मिस्टर आणि मिसेस:- भाग 3

Vihan Met The Same Girl Accidentally Again And Their Communication Started

मिस्टर आणि मिसेस :- भाग 3


ड्रायव्हरने गाडी भाट्ये ब्रिज वरून घेतली आणि विहान ला समुद्राचे दर्शन झाले. समुद्राचा व्यु पाहून तो खुश झाला.
बीच ला मागे टाकून वरती चढावावरून गाडी कोहिनूर समुद्रा रिसॉर्ट ला शिरली.
हॉटेल लॉबी च्या इथे त्याच्या कंपनीच्या टीम मधले लोक त्याचे स्वागत करण्यासाठी बुके घेऊन तयार होते...
"वेलकम जी एम सर"
"थँक्स... फ्रेश होतो आणि लगेच ऑफिसला निघुयात"
"येस सर.."
तो त्याच्या डीलक्स रूम मध्ये शिरला...मस्त रूम होती ती...निर्विवाद सुंदर जागा..मस्त लोकेशन... खिडकीतून समुद्र नजरेत मावत नव्हता तर वर निरभ्र निळे आकाश.

त्याने आवरले आणि तो छान तयार झाला. आकाशी रंगाचा फॉर्मल शर्ट त्यावर नेव्ही ब्लु रंगाची स्लिम फिट पॅन्ट अशा साध्या पण त्याला शोभून दिसणाऱ्या गेट अप मध्ये तो बाहेर आला.
ऑफिसच्या लोकांबरोबर तो ऑफिसमध्ये गेला.
त्याचे ते रुबाबदार व्यक्तिमत्व आणि अगदी साध्या पद्धतीने काम समजावून देणे -वागणे यामुळे काही वेळातच तो रुळला.
त्याच्या कडे सगळे पेंडिंग डिटेल्स होते..त्याने फटाफट रिव्ह्यू मिटिंग घेतली..फ्युचर प्लॅन डिस्कस केला. काही सूचना दिल्या.
हेड ऑफिसमध्ये काही मेल्स केले.
त्याच्या कामाची पद्धत फारच सिस्टीमॅटिक होती. नवा "जी एम सॉलिड आहे " अशी बातमी सगळीकडे व्हायरल होऊन पसरली.

आज प्रवास करून आला असल्याने तो जरा लवकरच ऑफिस मधून बाहेर पडला पण कामातून डोके बाहेर पडताच त्याला आठवली "ती".
काय करत असेल ती? तिचा नंबर हवा होता...एक कॉफी साठी तरी भेटता आले असते...
नंतर तो स्वतःच चमकला..."
का बरे आपण राहून राहून त्याच आठवणीत जातोय? त्यालाही नवल वाटले.

गाडीत बसल्यावर ड्रायव्हर ने विचारले "साहेब हॉटेल ला जायचे ना?"
"नको! भाट्ये बीच ला चल... इथला किनारा खूप निवांत आणि सुंदर आहे. तशीही थोड्या वेळात संध्याकाळ होईलच तर तिकडेच गाडी घे"

तो किनाऱ्यावर पोचला तर थोडेफार लोक होते.
कोणी डिस्टर्ब करायला नाही पाहून तो सुखावला.
संध्याकाळची ती निवांत वेळ त्याला स्वतःसोबत घालवायची होती. इन केलेला शर्ट बाहेर काढून त्याने शर्टाच्या बाह्या फोल्ड केल्या शूज हातात घेतले आणि तो किनाऱ्यावर चालत राहिला.
त्या मऊशार वाळूवर चालत तो फक्त त्या अथांग समुद्राकडे बघत होता. कानावर त्या सळसळणाऱ्या नारळाच्या झाडाचा आणि समुद्राच्या लाटांचा आवाज खूप सुखावत होता.

आपल्याच नादात तो बरेच अंतर चालून आला आणि एके ठिकाणी निवांत बसला.
त्या निवांत क्षणाला त्याला तिची आठवण झाली.
खरंच आज मोबाईल नंबर तरी घ्यायला हवा होता....
लाटांकडे बघत शांत बसला असताना त्याच्या बाजूने कोणी तरी जात होते... त्याला आवाज ऐकलेला वाटला तसे त्याने मागे वळून पाहिले तर समोर "तीच" होती.

तिला बघून त्याची कळी खुलली...तिच्याशी बोलायचे आहे असे मनापासून वाटले पण नाव कुठे माहीत होते! तो फक्त बघत राहिला.

दोघीं समुद्राच्या लाटा अनुभवत त्यात खेळत,ओले होत एन्जॉय करत होत्या तर हा "तिला" बघून गालातल्या गालात हसत होता. मुद्दाम हा त्या होत्या तिथे जरा जवळ जाऊन बसला आणि लक्ष नाही असा आव आणत होता.

काही वेळाने तिचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि एकदम ओरडून म्हणाली,
"ओहो ...मिस्टर शिष्ट!भेटलात पुन्हा?"
"अरे तू? हॅलो मिस अनामिका"तो म्हणाला.
"ए माझं नाव अनामिका नाही आहे"
"मग काय आहे?"
"शिष्ट लोकांना मी सांगत नाही"
"अच्छा मग कोणाला सांगते?"
"जे नॉर्मल असतात,बोलतात आणि मुख्य म्हणजे माझ्या प्रश्नाला उत्तर देतात"
"हे छान आहे"

तिच्या बरोबर असलेली ती मुलगी म्हणाली,
"अरे, हे तुमचे दोघांचे काय सुरू आहे? कोण आहे हा? आणि तू असे का बोलत आहेस?"

"निशा दी, हा खूप शिष्ट आणि अखडू आहे. ट्रेन मध्ये भेटला मला आणि एकही शब्द बोलला नाही माझ्याशी"

"उगाच नको हा हे असे सांगू तिला. मी थँक्स म्हणालो ट्रेन मध्ये आल्यावर" तिला खिजवत आणि मिश्किल हसत तो म्हणाला.

"मी मुंबई पासून बोलत होते तर तू चिपळूणला थँक्स म्हणाला..वाह! सॉलिड फास्ट आहेस रे तू"
"जसे लोक असतात तशी उत्तरे द्यायची असतात ना..." तो हसत म्हणाला, तसे निशाला सुद्धा  हसू आले आणि त्या दोघांना एकत्र हसत पाहून "ती" चिडली.

"दी, हे काय तू त्याला साथ देते आहेस"
"बास हा बलिशपणा आता"

ही थोडी हिरमुसली तेवढ्यात हा जाऊन तीन भेळ घेऊन आला आणि त्यांच्या हातात दिली.
निशा ने पटकन हातात घेतली आणि "व्हॉव!थँक्स" म्हणाली आणि खायला पण सुरवात केली.

डोळे बारीक करत तिने पुन्हा एक लूक दिला तसे त्याने नजरेने भेळ कडे खुणावले आणि इशारेनेच घे हे सुचवले तसे तिने हात पुढे केला.

थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत तो आणि निशा बोलत होते. रत्नागिरी शहर, तेथील रत्नदुर्ग किल्ला, थिबा पॅलेस, सावरकरांचे स्मारक असे विषय रंगात होते आणि ही मात्र गप्प आपल्याला कोणी भाव देत नाही म्हणून वैतागत होती.

अंधार पडायला आला होता तसे तो उठला. त्याने निशाला हात देत त्याने उभे केले आणि हिच्यापुढे हात केला तर ही दुर्लक्ष करत उठायला गेली आणि अचानक वाळूत पाय घसरून पडणार तेवढ्यात त्याने पटकन तिच्या हाताला पकडत तिला धरले आणि ओढून उभे केले.

थोडं ओशाळात ती पटकन सरळ झाली तर त्याने काही झालेच नाही असे दर्शवले.

"थँक्स"ती म्हणाली.
यावर तिला चिडवत तो म्हणाला " काय म्हणालीस?"
"थँक्स" ती पुन्हा बोलली.
"ओहह थँक्स बोलता येत तुला ?"
"हो येते...फिट्टम फाट झाली आपली.."
"कसे काय..?"
" मी सकाळी ट्रेनचा दरवाजा उघडायला लावला, तर तू मला हात दिलास "
"कसली हिशोबी आहेस तू.."
"म्हणजे काय...सीन्स बर्थ.."
"म्हणजे पाळण्यात पण हिशोब करत होतीस की काय...?"

आता मात्र ती पण खळखळून हसायला लागली आणि तिच्या त्या मोहक हसण्यावर हा भान हरपून बघत बसला.

"हाय मी नमिता" हात पुढे करत ती बोलली.
"नमिता..छान नाव आहे..."
"थँक्स....आणि ही माझी दी... निशा.."
"हाय...मी विहान..."
"हाय विहान... किती दिवस आहे रत्नागिरीत?" निशा ने विचारले.
"परवा संध्याकाळची ट्रेन आहे.."
"मग तोपर्यंत काय प्लॅन...?"

"काहीच नाही...उद्या आणि परवा इथल्या ऑफिसमध्ये जायचंय...नवीन प्लांट उभा करायचा आहे म्हणून मी इथे आलो आहे...बाकी इथे कोणी ओळखीचे नाही...त्यामुळे विशेष काही ठरवले नाही..."

"आम्ही आहोत की ओळखीचे आता..."निशा हसत म्हणाली..

"येस आणि त्या ओळखीनेच विचारतो आहे की जर तुमचे काही ठरले नसेल तर आपण डिनर ला जाऊ शकतो.."

"चालेल...काय ग नमू?"
"हा डिनर ला बोलावत आहे तर बिल हा भरणार असेल तर माझी काही हरकत नाही..."

नमिताच्या या बोलण्यावर तो हसत म्हणाला, "ओके मॅडम, मी बिल देईन..तुम्ही मस्त जेवणावर ताव मारा.. चालेल का..?"
"पळेल..."
यावर सगळे हसले...
ते चालत चालत त्याच्या गाडी पाशी आले..
"तुम्ही दोघी कश्या आला होत्या...?"
"रिक्षाने.."
"चला बरे झाले, त्यामुळे आता गाडीतून एकत्र जाता येईल..."
त्याने ड्रायव्हर ला गाडी काढायला सांगितले...
सगळे बसल्यावर गाडी निघाली..

"विहान...व्हेज का नॉन व्हेज?" निशाने विचारले.
"मी प्युअर व्हेजिटेरिअन आहे...तुम्ही नॉन व्हेज खा...मी व्हेज कंपनी देईन..." तो हसत म्हणाला.
"अरे, आम्ही दोघी पण अस्सल शाकाहारी आहोत...नॉन व्हेज नाही खात.."
"मग प्रश्नच मिटला...तुला माहिती असलेले छानसे रेस्टॉरंट तू सांग.."
तिने ड्रायव्हरला मारुती मंदिराच्या इथे शानबाग प्लाझा ला घ्यायला सांगितले.
तिथे पोचल्यावर त्याला "मिथिला-ओन्ली व्हेज" अशी पाटी दिसली.
त्याने ड्रायव्हर च्या हातात पैसे ठेवले आणि त्याला तासाभरात जेवण करून यायला सांगितले.
ते तिघेही आत रेस्टॉरंट मध्ये शिरले.
विहान ला अंबिअन्स आवडला.
एक छानशी जागा पकडून ते तिथे बसले..

"मेनू आणि वेनू तुमचा...बिल माझे..सो जे काही ऑर्डर करायचे आहे ते तुम्ही करा.." तो म्हणाला.

निशा मे नमिता कडे मेनू कार्ड दिले. तिने वेटर ला बोलावून फटाफट ऑर्डर दिली, " एक पनीर चिली, चीज चेरी पायनापल, मसाला पापड, ग्रीन सॅलड, पनीर कढाई, मलई कोफ्ता, रोटी बास्केट, हैदराबादी बिर्याणी आणि नंतर गडबड आईस्क्रीम व फ्रुट सलाड विथ कस्टर्ड"

"नमू, तो बिल भरतोय म्हणल्यावर एवढी ऑर्डर देतात का?"
"अगं, तिला बिनधास्त देऊ दे ऑर्डर...तिला सगळे अनलिमिटेड लागते, हो की नि ग?"
"म्हणजे....?"
"सकाळी ट्रेन मध्ये ब्रेकफास्ट दिल्यावर मला विचारत होती, की अनलिमिटेड मिळतो का...?" तो मोठ्याने हसत म्हणाला...
यावर निशा पण जोरजोरात हसायला लागली...


"यु...यु...मिस्टर...." नमिता बोट दाखवत त्याला म्हणायला लागली पण विहान अजूनच हसायला लागला.
निशा ला पण हसू येत होते पण ती जरा जपून हसत होती...
"ए मिस्टर, मी ते तू माझ्याशी बोलावे म्हणून विचारले सहज...त्यात काय एवढे...?"


"मी तेच म्हणत आहे नमिता, त्यात काय एवढे? असते एकेकाची भूक! काहींना लागते बऱ्यापैकी खायला...हो ना ग निशा?"
निशा पाणी पीत होती आणि त्याच्या बोलण्याने तिला एकदम ठसका लागला...
कसेबसे सावरत ती म्हणाली, " प्लिज विहान, नको हसवू पाणी पिताना..आता कारंजे उडले असते..."
यावर तो अजून हसायला लागला.... त्याचे हसणे पाहून त्या दोघींना सुद्धा हसायला यायला लागले.

टेबलावर जेवण आले तसे हसणे कमी होऊन जेवण जास्त जायला लागले.
जेवण फारच छान होते...नमिता ने मेनू ची ऑर्डर पण परफेक्ट दिली होती. त्यामुळे जेवणाची मजा आली.

गडबड आईस्क्रीम आल्यावर विहान ने विचारले, "नमिता, तुला कसे माहिती ग...?"
"काय...?"
"हेच की तू खूप गडबड करणार आहेस म्हणून जेवणाच्या शेवटी असे आईस्क्रीम खावे लागणार आहे..."
त्याच्या बोलण्यावर तिने डोळे मोठे केले..
विहान क्षणभर पाहत राहिला तिच्याकडे...
शो चा चष्मा काढून ती खरंच सुंदर दिसत होती. तिचे मोठे काळेभोर डोळे खूपच शोभून दिसत होते तिला.
त्याला तिला असेच पाहत राहावंसं वाटले..
तेवढ्यात बिल आले.

बिल देऊन ते बाहेर आले.
"चला तुम्हाला घरी सोडतो..."
"अजिबात नको...इथून 3 मिनिटे चालत माझे घर आहे...एवढे खाल्ले आहे तर आता चाललो तरच बरं वाटेल... निशा म्हणाली...

जनरल 2 मिनिटे तिथे बोलून तो गाडीतून निघून गेला.
मस्त वेळ गेला होता त्याचा...अगदी जसा हवा तसा...
गाडी हॉटेल मध्ये शिरली आणि तो उतरला...
सहज त्याच्या मनात विचार आला, रात्री विचारुयात का फोन करून, तिला कसे वाटले ते?
आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात आले, "त्याने आजही नंबर घेतला नव्हता.. आजही त्याचे कार्ड दिले नव्हते...आजही त्याच्याकडे ती कुठे राहते हे माहिती नव्हते....!
"वा रे जनरल मॅनेजर... कमाल आहे तुमची..."
त्याचे बोलणे ऐकून बाजूने जाणारा हॉटेल चा मॅनेजर त्याला म्हणाला, "मला काही म्हणालात का साहेब...?"
"नाही, तुम्हाला नाही हो..." हसत तो म्हणाला...
सकाळच्या प्रसंगाची पुनरावृत्ती तो आत्ता रात्री अनुभवत होता!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all