मिठी

celebrations of hug day.

मिठी

लेखिका - स्वाती  बालूरकर, सखी.

एक दिवस सकाळी सकाळीच नैना धावत धावत आली आणि खोलीत असलेल्या अभिजीतला जाऊन बिलगली , तिच्या घट्ट मिठीने तो एकदमच गांगरला.

"अगं काय वेडेपणा आहे हा ? दारही नीट लावलेलं नाहिय!"

"काय हो तुम्ही नेहमी असाच पचका करता बाई. . कशाचंच कौतुक नाही तुम्हाला."
ती पटकन विलग झाली व लगेच जायला निघाली. .

"अगं आलीस काय , बिलगलीस काय अन लगेच चाललीस काय? सांग ना काय झालं. "

"असू दे कशाला उगीच?" ती लहान मुलाप्रमाणे रूसली.

" बरं मग दार तू लावतेस का मी लावू?"
तो मिश्किलपणे म्हणाला.

"काही नको जा. . तुम्हाला रोमँटिक होताच येत नाही"

त्याने पटकन दार लावलं व तिला जवळ घेतलं. त्याला कळालं आता ही नाराज झाली तर आठ दिवस रुसवा काढेल.

" हो ना गं तुझं दुर्दैव . . नवरा रोमँटिक नाही. पण नैना शिकव ना मला रोमँटिक कसं व्हायचं ते?"

"ते काही शिकवता येत नाही असं. . मधूनच असायला हवं. . लग्न झाल्यापासून पाहतेय. . सगळं कसं मर्यादेत अन शिस्तित असतं तुमचं सगळं. . .?"

" बाप रे . . बायकोला बरंच खोलपर्यंत लागलंय काहीतरी. . "त्याने चेहरा ओंजळीत घेतला. .

टपोर्‍या डोळ्यातून दोन अश्रू पण टपकले.

कपाळावर चुंबन करून त्याने तिला खूप प्रेमाने आलिंगन दिलं.

" अगं माझी भोळी बायको. . सांग ना काय होतं . . कशामुळे आली होतीस जवळ पटकन. . व राग का येतोय?"

" झालं आता ते सोडा. . थँक्यू . . नेहमीच शिस्तित नका रहात जाऊ बाई. . मला ते. .फेब्रुवारी . . जाऊच द्या कशाला ?"

"काय . . काऽय?" त्याच्या या थट्टेच्या स्वरानी तिने पुन्हा त्याला मिठी मारली व त्याच्या छातीवर नाक रगडलं. .

त्याला हे सगळं खूप छान वाटत होतं.

तो ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. ती आत पोळ्या करत होती. अचानक ती आल्याने तो गाेंधळला होता. आई वडिलांसमोर खूपच मर्यादेत रहायचा तो. अस्सा अल्लडपणा आवडायचा नाही.

"नैना. . अगं नाश्ता देत होतीस ना, आणि गॅसवर दूध उकळतंय गं!"

बाहेरून सासूबाईंची ललकारी कम हाक कम सूचना ऐकु आली तसा तिने. . कपाळावर हात मारला. ." अरे देवा. . बघा हे असं होतं"

फणफणतच त्याला दूर लोटुन, दार उघडून ती बाहेर आली.
डायनिंग टेबल जवळ बसलेल्या सासूबाईंकडे पाहून अवघडल्यासारखं झालं.

ती लाजत होती. तोही तयार होऊन डबा घ्यायला आत आला ते मनात गोड उकळ्या फुटत होत्या.

शूज घालताना सहज बातम्या बघितल्या तर. .

प्रेमी जनांचा आठवडा सुरू झाला आहे. .
आणि सर्वत्र सगळे प्रेमवीर आज "हग डे "अर्थात "मिठी किंवा आलिंगन दिवस" साजरा करत आहेत.

फोन उघडला तर सगळ्यांचे स्टेटस अन पिक बघून नितीशची ट्यूब पेटली. . !

म्हणूनच परवा तिने गुलाब दिला होता.
काल सगळ्या लग्न ठरल्याच्या आठवणी सांगत होती. . साखरपुडा अन प्रपोज!
अरे यार आपणच अडंणी राहिलो यात.

तो निघाला पण घराबाहेर जाऊन आवाज दिला. . " नैना टेबलावर रूमाल राहिलाय देतेस का ?"

सासूबाई गालात हसल्या . .

"जा बोलावतोय तो!"

तिला पुन्हा अवघड वाटलं.

त्याने ग्राउंड च्या ऐवजी लिफ्टमधे ६ नंबर दाबला. ती आत गेली . लिफ्ट सुरू होताच तो म्हणाला. ." हॅपी हग डे डार्लिंग !" अन मिठी मारली. .

"सॉरी गं आयुष्यातला असा पहिला फेब्रुवारी आहे ना!"

"बाय" . . अन लाजून तिने त्याला घट्ट मिठी मारली.

तिने लिफ्ट थांबवली व आलेल्या मजल्यावर उतरून गेली.

समाप्त
©® स्वाती बालूरकर, सखी.
०९. ०२ .२०२२