मिस्टर आणि मिसेस :- भाग 23

Vihan And Namita Tries To Help Jay Towards Nisha
बीच वर असतानाच विहान च्या डोक्यात एक कल्पना आली होती....
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने नमिता ला फोन केला आणि सांगितले त्याच्या मनातील कल्पना...

"अरे पण तिला न सांगता? असे एकदम?"
"हो त्यातच मज्जा आहे"
"ठीक आहे, डन!"

दोघांनी काही ठरवले होते... जय ला फक्त रविवारी सकाळी 4.30 वाजता भेट असे सांगितले....बाकी त्याला काहीच कल्पना दिली नाही...
जय मुळातच भटकंती वाला होता, त्यामुळे फार काही विचारायच्या भानगडीत तो पडला नाही.

रविवार चा दिवस उगवला. सकाळी लवकरच विहान आणि जय यांनी कॅब करून नमिता ला तिच्या घरापाशी पीक केले आणि ते पुढे निघाले...

"वीरू आपण कुठे जाणार आहोत?" जय कॅब मध्ये म्हणाला.
नमिता फक्त गोड आणि मिश्किल असे दोन्ही कॉम्बिनेशन करत त्याच्याकडे पाहून हसली तसे त्याने डोळे बारीक करत तिच्याकडे संशयाने पाहिले.

विहान ने कॅब दादर स्टेशन ला घ्यायला लावली...
स्टेशन ला उतरल्यावर प्लॅटफॉर्मवर जाईस्तोवर जय शांतपणे काही न बोलता उभा होता.
विहान आणि नमिता एकमेकांशी काही बोलत उभे होते आणि जय स्टेशनवरील लगबग पहात राहिला..

10 मिनिटात मोठा हॉर्न देत ट्रेन आली...ट्रेन बघून जय चे डोळे मोठे झाले आणि आनंदाने अक्षरशः उड्या मारत त्याने विहानला हग केले .... नमिता त्याला असे पाहुन पोट धरून हसत होती.
मुंबई-गोवा जनशताब्दी एक्सप्रेस होती ती....!

"वीरू, आपण रत्नागिरी ला जातो आहोत?"
"येस!"
"निशा ला भेटायला?"
"येस!"
"आज तुम्ही दोघे फक्त माझ्यासाठी येताय रत्नागिरीला?"
"येस"
"वीरू यार उममहहह आ.."
"हे काय आहे?" त्याची कृती बघून विहान ने पाऊल मागे घेत विचारले.

"ह्याला पप्पी म्हणतात मेरी जान!मेरे दोस्त! तेरे यह अहसान मैं कभी नाही भुलूंगा | "

"ए फिल्मी गड्या, चल चढ आता" नमिता त्याला चिडवत म्हणाली. एव्हाना जसा जय आहे तसे तिने त्याला एक फॅमिली मेम्बर म्हणून स्वीकारले होते. अवखळ, खोडकर, बडबड करणारा असला तरी मनाचा तो खूप छान आहे हे तिने पूर्णपणे मान्य केले होते.

डोअर पाशी जय चाळे करायला गेला तसे विहान ने त्याला आता ढकलले. फायनली जय,विहान आणि नमिता ट्रेन मध्ये बसले आणि प्रवासाला सुरवात झाली.

नमिता आणि विहान च्या नात्याची सुरवात ट्रेन च्या प्रवासानेच झाली होती. ती दोघेही हातात हात घालून बसली होती... नजरेनेच ती त्याला " मी खूप हॅपी आहे" असे सांगत होती.

"आख्यु आख्यु..." जय मुद्दाम खाकरला तसे विहान ने त्याला टपली मारली.

नमिता ला वाटले याला काही त्रास होतोय तिने पटकन पाण्याची बाटली त्याच्यापुढे धरली.

"मला कशाला देतेस?" जय म्हणाला.
"अरे तुला ठसका लागला ना....!"

" ते तुम्हा दोघांना कळावे की मी पण तुमच्या सोबत प्रवास करत आहे .... तुमचं गुलुगुलु मला रत्नागिरी पर्यंत ऐकायला नको ना म्हणून मुद्दाम आवाज केला " जसे जय हसत म्हणाला तसे नमिता ने त्याच बाटली ने त्याला फटका मारला.

तसे खूप लागल्याचा अविर्भाव करत तो काही क्षण ओरडला,गप्प झाला आणि पुन्हा त्याचे माकडाचाळे सुरू झालेच.

"इथे येणारे फूड हे विकत घ्यावे लागते बरं का... ही जनशताब्दी आहे तेजस नाही... कळले का जय तुला..?" विहान सुद्धा त्याला साथ देत नमिता ला चिडवायला लागला तसे तिने त्याला रागाने बघत हलकेच तोंड वाकडे केले.

विहान मोठ्याने हसायला लागला..

तेवढ्यात त्यांचे स्नॅक्स आलेच. गरमागरम कटलेट, ऑम्लेट, समोसा पाहून जय च्या तोंडाला पाणी सुटले.
मागील प्रवासातील कटू वाटणाऱ्या आठवणी आता नमिता ला चेहऱ्यावर गोड हसू आणत होत्या. त्या आठवणी तिला सुखावत होत्या तर तिचे हावभाव बघून विहान सुद्धा त्या विश्वात जाऊन येऊन होता.

बाहेरचा निसर्ग, परिसर बघून तिघेही मध्येच बोलत होते आणि काही प्लॅन करत होते. जय सोबत असला तरी त्या दोघांना अजिबात अवघडेल असे न वागता एकदम खेळकर वातावरण मेंटेन करून होता.

गरमागरम कॉफी आली तसे "आता जिवात जीव आला बघ" जय एक घोट घेत बोलला...

नमिता म्हणाली" का आतापर्यंत जीव गेला होता का?"

"मेरे दोस्त की जान, मैं तो यहा हूँ ही नही,
तो मेरी जान यहाँ इस ट्रेन में होगी भी नहीं.."

अरे बापरे... हे भूत आहे तर ओरिजनल जय कुठे आहे?" नमिता हसत विचारत होती.

"अगं तो रत्नागिरी ला केव्हाच पोहचला आहे,काळजी नको "विहान म्हणाला तसे तिघेही हसायला लागले.
प्रवास छान सुरु होता...सुपरफास्ट स्पीड ने गाडीने 10.30 वाजता रत्नागिरी च्या प्लॅटफॉर्मवर त्यांना सोडले.

तिला काहीही न कळवता तिघेही तिच्या फ्लॅट वर जाऊन धडकले.

दारावरची बेल वाजली तसे निशा ने दार उघडले... समोर तिघे उपटसुंभ पाहून ती प्रचंड सरप्राइज झाली.
ती तशीच उभी होती, तिला नमिता ने आत ढकलले तशी ती हलली.

ट्रॅक पॅन्ट त्यावर टी शर्ट विस्कटलेले केस अशा घरातल्या अवतारात निशा होती, प्रचंड आश्चर्य चकित होत तिने विचारले, " तुम्ही ????????? अचानक????????"

"का तुला आवडले नाही का आम्ही आलो ते?" विहान ने मुद्दाम प्रश्न केला.

"तसे नाही रे एक कॉल करायचा ना मी किती गबाळ्या अवतारात आहे. संडे म्हणून आळसावत बसले होते"

"तरीही तू खूप छान दिसते आहेस" जय बोललाच तसे ती सोडून तिघेही हसायला लागले... तिने एक रागीट लूक जय ला दिला.

"ह्या माकडाला का आणले तुम्ही..? दोघे आला असता तरी चालले असते की.." ती चिडून म्हणाली.

"दी.. मी आणले आहे त्याला...आता तुझ्याकडे मोजून 15 मिनिटे आहे, पटकन तयार हो तोवर मी कॉफी करते" असे म्हणत नमिता ने तिला बेडरूम मध्ये ढकलले.

ती कधी तयार होऊन बाहेर येतेय याची वाट बघत नजर लावून जय दरवाज्याकडे बघत बसला होता तर त्याचे वागणे दाखवत नमिता विहान ला खुणावत होती.

त्यांची कॉफी संपायच्या आत निशा ने हॉल मध्ये प्रवेश केला.

केशरी रंगाचा शॉर्ट टॉप तिला खूप खुलून दिसत होता. त्यावर अँकल लेंथ ब्लु पॅन्ट, हाफ क्लच केलेले केस खांद्यावर स्लिंग बॅग ...सॉलिड दिसत होती ती...

तिला बघून जयचे यावेळेस खरोखरचे माकड झाले एकदम. त्याला तसे बघताना पाहून निशा तिच्या चेहऱ्यावरचा राग दाखवत विहान कडे बघून विचारत होती,"काय प्लॅन आहे?"

"तू चल तर! देव पण ना छप्पर फाड के देतो बघ" जय ला डिवचत विहान म्हणाला.

"का काय झाले?"

दोघीच्या मध्ये जात दोघींच्या खांद्यावर हात टाकत तो जय ला म्हणाला " एक तरफ घरवाली दुसरी तरफ आधी घरवाली ! दोघीही कडक एकदम"

त्याचे बोलणे ऐकताच जय ने त्याला टफ लूक दिला तर या दोघीनी एकदम चकित होऊन त्याच्याकडे बघितले.
नमिता डोळे मोठे करून बघत होती तर निशा तिला चिडवत मुद्दाम विहान च्या आणखी जवळ गेली आणि त्याला हायफाय करत हसायला लागली.

"बघतो तुला..." जय हळूच त्याच्या कानापाशी जात म्हणाला..

विहान मोठ्याने हसला.

ते खाली आले तेव्हा हायर टॅक्सी आलीच होती. विहान ने ड्रायव्हर कडून चावी घेतली. तो ड्राइविंग सीट वर बसला तर नमिता बाजूला बसली... जय एकदम खुश झाला कारण निशा ला त्याच्या जवळ बसण्याशिवाय पर्याय नव्हता.

आरे वारे रोड च्या दिशेने गाडी निघाली....
जाताना डावीकडे अरबी समुद्र फार अप्रतिम दिसत होता...कधी चढाचा रोड तर कधी उतरता असे करत ते आरे बीच वर पोचले.. तिथे मस्त फोटो काढणे झाले...नारळ पाणी आणि तिखट मीठ लावलेले गरम कणीस खाऊन सगळे जण रॉक पॉईंट ला येऊन थांबले....
समुद्रा बद्दल काही गप्पा करता करता जय निशा ला चिडवत होता त्यामुळे निशा आणि त्याची नोकझोक सुरू होती.

थोड्या वेळाने ते पुढे गणपतीपुळे ला गेले..
रविवारची गर्दी असून सुद्धा गणपतीपुळे ला बाप्पाचे छान मनासारखे दर्शन झाले. विहान आणि नमिता ने मिळालेल्या सुखाबद्दल बाप्पाचे अंतःकरणाने धन्यवाद मानले तर जय ने निशा साठी मनापासून प्रार्थना केली.

" खूप छान प्रसन्न वाटले ना दर्शन घेऊन ?" निशा म्हणाली तसे जय लगेच म्हणाला" हो ना! खूपच छान वाटले आणि तुझ्या सोबत तर भारीच वाटले"
निशा ला इम्प्रेस करायची एकही संधी तो सोडत नव्हता.

चौघही जण समुद्रकिनारी गेले. नमिता आणि विहान पाण्यात जात एकमेकांचे फोटो घेत कधी सेल्फी घेत एन्जॉय करत होते. मुद्दामच निशा कडे दुर्लक्ष करत होते आणि जय ला चान्स देत होते पण निशा काही जय ला बधत नव्हती.

एवढ्यात पाण्यात आत उभी असताना निशा आपल्याच विचारात होती आणि अचानक समोरून एक मोठी लाट आली आणि तिला भिजवून गेली...पुढचे कळायच्या आत परतणाऱ्या पाण्यासरशी तीच्या पायाखालची वाळू सुद्धा सरकली आणि तिचा तोल गेला.

जय जवळच होता...लाटेने त्याला सुद्धा भिजवले होते पण त्याला कळले की ही लाट वाळू सरकवत आहे आणि त्याने पटकन निशा च्या बाजूला उडी मारली...
पाण्याच्या प्रवाहात निशा एकदम जोराने आता जात असताना जय ने तिच्या हाताला धरले...ती सावरत असताना तिला पाणी ओढत होते तसे पटकन जयने तिला पायाशी धरत सावरले.

लाट पूर्ण पणे निघून गेली ...ते दोघेही उठले...जय मुळे आज ती पाण्यात जाण्यापासून वाचली होती.
त्याचा तो स्पर्श, तिला असलेली त्याची काळजी,अलगद सावरणे , त्यामागचे प्रेम असे बरेच काही एका क्षणात सांगून गेले.

पाहिल्यांदा तिला काही वेगळी अनुभूती झाली, तिला या वेळी जय चा राग नाही आला...
ती मनापासून हसत त्याला " थँक्स" म्हणाली आणि त्याच्या हाताला धरतच पाण्याबाहेर आली.

लांबून हे सगळे विहान आणि नमिता बघत होते
बराच वेळ पाण्यात खेळत एकमेकांचे भरपूर फोटो काढून झाले होते त्यामुळे ते धावत तिथे आले...

"काय झाले...आर यु पीपल ओके..?"
"आज गेलेच असते पाण्यात... जय ने वाचवले..." निशा हसत म्हणाली..

जय काहीच बोलला नाही...
आता ते सगळे एका सुरक्षित ठिकाणी उभे राहून फोटो काढत होते.

मुद्दाम निशा आता जय च्या बाजूला येऊन पोझ देत होती... त्यालाही हे जाणवत होते ...नकळत तिच्या मनाचा कल जय च्या दिशेने वळत होता.

त्यांनतर विहान जवळच्या ब्लु ओशियन रिसॉर्ट ला लंच साठी घेऊन गेला..रिसॉर्ट, लोकेशन, अंबिअन्स आणि इंटेरिअर पाहून सगळे जाम खुष झाले...

"विहान तुला सगळे कसे माहिती असते रे..?" नमिता कौतुकाने म्हणाली..
"त्याचे काय आहे ना माझ्या नमु...मी रत्नागिरी ला कामा निमित्ताने खूप वेळा आलो आहे ना म्हणून..."

"वॉव...परत बोल..."
"काय...?"
"ते जे आत्ता बोलला ते..."
"मी रत्नागिरी...."
"ते नाही....."
"मग....?"
"ते....जे दुसरे तू बोललास ते..."
"काय..." विहान तिला मुद्दाम विचारत होता...
"जा नको बोलूस..." ती चिडत म्हणाली..
"चिडू नकोस ना..........नमु..." तो हसत म्हणाला तसे तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले...

सगळे जेवणासाठी रेस्टॉरंट मध्ये आली...त्या वेळी विहान ने मुद्दाम निशा ला मेनू ऑर्डर करायला सांगितले.

निशा ने मेनू कार्ड जय ला दिले...
"तू ऑर्डर कर आज जय...बघू तुझी चॉईस .."
ती हसत म्हणाली..
तसे जय ने चॅलेंज स्वीकारत ऑर्डर दिली...
पुरणपोळी, सोलकढी, उकडीचे मोदक, छोले, पोह्याचे पापड, कुरडई, व्हेज बिर्याणी अशी ऑर्डर दिली...

तसे निशा ने मान डोलवत "गुड " असे म्हणले...
जेवण आले आणि एन्जॉय करत जेवण आटोपले...
निशाच्या जय बद्दलच्या वागण्यातील फरक थोडा थोडा सगळ्यांनाच जाणवायला लागला होता.

जेवण आटोपून आजूबाजूला फिरत बघत एन्जॉय करत सगळे जण परत रत्नागिरीला आले..

दिवसाची सांगता होत होती, तर जय चा जीव मात्र आता प्रत्येक क्षणाला वरखाली होत होता. त्याला आजचा दिवस संपायलाच नको होता तर त्याची ही चुळबूळ निशा पासून लपत नव्हती.

कुठेतरी वेळ थोडा हळू हळू पुढे जावा असा तिच्याही मनाचा कल येताच होता.

कामगिरी फत्ते बहुतेक या आनंदात विहान आणि नमिता एकमेकांकडे बघून हलकेच हसत होते.आज खास यासाठी ते दोघे आले होते
संध्याकाळी सहा वाजताची गाडी होती...

थोडेफार शॉपिंग करत सगळे जण बरोबर साडे पाच ला स्टेशनवर पोचले..
जाताना जय निशा बरोबर काही बोलतच नव्हता..
विहान ला जाणवत होते, त्याच्या मनाची अस्वस्थता...त्याची सुरू असलेली घालमेल आणि त्याच्या विचारांची दिशा...

"थांबतोस का इथेच 2 दिवस...मी हॉटेल मध्ये तुझी सोय करून देतो..." विहान ने त्याला विचारले...

"आणि काय करू...तिचे तर ऑफिस असेल..मी काय भजन करू..."

"मी विचारायचे काम केले..."
"नको...आज येतो बघु नंतर काय करता येते..."

गाडी येत होती..तेव्हा जय पाशी निशा आली आणि हसत म्हणाली, "हे जय, थँक्स...आजचा दिवस मस्त गेला..मजा आली...आणि मेनू छान होता बरं का..."

तो काहीच बोलला नाही...

"तू हसत माकड चाळे करतच छान दिसतोस...असा शांत नाही चांगला वाटत..."

"राहूदे निशा...मी काहीही केले तरी चांगला नाही वाटत ...या माकडला कशाला आणले हे जे तू सकाळी बोललीस ना ते अगदी बरोबर होते..."

त्याच्या या बोलण्याने ती चमकली..
गाडी प्लॅटफॉर्मवर आली आणि सगळे डब्यात शिरले...
विहान आणि नमिता ने निशा ला बाय केले आणि आत जाऊन बसले.

जय दरवाज्या पाशीच थांबला...
त्याच्या चेहऱ्यावर आत्ता निर्विकार भाव होते... निशा त्याच्याकडे एकटक पाहात होती...

"जय....मी तुला फोन करेन.. चालेल ?"

तो काहीच बोलला नाही..

"जय...मला तुझ्याशी बोलायचे आहे...तू मात्र एकदम शांत बसला आहेस..गाडी निघत आहे....मी फोन करेन चालेल ना...बोलशील का..फोनवर...?"

तो शांत होता..एक धक्का बसला आणि गाडी हलली....गाडी बरोबर ती पण चालायला लागली...
गाडी स्पीड पकडेस्तोवर निशा गाडी बरोबर चालत होती..
जय फक्त तिच्याकडे पहात होता...निर्विकारपणे आणि त्याची निर्विकार नजर तिला सहन होत नव्हती..

गाडी दिसेनाशी होईपर्यंत निशा त्या डब्याकडे नजर लावून बसली होती...तिला डब्याच्या दरवाज्यात जय ची उभी आकृती अजूनही दिसत होती.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all