मोबाईल, शाप की वरदान ?

About Mobile


\"भ्रमणध्वनी\" हा शब्द बोलताच अनेकांना लवकर समजणार नाही. कारण पेन,टेबल,सायकल,फाइल,आईस्क्रीम, टेलिफोन, सिलेंडर,डॉक्टर,बस असे अनेक शब्द आहेत जे इंग्रजी शब्द असले तरी रोजच्या बोलण्यात एवढे प्रचलित झाले आहे की,कोणी या शब्दांचा मराठी शब्द ही शोधत नाही, शोधला तरी बोलत नाही आणि बोलले तरी समोरची व्यक्ती म्हणणार ,"साध्या मराठीत बोल ना,इतके मोठे शब्द का बोलत आहे ? "
तर सांगायचा उद्देश हा चं की भ्रमणध्वनी हा शब्द अनेकांचा परिचयाचा नसला तरी त्याचे इंग्रजी नाव हे वरील सर्व शब्दांप्रमाणे प्रत्येकाच्या तोंडी पक्के बसले आहे.
म्हणजेचं सर्वांच्या परिचयाचा,सर्वांच्या बोलीभाषेतील \"मोबाईल\" होय.
लहानथोर, गरीब-श्रीमंत, स्त्रीपुरुष असा कोणताही भेदभाव न करता सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेला मोबाईल!
पूर्वी सकाळी उठल्यानंतर देवाचे नाव घेतले जात असे ,हातांमध्ये देवाला पाहून नमस्कार केला जात असे.
\"कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती
करमध्ये तू गोविंदा प्रभाते करदर्शनम् ।\"
पण आता प्रथम \"मोबाईल दर्शनम्\" !
गजर च्या घड्याळाने उठणारे लोक आता मोबाईल च्या आपल्या आवडीच्या रिंगटोन्स च्या आवाजाने उठतात. गजरची घड्याळे अनेक घरांतून दिसेनासी चं झाली आहेत.
सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेतल्याशिवाय दैनंदिन कामांना सुरुवात होत नाही.
सकाळी गुड मॉर्निंग मेसेज ते रात्री गुड नाइट मेसेज असा मोबाइल चा दिवसभराचा नित्यक्रम ..

सुरूवातीला मोबाईल चा उपयोग फक्त संदेशांची देवाणघेवाण यासाठी होत असे आणि मोबाईल खुप थोड्या लोकांकडेचं होता.
किपॅड ते टच स्क्रीन असा मोबाईल चा प्रवास झालेला आहे.
आज मोबाईल फोन विविध आकारांमध्ये उपलब्ध आहेत,विविध तांत्रिक वैशिष्ट्ये आहेत आणि ते अनेक कारणांसाठी वापरले जातात,जसे की - व्हॉईस कॉलिंग ,व्हिडिओ चॅटिंग ,टेक्स्ट मेसेजिंग,इंटरनेट ब्राउजिंग ,ई-मेल ,व्हिडिओ गेम्स आणि फोटोग्राफी इ. म्हणूनचं मोबाईल ला \"स्मार्ट फोन\" म्हणतात.
लोक जसे गाडीला महत्त्व देतात त्याप्रमाणे मोबाईल वापरणे हे देखील महत्त्वाचे झाले आहे.विशिष्ट ब्रॅंड चे मोबाईल वापरणे ही तर स्वतः ची प्रतिष्ठा वाटू लागली आहे.शरीराला आणखी एक अवयव जोडण्यासारखा मोबाईल माणसाला जोडला गेला आहे.
बाजारपेठेमध्ये मोबाईलचा नवीन मॉडेल कधी लाँच होईल याची आतुरतेने वाट पाहत असतात.
अगोदर घरातील सर्व व्यक्तींसाठी एकचं टेलिफोन पण आता घरात जितके व्यक्ती तितके मोबाईल्स ! आणि घरातील व्यक्ती प्रमाणे किंवा त्यापेक्षा जास्त ही त्याची काळजी घेतली जाते .
मोबाईल चार्जिंग ला लावणे,तो चांगला रहावा,खराब होऊ नये म्हणून स्क्रीन गार्ड ,मोबाईल कव्हर लावून घेणे.सदासर्वकाळ आपल्या जवळ बाळगणे,त्याच्यात थोडाही बिघाड झाला तरी करमेनासे होणे,चिडचिड होणे इतका मोबाईल जीवनाचा भाग बनला आहे.
टेलिफोन ला केबल असल्याने एका जागी बसून चं फोनवर बोलणे होत असे. मोबाईल ला बरोबर नेऊ शकत असल्याने केव्हाही, कोठेही फोनवर बोलणे सोपे झाले आहे.
घरात आई-वडील ,मुले आपआपले मोबाईल घेऊन बसलेले असतात. ट्रेन,बस,ऑफिस कोठे ही पहा सर्वांच्या हातात मोबाईल आणि त्यात एवढे गुंग असतात की बाजूला काय सुरू आहे हे सुद्धा समजत नाही. रस्त्यावर मोबाईल वर बोलत चालणारे,ड्रायव्हिंग करताना मोबाईल वर बोलणारे स्वतः वर तर संकट ओढून घेतात पण दुसऱ्यांना ही संकटात टाकतात.
मोबाईल मुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत.जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण घरी बसून संपर्क करू शकतो.मेसेजेस ,कॉल्स,व्हिडिओ कॉल्स,ग्रुप चँटिंग, ग्रुप कॉल्स, अशा अनेक सुविधा मुळें वेगवेगळ्या ठिकाणी असून सुद्धा एकमेकांशी बोलू शकतो,पाहू शकतो.
मोबाईल मुळे फोटोग्राफी सहज,सोपी झाली आहे.आनंदाचा क्षण आठवण म्हणून पटकन मोबाईल मध्ये टिपता येतो.वेगवेगळ्या अँप्स मुळे अनेक गोष्टी घरी बसून चं करता येतात .
जसे- ट्रॅव्हलिंग टिकीट्स ,मूव्ही टिकीट्स,हॉटेल्स बुकिंग,ऑनलाइन शॉपिंग,नेट बँकिंग इ.इ.
गूगल मॅप मुळे प्रवास करण्यास मदत होते.
कोरोना काळात तर जेव्हा पेंशट ला प्रत्यक्ष भेटणे शक्य नव्हते तेव्हा मोबाईल चं भेटण्याचा दुवा ठरत होता. येणे जाणे सर्व काही बंद होते तेव्हा सुखदुःखाचे प्रसंग मोबाईल मुळेचं अनुभवता आले.शाळा,कॉलेजेस,ऑफिसेस हे सर्व बंद होते तेव्हा ऑनलाइन क्लासेस, वर्क फ्रॉम् होम यामुळे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले आणि नोकरी ,व्यवसाय ही सुरू राहिले.
रोजच्या प्रत्येक गोष्टीत आता मोबाईल महत्त्वाचा ठरत आहे,दैनंदिन गरजा,शिक्षण,आरोग्य, नोकरी, व्यवसाय, आर्थिक अशा अनेक क्षेत्रांत मोबाईल ची गरज भासत आहे.
मोबाईल मुळे सर्वांचे जीवन सुखकर होत चालले आहे म्हणजेचं तो सर्वांसाठी वरदान चं ठरत आहे ..
पण \"अती तिथे माती\" या प्रमाणे कोणत्याही गोष्टीला मर्यादा असली तर चांगले! अतिरेक झाला तर दुष्परिणाम भोगावे लागतात.
मोबाईल च्या बाबतीत ही तसेचं झाले.
मोबाईल च्या अति वापरामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो,वेळेचा अपव्यय होतो.मुले मैदानी खेळ न खेळता मोबाईल गेम्स खेळतात.त्यामुळे त्यांचे शारिरीक नुकसान तर होतेचं पण मुलं एकलकोंडी होतात.
पूर्वी रिकाम्या वेळी काही ना काही छंद जोपासली जातं पण आता थोडाही वेळ मिळाला तरी मोबाईल मध्ये गुंग ...
पूर्वी पत्र लिहीणे,पत्राची वाट पाहणे यामध्ये वेगळीचं मजा होती..नात्यांमध्ये गोडवा होता पण आता रोजचं बोलणं त्यामुळे ती ओढ कुठेतरी जाणवतं नाही .
जग जवळ आले पण मनाने माणसे दूर चाललीत...
घरातील व्यक्ती एकमेकांना वेळ देत होती पण आता सर्वांचा बराचसा वेळ मोबाईल,सोशल मिडिया यातचं जातो.सर्व जण खऱ्या जगापासून आभासी दुनियेत सुख शोधत आहे.
मुलांचा अभ्यासावर परिणाम होत आहे.नको त्या गोष्टींकडे जास्त आकर्षण वाढत आहे.अनेकांच्या आयुष्यात भांडण,कलह ,वादविवाद या गोष्टींना मोबाईल जबाबदार ठरत आहे.
त्यामुळे मोबाईल हा अशा सर्व लोकांसाठी शाप चं ठरत आहे..

जसे अणुबॉम्ब चा शोध चांगल्या हेतू साठी लावला पण काहींनी त्याचा उपयोग विध्वंसक म्हणून केला.
सुरीचा उपयोग फळे,भाजीपाला कापण्यासाठी होतो पण काही जण त्याचा दुरुपयोग ही करतात.
तसेचं मोबाईल चा शोध ही चांगल्या हेतू साठीचं केला .
पण प्रत्येक वस्तू कशी वापरतो आणि वापरणाऱ्याची वृत्ती कशी यावरून ती वस्तू शाप की वरदान ठरत असते.
मोबाईल चा चांगला वापर केला तर खरचं तो सर्वांसाठी वरदान चं आहे
आणि गैरवापर केला तर शाप ही ठरतो.
म्हणून चं सांगावेसे वाटते मोबाईल ला वरदान म्हणून चं वापरावे आणि जीवन सुखकर करावे.
पण मोबाईल चा अतिरिक्त आणि गैरवापर करून स्वतः साठी व इतरांसाठी ही मोबाईल ला शाप ठरवू नये..


शेवटी एवढेच,
आपल्या सर्वांच्या मोबाईल ची बॅटरी नेहमी फुल असावी, फुल नेटवर्क असावे,तो नेहमी व्यवस्थित असावा आणि नियमित आपल्याला आनंद मिळत रहावा...