मोडलेली नाती ( भाग तिसरा)

खरचं का या स्त्री देहाचा कोणाला ईतका मोह पडतो की त्या साठी माणूस कोणत्याही थराला जावू शकतो

मोडलेली नाती ( भाग तिसरा )

विषय : तिचं आभाळ 


ती ईतकी साधी सरळ मुलगी होती की तिला अशा गोष्टींची अजिबात सवय नव्हती. तिला आयुष्या कडून कुठल्याही जास्त अपेक्षा नव्हत्या.

पण पावलो पावली खोटं बोलत जगणं किती कठीण गोष्ट आहे. हे तिला जाणवतं होत. साधं घरुन फोन आला की जावई कसे आहेत , अशा साध्या प्रश्नानेही तिला हजारो इंगळ्या डसत. शाळेत जातांना ईतर मुलांचे बाबा त्यांना पोहोचवतांना दिसत याही गोष्टीचा तिला अतोनात त्रास होई. शिवाय श्रावण भाद्रपदातले स्त्रियांचे सण म्हणजे तिला एक शिक्षा असे. शिवाय मुलांचे बाबां संदर्भातले प्रश्न जीवघेणे असतं. कधी कधी हे सगळं सोडून निघून जावं असं तिला वाटे.

एक दिवस सासू सासऱ्यांनी तिला बैठकीच्या खोलीत बोलावलं. आजकाल कोणी जास्त त्या घरात बोलतं नसे. ती खाली मान घालुन बसली होती.

अगोदर त्या बाईने तिच्या नवऱ्याला कसे जाळ्यात ओढले या बद्दल त्यांनी माहिती सांगीतली. अजुन कोर्टात केस पणं उभी राहीलेली नाही. त्या आधी दोन मुलांना सोबत घेऊन त्या बाईकडे जावून तिने ही केस मागे घेण्यासाठी विनंती करण्याची तिला सूचना केली.

आपल्या नवऱ्याला जर खरोखर मुद्दामून या केस मधे अडकवल गेलं असेल तर त्याला बायको म्हणून वाचवणं. त्याच्या पाठीशी उभं राहणं किती आवश्यक आहे हे तिला पटलं.

आपल्या दोन मूलांना घेवून ती त्या बाईच्या दारात आली. त्या घरातील वातावरण देखील आनंदी नव्हते. एक प्रौढ दिसणारी स्त्री अंगणात आली. तिने आपल्या नवऱ्याला भुरळ घालणाऱ्या त्या प्रौढ स्त्रीला निरखून पाहिलं. एक गडद दुःखाची सावली त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर पडलेली होती. ती पुढे झाली आणि त्या स्त्रीला म्हणाली,

" बाई, माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मला
माहीत आहे तो असं चुकीचं पाऊल कधीचं उचलणार नाही. पण तरीही मी तुमच्या समोर पदर पसरते आणि त्याला माफ करा अशी विनंती करते ."

त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर पिळवटून टाकणाऱ्या दुःखाची छटा दिसली. त्या स्त्रीच्या डोळ्यात अश्रु दाटलेले होते.

" बाळ, मला माहिती आहे की तू तुझ्या नवऱ्याची बाजू मांडायला आली आहेस. आणि ते साहजीकच आहे. अर्थात तू समजतेस ती मी नाही. पण जिच्यावर तूझ्या नवऱ्याने अत्याचार केलेला आहे तिची मी तुला भेट घडवून देते. नंतर तू ठरव काय करायचं ते."

ती प्रौढ स्त्री तिला घेऊन घराच्या एका मागच्या खोलीकडे आली. तिने हळूच तिला खिडकीमधून आत बघायला सांगितलं.

तिने हळूच खिडकी उघडली आणि आत बघितलं. आत मध्ये एक वीस एक वर्षाची मुलगी भिंतीकडे तोंड करुन बसलेली होती. तिचे केस मोकळे होते.

तिची चाहूल लागताच ती मुलगी एकदम किंकाळी मारून नाचायला लागली. अंगावरचे कपडे ओरबडायला लागली. केस उपटायला लागली. त्या मुलीचा चेहरा दिसताच तिला आपल्या नवऱ्याच्या मोबाईल मधला तिचा सुंदर दिसणारा फोटो आठवला. तिने त्याला त्या फोटो बद्दल विचारले असल्याचे तिला आठवले. त्या वेळी त्याने तिची आपली दूरची नातेवाईक असल्याचं सांगितलं होतं. आता तिची अवस्था पाहून तिच्याही डोळ्यातून पाणी वाहात होतं.

तिला त्या अवस्थेत पाहून ती प्रौढ स्त्री रडत म्हणाली, " त्या दिवसा पासून आम्ही जिवंतपणी या नरक यातना भोगत आहोत. आता तुम्हीच सांगा. कशी मिटवायची ही केस ?.. त्या दिवशी तिच्या भावाने तूझ्या नवऱ्याला रेड हॅण्ड पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याचा तर खेळ झाला ग. पण माझी पोरगी आयुष्यातून उठली बघ. "

त्या स्त्रीच सांत्वन आपल्याला करताच येणारं नाही याची जाणीव तिला झाली. आणि तिच्या घशातुन ओक्साबोक्सी रडण्याचा आवाज यायला लागला.

यात त्या मुलीचं दुःख किती होतं, आपल्याला नवऱ्यानं फसवण्याच दुःख किती होतं आणि आता आपल्या समोर असलेल्या काळोखाला सामोरं कसं जायचं याचं दुःख किती होतं हेच तिला समजत नव्हतं. फक्त ती टाहो फोडून रडत होती. मुलं मात्र कावरी बावरी होवून बघत होती.

( समाप्त)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all