मिस्टर आणि मिसेस:- अंतिम भाग

And Finally Vihan And Namita Gets Married

महाबळेश्वर च्या रिजेंटा एमपीजी क्लब हॉटेल च्या मोठ्या लॉन वर एक शामियाना उभारला होता...गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे पडदे त्यात सोडले होते. ..यज्ञ कुंड मध्ये ठेवले होते आणि त्यात अग्नी छान पेटला होता..
मोजकी 100 लोकं होती...शामियान्याच्या बाजूने खुर्च्या ठेवलेल्या होत्या...त्या खुर्च्यांना पांढरी मखमली कव्हर्स टाकली होती..आजूबाजूला अप्रतिम कार्नेशन ची फुले, ऑर्किड डेकोरेशन आणि जासमीन फ्लॉवर्स लावलेली होती...शामियान्यात जाण्यासाठी 2 छोट्या पायऱ्या केल्या होत्या..


शामियान्याच्या पुढे एक रेशमी कापडाचा सोफा मांडला होता त्यावर विहान ची आई आणि त्याचा मामा बसला होता....नमिताची आई आणि बाबा शामियाना पाशी उभे होते....

गुरुजी लग्न या संकल्पनेचा अर्थ समजावून सांगत होते आणि त्यांच्या सांगण्या नुसार विहान आणि नमिता प्रत्येक वेळेला एकमेकांकडे बघून हलकेच हसत होते...त्या हसण्यात एक ग्वाही होती..एक शाश्वत पणा होता...आणि साथ निभावण्याची ताकद सुद्धा होती..

त्या सुंदर वातावरणात विधी पूर्ण झाल्यावर, लग्न घटिकेसाठी गुरुजींनी सगळ्यांना बोलावले...
मंगलाष्टके विहान च्या आईने फार छान म्हणाल्या..
शेवटी...तदैव लग्नम ...हा श्लोक जसा गुरुजींने म्हणून ते शुभमंगल सावधान म्हणाले, तसा जय पुढे झाला आणि त्याने विहान ला उचलले...

जय 5 फूट 11 इंच होता...विहान 6 फूट...त्यामुळे त्या शामियान्याच्या जवळपास छताला त्याचे डोके लागत होते...

सगळे जण टाळ्या वाजवत, जोरदार ओरडत उंच झालेल्या विहान ला बघण्यात मग्न झाले...नमिताच्या बाजूने तिला उचलायला कोणी आलेच नाही..

"सोडू नको जय....असाच ठेव..पकडून.." असे आवाज त्याला आले...तसा जय ने अजून त्याला उचलले..

"नमिता उडी मार उडी.. " तिच्या मैत्रिणीने आवाज दिला...पण नमिताची उडी थोडीच पोचणार होती...

शेवटी ती वाट पाहत बसली की विहान कधी खाली येतोय...पण जय पक्का होता...

"बोल..नमे..मला काय देणार..तर तुझ्या नवऱ्याला सोडतो..."
"जय.. सोड ना त्याला...प्लिज...." ती कळवळून म्हणाली..
"नाहीच मुळी..."
"दी....सांग ना त्याला..."

इतक्या वेळ मजा पाहत बसलेली निशा आता पुढे झाली आणि त्याच्या नकळत जयच्या पार्श्वभागावर जोरदार चिमटा काढला...

"ऐयोययोयो..." जय ओरडला आणि त्याने विहान ला खाली ठेवले आणि जोरजोरात पाठीमागे चोळायला लागला..

"कोणी चिमटा काढला...मला...?"
तसे सगळे हसायला लागले...
"ही चिटिंग आहे..."तो म्हणाला..
"चिटर सोबत चिटिंगच योग्य आहे.." नमिता म्हणाली.

विहान खालती आल्यावर नमिता ने त्याला लगेच हार घातला आणि येस-येस म्हणून नाचायला लागली...
मुलांच्या गमतीजमती पाहत सगळे हसत होते...

विहान ने सुद्धा नमिताच्या गळ्यात हार टाकला...
फुलांच्या पाकळ्या त्या दोघांच्या डोक्यावर पडल्या...अक्षता वापरण्याच्या ऐवजी त्यांनी फुलांचा वापर केला होता...

डेस्टिनेशन वेडिंग ही कल्पना जय आणि निशा ची...त्या रात्रीच त्यांनी ठरवले होते की विहान आणि नमिता चे लग्न डेस्टिनेशन वेडिंग करूयात...
पहिल्यांदा विहान नको नको करत होता पण जय ऐकण्याच्या तयारीत नव्हताच...गोवा का महाबळेश्वर फक्त त्याला एवढेच विहान कडून हवे होते..
शेवटी नमिता ने महाबळेश्वर फिक्स केले...

मालदीव च्या ट्रिप वरून आल्यानंतर पुढचे 2 महिने जय आणि निशा फक्त त्यांच्या लग्नाच्या तयारीत होते...प्रचंड उत्साहाने त्यांनी सगळे केले होते...

प्रोफेशनल व्हिडिओग्राफर सेलिब्रिटी फोटोग्राफर, फ्लोअर आरेंजमेंट करणारा, स्टेज डेकोरेशन वाला, केटरर्स, लोकेशन व्हेन्यू फिक्स करणारा सगळ्या लोकांशी जय दररोज बोलायचा...
दोन्ही बाजूच्या लोकांची लिस्ट फायनल झाली...

नुकतेच निशा च्या लग्नात सगळ्यांना बोलावले होते....त्यामुळे वेडिंग ला मोजके लोक कोण बोलवायचे हे ठरले..नंतर मुंबईत निवांत रिसेप्शन करायचे असे ठरले...

विहान साठी खास मोतीया कलरचा शेरवानी जय ने घेतला..तर स्नो व्हाईट कलरचा ब्रायडल ड्रेस नमिता साठी पसंत झाला...

जाण्या येण्यासाठी मुंबई ते महाबळेश्वर दोन मोठ्या लक्झरी वोल्वो बुक केल्या गेल्या...
सामान हे ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक तर्फे पाठवले गेले...

लग्नाचे सगळे जय आणि निशा बघत आहे पाहून विहानची आई आणि नमिताचे आई बाबा अगदी निश्चिन्त होते..त्यांच्या भेटी गाठी फक्त जेवणी खाणी आणि गप्पा यासाठी व्ह्यायच्या...!

दोन महिन्याच्या आत दोन लग्न याचे पहिल्यांदा नमिताच्या आई बाबांना टेन्शन आले होते पण जय आणि निशा यांनी सगळे अगदी इझी करून टाकले होते...

3 दिवस यांचा मुक्काम हॉटेल मध्ये होता..सगळे हॉटेल यांनी बुक करून ठेवले होते...मॉर्निंग टी, ब्रेकफास्ट, मिड मॉर्निंग स्नॅक्स अँड कॉफी, लंच, हाय टी स्नॅक्स, डिनर आणि मिडनाईट बुफे एवढी तयारी पाहुण्यांसाठी जय ने करून ठेवली होती...
चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स दर अर्ध्या तासाने वेटर्स घेऊन यायचे...सगळी सरबराई पाहून एकूण एक जण खूष होता...!

हळदी च्या प्रोग्रॅम मध्ये जय ने सगळ्यांसाठी गॉगल्स आणले होते..नमिता ला खांद्यावर उचलून हळदी साठी आणले...ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विहान ला लपवून ठेवले होते....जशी नमिता आली तसे विहान ला आणून सगळे जण हळद लावण्यासाठी तुटून पडले होते...

लग्नाच्या दिवशी सुद्धा जयने पुरुषांसाठी फेटे तर नमिता ने सगळ्या स्त्रियांसाठी खास नथ आणल्या होत्या..
लग्न जोरदार झाले...

जेवणात जवळपास 60 पदार्थ होते...सूप पासून ते डेझर्ट पर्यंत असा 7 कोर्स मिल होता..आलेला प्रत्येक जण तृप्त होत होता.

लग्न फारच उत्तम झाले..3 दिवस कसे गेले कोणाला कळलेच नाही...महाबळेश्वर सारखे ठिकाण, उत्तम लोकेशन, जबरदस्त जेवण आणि सर्वोत्कृष्ट आदरातिथ्य यामुळे प्रत्येक जण या लग्नाच्या बाबतीत भरभरून बोलत होता...

लग्न करून सगळे मुंबईत परतले तसे विहानच्या आईने जय आणि नमिताच्या पाठीवर थोपटले आणि त्यांचे कौतुक करत त्या म्हणाल्या, "तुम्ही अप्रतिम पद्धतीने लग्न करून दिले आहे...तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे..."
"काकू, तुला आवडले यात सगळे आले..." जय म्हणाला...
तसे आईने त्या दोघांना जवळ घेतले...

नमिताची आई आणि बाबा खूप आनंदी होते आणि रडत पण होते...!
विहान त्यावेळेस तिच्या आई बाबांजवळ आला आणि म्हणाला, "तुम्ही अजिबात रडू नका..मी नमूं ला सांगितले होते की तुझ्या आई बाबांना कधी एकटे वाटणार नाही..
मी आणि जय ने हा विचार मनात ठेवूनच एक गोष्ट केली आहे...
"काय...?" बाबांनी विचारले..
"तुमच्या घरा समोर अव्हेन्यू हाईट्स हा नविन टॉवर बनत आहे.."
"हो ..त्याचे काय..?"
"आम्ही दोघांनी शेजारी शेजारी फ्लॅट बुक केला आहे...2 महिन्यात पझेशन मिळेल... म्हणजे 2 ही बहिणी शेजारी शेजारी आणि तुम्ही अगदी समोर...ना दहिसर ना बोरिवली... कसलीच चिंता नाही..."

हे ऐकून नमिताच्या आईच्या डोळ्यात पाणी आले...
"पण तुझ्या आईला चालेल का...?" बाबांनी विचारले तसे विहान ची आई पुढे येत म्हणाली, "या बद्दल विहान आणि जय ने मला केव्हाच सांगितले आहे..."

काहीही न बोलता त्यांनी हात जोडले तसे त्यांचे हात पकडत विहान म्हणाला, "काळजी नसावी..आपण सगळे कायम सोबत आहोत..."

नमिता आणि निशा दोघेही आनंदाने रडत आईच्या गळ्यात पडल्या..

2 महिन्याच्या आत विहान ने बोरिवली तर जय ने दहिसर चा फ्लॅट विकला आणि नव्याने झालेल्या टॉवर मध्ये शिफ्ट झाले...
आई साठी विहान ने खास देवघरासहित एक मोठी रूम बनवून घेतली होती.
आता आई बाबांना खिडकीतून यांचे घर दिसायचे...

विहान ने जय ला प्रॉमिस केल्याप्रमाणे ताडदेव ला सरदार पावभाजी खायला घातली..इतके बटर पाहून जय खूष होता तर निशा आणि नमिता जयच्या वेडे पणाला मनापासून हसत होत्या...

सगळीकडे आनंद होता...
2 फ्लॅट्स शेजारी शेजारी होते....
एका फ्लॅट च्या नेमप्लेट वर लिहिले होते...


"वेलकम टु हाऊस ऑफ मिस्टर खोडकर आणि मिसेस मॅच्युअर्ड"
तर दुसऱ्या नेमप्लेट वर लिहिले होते
"वेलकम टु हाऊस ऑफ मिस्टर खडूस आणि मिसेस खादाड.."

रत्नागिरीच्या ट्रेन मध्ये सुरू झालेला त्यांचा प्रवास आज त्यांना इथं घेऊन आला होता....

दोन मिस्टर आणि दोन मिसेस आनंदाने आपापल्या घरात संसार करत होते...!

समाप्त!

©®अमित मेढेकर

पोस्ट स्क्रिप्ट:- जर वाचकांची ईच्छा असेल तर मिस्टर आणि मिसेस याचे दुसरे पर्व येणाऱ्या काळात नक्की सादर होईल.

🎭 Series Post

View all