मिस्टर आणि मिसेस:- भाग 11

Vihan Comes From Bangalore After Completion Of His Work

नमिता रूम मध्ये पळत गेली पण त्यापेक्षा 10 पटीने तिच्या आईचे विचार पळायला लागले.
जेवणाच्या वेळी तसे गप्प गप्पच वातावरण होते, ती विहान च्या विचारात होती तर आई तिच्या!
तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला तशी ती ताट घेऊनच रूम मध्ये गेली.

इथे तिच्या आईने लगेच निशा ला फोन लावला.
"निशा..."
"बोल ना आई, आवाज का असा येतो आहे? सगळे ठीक आहे ना?"
"हा विहान कोण आहे तुला माहीत आहे का?"

आता मात्र निशा गप्प झाली! काय बोलावे तिला कळेना? नमिता काही बोलली का? तिचे विचार सुरू झाले...
"निशा ऐकत आहेस ना?"
"हो, बोल ना आई"
"हा विहान कोण आहे?"
"तू शांत राहा...मी सांगते." असे म्हणत तिने तो नमिता ला भेटल्यापासून चा सगळा वृत्तांत आईला सांगितला.

"आई मी भेटले आहे विहान ला, खूप चांगला मुलगा आहे. संस्कारी वाटतो त्याच्या वागण्यावरून... चांगल्या घरचा आहे. मला खूप आवडला आणि मुख्य म्हणजे हँडसम आहे एकदम. तू काळजी करू नकोस, ती सांगेल वेळ आली की... आणि हो आपले बोलणे झाले हे सांगू नकोस तिला नाहीतर आमच्यात भांडण होईल..." ती हसत बोलली .

निशा हे सगळे बोलल्यानंतर आईचे BP नॉर्मलला आले... हसत हसत ती स्वतःशीच म्हणाली, " मुली मोठ्या झाल्यात आता "

इकडे विहान तिच्याशी बोलत होता..." नमिता थँक्स!"
"कशाबद्दल?"
"माझ्या आईसाठी धावत गेलीस त्यासाठी.
"आणखी काही?"
"म्हणजे?"
"नाही, आणखी काही आभारप्रदर्शन बाकी असेल तर ते करून टाक आणि माझा नंबर पण डिलीट करून टाक म्हणजे झाले"
ह्याने जरा दचकत विचारले "का नंबर डिलीट करू?"

"कसे आहे ना,मला फ्रेंड म्हणायचे आणि वरून ही फॉर्मलिटी! मला असले लोकच आवडत नाहीत" त्याची फिरकी घेण्याचे टोनिंग त्याला जाणवले तसे त्याला हायसे वाटले.

"बरं नाही बोलत..."
"डॅट्स बेटर"ती हसली.
"बरं एक करशील का आणखी?"
"बिनधास्त बोल!"
"तू सांताक्रूझ एअरपोर्ट ला येशील का...मी अंदाजे 7.30 वाजता लॅंड होईल...तिथून आपण दोघेही सोबत बोरिवली ला जाऊ. आपली भेट पण होईल आणि बोलणे पण"
"हो येईल नक्की" तिच्या तर मनासारखे झाले होते.
"ठीक आहे ठेवतो मी कॉल,भेटूयात मग"

घरातून बरोबर 6.30 वाजता ती निघाली...फ्लाईट यायच्या अर्धा तास आधीपासून ती अरायव्हलच्या इथे त्याची वाट बघत होती. त्याच्या भेटीची ओढ, मनातील हुरहूर आणि नवीन भावनांची जाणीव तिला होत होती.

फ्लाईट वेळेत होती, तो समोरून येताना दिसताच हिच्या हृदयाची धडधड वाढली. त्याची नजर समोर तिलाच शोधत होती, तेवढ्यात लाल रंगाच्या क्रॉपटॉप आणि ब्लु जीन्स मध्ये त्याला ती दिसली तसे त्याने हात दाखवत मोठे स्माईल दिले.

"हाय, मस्त दिसते आहेस!"
" हाय, थँक्स..."थोडं लाजत ती म्हणाली.
बोलायचे तर खूप होते पण जसे शब्द सापडत नाही असे काही क्षण गेले. तोवर त्याने कॅब बुक केली ...आणि जशी कॅब आली तसे ते निघाले.

"कशी झाली मीटिंग?"
"एकदम छान झाली. आणखी पुढच्या बऱ्याच गोष्टी वर चर्चा पण झाली.ते डेलिगेशनवाले नेक्स्ट वीक इथे येतील, प्रोजेक्ट च्या सायनिंग फॉर्मलिटी पूर्ण करायला"
"ग्रेट,पार्टी कधी देतो आहेस?"
"तू म्हणशील तेव्हा."
ती हसली...

"बरं नमिता, तुला काही सांगायचे होते.... काल घरून कॉल आला तेव्हा मला ईतर कुणाचा नाही नेमका तुझाच चेहरा आठवला...सुचत नव्हते की काय करू पण अचानक वाटले की तू मदत करशील. मला विश्वास वाटत होता तुझ्याबद्दल आणि खरंच तू होती म्हणून मी आज नीट काम करू शकलो बंगलोर मध्ये"

ती काही न बोलता नुसतीच त्याच्याकडे बघत होती...

"थँक्स म्हणत नाही नाहीतर तू नंबर डिलीट करशील" तिची खेचत तो म्हणाला तशी ती पण खळाळून हसली.

सांताक्रूझ ते बोरीवली खूप वेळ नाही लागला त्यांना ...त्यांच्या गप्पांच्या नादातच कॅब बोरिवली ला त्याच्या सोसायटी जवळ पोचली.
तो उतरला पण ती नाही उतरली...

" काय झाले....? चल वर, आईला भेटून जा..."
"नाही नको विहान... आता उशीर होईल, आणि तसेही मी त्यांना उद्या येईल म्हणाले आहेच तर मी उद्या सकाळी येईल"

"अगं.. थोडा वेळ चल..."
"विहान उद्या येते नक्की..."
त्याने क्षणभर तिच्याकडे पाहिले आणि ड्रायव्हर ला म्हणाला, " मॅडम ला अंधेरीला सोडा.."
ड्रायव्हर ने मान डोलावली...
"नमिता, कॅब चे ऑनलाइन पेमेंट आहे..तुझ्या घरापाशी पैसे देण्याच्या भानगडीत पडू नकोस..."
"आपल्यात व्यवहार कधीपासून आला...?"
"कधीच आला नाही आणि येणार पण नाही...नीट जा आणि पोचल्यावर कळव मला..."
"कशाला...ह्या कॅब ची ट्रिप एंड झाली की मेसेज येईलच की तुला..." ती थोडी चिडवत म्हणाली...
"तो कॅब चा मेसेज येईल ना....मला तुझा मेसेज हवा आहे..." तो हसत म्हणाला...
त्याच्या बोलण्यावर थोडीशी लाजत ती म्हणाली..." येस! कळवते"
तसा तो सोसायटीच्या दिशेने निघाला आणि ही अंधेरी ला निघाली.

विहान घरी पोचला,मावशींनी दार उघडले. पाहतो तर आई समोर TV बघत बसली होती.

"आई कसं वाटत आहे आता" बॅग खाली ठेवत तो आईजवळ जाऊन म्हणाला.
"मला काय झालंय! मी एकदम छान आहे."
"काय आई...सकाळी घाबरवून टाकले होते ना मला..."
"कसे काय रे...?" आई मुद्दाम म्हणाली...
"मजा घेतेस का आई माझी..?"
"हे बघ...ह्या मावशी बाईंनी फोन नसता केला तर कळले असते का तुला काही...ते जाऊदे...आता मी कशी दिसत आहे ते सांग...?"
"ग्रेट!...व्यवस्थित दिसत आहे"

"पण या सगळ्यात एक छान झाले..."
"काय ग आई...?"
" नमिता....नमिता च ना ती...तिची ओळख झाली..."
"त्यात काय छान आई....मैत्रिणी बरोबर ओळख झाली त्यात काय विशेष...!" मुद्दाम त्याने असे बोलत आपण या गावचा नाही असे दाखवले.
" हो का? पण मला वाटले...की इमर्जन्सी ला आपल्या मुलाच्या अनुपस्थिमध्ये जर कोणी मुलगी येत असेल तर कोणीतरी जवळची असेल, नाही का?" मुद्दाम त्याची फिरकी घेत त्या म्हणाल्या.

तसे त्याने मान फिरवली आणि जीभ चावली पण त्याच्या आईने नोटीस केलेच आणि त्या मनापासून हसल्या.
" कुठली रे ही मैत्रीण?"

"अगं... ही नमिता आणि हिची बहीण निशा मला रत्नागिरी ला भेटल्या"
"अच्छा आणि इतक्यात छान मैत्री झाली की तुमची" त्या मुद्दाम बोलत होत्या.

आता जास्त ताणण्या पेक्षा त्याने प्रवासाचा सादर वृत्तांत सांगितला... दादर ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते दादर सगळ्याच गोष्टी आईला सांगितल्या.

हे झाल्यावर तो म्हणाला " आई मैत्रीण आहे माझी ती"

"मी कुठे काही बोलले का? " आईने हसत विचारले..

तसे तो उठून पटकन फ्रेश व्हायला गेला, आता इथे जास्त बसून राहिले तर आई आपल्याला अजून काही विचारेल हे त्याने ओळखले..
जसा तो गेला तसे त्या मनापासून आणि उद्देश्यपूर्वक हसल्या.

इथे नमिता घरी पोचली तेव्हा जवळपास 9.30 वाजत होते. बाबांनी दार उघडले तसे ती पटकन घरात आली.
"नमू बेटा, बराच उशीर झाला कुठे गेली होतीस?"

"तिच्या फ्रेंड च्या आईला बरे नाही ना! तिकडे गेली होती ती..." आई मुद्दाम म्हणाली तसे तिने चमकून पाहिले. आई फक्त हसली.

"फ्रेंड?" बाबा विचारत होते.
"नवीन फ्रेंड आहे...विहान!"आई म्हणाली.

बाबांनी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले...तसे तिने रत्नागिरी भेटीचा संपूर्ण किस्सा आणि निशा सुद्धा सोबत होती असे सगळे सांगितले.

दोघांनी नीट ऐकून घेतले.... ती फ्रेश व्हायला गेली तसे आईने तिच्या मोबाईल मधला त्या तिघांचा फोटो बाबांना दाखवला... विहान चा फोटो दाखवत निशाबरोबर जे बोलणे झाले ते पण सांगितले.

दोघेही एका वेगळ्या समाधानाने हसले.

रात्री जेवण झाल्यावर त्याचा मोबाईलचा वाजला...
त्याने पाहिले तर नमिताचा फोन होता...
"जागा आहेस..?"
"येस..!"
"दमला नाहीस का..?"
"आईला भेटून थकवा निघून गेला.."
खरंय..तुझी सगळ्यात मोठी काळजी म्हणजे तुझी आई हो ना!"
"फक्त काळजी नाही...आनंद, समाधान, गर्व, अभिमान, प्रेरणा...सगळे आई"
ती फक्त हसली...
"तू नीट पोचलीस..."
"एकदम टकाटक...फुल्ल टू टकाटक"
"नमिता, तू मधूनच टपोरी भाषा काय वापरतेस गं...?"

"बोले तो...अपुन टपोरी दिखता क्या तेरेको...एकदम सही सही बोलता भिडू...अपुन एकदम जंटल लडकी है क्या...!"

"हे हे हे..."
"हसता क्या है चिकने..? टपोरी क्यों बोलता है मेरेको...?"

"बाई..चुकले माझे...तुला परत टपोरी नाही म्हणणार.... तुझ्या एवढी सोज्वळ मुलगी मला या भूतलावर सापडणार नाही..."

"आता कसं... एकदम झ्याक... ह्ये कायम लक्ष्यात ठेवायचं की ओ पाहुणें ..."
तिच्या या बोलण्यावर तो मोठमोठ्याने हसायला लागला..

"विहान..आई विचारत होती तुझ्याबद्दल..."
"सेम हियर.."
"म्हणजे...?"
"माझी आई पण तुझ्याबद्दल विचारत होती..."
"बघ..बघ..मी तुला म्हणत नव्हते का...?"
"काय..?"
"आपल्याला कोणी फॉलो करतंय.. त्याशिवाय का आपल्या घरी तोच मेनू येतो आणि आपल्या दोघांच्या आया तेच विचारतात..."

"संशयाच्या वादळी गर्तेत अडकलेल्या हे मुली, अतिविचारांचे भांडार तुझ्या मन बिंदूच्या केंद्रस्थानी का उगम पावत आहे जेणेकरून आपण अश्या नको त्या वैचारिक अवस्थेत स्वतःला अडकवून घेण्याची व्यर्थ धडपड, जैविक कष्टाला आमंत्रण देत आहे...निग्रहाचा अट्टाहास करून सामर्थ्यवान व्हावे ही नम्र विनंती..."

"क क काय काय ...काय? मला काहीच कळले नाही"

"मला तेच अपेक्षित आहे...हे कळण्यासाठी मला उद्या परत भेटावे...बाय!"

त्याने फोन ठेवल्यावर सुद्धा त्याच्या हसण्याचे आवाज तिच्या कानामध्ये घुमत होते..त्याचे बोलणे आठवण्याचा प्रयत्नात ती त्याला आज बाय म्हणायला सुद्धा विसरली होती...!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all