मिस्टर आणि मिसेस:- भाग 22

Vidhan Proposes Namita And Both Share Their Heart Feelings
 विहान ने तिथूनच निशा ला व्हिडिओ कॉल केला, व्हिडिओ कॉल म्हणल्यावर तिला थोडे नवल वाटले, तिने लगेच कॉल घेतला.

"हाय " हे तिचे शब्द तोंडातच राहिले जेव्हा तिने स्क्रीन वर नमिता आणि विहान दोघांनाही पाहिले. त्यांचे खुललेले चेहरे बघून तिला कल्पना आलीच.

"दोघेही सोबत म्हणजे नक्कीच काहीतरी शिजतंय" निशा म्हणाली.

"दी शिजतंय नाही, शिजले आहे"

"वाह! नक्की कसे आणि काय शिजले रे विहान?"निशा मुद्दाम विचारत होती.

"त्याचे काय आहे ना, एक मुलगी माझ्या आईची सून व्हायला तयार झाली आहे!"

" ग्रेट न्युज! पार्टी तो बनती है! "

"ताज ला चालेल ना..?" विहान ने हसत विचारले...

"पळेल....आणि नमू आयुष्यात पहिल्यांदा तू स्वतः योग्य निर्णय घेतला आहेस. तुमचे दोघांचेही मनापासून अभिनंदन. खूप खुश आहे मी तुमच्यासाठी"

"निशा माझी तर डबल मज्जा आहे" विहान म्हणाला तसे नमिता ने त्याच्याकडे काही कळत नसल्यासारखे पाहिले.

"विहान कशी काय रे?" निशा ने सुद्धा तिला विचारले...

"अग बघ ना...तुझ्यासारखी साली म्हणजे आधी घरवाली आणि नमिता सारखी बायको. आहे की नाही डबल धमाल" विहान जसे बोलला तसे नमिता त्याला मारायला लागली तर निशा मोठे डोळे करून बघायला लागली...

पण नमिता चा अविर्भाव पाहून " विहान डन!..मी आधी घरवाली..." निशा मुद्दाम नमिता ला चिडवायला म्हणाली तसे नमिता लटकेच चिडून म्हणाली.." दी... भेटच तू मला"

" आता डायरेक्ट पार्टी ला भेटीन..... मला ताज ला पार्टी हवी विहान समजले ?"

"येस! प्रॉमिस"विहान म्हणाला आणि नमिता ने सुद्धा तिला अंगठा दाखवत सहमती दर्शवली.

आनंदात आकंठ बुडालेले ते आपला आनंद आणखी एका व्यक्तीला कळावा म्हणून विहान ने कॉल केला...

"जय"
"बोल वीरू"
"तुला काही सांगायचे आहे"
"निशा मला हँडसम, स्मार्ट म्हणाली का?"

नमिता ने विहान च्या हातून फोन घेतला आणि म्हणाली " जय तुला एक गुड न्युज द्यायची आहे"

"आयला...तू विहान च्या फोन वर? अगं हीच तर गुड न्यूज आहे"

"जय कधी तर सिरिअस राहा रे. मी आणि विहान लग्न करत आहोत"

"ओहोहो ग्रेट ! पण हे मला माहित होते" जय पुन्हा मस्करी च्या मुड मध्ये आला तसे नमिता ने विहान ला फोन दिला.

"जय ही गुड न्यूज आतापर्यंत फक्त तूला आणि निशा ला माहीत आहे"

" निशा आणि मी...क्या बात है...?"

"जय अरे फॉर्मलिटी म्हणून तरी अभिनंदन म्हण...." विहान हसत म्हणाला.

तसे जय म्हणाला..." पार्टी देशील ना तेव्हाच म्हणेन तुला.... आता फक्त नमिता ला अभिनंदन माझ्याकडून"

"तू नाही सुधारणार" म्हणत विहान ने फोन ठेवला.

दोघेही हसत होते, जय जरी बोलला नाही तरी त्याच्या सदिच्छा आहेत त्या दोघांनाही माहीत होत्या.

"विहान आता पुढे कसे करायचे?" नमिता ने विचारले.

"मी आईशी बोलतो, आई सांगेल पुढे काय करायचे ते..." म्हणत विहान ने तिला घट्ट मिठी मारली.

दोघे बीच वरच्या काला खट्टा गोळा खायला गेले...आज चा दिवस त्या दोघांसाठी अविस्मरणीय होता. आज दोघांनी त्यांचे प्रेम कबूल करून लग्नाचा निर्णय घेतला होता. हसत, बोलत आपले भविष्य रंगवत त्यांना पुढे जायचे होते…

चार बर्फाचे गोळे खाऊन नमिताची जीभ फुल्ल रंगीबेरंगी झाली..ते पाहून विहान ला हसायला आले..

"का हशतो हाहे..?" ती तोंडात गोळा ठेऊन बोलली..
तसे त्याला अजून हसायला यायला लागले...

तिने चिडून गोळा थर्माकोल कपात ठेऊन दिला..तसे तो अजून हसायला लागला...

"विहान...आता जर तू हसलास ना तर मी कट्टी करेन तुझ्याशी..कायमची..."

"शक्यच नाही नमिता... तू चिडूच शकत नाही माझ्यावर..."

"आणि चिडले तर..."

"दाखव तर चिडून..." तो तिच्याकडे वेडावून दाखवत म्हणाला.

तिने त्याच्याकडे पाहिले...त्याचा इनोसंट चेहरा, त्याच्यावरील हसरे भाव आणि चमकदार डोळे पाहून तिचा राग पळून गेला...

"जा मला नाही चिडायचे..."
"का..? चिडणार होतीस ना...?"
"माझी मर्जी..नाही चिडायचे..."

यावर तो मान डोलावून तो हसला.
"चल मला पाव भाजी आणि पाणी पुरी खायला घाल..."

त्याने डोक्याला हात लावला...
"काय झाले ...?"
"मला एक प्रश्न पडतो कायम नमिता..?"
"काय...?"
"एवढी बारीक तू....?"
"बारीक...?

"सॉरी...एवढी फिट तू...एवढी स्लिम आणि ट्रिम तू.. एकदम परफेक्ट तू...."

"बोलत जा..मला आवडत आहे...."
"हां तर एवढी फिट तू...."
"पुढे तर बोल..."

"मग हे एवढे खातेस ते जाते कुठे...अंगाला लागत नाही का..?"

"मी एवढे खाते...? काय खाल्ले रे....आत्तापर्यंत गोळा खाल्ला आहे फक्त... आणि चौपाटीवर आल्यावर पाव भाजी आणि पाणी पुरी खायला नको का...आणि आपले आजच्या दिवसाचे सेलिब्रेशन नको का... काय एवढे खाल्ले की तुझ्या नजरेत आले रे...किती बोलतोस रे मला...किती नावे ठेवतोस मला..किती खाणे काढतोस माझे...एवढेसे पोट माझे पण त्या साठी पण तू मला एवढे बोलतोस...मुली काय काय हट्ट करतात आणि मी फक्त खाऊ आण म्हणले तर एवढे सुनावलेस...जा नको मला पावभाजी.. तूच खा...मी जाते..." असे म्हणून ती तिथून उठली आणि गेली...

विहान फक्त तिच्याकडे पाहात होता..ती काय बोलली हे तो आठवत होता तेवढ्यात ती मागे वळून आली आणि म्हणाली, "अरे तू अजून गेला नाहीस.... जा ना आण ना पाव भाजी...आणि त्याला सांग की बटर डबल टाक आणि जोडी एक्स्ट्रा सांग...आणि हे बघ त्याला तिखट कांदा पण सांग द्यायला..भुकेने कावळे चिमण्या ओरडत आहेत...जा लवकर जा...."

ती बसल्यावर तो उठला आणि तिला कोपऱ्यापासून नमस्कार करत पाव भाजी आणायला गेला.

तो गेल्यावर तिने आईला फोन केला आणि सांगितले की मी जेवायला नाही येणार आहे...
तो येईस्तोवर तिने त्याचे फेसबुकवर काही फोटो पाहिले...

"कसला हँडसम आहे हा ..." "फारच चिकना आहे हा..." "इतके दिवस का नाही भेटला हा मला..." "अंधेरीपासून बोरिवली पर्यंत कधी दिसला नाही हा मला.."

ती फेसबुक पाहत असताना तो हातात प्लेट्स घेऊन आला..

२ प्लेट्स मध्ये पावभाजी वर भरपूर बटर टाकून सोबत पावाच्या जोड्या, मसाला पाव, तिखट कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असे सगळे घेऊन आला होता...

ते पाहून ती खुश झाली...
"विहान... आज मी खूप खुश आहे..."
"का पावभाजी आणली म्हणून..?"

"नाही रे...आज आपण ठरवले ना की आपण पुढे काय करणार आहोत ते...म्हणून.."

"नशीब, मला वाटले की बटर जास्त आणले..." तो हसत म्हणाला..

"हे बघ तू माझी चेष्टा करत आहेस हे मला कळत आहे..पण मी आज खूप खुष आहे..."

"नमिता, मला एक विचारायचे आहे..."
"विचार.."
"निशा तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी...बरोबर ना..."
"हो..."
"मग तिच्याआधी तुझे लग्न झालेले चालेल का..?"

"आं... म्हणजे असे काही नाही....म्हणजे माहिती नाही...म्हणजे तिच्या मनात काय आहे हा विचार केलाच नाही मी...मी आता 27 वर्षांची आहे...ती 29 आहे...बाबा आमच्या दोघांच्या लग्ना बद्दल कायम आम्हालाच विचारत असतात...आई कधी कधी किरकिर करते पण आम्ही तिला सांगितले की आमचे आम्ही शोधू.. तुला काळजी नको..."

"पण निशा च्या मनात कोणी आहे का..?"
"नसावा..कारण असता तर तिने मला सांगितले असते..."
"तू शोधून काढू शकशील ...?"
"शोधायला कशाला हवे आहे...? मी आत्ता विचारते तिला..."
"नमिता, आत्ता नको..उद्या सकाळी मला सांग...मग मी पुढचे बघतो..."

"ओके बॉस... आजपासुन आमच्या जी एम साहेबांच्या ऑर्डर प्रमाणे मला वागायचे आहे ना..."

"ते असले तरी...हा जी एम घरातल्या एच एम च्या मनाप्रमाणे करेल बरं का..."

यावर ती गोड हसली..तिच्या हसण्या कडे पाहत त्याने तिला पावभाजी भरवली.. ते खात असताना त्याला ती जगातील सर्वात सुंदर मुलगी भासत होती....!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all