मोबाईल, मोबाईल आणि मोबाईल

मोबाईलमुळे आयुष्यात घडून आलेले बदल

आजकालची पिढी दर महिन्याला मैत्रीण बदलावी तसं नवीन मोबाईल घेते. असते एकेकाची आवड, आलं नवीन मॉडेल की चाललेच लगे घ्यायला. पण कितीही काळ बदलला, किंवा बाजारात कितीही नवंनवीन मॉडेल आलीत तरी पाहिली गोष्ट कोणतीही असो, काहीही असो अजिबात मनातून जातं नाही. सगळ्याच नवलाईच्या गोष्टी तिच्याशी निगडीत असतात ना. मी फक्त मोबाईल बद्दल बोलतोय, लक्षात आहे ना. 


प्रत्येक गोष्टीची कारण नसतांना हौस हे माझं मोबाईल घ्यायच खरं कारण. जेंव्हा लोकं एकमेकांना भेटून चौकशा करायचे त्या काळात मी मोबाईल घेतला होता. 


त्याच्या आधी लँडलाईन फोन होता. त्याच्या वर आमच्या घरातल्या लोकांपेक्षा इतरांचेच फोन जास्त यायचे. किंवा नाहीतर याचा निरोप त्याला दे,त्याचा निरोप याला दे,  त्याला बोलावून आण अशी समाजसेवेचीच कामं जास्त व्हायला लागली होती.


मला तर कधी आठवतंच नाही की लँडलाईन वर आम्हाला कधी फोन आला होता म्हणून. बेल वाजली की आम्ही धावत पळत जायचो आणि मग ज्याचा फोन असेल त्याला बोलवायला जायचो. चुकून फोन द्यायला किंवा निरोप सांगायला विसरलो की वाईटपणा यायचा. 


एकदाच फक्त बायकोला एक फोन आला होता, दहा मिनिटं सगळं बोलून झाल्यावर लक्षात आलं की तो रॉंग नंबर होता. बिल मात्र खच्चून यायचं. लँडलाईनच बील भरायसाठी मला सायकल विकावी लागली आहे. 


नंतर मोबाईलचा जमाना आल्यावर मी मोबाईल घ्यायचं ठरवलं. तेंव्हा तर इनकमिंग कॉलला पण पैसे लागायचे. पण हौसेला मोल नसतं ना. 


हा मोबाईल, वजनाने मस्त दणकट होता. त्याला अँटिना सारखी एक छोटीशी एका बाजूला शेंडी होती. तो एव्हढा वजनदार होता की पॅन्टच्या ज्या खिशात तो ठेवलेला असायचा तो खिसा एका बाजूला झुकलेला असायचा. 


तेंव्हा माणसं समोर भेटली तरी मी त्यांना फोनवर बोला ना, हा घ्या माझा नंबर. मग सविस्तर बोलू या, असं आग्रहाने सांगत असे. पण लोकांना त्या वेळी माझ्या फोनच कौतुक वाटत नसे. 


आपल्या समाजात तुम्हाला माहितीच आहे ना की कोणाची प्रगती झालेली कोणाला आवडत नाही आणि सहनही होतं नाही. लोक माझ्या बद्दल आणि माझ्या मोबाईल बद्दल नेहमी कुचेष्टेने बोलायचे. 


एकदा तर ऑफिस मधल्या लोकांची भांडण झाली. तेंव्हा एक बाई दुसऱ्या बाईला संतापून म्हणाली, माझ्या जास्त नादी लागू नको बर आधीच सांगून ठेवते. माझं जर डोकं फिरलं ना तर तो जोशींचा फोनच डोक्यात घालीन मी, समजलं का. आणि खरोखरच माझ्या मोबाईलचा आकार पाहून त्या बाईने भीतीने डोळे गच्च मिटून घेतले. 


बऱ्याच वेळा तर ऑफिस मधला प्युन, कागद उडू नये म्हणून मला त्या वर पेपरवेट म्हणून मोबाईल ठेवायला सांगायचा. 


हे सगळं मला हिणवण्या साठी सगळे वागतात हे मला चांगलं समजायचं. मी लक्षच द्यायचो नाही. पण एकदा कहर झाला हो, आमच्या साहेबांच्या साल्याने ट्रक घेतला. तर साहेबांनी मला बोलावून घेतलं, आस्थेने मोबाईल विकायचा आहे का असं हळुवार पणे विचारलं. मला वाटलं की कदाचित साल्याला गाडीवर दूर दूर जावं लागतं असेल म्हणून मोबाईलची चौकशी करत असतील. मी म्हणालो, साहेब आजकाल मोबाईल स्वस्त झालेत. एव्हढयाच किमतीत नवीन येवून जाईल. 


अहो, काय आहे ना, नवीन ट्रकला नजर लागू नये म्हणून चप्पल बांधतात ना, मला वाटलं त्या ऐवजी तुमचा मोबाईल बांधला तर काय हरकत आहे. आई शप्पत, माझं असं डोकं फिरलं होतं ना असं वाटतं होतं मोबाईल खरोखरच साहेबाच्या डोक्यात घालावा. पण मी राग आवरला. माझं डोकं एकदा फिरलं की मी कोणाचंच ऐकत नसतो म्हणून मी शक्यतो बायको समोर आणि साहेबा समोर डोकं फिरुच देत नाही. काहीही बोला, मी आपला शांतपणे मनातल्या मनात शंभर पर्यंत अंक मोजत बसतो. 


पण एकदा या मोबाईल ने मला जाम संकटात टाकलं होतं. त्या दिवसापासून मी तो फोन कार्डा सकट बंद करून टाकला. त्याच असं झालं होतं. त्या फोन मध्ये मेसेज एकाच वेळी सगळ्या नंबरांवर पाठवून देता येत असतं. 


आणि सगळ्या दुनियाभरचे फोन नंबर, म्हणजे हिच्या मैत्रिणींचे, मुलाच्या मित्र मैत्रिणींचे, साहेब लोकांचे, त्यांच्या बायकांचे, भाजीवाले, किराणावाले, असे जे जे लोकं मोबाईल वापरत असतं त्या सगळयांचे नंबर माझ्या फोन मध्ये आवर्जून सेव्ह करून ठेवत असे. 


तेंव्हा असं व्हॅलेंटाईन डे वगैरेच एव्हढं फॅड नव्हतं. तरी म्हटलं आपण काही जवळच्या मित्रांना रात्री बारा वाजताच मेसेज करून आपलं प्रेम व्यक्त करू या. आणि कोणतं सेटिंग झालं देव जाणे.झाडून झटकून एकूण एक नंबरवर माझ्या फोन वरून हॅपी व्हॅलेंटाईन डे चा मेसेज तेरा फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजता फॉरवर्ड झाला. आणि  चवदा फेब्रुवारी, सगळ्या जगासाठी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस माझ्या साठी मात्र काळ रात्र ठरला. 


बारा वाजून दोन मिनिटांनंतर माझा फोन सतत वाजायला लागला. पाहिला साहेबाचा फोन होता,आज  काय घेतली आहे की काय. माझ्या बायकोला हॅपी व्हॅलेंटाईन डे चा मेसेज पाठवता काय. उद्या ताबडतोब येवून भेटा मला ऑफिस मध्ये. 


लगेच हिच्या लहान बहिणीचा ( लहान कसली, चांगली कॉलेजला जाते ना ) हिला फोन, हे काय ग ताई, बघ ना इतक्या रात्री जिजुंनी मला व्हॅलेंटाईन डे चा मेसेज पाठवला. लव्ह यू जीजू. 


मग हिच्या मैत्रिणींचे फोन सुरु झाले.मग तर हिचा अवतार तुम्ही पाहायचा असता. एखादा देव अंगात आल्यावर त्या बायका कशा केस मोकळे सोडून घुमायला लागतात ना. तसंच मला वाटलं. आता तुम्हीच सांगा यात माझी काय चूक झाली होती.


मी आपला त त प प हे दोनच अक्षर आलटून पालटून म्हणतं होतो. रात्रभर या फोन मुळे मला काय कोणालाच झोप लागली नाही. दर दहा मिनिटांनी एक फोन यायचा. आम्ही हॅलो म्हटलं की तिकडून शिव्या सुरु व्हायच्या. शेवटी तो किंवा ती शिव्या देणारी व्यक्ती बोलून बोलून  थकून जायची आणि, आम्हालाच ठेवा आता फोन असं म्हणून कट करून टाकायची. बऱ्याच जणांनी तर पोलिसात तक्रार करणार असल्याचा धमक्या दिल्या मला. 


असा तो भीषण व्हॅलेंटाईन डे मी कसा विसरेन. सकाळीच बायको रागारागात उठली. तेव्हढ्यात कोणीतरी सज्जन व्यक्तीने मला हॅपी व्हॅलेंटाईन डे चा रिटर्न मेसेज पाठवल्याचा आवाज आला, बायको ने तो मेसेज वाचला आणि अच्छा असे धंदे चालतात का तुमचे असं म्हणून, आणा तो मोबाईल इकडे असं म्हणून माझा तो प्राण प्रिय पाहिला मोबाईल त्वेषाने उचलला आणि सरळ बंबात टाकून दिला. 


आता काय, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी .