मोडलेली नाती ( भाग दुसरा)

खरचं का या स्त्री देहाचा कोणाला ईतका मोह पडतो की त्या साठी माणूस कोणत्याही थराला जावू शकतो


मोडलेली नाती ( भाग दुसरा )

विषय:तिचं आभाळ 


बघता बघता ती जेलच्या प्रचंड गेट समोर उभी राहिली. आपलं सगळं आयुष्य गिळणाऱ्या त्या अजस्त्र दरवाजा कडे ती दुरुनच स्तिमित होऊन बघत राहिली. त्या मोठ्ठ्या दरवाजाला एक छोटा दरवाजा होता. त्या दरवाज्यात एक पहारेकरी बंदूक घेऊन उभा होता. त्याने तिला बघितल्यावर जूजबी माहिती विचारली. तिने आपल्या मुलाखतीचा नंबर आणि कैदी नंबर सांगितला. त्याने दरवाजा उघडून तिला आत जायला सांगितलं. आत मध्ये ती मुलांना घेऊन गेली. तिची झडती घेतली गेल्यानंतर तिला एक टोकन देण्यात आले आणि एका बेंचवर बसवण्यात आले.


तिची धडधड खूप वाढली होती. तब्बल एक वर्षानंतर तो भेटणार होता. वेळ फक्त पाच मिनिटं. काय बोलायचे, काय प्रश्न विचारायचे याची उजळणी चालली होती. मुलं त्याला बघून काय बोलतील माहीत नव्हतं. प्रत्यक्षात त्याला बघितल्यावर आपली काय अवस्था होईल माहीत नाही.

जीव मुठीत धरून ती एकेक क्षण मोजत होती. दोन चार सहा आठ किती नंबर गेले तिला कळलच नाही. तिचा नंबर आल्या बरोबर ती दचकून जागी झाली. एका पहारेकऱ्याने तिला त्याच्या कोठडी समोरं आणून उभ केलं.

आजुबाजुला गडद थंडगार गारवा होता. आणि त्या थंडगार गजाआड तो उभा होता.

त्याला त्या जेलच्या चटयापट्याच्या ड्रेसमधे पाहून तिला गलबलून आलं. त्याच्या कोठडी बाहेर त्याचा नंबर लिहिलेला होता. मुलं भेदरून त्याच्या कडे बघत होती. कोठडीच्या गजांवर हात ठेवून तो उभा होता. तिच्या कडे आणि आपल्या मुलांकडे बघून तो काय विचार करत होता कळत नव्हतं.

त्याच्याकडे बघता बघता तिला त्याच्या सोबत पाहिलेली स्वप्न आठवली. सात जन्माची सोबत देण्याची वचन देवून त्याने आपली सोबत अर्ध्यात सोडली होती. तसं पाहिलं तर तो अगदी सुरक्षित होता. तो अशा जागी होता की तिथं त्याला जाब विचारणार कोणीच पोहोचू शकत नव्हतं. पण तिचं मात्र तसं नव्हतं. तिला मात्र प्रत्येक क्षणाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागत होती. त्याला खडसून जाब विचारावा असं तिला वाटलं. पण तिची जिभच रेटली जाईना. तिला त्या वातावरणात कसं तरी व्हायला लागलं. आपला तोल जातो की काय असं तिला वाटलं. आणि तिने आधारासाठी गज घट्ट धरले .

" कशी आहेस ? " खूप दूरवरून आल्या सारखा त्याचा आवाज होता. एकेकाळी याच आवाजाने घातलेली साद ऐकून ती सारी बंधन झुगारून त्याच्या कडे धावत आली होती. आज मात्र दोघांच्या मध्ये होता तो काळोख, ती मजबूत गज आणि वाऱ्याच्या वेगाने धावत संपून जाणारा पाच मिनिटाचा वेळ.

त्याचा तो आवाज ऐकल्या बरोबर तिच्या घशात हुंदका दाटुन आला. ती तशीच मुसमुसत राहीली.

त्याने अलगद त्याचे हात तिच्या हातावर ठेवले. त्या बरोबर चटका बसल्या सारखे तिने तिचे हात बाहेर काढून घेतले. याचं हातांनी कोणावर तरी बलात्कार केलेला होता, हे आठवताच ती आक्रसून गेली.

" तू आलीस, मला वाटलं तू मला सोडून गेली असशील. "

" सोडून जाणार तरी कोठे. माझे सगळे परतीचे रस्ते हरवले आहेत" ती मलूल आवाजात म्हणाली.

" माझ्यावर विश्वास ठेव मी निर्दोष आहे. मला यात गुंतवल गेलंय. ठेवशील ना विश्वास. ".

" हो नक्की ठेवेल. फक्त मला तिचं नावं सांगाल, कोण होती ती. जीचा तुम्हाला मोह पडला "

तो काहितरी बोलला. ते नावं तिच्या कानावर उकळत्या तेला सारखे पडले. ती काही बोलणार होती तेव्हढ्यात भेटीची वेळ संपल्याचा बझर वाजला.

ती मुलांसह बाहेर पडली. पुन्हा एक वर्षांनी भेटण्यासाठी. तो आत मध्ये बंद होता. ती बाहेरच्या जगात मुक्त असून बंदीस्त होती.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all