मिस्टर आणि मिसेस :- भाग 1

Story Of Two Strangers Who Meet In A Train

मिस्टर आणि मिसेस:- भाग 1


सॉलिड खुश होता आज तो! कमालीचा आनंदी होता तो. \"आज मैं उपर आसमां नीचे\" अशी अवस्था होती त्याची. आणि का नसावे आज कंपनीचा \"जनरल मॅनेजर\" झाला होता तो. वय वर्षे केवळ 30. दिसायला निर्विवाद हँडसम! IIT-IIM टॉपर होता तो. एक्सीलंट अकॅडेमिक रेकॉर्डस असलेला तो कॅम्पस मध्येच सिलेक्ट झाला होता. तिथून पुढे 2 वर्षात एका मोठ्या कंपनी मध्ये जॉब मिळाला होता त्याला...आणि एक एक करत गेल्या 5 वर्षात तो इथे पोचला होता.
हेवा वाटावा असा होता तो. दिसायला वागायला, बोलायला. उंच, गोरा आणि मितभाषी. ऑफिसमधल्या अनेक मुली त्याच्या मागे होत्या. हा मात्र फक्त कामाकडे लक्ष द्यायचा. कोणालाच भाव देत नसल्यामुळे हा सगळ्यांना शिष्ट वाटायचा पण त्याने याला काही फरक पडायचा नाही.
आज कंपनीच्या हेड ने येऊन सगळ्यांपुढे ही अनाऊन्समेन्ट केली होती.
अनेक डोळे मोठे झाले होते तर काही चेहऱ्यावर आनंद पसरला होता.
कोणाला काही वाटले असावे पण स्वतः विहान खुश होता. जनरल मॅनेजर ही मोठी पोस्ट होती. भरपूर पर्क्स आणि गलेलठ्ठ पगार याची आता उधळण होती.

ही बातमी घेऊन संध्याकाळी उशीरा तो घरी पोचला. आई ची TV वर सिरीज पाहणे चालले होते.
"आई, एक चांगली बातमी आहे.."त्याने आईजवळ जाऊन सांगितले.
"काय रे विहान..?"
"आज मी जनरल मॅनेजर झालो..."
"जनरल का बरे? स्पेशल का नाही?" आईने भाबडेपणाने विचारले.
विहान हसला...
"अगं आई, जनरल मॅनेजर च म्हणतात. मोठी पोस्ट आहे ही.."
"हो का...मला माहिती नव्हते रे...छान झाले...आता तुला एक चांगली मुलगी मिळेल बघ लग्नाला..."
आईचे बोलणे ऐकून त्याला अजून हसायला आले...
"हसतो काय? एकुलता एक तू...तुझे वडील गेल्यावर मला तुझी ही जवाबदारी पार पाडायला हवीच ना.."
तो काही न बोलता त्याच्या रुम कडे गेला आणि आई देवापाशी साखर ठेवायला गेली.

त्याचा मोबाईल तेवढ्यात वाजला. त्याच्या व्हाईस प्रेसिडेंट चा फोन होता.
"विहान, काँग्रॅज्युलेशन्स"
"थँक्स सर.."
"नवी जवाबदारी घ्यायला तयार?"
"बाय ऑल मिन्स"
"आपल्या रत्नागिरी प्लांट ला तुला उद्या जावे लागेल..2 दिवसाची तुझी ऑफिशियल विझिट असेल"
"ओहह..ओके.."
"एनी प्रॉब्लेम?"
"नॉट ऍट ऑल सर..."
"सकाळी कंपनीची गाडी पोचेल 6 वाजता..त्याने जा.."
"सर, एक रिक्वेस्ट.."
"येस ..."
"मला ट्रेन ना जायला आवडेल.."
"नो वरीज..आपल्या एजंट ला सांगतो, पुढच्या अर्ध्या तासात तुला तिकीटाचा मेल मिळेल.."
"ग्रेट सर..थँक्स"
"बाय..बाकी फोनवर बोलू"
"बाय सर"

त्याने फोन ठेवला आणि आईकडे गेला.
"आई, मला 2 दिवस रत्नागिरी ला जावे लागत आहे, मावशी राहतील ना तुझ्याबरोबर?"
"हो रे विहान..काही काळजी नको..तू जा..."
विहान ने आई बरोबर जेवण केले, थोड्याफार गप्पा झाल्या आणि त्याने बॅग भरायला घेतली.
तोपर्यंत एक्सिक्युटिव्ह चेयर कार चे कन्फर्म तिकीटाचा त्याला मेल आला.
अलार्म लावून तो झोपून गेला.

सकाळी सहा वाजता त्याची ट्रेन दादर वरून होती. दादर ला बसले की 5 तासात बरोबर 11 वाजता रत्नागिरी.
पावणे सहाला हा दादर ला पोचला.
इंडिकेटर वर 22119 तेजस एक्सप्रेस चे नोटिफिकेशन आले.
बरोबर 5 वाजून 58 मिनिटांनी गाडी प्लॅटफॉर्म 4 वर आली.
हा आत शिरला. डबा बऱ्यापैकी भरला होता. ..लगेच आत जाण्याऐवजी तो दरवाज्यातच उभा
राहिला. गाडीला हिरवा दिवा लागलाच होता आणि ऑटोमॅटिक दरवाजा बंद होण्याचा बझर वाजला.
तेवढ्यात दरवाज्यातून आत मध्ये एक बॅग आली आणि पाठोपाठ एक हात आत दरवाज्यातून त्याच्या हातावर ठेवला गेला. दरवाजा बंद होत असताना एकदम शेवटच्या क्षणाला एक मुलगी त्याचा हात धरून आत शिरली आणि त्या क्षणाला गाडीचा दरवाजा बंद झाला...

"ओह माय गॉड! काय गाडी पकडली आहे मी...सॉलिड! थँक्स हां...तुम्ही दरवाज्या पाशी थांबला होतात म्हणून मी आत येऊ शकले नाहीतर या तेजस एक्सप्रेस चे आपोआपच दरवाजे बंद होतात आणि माणूस बाहेर राहतो..." ती हसत हसत म्हणाली..

एक क्षण तो तिच्याकडे बघतच राहिला.
उभा चेहरा, गोरीपान, काळेभोर केस आणि डोळ्याला शो चा चष्मा! वयाने 25ची वाटत होती. स्ट्रिप्स वाला टी शर्ट आणि जीन्स घालून ती अजून धापा टाकत होती...

तिची बॅग घ्यायला त्याने मदत केली आणि स्वतःची बॅग घेऊन त्याने कंपार्टमेंट मध्ये प्रवेश केला.
तिने सांगितले, सीट नंबर 14..ह्याने त्या सीटच्या
वरच्या ग्लास लगेज स्ट्रिप वर हिची बॅग ठेवली आणि स्वतः तिच्या बाजूला विंडो सीट नंबर 13 वर बसला.
तिने चकित होऊन त्याच्याकडे पाहिले तर त्याने खिडकीतून बाहेर पाहायला सुरुवात केली..

तिने तिच्या पर्स मधून मोबाईल काढला आणि फोन लावला..."हो ग...वेळेत पोचले... नाही..व्यवस्थित चढले ट्रेन मध्ये....अगं गंमत ऐकना.... तिचे बोलणे सुरू होते जे विहानच्या काना पर्यंत पोचत होते....
हां.. हो...बघ ना....मग काय तर....
हे तर DDLJ सारखे झाले..राज ने सिमरन ला हात दिला.
त्याच्या कानाने हे वाक्य ऐकले आणि त्याने तिच्याकडे पाहिले..
"सॉरी हां...माझ्या फ्रेंड बरोबर बोलत आहे..." ती म्हणाली.
त्याने काही न बोलता हातातल्या मोबाईल कडे पाहायला सुरुवात केली.

थोड्या वेळाने गाडीत पाणी, न्यूज पेपर, चहा कॉफी आणि बिस्किटे सर्व्ह झाली.
त्याने कॉफी घ्यायला सुरुवात केली तेवढ्यात तिच्या हाताच्या धक्क्याने त्याच्या हातातील कॉफी खालती जीन्स वर सांडली...

"ओहह...सो सॉरी... आय ऍम एक्सट्रीमली सॉरी..."
त्याच्या जीन्स मधून गरम कॉफीचा चटका त्याला लागला होता.
तो उठला आणि वॉश बेसिन पाशी गेला...
त्याने जीन्सवर हाताने पाणी शिंपडले... थोडे चेहऱ्यावर पाणी मारले आणि वळला तर मागे ही उभी..
"सॉरी, म्हणजे मी केसांना क्लिप लावायला गेले आणि माझा धक्का लागला. भाजले का तुम्हाला?"
तो काही न बोलता आत सीटवर गेला.
ती त्याच्या मागे आली आणि म्हणाली, "ओ हॅलो, मी तुमच्याशी बोलत आहे. चटका बसला का?"
त्याने काही न बोलता न्यूजपेपर वाचायला सुरुवात केली...

त्याच्या ह्या वागण्याने ती धुसफूसतच खाली बसली.
"आलाय मोठा शहाणा...गेला उडत..."
त्याची ही वाक्ये विहान पर्यंत पोचली पण त्याने लक्ष वाचण्यात ठेवले होते.
एव्हाना पनवेल गेले होते, आता पुढे गाडी डायरेक्ट चिपळूण ला थांबणार होती.
तिची सारखी चुळबूळ सुरू होती आणि तो एकदम शांत होता..
तिच्या सततच्या हालचाली मुळे त्याला अधून मधून तिचा धक्का लागायचा पण तो दुर्लक्ष करत होता...
त्याचे दुर्लक्ष करणे हेच तिला झोंबत होते...

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all