मला माफ करताल का?

A story of a girl Nisha and her parent. This is a marathi story of a girl who married against her parent's will. She had love on a boy Rahul. They ran away and happily married with each other beacause her parent's were not ready to accept their relat

उन्हाळ्याचे दिवस होते. साधारणतः चार-साडेचार ची वेळ होती. निशा एका ठिकाणी उभी राहून तिचा पती राहुल व मुलगी कार्तिकी ची वाट बघत होती. ते मार्केट मध्ये खरेदी करण्यासाठी आले होते. कार्तिकीने रस्त्यात कुठेतरी आईसगोळा बघितला होता आणि पुढे आल्यावर ती त्याचा हट्ट करू लागली होती. निशाने तिला आईस्क्रीम बद्दल विचारलं; पण तिला आईसगोळाच हवा होता. त्यामुळे राहुल तिला आईसगोळा खाऊ घालण्यासाठी घेऊन गेला होता.

ऊन असल्याने निशाने स्कार्फ बांधलेला होता व डोळ्यावर गॉगल देखील लावलेले होते. तिची दृष्टी रस्त्यावर स्थिर होती.

"ही कार्तिकी पण ना खूप हट्टी झाली आहे. आईस्क्रीम खाल्ली असती तर काय बिघडलं असतं? राहुल पण तिचे जरा जास्तच लाड करतो. पप्पाची लाडकी!"

ती स्वतःलाच म्हणाली. ती त्या दोघांची वाट बघत होती. तेवढ्यात तिच्या कानांवर काही शब्द पडले.

"ए ताई, मला मदत कर ना. मला ए. टी. एम मधून पैसे काढायचे आहेत."

तिला तो आवाज ओळखीचा वाटला. त्या आवाजात तिला आपलेपणा जाणवला. ती वळली. एक बाई हातात ए. टी. एम कार्ड घेऊन उभी होती. त्या गडबडलेल्या होत्या. त्या खूपच अस्वस्थ भासत होत्या. त्या बाईला बघताच ती गंभीर झाली. ती त्या बाईला बघतच राहिली. तिच्या हृद्याची धडधड वाढली होती. कोण होती ती बाई? निशा ओळखत होती त्यांना? त्या पण ओळखत होत्या का तिला?

"हो ठीक आहे."

त्यांनी तिला स्कार्फ व गॉगल मुळे ओळखलं नव्हतं याची खात्री पटल्यावर ती स्वतः ला सावरत बोलली. मागेच एक ए. टी. एम ची मशीन होती. तिने त्यांना पैसे काढण्यात मदत केली. नंतर त्या दोघी बाहेर आल्या.

"धन्यवाद ताई तुझं."

तिने मान हलवली. ती बाई चालू लागली. निशा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतिकडेच बघत होती. तिने गॉगल बाजूला सरकावत तिचे डोळे पुसले. ती हळूहळू त्यांच्या मागे जाऊ लागली. थोडं समोर गेल्यावर त्यांची चालण्याची गती मंदावली. त्या खाली कोसळू लागल्या. निशाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. तिने धावत जाऊन त्यांना सावरलं.

"काकू सावकाश!"

तिने त्यांना बाजूला सावलीमध्ये बसवलं. तिच्या पर्समधून पाणी काढून त्यांना पाजलं. त्या रडू लागल्या. त्यांचा हात हातात घेत ती बोलली.

"काय झालं काकू? तुम्ही रडू नका असं. मी काही मदत करू शकते का तुमची?"

"आमचे हे हॉस्पिटल मध्ये आहेत गं. मला खूप भिती वाटतेय. घरात आम्ही दोघेच आहोत. मला फक्त त्यांचाच आधार आहे. मुलंबाळं कुणी नाहीत. एक मुलगी होती, एकुलती एक. तिही........"

"काळजी करू नका काकू. थोडा वेळ लागेल, नंतर सगळं ठीक होईल."

तिने त्यांच्या हातात बिस्कीट चा पुडा दिला.

"हे काय? नको मला."

"घ्या काकू, नाहीतर चक्कर येईल परत. स्वतः तुम्ही खंबीर असताल तेव्हाच तुम्ही काकांची काळजी घेऊ शकाल ना. तुम्हीच जर चक्कर येऊन पडलात तर?"

त्या क्षणभर तिच्याकडे बघतच राहिल्या. त्यांच्या गालावर हलकसं हसू आलं.

"बरोबर आहे बाळा तुझं."

त्यांनी बिस्कीट खाल्ले.

"चला मी येते तुमच्या बरोबर."

"अगं तुला कशाला त्रास?"

"त्रास वगैरे काही नाही. तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात."

त्यांनाही तिचा आवाज ओळखीचा वाटू लागला. त्या चालतांना एकटक तिच्याकडे बघत होत्या. तिचा फोन वाजू लागला. तिने बघितलं की राहुलचा फोन होता. तिने फोन उचलला.

"अगं कुठे गायब झालीस तू? तुला येथेच थांब म्हणालो होतो ना मी?"

"अरे मी इथे जवळच आहे. एका काकू ला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. तू थांब तेथेच. मी आलेच."

"अगं पण...."

त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या अगोदरच तिने फोन ठेवला. ती त्यांच्याबरोबर चालू लागली.

"अगं जा तू. उगाच कशाला तुझा वेळ वाया घालवतेय? उगाच तुझ्या पतीला तुझी काळजी वाटत असेल."

"काही नाही. मी काकांना भेटूनच जाईल."

त्या हसू लागल्या.

"किती गोड मुलगी आहे!"

त्या मनात म्हणाल्या. त्या दोघी हॉस्पिटल मध्ये येऊन पोहोचल्या. त्या काकूंनी बिल भरलं. नंतर दोघी काकांना ज्या रूममध्ये ऍडमिट केलं होतं तेथे येऊन पोहोचल्या. ते काका झोपलेले होते. निशाचे गॉगलआड असलेले डोळे त्यांना बघून पाणावले. तिने तिचे ओठ चावले. ती थोडी अस्वस्थ झाली होती. त्या काकू त्यांच्याजवळ बसल्या.

ती तेथे स्तब्ध उभा होती. थोड्या वेळाने तिच्या कानांवर पाठीमागून आलेला आवाज पडला.

"निशा...."

ती वळली. तिच्या मागे राहुल उभा होता. त्याच्या कडेवर कार्तिकी होती. त्या काकू पण वळल्या होत्या. राहुलला बघताच त्या काकू उभा राहिल्या. ते दोघे एकमेकांना आश्चर्याने बघू लागले. नंतर त्या काकू निशा कडे बघू लागल्या.

"निशू! "

तिने गॉगल व स्कार्फ काढला. तिचे डोळे पाणावले होते. नजर खाली करून ती बोलली.

"आई!"

कार्तिकीला व निशाला बघून त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. राहुल मागे सरकला. त्याची नजर जमिनीवर स्थिर होती. राहुलची तशी हालचाल बघून त्यांचा चेहरा गंभीर झाला.

"काय गं, आईला काकू म्हणतेस?"

तिचे बाबा पण उठले होते. ते तिला बघून थबकलेच. त्यांनी राहुल व कार्तिकीकडे बघितलं. तिचा सुखी संसार बघून त्यांच्या पण डोळ्यांत पाणी साचलं. राहुल मात्र खाली मान करून उभा होता.

"आई, बाबा मला माफ करताल का? माझ्यामुळे तुम्हाला बरंच काही सोसावं लागलं असेल ना. लोकांनी चार गोष्टी पण ऐकवल्या असतील. प्लिज मला माफ करा. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. करताल ना मला माफ?"

ती रडू लागली होती. तिचे आईबाबा खाली बघू लागले. सगळं विसरणं त्यांच्यासाठी थोडं अवघड होतं. नंतर काही क्षणांनी तिची आई बोलली.

"माफी तर मलाही मांगायची आहे, राहुलरावांची."

आता राहुलच्या नेत्रांच्या पडद्यावरही अश्रुंची शिंपड झाली होती.

"किती अपमान केला होता मी त्यांचा. तसंतर चूक हिची पण आहे. लवकर सांगायला काय झालं होतं? लग्न जमल्यावर सांगते की माझं राहुलवर प्रेम आहे. ती परिस्थितीच तशी होती. त्यातल्या त्यात निशू एकुलती एक. घरची लाडकी. तिच्याबद्दल काळजी वाटणारच ना आम्हाला! मुलगा कोण आहे? कसा आहे? आम्हाला याची काहीही कल्पना नव्हती. आम्ही तुमचं म्हणणं ऐकून पण घेतलं नाही. निदान तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं. पण तुमचा सुखी संसार बघून खात्री पटली की या वेडाबाईची चॉईस खरंच चांगली आहे. राहुलराव, मला माफ करताल का?"

त्यांनी हात जोडले. तो त्यांच्या जवळ आला. कार्तिकीला त्याने खाली उतरवलं.

"अहो, हात नका जोडू प्लिज. तुम्हाला राग येणं साहजिक होतं. तुम्ही आम्हाला माफ केलं तेच आमच्यासाठी खूप आहे."

आईने त्यांना माफ केलं होतं हे बघून ती दोघे खुश झाली. मात्र तिचे बाबा अजून गंभीरच होते. आई तर दयाळू असते. लगेच वितळून जाते, पण बाबा. बाबा तर कठोर असतात ना. नक्कीच त्यांच्या अश्या निर्णयामुळे ते खूप रागात असतील. तिचे बाबा तिला कधीच माफ करणार नाहीत का? तिने पळून लग्न करायला नको होतं का? तिचे बाबा तिचा द्वेष करत असतील का? हे प्रश्न तिला टोचू लागले.

"आई ह्या कोण आहे?"

"अगं आजी आहे."

"आजूssss."

ती खूप खुश झाली व तिच्या आजीला जाऊन बिलगली. त्या त्यांच्या गुडघ्यावर बसल्या. कार्तिकीने छान पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातलेला होता. गोबरे गाल, गोल टपोरे डोळे व निखळ निरागसता या सर्वांनी ती कुणालाही हवीहवीशी वाटायची. त्यांनी तिला डोळे भरून बघितलं व तिच्या डोक्यावर व गालांवर हात फिरवला.

"किती गोड नात आहे माझी!"

त्यांच्या डोळ्यांतून काही थेंब जमिनीवर पडले. कार्तिकीचं लक्ष तिच्या आजोबांवर गेलं. ती बेडला लटकावलेल्या सलाईनकडे कुतूहलाने बघू लागली. नंतर ती तिच्या आजोबांकडे वळली.

"आजोबा काय झालं तुम्हाला? बाऊ झाला का? दुखतं का खूप? मी डॉक्टर ला बोलावू का? तुम्ही रडू नका मी आहे ना!"

ते काही क्षण शांत होते. त्यांची शांतता बघून सर्वजण थोडेसे उदास झाले. ते काहीतरी विचार करत होते. त्यांच्या मनात निशाबद्दल प्रचंड राग होता. नंतर काही क्षणांनी ते बोलले.

"निशू पण लहानपणी अशीच होती ना!"

त्यांनी कार्तिकीला जवळ घेतलं. तिचे गोबरे गाल ओढले. निशा भरलेल्या डोळ्यांनी हसू लागली. सगळं विसरून तिच्या बाबांनी देखील त्यांना माफ केलं होतं.

©Akash Gadhave