे प्रार्थना करीत होता. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. 

 

रात्रीचे जेवण उरल्यावर स्मिता आणि राजेश गप्पा मारत बसले होते. राजेशला फोन आला म्हणून तो बाल्कनीत गेला. तो पाच मिनिटांनी घरात आला आणि अगदी लहान मुलांसारख ढसा ढसा रडू लागला. स्मिताला कळेना नक्की काय झाले आहे ते. तिने राजेशला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याला पाणी आणून दिले. त्याचे अश्रु पुसले. राजेश थोडा शांत झाला आणि त्याने तिला त्यांची नोकरी गेल्याचे सांगितले. स्मिता सुध्दा जागीच स्तब्ध झाली. पण तिने स्वतः ला सावरले. राजेश सर्व संपल्या सारखेच वागत होता. तिने त्याला भानावर आणले. जे झालं ते झालं पण आपण असे हरून नाही जाऊ शकत. आपल्याला आपल्या मुलींसाठी खंबीर राहायला हवे याची तिने त्याला जाणीव करून दिली. राजेश स्मिता ला म्हणाला आता पुढे काय करायचं. या प्रश्नाचं उत्तर तिच्या कडे सुध्दा तेव्हा नव्हते. आजची रात्र सरू द्या.. उद्या ठरवू आपण काय करायचं ते. असे म्हणून तिने ती वेळ मारून नेली. ती रात्र दोघांनाही झोप लागली नाही.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी उतल्यावर स्मिताने राजेशच्या हातात काही पैसे दिले. दोन लाख रुपये होते ते. ते राजेशला देत स्मिता म्हणाली, "एवढ्या वर्षात मी साठवलेली रक्कम आहे ही. तुम्ही जे घर खर्चासाठी मला पैसे द्यायचात त्यातून मी थोडे थोडे बाजूला काढायचे. अडी अडचणीच्या वेळी त्याचा उपयोग होईल म्हणून. आपण काहीतरी उद्योग सुरू करू. एक जागा भाड्याने घेऊ. हवं तर भाजीच दुकान सुरू करू. होल सेल भावात भाजी आणू आपण."

 

 त्यावर राजेश तिला म्हणाला" इथे इतकी दुकानं आहेत मग आपल कस चालेल.?" त्यावर ती त्याला म्हणाली, "नाही चालणार हे तरी कशावरून. आपण प्रयत्न तर करू. उपजिविकेसाठी आपल्याला काहीतरी करावेच लागेल ना. आपल्या दोघांचंही शिक्षण जेमतेम, आता नोकरीही मिळणार नाही. घरी बसून रडण्यापेक्षा बाहेर पडून प्रयत्न करू. तुम्हाला ऑफिस मधून सुध्दा काहीतरी पैसे मिळतीलच. ते आपण सेविंग म्हणून ठेऊ". 

 

राजेशला तीचे म्हणणे पटत होते असे नाही, पण तिच्यातल्या सकारात्मकतेने त्यालासुद्धा वाटले करून बघायला काय हरकत आहे आणि आता असही त्यांच्या कडे दुसरा पर्याय नव्हता. . आठवड्यात त्यांना त्यांच्या घरा शेजारीच भाड्याने एक दुकान मिळाले. तिथे त्यांनी आधी फक्त कांदे बटाटे विकण्यास सुरुवात केली. होले सेल मार्केट मधून विकत आणून बाजार भावा पेक्षा १/२ रुपये कमी करून ते विकू लागले. काही दिवसांनी त्यांनी भाजी विकायला सुरुवात केली. मग एक सेकंड हॅण्ड फ्रिज घेऊन शीतपेय विकू लागले. स्मिता गृहिणी होती. त्यामुळे तिला गृहिणींना दैनंदिन दिवसात स्वयंपाक करताना होणारा त्रास आणि अडचणी माहित होत्या. गृहिणींना काय आवडेल ते माहित होते. तिने घरीच वेग वेगळ्या प्रकारचे पीठ दळायला सुरू केले. दुकानात येणाऱ्या प्रत्येकाला ती सुरुवातीला १०० ग्राम पीठ मोफत देऊ लागली. ती सुगरण होती. हे लोकांना आवडणार याची तिला खात्री होती. तिच्या या कल्पनेने कमालच झाली. त्याचा धंदा वाढला. हळू हळू तिने वेग वेगळ्या चटण्या बनवून विकणे सुरू केले. लोकांना तेही आवडले. स्वयंपाक करताना वाटण बनवाव लागत. त्यासाठी भाजलेल्या खोबऱ्याची आवश्यकता असते. तिने तेही बनवून विकण सुरू केलं. ही कल्पना तर हिट ठरली. खुप कमी वेळात त्यांचा व्यवसाय वाढला. हे सर्व करताना तिची बरीच धावपळ होत होती. पण ती तिच्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन उभी होती. तिची सकाळ चार वाजताच व्हायची. मुलींचं सर्व आवरून, घरची कामं करून ती राजेशला दुकानं सांभाळायला मदत करत होती. हे सर्व करताना तिने कधीच कसली तक्रार देखील केली नाही. बरेचदा सामान आणता राजेश सोबत ती सुध्दा ओझी उचलून आणायची.एखाद्या पुरुषाला ही लाजवेल एवढं काम ती करत होती. राजेशच तिच्यावर प्रेम होतच पण या दिवसात त्याच्या मनात तिच्यासाठीच आदर खुप वाढला होता. स्मिता नसती तर आज आपण काय केले असते, खरच तिच्या सारखी सहचारिणी मला भेटली हे माझ सुदैव आहे, हे त्याला राहून राहून वाटे. तिच्यातल्या या बिझनेस स्किल्स ची सुध्दा त्याला नव्याने माहिती होत होती. एरवी खुप साधी वाटणारी त्याची बायको त्याला आता नव दुर्गे सारखी सारखी भासत होती. तिच्या रुपात त्याला देवीच भेटली होती.

 

                                            समाप्त

 

 

 

डॉ.अश्विनी अल्पेश नाईक.

 

वाचकहो.. लेख कसा वाटला ते नक्की सांगा. आपला अभिप्राय नोंदवा. लेख आवडला असेल तर LIKE जरूर करा. आणि हो मला FOLLOW करायला विसरू नका.

माझा लेख माझ्या नावासहित शेअर करायला माझी काहीच हरकत नाही????????.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Ashwini Alpesh Naik

Physiotherapist

हॅलो.. मी पूर्वाश्रमीची डॉ. अश्विनी अनिल पांचाळ आणि आता डॉ. अश्विनी अल्पेश नाईक. मी फिजिओथेरपिस्ट आहे. गेले सहा वर्ष प्रॅक्टिस करते आहे. मला वाचनाची, लिखाणाची,प्रवासाची आवड आहे. मला आसपासच्या गोष्टी, निसर्ग, माणसं, यांचे निरीक्षण करायला फार आवडते.कदाचित ही आवड मला माझ्या प्रोफेशनमुळे निर्माण झाली असावी. निरीक्षणातून आपण बरेच काही शिकतो असे मला वाटते. माझी हीच आवड बरेचदा माझ्या लिखाणातून झळकते. माझी अजून एक ओळख म्हणजे मी एक आनंदी बायको आहे आणि अकरा महिन्याच्या बाळाची आई आहे.