मिस्टर आणि।मिसेस:- भाग 21

Vidhan Decides To Speak With Namita
दिवस छान हसत खेळत गेला. भरपूर एन्जॉय केले सगळ्यांनी.
बरोबर 5.30 वाजता ते रिसॉर्ट वरून निघाले आणि विहान ने म्हणल्याप्रमाणे 6 वाजता स्टेशन जवळ पोचले.

"चल निशा मी तुला सोडायला येतो..." जय म्हणाला तसे तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले.
"का? मी जाईन की!" ती एकदम तिक्ष्णपणे म्हणाली...

तसे जय हिरमुसला....हे बघून नमिता आणि विहान सुद्धा तिला सोडायला निघाले त्यामुळे जय चे फावले.

ट्रेन ला यायला 10 मिनिटे बाकी होती,तोवर जय ने तिचा नंबर मागून घेतला...हो नाही करता करता तिने नंबर दिला तसे जय ने मिस कॉल देऊन स्वतःचा नंबर लगेच तिच्या पर्यंत पोचवला.

"मी तुला कॉल करेन आणि मेसेज सुद्धा.." जय हसत निशा ला म्हणाला.
ती काहीच बोलली नाही... तिची निर्विकार नजर त्याच्या मनाला थोडी बोचलीच पण हार मानेल तो जय कुठला.

"तुला आज गेलच पाहिजे का ?" जय ने चिकाटी सोडली नाही.

"मी जॉब करते, त्यामुळे उद्या सकाळी मला ऑफिसमध्ये जायचे आहे, तुझ्या सारखी मी रिकामी नाही..." निशा ऍटीट्युड मध्ये जय ला बोलली.

तो नुसता हसला...
तेवढ्यात ट्रेन आली तसे तिने विहान आणि नमिता ला हग करून बाय केले तर जय ने हात पुढे केला तर त्याला शेकहँड केले...

ती गेली तसे विहान ने जय ला बाजूला घेतले...
"जय नक्की काय सुरू आहे?"विहान जय च्या कानात कुजबुजला.

"काय यार,जसे हवे तसे होईल तर आयुष्य कुठले ना?"

"तेच विचारत आहे..काय झाले.?"
"आता नको नंतर बोलू " नाराजीत जय बोलला.

"होईल होईल, बघू काय करता येईल ते..... तसे माझे पूर्ण लक्ष होते तू आज दिवसभर काय करत होतास ते. चांगले प्रयत्न केलेस इम्प्रेस करायला" विहान त्याच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवत बोलला.

तिला सोडल्यावर सगळे जण थोड्याफार गप्पा मारत बसले.. गाडी मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये शिरली होती.. 8 वाजता अंधेरी ला नमिता आणि तिच्या आई बाबांना ड्रॉप केले.. जाताना त्यांचे चेहरे आनंदात दिसत होते.

"थँक्स विहान,मस्त दिवस गेला आज तुझ्यामुळे" तिचे बाबा म्हणाले.
तो हसला आणि परत भेटू असे म्हणून पुढे बोरिवली ला निघाला.
जयने विहान आणि आईला बोरिवली ला सोडले आणि पुढे दहिसर ला गेला..

घरी पोचल्यावर आई ने कॉफी बनवली.
"घे विहान कॉफी घे" आई म्हणाली.
"आई कसा गेला दिवस?"
"एकदम छान!"
"मी मुद्दाम आज तुझी आणि त्यांची भेट घडवून आणली आहे..."
"हो विहान समजले मला. आई आहे मी तुझी...कळते मला ते.." खोडकरपणे त्या म्हणाल्या...

"आई तसे आमचे दोघांचे अजून काहीच बोलणे झालें नाही आहे. पण तू सांग तुला ते लोक कसे वाटले?"

"ते लोक की नमिता?" आई त्याला चिडवत म्हणाली...

"आई तू पण ना"

" तिचे आईबाबा चांगले वाटले मला.....आईशी माझी गट्टी छान जमली आहे,..बाबा खुप साधे वाटले..आणि राहिला प्रश्न नमिताचा... ती तर मला आधीच आवडली आहे"

विहानला हायसे वाटले.
त्याने नमिता ला मेसेज केला "कसा गेला दिवस?"
"एकदम फंटास्टिक! जबरदस्त! मस्त!"

" काय म्हणतात आई बाबा?"
"काही बोलणे नाही रे झाले अजून, दमले होते ते... त्यामुळे झोपायला गेले मी पण मुद्दाम विचारले नाही.."

"ओके...उद्या बोलू....."
"येस....गुड नाईट!"

सकाळी ऑफिस ला जाताना त्याने नमिता ला फोन केला" गुड मॉर्निंग मॅडम..."
"गुड मॉर्निंग हँडसम..."
"काही बोलणे झाले का ग?"
"नाही रे अजून....तुला इतकी घाई का झाली आहे "

"काही नाही ग.... कॉल कर मला बोलून झाले की"
कळवते रे नक्कीच..."

तिचा फोन झाल्यावर विहान ने निशा ला कॉल केला " हाय निशा.."
"हे हाय..!"
"खास विचारायला फोन केला मी...कालचा दिवस कसा गेला?"
"अरे भारी एकदम! खूप एंजॉय केले, जबरदस्त ठिकाण, मस्त कंपनी ..सगळे छान"

"ग्रेट ! आणि माझा मित्र जय कसा वाटला?"
"खरं सांगू..?"
"एकदम खरं.."
"गोरिला! चिंपांझी ! माकड! औरंगुटान"
"अगं, मी जय बद्दल बोलत आहे"

"आणि मी सुद्धा" म्हणत ती मोठमोठ्याने हसायला लागली.

त्या विषयावर जास्त बोलण्यात काही पॉईंट नाही असा विचार करून त्याने इतर गप्पा मारायला सुरुवात केली... ऑफिसला पोचल्यावर त्याने फोन ठेवला.

विहान ऑफिसमध्ये कामात असताना फोन आला...त्याने नाव पाहून कट केला.
पुन्हा आला, पुन्हा त्याने कट केला.
पुन्हा आला , पुन्हा कट केला...
असे 4 वेळा झाले,शेवटी बोलल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून त्याने कॉल घेतला.

"तुला जरा दम नाही का जय? कॉल बॅक केलाच असता ना मी?"

"बाकी सोड...आधी सांग निशा शी बोलला का?" जयने विचारले...
"मला माहिती होते की तू विचारणार ते....\"
"बोललास का नाही ते सांग..."
"हो जय...बोललो मी तिच्याशी.... "
"काय म्हणाली ती " उत्साहात जय म्हणाला.
"जाऊ दे रे..."
"विहान सांग लवकर..."
"तुला नाही ऐकवणार..."
"ऐकवेल..तू बोल पटकन..."
"गोरिला! चिंपांझी ! माकड ! ओरंगुटान"
"व्हॉट? काय ?"
"जे ऐकले तेच!"
"थांब मी कॉल करतोच तिला " असे म्हणत जयने कॉल कट केला सुद्धा आणि निशा ला कॉल केला.

"निशा.. मी गोरिला! चिंपंझी ! माकड ! बोलतो आहे.."
"अरे ओरंगुटान विसरलास की काय..?"तिने गुश्यात विचारले.
"तुला मी खरंच तसा वाटतो का..?"
"हो आणि तुझे ते विचित्र माकडचाळे म्हणजे तर पथेटिकच"

"व्हॉट?"
"ऐकायला कमी येते का तुला?"

"नाही कान तिखट आहेत माझे"

"मग त्याला मीठ पण लाव "निशा त्याला आणखी डिवचत म्हणाली...
"मॅडम या गोरिला कम चिंपंझी कम माकड कम ओरंगुटानशीच गाठ पडली आहे तुमची.
आता बघ याचेच वेड लागते की नाही तुला"

"वेड...माय फूट"

"तुझे फूट तर तुझ्याच सारखे छान आहेत, पण बघ चॅलेंज आहे माझे हेच माकड चाळे तुला वेड लावतील की नाही..."

निशा ने काही न बोलता फोन ठेवला.
जयनेही चॅलेंज स्वीकारले की निशा लाच जोडीदार बनवणार असे.

लंच ब्रेक मध्ये विहान ला नमिता चा कॉल आला.
"बोल नमिता" विहान थोडा उत्साही थोडा नर्व्हस असा काहीसा साउंड करत होता
"विहान तू ठीक आहेस ना?"

"हो ग , आधी सांग बोललीस का आईबाबांशी?"

"हो, ते दोघेही एकदम खुश आहेत. तुझ्या आईचा स्वभाव त्यांना खूप आवडला. आई तर म्हणत होती की विहान खूप छान मुलगा आहे त्याच्या आईने खूप छान संगोपन केले आहे त्याचे. इतक्या लहान वयात एवढी मोठी पोस्ट, समजूतदार स्वभाव, गोड वागणे आणि वरून इतजे छान संस्कार....खूप आवडलास त्या दोघांनाही तू"

"ग्रेट! " उद्या संध्याकाळी वेळ आहे का तुला नमिता?"
नमिता काहीच बोलली नाही तरी त्याला तिच्या गालावर आलेली लाली न बघताही जाणवत होती.

"नमिता मला तुला भेटायचे आहे, एकटीला!"

"विहान मला सुद्धा तुला भेटायचे आहे."

काही क्षण दोन्ही बाजूला शांत गेले पण ती ओढ ती हुरहूर दोन्ही बाजूला सारखीच होती.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघे जुहू चौपाटीवर भेटले...
भरपूर गर्दी आणि गोंधळ यामध्ये ते दोघे वाळूत एका ठिकाणी बसले...

समुद्रात बऱ्याच बोटी दिसत होत्या..सूर्य समुद्रात शिरण्याच्या तयारीत होता आणि बरीच जोडपी एकमेकांच्या हातात हात घालून बसली होती...

विहान आज तयारीने आला होता..या क्षणांची त्याने खूप वाट पाहिली होती...

नमिता कडे त्याने पाहिले...त्या मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे तिच्या चेहऱ्यावर येत होती...त्यावेळेस ती त्याला एका सुवर्णपरी समान भासली..तिचे वाऱ्यावर भुरभुरु उडणारे केस त्याला मोहवत होते...या सगळ्याने तो कसे बोलायचे हे ठरवत होता आणि ते उडणारे केस त्याच्या बोलण्याच्या बरोबर मध्ये येत होते...

नमिता साठी तो क्षण प्रचंड महत्वाचा होता..तिला आजू बाजूचा कुठलाच आवाज येत नव्हता.. फक्त तो काय बोलतो याच्या कडे तिचे लक्ष होते..

त्याने बोलण्यासाठी तोंड उघडले आणि तेवढ्यात बाजूला एक दाणे विकणारा मुलगा आला.."साहेब ..दाणे घ्या ना.."
त्याने काही न बोलता दाणे घेतले आणि तिला दिले...

ती हसली आणि त्याच्या बोलण्याची वाट पाहायला लागली...तो बोलायला घेणार तेवढ्यात परत बाजूला गजरेवाला एक मुलगा आला...

"गजरे घ्या ना मॅडम साठी..."
त्याने मान डोलवत गजरे घेतले...
त्याने तिच्याकडे गजरे दिल्यावर ती मोठमोठ्याने हसायला लागली..

आता मात्र तो सिरीयस होऊन तिच्याकडे बघायला लागला...त्याच्या या बघण्याने ती काँशिअस झाली...

"नमिता, मला आज तुझ्याशी काही स्पेशल बोलायचे आहे..."
"मी ऐकत आहे विहान...तुझेच बोलणे ऐकत आहे.."

"नमिता, तुला माहिती आहे की माझ्या लहानपणी माझे बाबा गेले..त्यानंतर आईने मला शिकवले आणि मोठे केले...मी शिकलो आणि चांगल्या कंपनीत जॉब मिळाला..तिथल्या कामाने खुष होत होत बॉस ने मला जी एम बनवले... आज मी सेटल आहे...बोरिवली ला फ्लॅट आहे..सेटल्ड जॉब आहे...प्रेम करणारी आई आहे...आणि भविष्य चांगले घडवण्यासाठी मी तयार आहे...
तर मला या भविष्यात....

"साहेब, फुगे घ्या ना फुगे...सकाळ पासून एक पण नाही गेला आहे..." छोटा मुलगा त्याच्या बाजूला येऊन बोलत होता..

लागोपाठ तिसऱ्या वेळीस कोणीतरी डिस्टर्ब करायला आले म्हणल्यावर विहान वैतागला....
" काही बोलायला गेले की कोणीतरी येत आहे इथे...जागा चुकली का आपली नमिता..?"

नमिता ने त्या मुलाकडून फुगे घेत विहान ला म्हणाली, "विहान.. ती प्रत्येक जागा माझ्यासाठी योग्य आहे जेव्हा तू माझ्या बरोबर आहेस....तू बोल! मी तुझेच ऐकत आहे..आपल्याला कोणीच डिस्टर्ब करू शकत नाही..."

तिच्या बोलण्याने तो प्रफुल्लित झाला...

त्याने तिचा हात हातात घेतला आणि जीव डोळ्यात आणून तिला विचारले..
"नमिता, माझ्या पुढच्या भविष्य काळात मला पूर्णपणे तुझे अस्तित्व हवे आहे...माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत तुझी साथ हवी आहे...
येणारा प्रत्येक क्षण मला तुझ्या अस्तित्वात घालवायचा आहे...नमिता, तुला माझ्या आईची सून व्हायला आवडेल का?"

त्याच्या या बोलण्याने ती मोहरली..अत्यानंदाने तिने त्याला मिठी मारली आणि त्याच्या कानात हळूच म्हणाली, "हो...मला तुझ्या आईची सून आणि तिच्या मुलाची बायको व्हायला खूप आवडेल.."

त्या क्षणाला जणू तिथला समुद्र ,तो सूर्य, ती वाळू, ती हवा आणि आजूबाजूची गर्दी सगळे जागच्या जागी थांबले होते...त्या दोघांनी त्या क्षणाला पूर्णपणे अमर बनवले होते...!

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all