मिस्टर आणि मिसेस :- पूर्व अंतिम भाग

Jay And Nisha Gets Wedded

झेंडूची तोरणे प्रवेशदाराला लावलेली होती, अत्तरांचा घमघमाट सगळीकडे दरवळत होता. फुलांच्या माळा आणि वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्यांचे सडे...जिकडे तिकडे लगबग आणि मधूनच ऐकू येणारे सनईचे सूर...हॅलोजन लाईट्स आणि स्पेशल बॅकग्राऊंड पडदा ज्यावर जय वेडस निशा असे लिहिलेले होते...असा तो सजलेला मॅरेज हॉल पूर्णपणे चमकत होता..आज पिंक थीम ठरवली होती लग्नामध्ये त्यामुळे वातावरण एकदम गुलाबी गुलाबी झाले होते.


पण त्याही पेक्षा चमकत होती ती म्हणजे निशा! गुलाबी रंगाचा स्पेशल शरारा, फ्लोरल डायमंड ज्वेलरी, ब्रायडल मेकअप आणि रचनात्मक हेयर स्टाईल .फाईन आर्टस् झाल्यामुळे नमिताची दृष्टी आर्टिस्टिक होती त्यामुळे तिच्या दी ला खास सजवण्यासाठी ती पुढे होती....मुळातच निशा खूप गोरी होती आणि त्यात आज तर तिच्यावरून नजर हटत नव्हती...!
आज लग्नाला अनेक लोकांना बोलावले होते त्यामुळे हॉल पूर्ण भरला होता.

सकाळी विधी च्या वेळेस निशा ने नऊवारी नेसली होती...पण आता लग्नाच्या वेळेस तिने केलेला मेकअप पाहून जय फ्लॅट झाला होता...स्टेज वर जाण्याच्या आधी जयने निशाला गाठलेच आणि हळूच म्हणाला, "मला काय वाटते निशु, आपण लग्न कॅन्सल करूयात..."

त्याच्या या बोलण्यावर निशा ने दचकून त्याच्याकडे पाहिले..."म्हणजे...?"

"म्हणजे डायरेक्ट आपण इथून हनिमूनला ला निघुयात...तुला पाहून मला आता राहवत नाही आहे ..."

त्याच्या या बोलण्यावर निशा प्रचंड लाजली..

"आयडिया कशी आहे...." त्याने विचारले
"जय, तुला कुठे काय बोलायचे ह्याचे कधीच भान नसते..."
"भान हरपून टाकणारी बायकोला घरी आणत आहे..कशाला भान ठेवण्याची याची गरज आहे.."

त्यांच्या या लुटुपुटू बोलण्याच्या मध्ये बरोबर नमिता आली..." काय जय...माझ्या दी ला पळवून न्यायचा विचार आहे का...?"

"कसली मनकवडी आहेस गं तू..." जय ने हसत तर निशा ने चकित होत तिच्या कडे पाहिले..

"मी नाही..तुझा मित्र...माझा विहू, तो मनकवडा आहे..तुम्ही हळूहळू बोलत असताना त्यानेच मला सांगितले की जय, निशा ला म्हणत असणार की पळून जाऊयात.. लग्न न करता.."

त्याच्या या बोलण्यावर जय मोठ्याने हसायला लागला..त्याने विहान कडे बघत "लव्ह यु ब्रो..." असे म्हणत हात केला..

"नमूं, या दोघांची वेवलेंथ बघता आपल्याला काही सिक्रेट ठेवताच येणार नाही गं..." निशा कपाळाला हात लावत म्हणाली..

"डोन्ट वरी दी...आपण कोड लँग्वेज मध्ये बोलु..." नमिता हसत म्हणाली..

तेवढ्यात मागून निशा ची आई आली आणि सगळे जण वरती स्टेज वर गेले...
स्टेज वरती सुद्धा जय चे काहीतरी खोड्या काढणे सुरूच होते...त्या अंतरपाटाच्या वरून बघ, कधी गुरुजींना सांग लवकर करा, कधी हळूच निशा -निशा असा आवाज कर असे त्याचे चालले होते...त्यामुळे पूर्ण स्टेज वर एक वेगळाच माहौल होता...

गुरुजींच्या मंत्र उच्चारात आणि अनेक लोकांच्या साक्षीने जय ने निशाच्या गळ्यात हार टाकला...सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट आणि टेप वर मस्त बँड चा आवाज सुरू झाला... या सगळ्यात लग्न लागले...

जय च्या वतीने त्याचे काही नातेवाईक आले होते पण वरमाई पासून सगळे विहानच्या आईने केले..

जय आणि निशा साठी सगळी शॉपिंग विहान आणि नमिता ने केली होती..स्वतःच्या लग्नाला बाजूला ठेऊन हे दोघे गेले दीड महिना फक्त यांच्या लग्नाच्या साठी तयारी करत होते..

लग्न लागल्यावर जय ने निशाला उचलून घेतले... आणि स्टेजवरच नाचून त्याचा आनंद व्यक्त केला..सगळे जण जय च्या जॉली मूड आणि सेन्स ऑफ ह्युमर चे कौतुक करत होते...

जेवणासाठी बुफे लागला होता फक्त या लोकांसाठी खास पंगत होती...जय, विहानच्या ऑफिस चे लोक, त्यांचे मित्र-मैत्रिणी या सर्वांसोबत भरपूर फोटो आणि धमाल चालले होते.

जेवणात मेनू जय च्या आवडीचा होता कारण निशा ने ऑलरेडी सांगितले होते की जय जो मेनू ठरवेल तो मला मान्य आहे...

त्यामुळे आज मँगो रबडी, ड्रायफ्रुट गुलाबजाम, डॉलर जिलबी, पुरी, पालक-बटाटा मिक्स भजी, भेंडी फ्राय, स्पेशल कुर्मा, मिक्स रायता, पापड कुरडई, मसाले भात आणि सोलकढी असा मेनू होता...

जेवताना जयला सांगितले की निशा ला भरव तसे त्याने एका चमच्यात गुलाबजाम, हातात जिलबी आणि दुसऱ्या हातात रबडी असे एकावेळीस निशा पाशी नेले...त्याचे हे वागणे पाहून सगळ्यांना हसू येत होते....
निशा ला हसताना खाता येणे शक्य नव्हते म्हणून ती जय ला हातानेच नको नको करत होती...

ती नको म्हणाली तसा जय विहान ला म्हणाला, "ही एकदा नाही म्हणली की माझ्या हातात एक जिलबी जास्त वाढव रे...दुसऱ्यांदा नाही म्हणाली की एक गुलाबजाम वाढव आणि अजून जर नाही म्हणाली तर रबडी चे अख्खे पातेले इथे आण ..मी बघतोच कसे खात नाही ते..."

तो पातेले खरंच आणेल या भीतीने निशाने सगळे खाल्ले आणि हळूच जयचे बोट चावले...

त्यानंतर उखाणा घ्यायला सांगितला...

पहिले निशा ने घेतला...
"गाण्याच्या सप्तसुरात असते तल्लीनतेची लय,
आयुष्य असेल आनंदी जेव्हा सोबत असेल जय...!"

तिच्या उखाण्याला सगळ्यांनी टाळ्या वाजवून भरभरून दाद दिली आता सगळ्यांचे लक्ष जय कडे होते की तो काय उखाणा घेत आहे...
जय ने सुरुवात केली,

"कधी कधी मी खूप होतो आनंदी, या सुंदर जीवनाचा प्रवास करताना....
आनंद होतो दुप्पट तेव्हा, निशा चावते माझे बोट जिलबीचा घास भरवताना..!"

त्याचा उखाणा ऐकून सगळ्यांनी शिट्ट्या टाळ्या चा हुर्रे सुरू केला...निशा मोठे डोळे करून बघत होती पण नंतर सगळे तिला बघत आहेत पाहुन ती लाजली....

जयच्या पाठीवर येऊन विहान ने थाप मारली आणि म्हणाला, "बघ निशा...तूला काय वाटले त्याला कळले नाही तू चावलेले..."

तसे निशा ने हात जोडून त्या दोघांना नमस्कार केला...

लग्न, जेवण झाल्यावर सगळे जण जायला निघाले...
विहान ने तिच्या आई बाबांना सुद्धा दहिसर ला त्याच्या घरी यायला सांगितले..
" उद्या सत्यनारायण पूजेसाठी येतो असे सांगून ते अंधेरीला गेले..."

दहिसर च्या घरी विहान आणि नमिता ने त्या दोघांचे स्वागत केले..सोबत विहानची आई पण होती..
पहिल्यांदा जाऊन त्यांनी आई बाबा आणि त्याचा मामा या सगळ्यांच्या फोटो पुढे हात जोडले...पहिल्यांदाच जय थोडासा भावुक झालेला निशा ने बघितले...तिने अलगद त्याचा हात पकडला...सांगायला की ती आहे कायम त्याच्या सोबत...!

सगळे जण नंतर हॉल मध्ये आले तसे विहान आणि नमिता ने त्यांच्या पुढे एक पाकीट धरले...

"आमच्या कडून लग्नाची एक छोटीशी भेट.."
त्यांनी उघडून बघितले तर "सोनेवा फुशी " या मालदीव मधल्या रिसोर्ट चे 7 दिवसाचे बुकिंग आणि सोबत मुंबई ते माले जायची यायची एअर तिकीट्स होती...

"बास का भाई...आम्ही जायचे आणि तुम्ही... काय मुंबईतच का..?"

"हे बघ जय, आमचे लग्न अजून व्हायचे आहे त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही... हां पण उद्याची पूजा झाली की परवा आपण भेटत आहोत लंच ला....ते सुद्धा गेटवेच्या ताज मध्ये..."

"ताज...ओहो काय विशेष...?" जय ने विचारले

"विशेष म्हणजे.....तुझ्या बायकोला मी प्रॉमिस केले होते...की पार्टी देईन ते सुद्धा ताज ला च...फाईव्ह स्टार मध्येच...म्हणून स्पेशल.."

"येहहहहह!....थँक्स विहान तुझ्या लक्षात आहे..." निशा म्हणाली..

"तर तुम्ही सामान भरायच्या तयारीला लागा कारण परवा रात्री तुमची फ्लाईट आहे.." विहान म्हणाला.

त्या दिवशी सगळे जण बरेच दमले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर गुरुजी येणार होते म्हणून सगळ्यांनीच आटोपते घेतले...!

दुसऱ्या दिवशी निशा चे आई बाबा लवकर आले...
गुरुजी त्यांच्या सोबतच आले...
आल्या आल्या निशा आईच्या गळ्यात पडली..

"किती सुंदर दिसत आहे गं माझी पोर...दोन्ही हाताला मेंदी, हातात बांगड्या आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुझे हे मंगळसूत्र... कायम खूष राहा दोघेही " असे म्हणून
आईने तिच्या वरून नजर उतरवून बोटे मोडली..

तसे नमिता धावत आली आणि म्हणाली, "आई माझी पण....माझी पण..."
तिच्या इनोसंट पणाला हसत आईने तिच्या वरून पण बोटे ओवाळून टाकली..

विहानच्या आईने पूजेची तयारी केली होतीच आणि गुरुजी बाकी सगळे घेऊन आले होते त्यामुळे सत्यनारायण पूजा व्यवस्थित पणे पार पडली...
सोबत काही निशाकडचे नातेवाईक पण आले होते..
जेवण आज बाहेरूनच मागवले होते...!

सगळे झाल्यावर संध्याकाळी निघताना निशाची आई रडायला लागली.. तसे निशा ने आईला घट्ट पकडले आणि म्हणाली, " आई मी इथंच आहे आता..रत्नागिरी ला सुद्धा नाही ...आणि आता आपल्याला नमूं चे लग्न पण मस्त करायचे आहे तर रडून कसे चालेल..."

आईने मान डोलावली आणि म्हणाली, "रडत नाही गं मी निशु...आनंदाश्रू आहेत...सुखी राहा...माझ्या पिल्लू..." असे म्हणून आईने निशाला घट्ट पकडले...त्या दोघी मिठीत बऱ्याच वेळ मूकपणे रडत होत्या...!

आई बाबा गेल्यावर विहान आणि नमिता ने त्यांची रूम सजवायला घेतली आणि त्यांना एकदम छान फील करून दिले...
रात्री विहान आई आणि नमिता सगळे जण घरी गेले...
जय आणि निशा दोघेच राहिले...!

जय ने निशाला उचलून घेतले आणि रूम मध्ये घेऊन गेला..

"निशु...थँक्स सो मंच.."
"का थँक्स..?"
"या माकडाशी लग्न केल्याबद्दल..."
"तुला पण थँक्स...जय..
"का..?"
"मला तुझी माकडीण बनविल्याबद्दल.."
तसे दोघेही हसले..

त्यांनी त्या रूम कडे पाहिले...,फुलांच्या माळा, गादीवर डेकोरेशन, गुलाब पाकळ्या अश्या उत्तम पध्दतीने रूम सजवली होती...

"निशु... आपल्या लग्ना साठी नमिता आणि विहान या दोघांनी दिवस रात्र एक करून काम केले आहे आणि भरपूर झटले सुद्धा आहेत...आता आपली रिस्पॉन्सीबिलिटी की त्यांचे लग्न आपण छान लावून द्यायचे..."

"अगदी मनातलं बोललास जय...आपण त्यांचे लग्न ही तेवढेच उत्तम करूयात जेवढे आपले झाले..."

"मिशन विहानमिता...ऍक्टिवेटेड..."
"येस बॉस..."

एकमेकांच्या मिठीत शिरण्याच्या आधी हे त्यांचे शेवटचे वाक्य होते...


क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all