मिस्टर आणि मिसेस:- भाग 4

Vihan Again Forgot To Take Her Number And Then Was Trying To Search Her
मिस्टर आणि मिसेस :- भाग 4

नंबर घेण्याची साधी अक्कल नाही का विहान तुला? काय तू वागतोस ना खरंच! आपलीच अक्कल काढत आणि हसत हसत तो हॉटेल ला पोहचला. स्वतःवर वारंवार वैतागत होता की "का मला आत्ता पण सुचले नाही तिचा नंबर घ्यायला? इतका कसा मी वेंधळा?"

तेवढ्यात फोन वाजला, बघतो तर आईचा कॉल होता तशी त्याने जीभ चावली आणि कॉल घेतला"सॉरी आई! गडबडीत राहून गेले ग कॉल करायचे."
"तू तर वेंधळाच आहेस... कसा ऑफिसमध्ये काम करतो देव जाणे आणि म्हणून मी कॉल करते . काळजी नाही वाटत का रे मला?"
"अग हो आई ! खरच चुकलं, आल्यावर ऑफिसमध्ये गेलो आणि तुला मी पोचलो हे सांगायचे विसरूनच गेलो."
"ठीक आहे, असो सगळे नीट ना?"
"हो ग! काळजी करू नकोस,परवा संध्याकाळी निघेल इथून. तू ठीक आहेस ना आणि मावशी आहेत ना सोबत तुझ्या?"
"हो इथे सगळं ठीक आहे, तू काळजी घे आणि आठवण झाली तर फोन कर" हसत त्या म्हणाल्या आणि फोन ठेवला.

नुकताच फ्रेश होऊन आलेला तो शॉर्टस आणि हाल्फ टी शर्ट वर असलेला तो बोलत बोलत गॅलरीत आला. सहज वर लक्ष गेले तर आकाशात चमचमणारे तारे, स्वच्छ चंद्रप्रकाश त्याला मोहून टाकत होता. समोर पसरलेला तो समुद्र काहीतरी खुणावत होता, जरी अंधारले होते तरी दूरवर काहीतरी जहाजासारखे जाणवत होते. समुद्रावरून वाहणारा वारा त्याला स्पर्शून जाताना हलकेच कानाशी गुणगुणल्यासारखे काहीतरी सांगत होता. एक मोठा श्वास घेऊन प्रसन्न मनाने तो तिथेच रेलिंग चेअर वर बसला.

आजूबाजूला बघताना त्याला सारखी तीच \" -नमिता-\" आठवत होती. ती आजूबाजूला असताना त्याच्या मनाला गुदगुल्या झाल्यासारखे जाणवत होते आणि तेच आता आठवून तो मिश्किल हसत होता.

निशाशी त्याची गट्टी जमली होतीच, गप्पा मारत हसत खेळत घालवलेला वेळ त्याला आठवत होता.
तिच्या डिनर ऑर्डर वरून मॅडम चांगल्याच चवीच्या आहेत आणि माहितगार पण हे नक्कीच जाणवत होते शिवाय ज्या प्रकारे बिनधास्त ऑर्डर केली आणि वागत होती यावरून बोल्ड आहे हे त्याच्या लक्षात आलेच होते.
तिचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता आणि याची स्माईल वाढत होती.

नवीन भावना मनात जागी होत होती काय ते अजून त्याला कळत नव्हते पण आवडत नक्की होते. एवढ्या 30 वर्षांच्या काळात आज पहिल्यांदा तो हे अनुभवत होता.
परवा निघेपर्यंत ती परत भेटायला हवी असे त्याला मनोमन वाटले. नाही भेटली तर त्याला रुखरुख लागणार होती.
"नमिता, तुझा नंबर का नाही दिलास तू...?" स्वतःशीच मोठ्याने बोलत तो म्हणाला.
लाटांचा आवाज जर वाढला बहुतेक खालती खळाळत असणारा समुद्रसुद्धा त्याच्या बोलण्यावर खुदकन हसत होता......!

इकडे त्या दोघी चालत घराकडे निघाल्या तशी निशा म्हणाली " छान आहे ना विहान?"
"हम्म"
"हम्म काय?बोलते आहे ना मी तुझ्याशी?"
"मग काय आरती ओवाळू त्याची?"

"शिष्ट तर तू आहेस मुलखाची! छान हसरा बोलका वाटला मला तो....पहिल्याच भेटीत आपलंसं केले त्याने."

"तू झाली असशील आपली, मी नाही.
ठीक वाटला पण इतके काही विशेष नाही" तोऱ्यात ती म्हणाली तर खरी पण तिच्या मनात सुद्धा तेच क्षण रेंगाळत होते जे त्यांनी सोबत घालवले होते.

दोघी घरी पोचल्या आणि एकदम म्हणाली " अरे त्याचा नंबर नाही घेतला" . स्वतःवर वैतागत फ्रेश व्ह्यायला निघून गेली तशी निशाला हसायला आले.

दोघी बहिणी रात्री गच्चीवर गप्पा मारायला आणि थोडी शतपावली करायला म्हणून गेल्या, कारण तुडुंब जेवण झाले होते.

" विहान मला तर आवडला बुवा! छान मुलगा आहे आणि मुख्य म्हणजे चांगल्या घरचा वाटतो आहे." निशा म्हणत होती.
"हम्म"
"बोलायला सभ्य वाटला"
"हम्म"
"बिल पण कुरकुर न करता लगेच दिले त्याने.."
"हम्म"
"वागणे पण एकदम डिसेंट होते"
"हम्म"
"आपल्याला त्याने एकदम रॉयल ट्रीटमेंट दिली.."
"हम्म"
"बीच वर सुद्धा आपल्यासाठी भेळ घेऊन आला होता"
"हम्म"

"मूग गिळले आहेस का आज?"
"का?"
"मगापासून नुसतं हम्म काय चालु आहे ते"
"अगं, ते उगाच..."
"बघ, तुला इंटरेस्ट नसेल तर सांग, मी बघते काय करता येईल ते..."
"दी...." नमिता मोठे डोळे करून म्हणाली.
"म्हणजे इंटरेस्ट आहे तर..."
यावर दोघीही हसायला लागल्या, तसं नमिता ने पटकन तिच्या खांद्यावर डोकं ठेवले आणि म्हणाली " दी, मिस यु ग"

"हो का? नक्की मीच ना?" तिला चिडवत निशा म्हणाली.
"ए जा ग! तुझं आपलं विहान पुराण ते."
"अग पण मी विहान च नाव तरी कुठे घेतलं?"
तशी ती चपापली,आणि चोरी पकडी गयी सारखी इकडे तिकडे बघायला लागली.

"हम्म! तर ओठात एक आणि मनात एक.... बरी ग शहाणी तू"
"अगं अस काय करतेस, सकाळी तर ओळख झाली आणि तीही इतकी टेरर. शिष्ट कुणीकडला, इतकी मी बोलत होते पण हा आपला मख्खं ! एक शब्द बोलेल तर शप्पथ!"

"मग तू का ट्रेन थांबवली त्याच्यासाठी?"
"असच! "
"असंच ...असे काही नसते जगात. प्रत्येक गोष्टीला कारण असते हे नक्की" मिश्किल हसत तिला डीवचत निशा म्हणाली.

आता मात्र काही तरी मनाशी ती विचार करत शांत झाली होती आणि मध्येच गालावर खळी पडत होती.

दोन्ही बहिणींच्या थोड्याफार मस्ती वजा गप्पा झाल्या तोवर बराच उशीर झाला म्हणून त्या खाली झोपायला आल्या पण बिछान्यात अंग टाकून सुद्धा तिला झोप येत नव्हती...डोळे मिटले की विहान नक्कीच आठवत होता.
"तसा चांगला वाटतो आहे,दिसायला हँडसम आहेच आणि वागायला आणि बोलायला पण चांगलाच वाटतो आहे" ती मनाशी पण जरा मोठ्याने बोलली तसं निशा ने
"कोण ग " असे म्हणले तसे तिने झोपल्याचे नाटक केले आणि तिच्याकडे बघत हसून निशा ने पण डोळे मिटले.

विहान ची सकाळ लवकर झाली. रात्रभर गॅलरी मधल्या रेलिंग चेयर वर बसून तिथेच झोपला होता तो...
भल्या सकाळी पक्ष्यांचे आवाज त्याला आले आणि तो जागा झाला.
समोर भव्य अरबी समुद्र दिसत होता. त्याला फोटो काढण्याचा मोह नाही आवरला. त्याने त्याच्या आयफोन 12 मधून काही रँडम क्लिक्स घेतले आणि ते झूम करून पाहायला लागला.
समुद्रावर काही पक्ष्यांचे थवे उडत होते ते फोटो त्याला खूप आवडले.

त्याने आवरले आणि तो ब्रेकफास्ट रेस्टो ला आला.
तिथे बफे ब्रेकफास्ट होता..त्याने ऑरेंज ज्यूस, टोस्ट बटर, बेकड बीन्स, इडली सांबर आणि कॉफी असे आयटमस घेतले.
सोबतच्या न्यूजपेपर स्टँड वरचा एक पेपर त्याने उचलला आणि वाचायला लागला. जनरल बातम्या वाचत असताना त्याला पेपरात एकदम नमिता हे नाव दिसले...
त्याने ती बातमी लगेच वाचून काढली. त्या नामिताचा आणि ह्या नामिताचा दुरान्वयाने काही संबंध नव्हता पण नमिता हे नाव त्याला हायलाईट करून गेले.
त्याला स्वतःलाच हसायला आले. इतर वेळी त्याचे ह्या नावाकडे लक्ष गेले पण नसते पण आज त्याला या नावाबद्दल एकदम ओढ वाटत होती.

ब्रेकफास्ट करून तो फॉर्मल कपडे घालून लगेच ऑफिसला गेला. ऑफिसच्या कामा मध्ये गुंतल्यावर तो नमिता हे नाव थोड्या वेळापुरते विसरला. जसा लंच टाईम झाला तसे तो जरा रिलॅक्स झाला. तिथल्या मार्केटिंग हेड ला त्याने सांगितले की चल आपण बाहेर जाऊयात जेवायला....!

ते दोघे बाहेर निघाले, तसे विहान ड्रायव्हर ला म्हणाला,
"मिथिला-ओन्ली व्हेज "ला घे..
त्याच्या या बोलण्यावर त्याचा मार्केटिंग हेड म्हणाला,
"सर, तुम्हाला तर रत्नागिरी मधील रेस्तराँ पण माहिती आहेत की.."
विहान फक्त हसला...
ते दोघे तिथे पोचल्यावर त्यांनी 2 व्हेज थाळी ऑर्डर केली..
जेवण येईस्तोवर विहान ने त्याला विचारले," इथून 3 मिनिटांच्या अंतरावर कुठली सोसायटी येते रे"
विहानचा प्रश्न त्याला कळलाच नाही...
" सांग ना...कुठली सोसायटी येईल इथून जर चालत गेलो आपण तर 3 मिनिटांत"

"सर, हा सगळा रेसिडेंशियल एरिया आहे..आजूबाजूला खूप घरे आहेत....3 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला कुठल्या दिशेने घर शोधायचे आहे...?"

तिथे तर मेख होती...कुठली सोसायटी, कुठले घर...कुठले लोकेशन.. सगळेच अज्ञात होते...

"जर एखादी मुलगी इथे एकटी राहत असेल तर कुठे राहील?" विहान ने विचारले...

तो मार्केटिंग हेड त्याच्याकडे ब्लँक नजरेने पाहत राहिला...
विहान ला कळले की आपल्याला जे विचारायचे आहे ते चुकले आहे.
तेवढ्यात जेवण आले.
दोघांनी मन लावून जेवले... फरक एवढाच होता की मार्केटिंगवाल्याचे जेवणात लक्ष होते आणि त्याचे तिची आठवण काढण्यात...

जेवण होऊन ते गाडीपाशी आले तसा विहान म्हणाला, " अरे मला इथल्या जवळपास ज्या गल्ल्या आहेत ना तिथुन फिरवून आण रे जरा..."

ड्रायव्हर ने गाडी सुरू करून प्रत्येक जवळपास असलेल्या रस्ता, सोसायटी मधून फिरवायाला सुरुवात केली.
"सर, तुम्ही काही शोधत आहात का...?"
"हम्म" विहान ने एवढेच बोलून उत्तर द्यायचे टाळले.
अर्धा तास गल्ली बोळ पालथे झाले तरी त्याला ती कुठे दिसली नव्हती..
तशी ती दिसणार नव्हतीच हे त्यालाही कळत होते पण त्याला चान्स सोडायचा नव्हता...

शेवटी कंटाळून ते ऑफिसला परतले..त्याचे काम सुरू झाले पण मनातली रुखरुख जात नव्हती. उद्या निघायचे होते म्हणून त्याने संध्याकाळी उशिरा पर्यंत ऑफिसमध्ये बसूनच काम केले.

रात्रीचे 8 वाजले तसा तो निघाला...
हॉटेलच्या लॉबीत पोचला आणि ड्रायव्हरला उद्या सकाळी 8 वाजता यायला सांगून तो हॉटेलमध्ये शिरला.
रिसेप्शन वरून रूम ची की त्याने घेतली आणि तो रूम कडे जायला वळणार तेवढ्यात त्याला आवाज ऐकू आला, "विहान.."
त्याने झटकन मागे वळून बघितले तर नमिता आणि निशा दोघी होत्या.
तिला पाहून विहानच्या चेहऱ्यावर मनापासून हसू फुलले...
"व्हॉट अ प्लेसंट सरप्राईज..." तो त्या दोघींपाशी जात म्हणाला...
तश्या त्या दोघी हसल्या...
"जेवण झाले आहे का तुझे...?" निशा ने विचारले..
"नाही अजून...तुमचे"
"तुझीच वाट पहात होतो....आज आम्ही तुला डिनर ऑफर करायला खास आलो आहोत..चालेल ना?"
"डॅट्स ग्रेट...तुम्ही बसा ना रेस्टो ला... मला 10 मिनिटे द्या...मी फ्रेश होऊन येतो..."

त्यांनी मान डोलावली, तसा हा पटापट आपल्या रूम मध्ये गेला....
दरवाजा बंद करून तो जोरात ओरडला..."येस! ...ती परत भेटली येस...!" आणि तो अंगाचा कोट काढून तो गोल गोल फिरवायला लागला...अति आनंदात येस..येस असे म्हणत तो जोरजोराने उड्या मारत होता तेवढ्यात त्याला काही तरी जोरात आवाज आला....त्याने थांबून बघितले तर त्याच्या कोट फिरवण्याने तिथे असलेला काचेचा मोठा फ्लॉवर पॉट फुटला होता...

त्याने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणला, "वा रे जनरल मॅनेजर...कमाल आहे तुमची..."
त्याच्या या बोलण्याचे त्याला जोरदार हसू यायला लागले...
शॉवर घेऊन फ्रेश झाल्यावर तो रेस्तराँ मध्ये शिरला तेव्हा बहुतेक सगळ्यात सुखी माणूस होता...!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all