Jan 26, 2022
नारीवादी

मलाही तू हवी आहेस आई........

Read Later
मलाही तू हवी आहेस आई........


मलाही तू हवी आहेस आई........

एका मतिमंद मुलाच करता करता ती आई दुसर्‍या साठी काही उरतच नाही, घरातल्या बाकीच्या लोकांना आई हवी असते, तेवढाच त्रास त्यांना ही होतो, आणि आई ला तर स्वतः च आयुष उरत नाही, तीच्या इच्छा आकांक्षा चा बळी जातो, खूप सहन करत ती आपल आयुष खर्ची घालते, अश्या आई मुलीची कथा......

©️®️शिल्पा सुतार

...............

सकाळी आवर सावर करत असतांना सुमीला आईचा फोन आला... "आपला राजू गेला ग" ,...... आई शांत होती,

तिथल्या तिथे सुमी मटकन खाली बसली, ढसाढसा रडायला लागली, नवरा सतीश पळत आला,.... "काय झालं" ??

आधी रडून घेतलं सुमी ने खूप, मग सतीश ला सांगितलं,.... "मला जावं लागेल गावी ,आपला राजू गेला" ,

सतीश ने तिची बॅग भरली, दोन पोळ्या भाजी डब्यात भरून दिली,

"डबा नको आहे मला, जाणार नाही जेवण ", .... सुमी ,

"बस सुरू झाली की खाऊन घे थोडं आणि तसं बघीतल तर चांगलंच झाला आहे, तुझ्या आईला किती त्रास होता राजू चा , आता त्या मुक्त आहेत, येताना त्यांना घेऊन ये घरी, राहतील त्या आपल्या जवळ, तश्या ही तुझ्या वाटेला आई कमीच आली आहे, आता ती पोकळी भरून काढ",...... सतीश

एवढ्या दुःखातही सुमीला सतीश चा अभिमान वाटला,

" मी सांगून बघते आईला, आली तर घेऊन येईल, नाहीतरी आईला कोणाचा आधार आहे तिकडे",...... सुमी

वडील दहा वर्षांपूर्वीच वारले सुमी आणि तिचा भाऊ राजू दोनच अपत्य होते त्यांना.....

सतीश मुलांजवळ घरी थांबला, पुढच्या गाडीने सुमी गावाला निघाली, गाडी सुरू झाली तसं तिच विचारांचं चक्र भूतकाळात गेलं,

सुमी 4 वर्षाची असेल तेव्हा आजीने आई-बाबांना कडे घोषा लावला, घराला वंशाचा दिवा हवा, अजून एक मूल होउ दे,

"अहो आई पण कशावरून मुलगाच होईल" ,.... आई

"मला वाटतय तस, आणि दुसरी मुलगी झाली तरी हरकत नाही" ,.... आजी

हो नाही करता करता गोरा पान गुटगुटीत छोटासा राजू जन्माला आला, सगळ्या घरादाराला कोण आनंद झाला होता, वंशाला दिवा मिळाला होता, आई-बाबा खूप खुश होते, सुमी ही मोठी ताई म्हणून मिरवत होती, एक मुलगा एक मुलगी छान चौकोनी कुटुंब होतं

पहिलं वर्ष मजेत गेलं गेलं, राजूच्या बाल लीला मध्ये सगळे गुंग झाले होते, खूप खुश होते,

सणाचा दिवस होता तो, त्या दिवसापासून या चौघांचं पूर्ण आयुष्यच बदलून जाणार होत,

आजी राजुला आणि सुमीला सांभाळत बसून होती, आई स्वयंपाक करत होती, बाबा बाहेर गेले होते, राजुच अंग कालपासूनच गरम वाटत होतं,

आजी दोन-तीनदा आईला बोलली...." ताप आहे का याला बघ" ,

आईने बघितलं तर विशेष वाटलं नाही, जरा वेळाने राजू झोपून गेला, अचानकच अर्ध्या तासात त्याला फिट येऊ लागल्या, तोंडातून पांढरा फेस बाहेर येत होता, ताप अचानक खूप वाढला होता, आजी घाबरुन गेली, आईला हाक मारत होती, आई बाबा आले, धावपळ करतच राजुला दवाखान्यात नेल, घरी फक्त आजी आणि सुमी होती, पाच पाच मिनिट जात नव्हते, काय झालं असेल दवाखान्यात, जरा वेळाने बाबा घरी आले,

"काय झालं राजूला? आता कसा आहे" ?,..... आजीने डोळ्याला पदर लावला,

"ताप डोक्यात गेलेला आहे, डॉक्टरांनी ऍडमिट केलेय, मी कपडे घ्यायला आलो, दोन-तीन दिवस लागतील, घाबरू नको आई, होईल सगळ नीट" ,..... बाबा

आजीने कपडे भरून दिले, दोघांचा डबा दिला, आई बाबा चार दिवसांनी राजूला घेऊन घरी आले, परत सगळं सुरळीत सुरू झाल

राजू जसा वर्षाचा झाला तो अचानक डोळे फिरवायला लागला, पूर्वी हाक मारली की लगेच बघणाऱा राजू त्याच्या त्याच्या तंद्रीत खेळायला लागला, कोणी कितीही बोललं तरी बघत नसे, त्याचे हातही वेगळेच जाड झाले होते, आई बोलली बाबांना 2-3 वेळा,

" अहो राजुला डॉक्टर कडे न्यायला हव, त्याला बहुतेक समजत नाही मी काय म्हणते ते",...... आई

" लहान आहे तो नसेल समजत अजून, होईल नीट " ,..... बाबा

पण जसा राजू मोठा होत गेला त्याचा वेडसरपणा वाढत गेला

आई आता राजूच्या मागे असायची असायची, सुमिच्या वाटेला ती कमीच यायची, मग सुमी आणि आजीची गट्टी जमली, आईकडंन जे प्रेम मिळालं नाही त्याची अपेक्षा आजीकडून करायची, बाबांनाही सध्या टेन्शन यायला लागलं होतं, आईची चिडचिड वाढत चालली होती, काय करेल तरी काय सोन्यासारखा मुलगा असा वेड्यासारखा करतो, आता दर दोन दिवसांनी आई बाबा राजूला घेऊन वेगवेगळ्या डॉक्टर कडे जात होते, आईच घरात अजिबात लक्ष नव्हत, जरी घरी असली तरी ती राजूला घेऊन देवासमोर बसुन राही, माझ्याच मुलाला का केलं असा केलं असं सारखी बोलत रहायची, खूप चिंता करायची, बरेच दिवस तर तिचा उपवास असे, खूप नवस झाले पण गुण काही आला नाही,

आई आता आजीला रोज बोल लावायची,...... "तुम्ही घाई केली मुलगा हवा अस, बघा हे काय होवुन बसल" ,

आजी ही मग रडायला लागायची,..... "मला काय माहिती हे अस होईल? धीर धरा होईल नीट",..

बाबांनी स्वतःला कामात गुंतवून घेतले होत, ते उशिरा घरी यायचे, सकाळच्या वेळी ते राजुला सांभाळायचे, त्याची आंघोळ... खाण करून जायचे,

पण एवढ्या सगळ्यात सुमी कडे सगळ्यांचे दुर्लक्ष झाल होते, ती आहे की नाही घरात, कोणी तिच्याकडे बघत नव्हतं, तशी ती काही फार मोठी नव्हती, तिलाही आईवडिलांची गरज होती, या सगळ्यात सुमीवर खूप अन्याय झाला होता, हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं, ती आई बाबांशी बोलायचा प्रयत्न करायची पण आई बोलायची आजीला सांग सगळ जा, सुमी तिची तिची मोठी होत होती, कधी कधी ती तिच्या भावना आजी जवळ मोकळ्या करायची, फक्त आजी लक्ष देऊन होती, सुमीला काय हे समजत नव्हतं काय चाललय ते, पण तिलाही वाटायचं की आईने माझं कौतुक करावे..... बाबांनी मलाही फिरायला न्यावे, ती हट्ट करायची, पण कोणी ऐकायचं नाही

सुमी आता शाळेत जाऊ लागली होती, वर्गात एक हुशार विद्यार्थिनी म्हणून तिला नावाजले होते, शाळेत सगळे तिचे कौतुक करायचे, पण तिची नजर आसुसलेली होती आई बाबांच्या शाब्बासकी वर, असं नव्हतं की तिला राजू प्रिय नव्हता राजुवर तीच खूप प्रेम होतं, राजू ही तिला बघून खुश व्हायचा, कोणी कितीही सांगितलं तरी न ऐकणारा राजू सुमीने सांगितलं की गप्प बसायचा, तिचे शाळेचे वह्या पुस्तक बघायचा, तिच्या गालावर हात फिरवायचा, भावाबहिणींची ती जोडी खूप गोड होती, आईला त्या दोघांना बघून मन भरून यायचं, आज जर राजू ठीक असता तर तो सुमी सोबत शाळेत गेला असता, त्यांच्या दुःखाला सीमा नव्हती

हे सगळ बघून आजी आजारी पडली तिचंही वय झालं होतं, राजुला असं बघून ती पूर्णपणे खचून गेली होती, ती ह्या आजारपणातन उठलीच नाही, एक दिवस झोपेतच आजी जग सोडून गेली, सुमीच्या दुःखाला पारावार उरला नाही, एकच आजी तर होती जीच्या सोबत ती आपलं सुख दुःख शेअर करत होती सुमी खूप एकटी पडली, आता ती आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी राजुला सांगू लागली, त्याला कळे किंवा न कळे राजू ऐकून घ्यायचं तिच, आईला ही त्यामुळे बरीच मदत व्हायची संध्याकाळच ती राजुला सुमी जवळ बसवून सगळी कामं उरकून घ्यायची, आता आई बऱ्यापैकी स्थिर झाली होती राजूच आजारपण तिने स्वीकारलं होतं

बरीच वर्ष गेले होते, आता हे त्यांचं रुटीने झालं होतं, सुमी आणि राजू चे एक वेगळेच बॉण्डिंग होतं, राजू आईला बाबांना खूप त्रास द्यायचा पण सुमी दिसली की गप्प बसायचा, त्यामुळे का होईना सुमीला आता महत्व आले होतो, राजू वजनही खूप वाढल होतं आता तो आई कडुन आवरला जात नव्हता,

राजू मुळे बरेचसे नातेवाईक त्यांच्याकडे यायचे नाहीत, कोणीही नवीन घरी आले की राजू त्यांच्या अंगावर धावून जायचा, मारायचा, त्यामुळे सगळे घाबरून असायचे, आईने तर खूपच धसका घेतला होता राजूच्या वागण्याचा,

आताशा बाबा आजारी पडायला लागले होते, त्यांना हा ताण सहन होत नव्हता, आईचा सगळं लक्ष बाबांकडे होतं, सुमी घरातलं सगळं आवरून घ्यायची, त्याबरोबर ती राजू वर हि वचक ठेवून होती, लवकरच बाबा वारले, आईला हा धक्का सहन झाला नाही, पण राजूसाठी ति उभी राहिली, आता घरात फक्त आई सुमी आणि राजू, खूप एकटं आणि वाटायला लागलं होतं, कोणी नसलं की आई रडायची, तिला बघून राजू अजून चवताळायचा, सगळ मुश्किल झाल होत

सुमीच लग्न जमल, नवरा मुलगा अतिशय चांगला होता परंतु राजू आणि आईला एकटे सोडून जातांना सुमीला जिवावर आले होते, त्या दोघांना खरंतर तिच्या आधाराची गरज होती,

" आई मला हे लग्न नाही करता येणार, मी आजच तिकडे तस सांगणार आहे ",.... सुमी

"अस करु नको सुमी, तू तुझ आयुष अस आमच्या साठी वाया घालवू नकोस, एवढ चांगल स्थळ आलय, होकार दे ",....... आई

रितीप्रमाणे सुमीला लग्न करावच लागल, साध्या पद्धतीने लग्न करून सुमी सासरी गेली, सुमीच लग्नानंतर व्यवस्थित सुरू होत, सासरकडची मंडळी चांगली होती,

तिकडे आई आणि राजू चे खूप हाल होऊ लागले, राजू दिवसेंदिवस ऐकेनासा झाला, तो सतत आजारी असायचा, त्याला भूकही खूप लागायची आणि खायला नाही दिले की तो घरातल्या वस्तू फेकायचा, आईने तर धसकाच घेतला होता त्याचा, असेच दोन तीन वर्ष गेले एक दिवस परत राजुला फिट आली, आईने सुमीला फोन केला, ती धावत आली, राजू जवळ थांबली दवाखान्यात, तेवढच आईला घरी जाऊन आवरता आल, सुमीला जास्त दिवस थांबणं शक्य नव्हतं, तिची मुल लहान होती, सात-आठ दिवस थांबून राजूला घरी सोडल्यावर ती घरी परतली, राजूची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती आणि एक दिवस राजू त्यांना सोडून गेला........

गाव आलं..... सुमी बसमधून उतरली, घरी चालत गेली, आई राजू जवळ नुसतीच बसून होती, बाहेर तयारी सुरू होती, राजूचा अंत्यविधी झाला, रात्रभर आई नुसतीच बसून होती, ती ना रडली, ना काही खाल्लं, ना काही बोलली, दोन-तीन दिवस तसेच गेले, सगळे आसपासचे भेटून जायचे तरी आई बसूनच होती, आता मात्र सुमीला आईची चिंता वाटू लागली, आई बोल काहीतरी, रड तरी, काय आहे मनात सांग तरी

" खरं सांगू का मला आज खूप मोकळ वाटतय, रडावस वाटत नाही, अगदी सुटल्यासारखं वाटत, तुला वाटत असेल मी असा का विचार करते तर खरंच मोकळं वाटतंय, बरेच वर्ष झाले एका बंधनात बांधली होती मी, कुठे जाण नाही येण नाही" ,..... आई

सुमी आईचा हात हातात घेऊन बसली होती.........

" तुझ्या बाबानी ही मला हव तस सुख दिल नाही , पती-पत्नी म्हणून आमचं नातं हे तेव्हाच संपुष्टात आलं जेव्हा राजूचा जन्म झाला, माझ्याही काही इच्छा आहेत अपेक्षा आहेत त्या कधी पूर्ण झाल्या नाहीत, मी फक्त एक राजूची आई म्हणुनच जगलि, आता मला मी म्हणून जगायच आहे, मला माफ कर सुमी, मी तुलाही वेळ दिला नाही, मला का ते समजत नव्हत अस नाही, पण माझ्या प्रॉब्लेम मधुन मी बाहेर येउ शकत नव्हते, तुझी आजी किती चांगली होती, तिलाही मी बोल लावले नाही नाही ते बोलले",...... आई

" आई पुरे झाल ना अग काही प्रॉब्लेम नाही ",...... सुमी

" नाही सुमी मला बोलू दे आज, राजू माझा जीव की प्राण होता, पण गळ्याशी आलं की सगळच नको वाटायला लागतं, तसं आता हल्ली मी देवाकडे प्रार्थना करत होती की याला घेऊन जा आणि देवाने माझा ऐकल, राजूला या त्रासदायक जन्मातुन मुक्ती मिळाली",........ आई अगतिक झाली होती, मनसोप्त रडून घेतल तिने

"आई तू तुझ्या दृष्टीने बरोबर आहे, तू किती सहन केलं आहे हे मला माहिती आहे, तुझ आमच्या सगळ्यांवर किती प्रेम आहे हे मला माहिती आहे, हे सगळं विसर आता, मला तुला खूप प्रेम द्यायचं आहे, खूप छान राहायचं आहे आता आपल्याला, हे दहा-बारा दिवस झाले की तुझं सामान भर, तुला माझ्यासोबत यायचं आहे",..... सुमी

" नाही सुमी मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही, मी माझी सोय केली आहे, आपल्याच गावातल्या शिक्षिका त्या जवळच्या वृद्धाश्रम आहे तिथे काम बघतात, तिथे मदतनिसची गरज आहे, तिथे मी जायचा विचार केलेला आहे, तिथे मी मोकळी राहू शकते, काम विशेष नाही, फक्तं लक्ष ठेवायचा आहे" ,...... आई

" आई अग आता का दमते तू आरामात रहा माझ्या सोबत",..... सुमी

" आयुष्यात खूप काही करायचं राहुन गेलय, आता उरलेलं आयुष्य मी माझ्या मनाने जगणार आहे, मोकळी राहणार आहे, खूप पुस्तक वाचणार आहे, आरामात झोपणार आहे, पिकनिक..... मैत्रिणी सगळ जे सुटलय हातून ते अनुभवणार आहे, स्वैपाकाची फिकीर नाही की कुठलं बंधन नको आहे मला" ,....... आई खूप भरभरून बोलत होती

"छान विचार आहे आई",......सुमी

" पण तुझ्यासाठी मी आहे, तुला खूप प्रेम देणार आहे, तुला काहीही लागलं की सांग, एका हाकेवर दुसऱ्या दिवशी सकाळी हजर होईन मी",..... आई

"आई थोडे दिवस चल माझ्याकडे मग जा तिकडे वृद्धाश्रमात", .....सुमी विनवत होती

" ठीक आहे तू म्हणशील तस", .....आईने होकार दिला

आज बर्‍याच दिवसानी किवा पहिल्यांदा आईला गाठ झोप लागली, कोणी तिला त्रास देणार नव्हत, सुमी तिच्या निरागस चेहर्‍याकडे बघत बसली......... आईने किती त्रास सहन केलाय...... आता तिचे उरलेले दिवस छान जाणार आहेत याची तिला खात्री होती ......

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now