मनःशांती शोधा

Manshanti


मनःशांती
अलक

उन्हाळा जसा जसा वाढत जात होता तशी सुधा ऑफिसला जातांना आपल्या बॅगेत थंड पाण्याच्या दोन बॉटल घेऊन जाऊ लागली.
त्यात ती बॅग लहान, त्यात तिचा सगळा संसार ,डबा, डायरी, पास,पाकीट, आणि इतर लागणारे समान असत.
ह्या सगळ्या समानामुळे एक तर ती बॅग जड होई परंतु त्यात जागा ही मावत नसे.
अगदी स्टेशन ते ऑफिसपर्यंत चा भर उन्हातला पायी प्रवास ही खूप थकवायचा. ती बॅग आणि ओझे नको नको होई तिला. पण पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने त्या बॉटल ही गरजेच्या होत्या पण त्याचे ओझे उचलता उचलता नाकी नऊ येत. कशी तरी ती ऑफिस च्या दारात पोहचली की सुटकेचा निश्वास सोडत..
मग एकदा कोणी तरी सांगितले बाजूच्या पोस्ट ऑफिसमध्ये थंड पाण्याचे कूलर बसवले आहे तिथून पाणी आणा कश्याला इतकी खटपट करतात तुम्ही .
मग काय त्याचा शोध घेत घेत ती त्या ऑफिस पर्यंत गेली,मग आता नेमके हे थंड पाणी कोणत्या मजल्यावर आहे ,खाली आहे की वर आहे हे शोधण्यासाठी धडपड सुरू झाली आणि विचारपूस अंती ते थंड पाण्याचे कूलर तिला दिसले, तिला खूप थंड थंड वाटले, मस्तच आता आपला शोध पूर्ण झाला शेवटी..आता परत नको ते ओझे घेऊन भर उन्हात चालत यायची गरज नाही..जणू तिला स्वर्गीय सुखाचा शोध लागला होता.. तिने छान दोन बॉटल भरून पाणी घेतले आणि उन्हातून चालत आलो म्हणून एक बॉटल पाणी तिथे पिऊन ही घेतले.. हा आनंद तिच्यासाठी त्या क्षणाला खूप काही होता.. बरेच ओझे हलके होणार होते..एकदम खुश होऊन ऑफिस मध्ये परत आली ,तिने तिचा हा आनंद इतरांना मिळावा म्हणून त्यांना ही ह्या थंड पाण्याचे ठिकाण सांगितले..

तसेच काही मनःशांती चे असते,त्याचा शोध ही असाच घ्यावा लागतो
आणि त्यामुळे बरेच ओझे ताण हलके होत जातात, मग त्याचा अनुभव तुम्हाला मिळाला की तो इतरांना ही द्यावा असे वाटते..

Anuradha andhale palve