हरवलेलं प्रेमपत्र

How a love letter changes life

सिद्धी भुरके ©®

संध्याकाळी साधारण ७ वाजायची वेळ होती आणि राधाताईंच्या दारावरची बेल वाजली. दार उघडुन बघतात तर समोर त्यांची मुलगी सायली होती.
"सायली काय गं? अशी अचानक? ठीके ना सगळं?" राधाताईंनी काळजीने विचारलं.
"हो गं आई.. जरा ब्रेक हवा होता म्हणून आले दोन चार दिवस माहेरी. "सायलीने उत्तर दिले.
"अच्छा.. ये ना बाळ.. चांगली मनसोक्त रहा.. आणि आराम कर.जा फ्रेश होऊन ये.. तुला चहा ठेवते. "म्हणत राधाताई किचनमधे गेल्या.
थोड्या वेळाने मायलेकी चहा पीत गप्पा मारत बसल्या.
"काय गं सायली.. पुढच्या महिन्यात तुमच्या लग्नाला वर्ष होईल ना.. किती भरभर दिवस गेले ना.. "
"हो.. पण साकेतला त्याचं काही कौतुक नाहीये. लग्नाचा पहिला वाढदिवस चांगल्या रोमँटिक जागी जाऊन साजरा करायचा असं मला वाटतं होतं पण त्याला असं काही सुचतच नाही. एकमेकांना वेळ देऊ.. कुठे फिरायला जाण्यापेक्षा एकमेकांसोबत राहू असे विचार याचे. मग काय माझं पण जाम डोकं फिरलं आणि भांडण वाढत गेलं.. मग शेवटी मी त्याला बोलले बास आता.. मला एक दोन दिवस तुझ्यापासून ब्रेक दे आता. म्हणून आले गं मी आई इथे. एवढा महत्वाचा दिवस खरंतर याने किती काय स्पेशल केलं पाहिजे.. सारखा येणार आहे का लग्नाचा पहिला वाढदिवस?  " सायलीने आईकडे आपलं मन मोकळं केलं.
"अगं सायली काय हे.. असं साताजन्माच्या नात्यातून ब्रेक कोणी घेतं का??  कामातून ब्रेक मी समजू शकते.. पण नात्यात पण ब्रेक असतो आज मला पहिल्यांदा समजलं आणि एखादा दिवस स्पेशल करण्यापेक्षा एकमेकांच्या साथीने रोजचा दिवस स्पेशल करणे याला प्रेम म्हणतात."
"आई आता प्लीज तू लेक्चर देऊ नकोस. मला तुझी प्रेमाची व्याख्या पटतच नाही बघ. बरं ऐक ना उद्या ऑफिसमध्ये ट्रॅडिशनल डे आहे. मला तुझी बनारसी साडी दे ना.. " म्हणत सायलीने विषय बदलला.
"अगं जा घे कपाटातून.. तोपर्यंत मी पोहे बनवते",  मुलीच्या अल्लडपणाचा विचार करत राधाताई पोह्यची तयारी करू लागल्या.

इथे सायलीने आईचे कपाट उघडले. आईची बनारसी साडी तर तिला फार आवडत असे. सायलीने साडी बाहेर काढली. अंगावर टाकून बघायला ती उघडली.. तोच साडीमधून एक डायरी खाली पडली. तिने ती उघडली तर त्यात तिला एक पत्र सापडले. 'प्रिय राधा' अशी सुरुवात असणारं ते पत्र आईचं होतं. सायलीने लगेच आईला आवाज दिला. "आई अगं आई... हे बघ मला काय सापडलंय.. लवकर ये"...
सायलीचा आवाज ऐकून राधाताई लगबगीने खोलीत आल्या. "अगं काय झालं?? काय सापडलं?? "
"आई हे बघ.. मला तुझं आणि बाबाचं प्रेम पत्र सापडलंय.. "
राधाताईंनी लागलीच ते पत्र हातात घेतलं.. पाहिलं तर ते त्यांचं हरवलेल पत्र होतं.
"अगं बाई.. कुठे सापडलं तुला?? किती दिवस शोधत होते मी.. "असं म्हणून त्यांनी ते उराशी कवटाळलं.
सायलीला हे सगळं बघून हसूच आलं.
"मला माहितीये तुझं आणि बाबाचं लव्ह मॅरेज आहे.. पण इतकं काय आहे त्या पत्रात?? "
"तुला नाही समजणार.. या पत्रामुळेच आमचं लग्न झालं.. म्हणून खूप खूप स्पेशल आहे ते."
राधाताई म्हणाल्या.
"आई अगं प्लीज प्लीज मला तुमची लव्ह स्टोरी सांग ना गं.. "
"पुरे गं सायली थट्टा.. मला कामं आहेत.. येते मी.. "
"आई अगं सांग ना.. असं काय कारतीयेस.. "म्हणत सायलीने आग्रह केला तशा राधाताई तयार झाल्या.

"फार काही सांगण्यासारखं नाहीये.. खूप साधी सरळ गोष्ट आहे ही.. मी कॉलेजला शिकायला होते तेव्हा आमच्या वाड्याशेजारी नवीन बिर्ऱ्हाड आलं राहायला. ते म्हणजे तुझ्या बाबाची आत्त्या होती. तुझा बाबा मुंबईत शिकायला होता. पाच सहा महिन्यांनी यायचे ते आत्त्याला भेटायला तेव्हा मी त्यांना पाहिलं होतं. काय दिसायचे ते.. बेल बॉटम, प्रिंटेड शर्ट घालून एखाद्या हिरो सारखे अगदी. मग जाता येता आमची ओळख झाली.. मैत्री झाली आणि आम्ही एकमेकांना आवडायला लागलो. खूप दिवस वाट पहिली मी हे आत्ता सांगतील.. मग सांगतील मनातली गोष्ट.पण छे हे माझ्यापेक्षा जास्त शामुळ आणि लाजरे. शेवटी मीच त्यांना सांगितलं मला तुम्ही आवडता ते.. आणि यांनी मुलीसारखी होकारार्थी मान डोलावली. "
"भारीच आई.. तू बाबाला प्रपोज केलंस.. किती छान.. !!"सायली म्हणाली.
"हो.. मग काय फार अबोल होते हे.. रोज रोज भेटत नसू आम्ही. कधी चार पाच महिन्यांनी हे पुण्याला आले कि आमची भेट होत असे. त्या वेळी आत्ता सारखं मोबाईल वगैरे प्रकरण नव्हतं. एकमेकांशी संवाद साधायचं साधन म्हणजे पत्र होतं. पत्राने एकमेकांची खुशाली समजायची. पत्रातूनच शब्दरूपी भावना बोलायच्या. माझी यांना दोन पानी पत्र असायची तर यांचं पत्र चार ओळींचं पण नसायचं.. बघता बघता दिवस पुढे गेले. माझं बी. ए. पूर्ण झालं आणि घरात लग्नाची बोलणी सुरु झाली. मला तर काही सुचेना. घरी सांगायची हिम्मत नव्हती माझ्यात. शेवटी हे नातं इथेच थांबवायचा निर्णय घेतला मी. तसं पत्र लिहून कळवलं यांना.. खूप वाईट वाटलं होतं मला. पण तो काळ वेगळा होता. तेव्हा प्रेम विवाह होणं सोपं नव्हतं. "

"मग??? बाबाने काय केलं?? "
सायलीने उत्सुकतेनं विचारलं.
"मग यांनी मला हे पत्र पाठवलं आणि अबोल असणारा तुझा बाबा या पत्राने बोलता झाला. या पत्राने माझं आयुष्यच बदलून गेलं. तू म्हणशील तर तुला वाचून दाखवते."सायलीने होकारार्थी मान हलवली तसं राधाताई पत्र वाचू लागल्या.
"प्रिय राधा,
         तू भेटलीस कि खूप काही सांगायचं असतं तुला पण हे शब्द साथच देत नाहीत. बऱ्याचदा वेळेचं कारण देऊन माझ्या अबोल्याने वेळ मारून नेली. पण आज मी खूप बोलणार आहे तुझ्याशी. कुणाचीतरी आठवण येणं हे जर  प्रेम असतं,  दिवसरात्र त्याचाच विचार करणं हे जर प्रेम असतं, तुझ्या एका नजरेसाठी व्याकुळ होणं म्हणजे प्रेम असतं..तर  हेच प्रेम आहे माझं तुझ्यावर.      
        खूप वाईट वाटलं तुझा निर्णय ऐकून. पण मी तुला काही बोलणार नाही कारण तुझ्या काही अडचणी असतील त्याशिवाय तू असा निर्णय घेणार नाहीस हे मी चांगलंच जाणतो. पण मला एक संधी दे स्वतःला सिद्ध करण्याची. मला आत्ता नोकरी नाही,  तुझ्यासारखं मोठं घर नाही माझ्याकडे आणि तुझ्याशी लग्न कसं करू मी? कसा संसार करणार आपण?असे विचार येतात माझ्या मनात. पण खरं सांगू हि तारेवरची कसरत तुझ्या साथीने सोपी होईल, एकमेकांची सुख दुःख पण आपण अलगत पापण्यांनी वेचू गं.. प्रेमाच्या शब्दांनी भाजी भाकरी पण गोड करू गं.. घर किती मोठ आहे हे नको बघूस.. त्या घरात तूच सुख आणशील याची खात्री आहे मला.. मिळून अवघड मार्ग सोपा करू.. सगळ्यांना हेवा वाटेल असा संसार करू. तू हो म्हणशील तर येईन मी तुझ्या घरी मागणी घालायला. तुझ्या उत्तराची वाट पाहतोय मी..
                                                            तुझाच,
                                                             शैलेश "
पत्र वाचताना राधाताईंच्या भावना दाटून अश्रुरुपाने ओझरत्या झाल्या.. त्या पुढे बोलू लागल्या,
"पत्र वाचून मी यांना होकार कळवला. हे रीतसर मला मागणी घालायला आले. माझ्या वडिलांना  यांच्या डोळ्यातील चमक दिसली, काहीतरी करून दाखवायची जिद्द दिसली.. त्यांनी होकार दिला आणि आमचं लग्न झालं. "
"वा.. कसली मस्त स्टोरी आहे तुमची आई "..सायली म्हणाली.

"अगं हा काय दि एन्ड नाहीये बाळा.. लग्नानंतर तर खरी परीक्षा सुरु झाली. २०० स्क्वेअर फूटची खोली ते आज २००० स्क्वेअर फुटचा फ्लॅटचा प्रवास सोपा नव्हता. पण एकमेकांच्या साथीने तो अशक्य पण नव्हता. सायली बाळा संसार सांभाळणं म्हणजे आपल्यावर आलेली जबादारी ओळखुन समजंसपणे वागणे.. एकमेकांच्या आवडी निवडी जपणे.. छोट्या गोष्टीवर न भांडता  समोरच्याला समजून घेणं असतं गं. या मार्गात दुःखाचे चटके पण सोसावे लागतात पण त्यातून सुखाचा मार्ग पण आपल्यालाच शोधावा लागतो. आणि प्रेम आणि  विश्वासाची ताकद इतकी आहे कि पर्वत पण हलवू शकेल. कोणतीही तक्रार न करता व्यक्त होणाऱ्या प्रेमाला कोणत्या रोमँटिक जागेची आणि दिवसाची गरज नसते. मी मगाशी म्हंटल तसं एकमेकांच्या साथीने हर एक दिवस स्पेशल बनवणे म्हणजे प्रेम.. "
सायली खजिल झाली. तिला आज नव्याने प्रेमाची व्याख्या समजली होती. इतके दिवस आपण खरचं साकेतवर प्रेम करत होतो का असा तिला प्रश्न पडला.
तिने जाऊन आईला मिठी मारली.

"आई चुकलं गं माझं.. मी तुझ्यासारखा कधीच विचार केला नाही गं संसाराचा. मला कस सगळं इन्स्टंट पाहिजे होतं..  एकमेकांच्या चुका काढण्यातच इतके दिवस गेले आमचे. पण आता या पुढे तू जसं खंबीरपणे बाबाची साथ दिलीस तशीच मी साकेतसोबत उभी असणारे.
खरंच या पत्रामुळे आज माझे डोळे उघडले.. "

तेवढ्यात दारावरची बेल वाजली तशा मायलेकी भानावर आल्या. राधाताईंनी दार उघडले तर सायलीचे बाबा आले होते.
"अगं काय गं.. किती वेळ दार उघडायला? "
"अहो तुमची राजकन्या आलीये ना.. तिच्याशी गप्पा मारत होते. "
"काय सांगताय...  मग होऊन जाऊ दे मग आज बासुंदी पुरीचा बेत.. काय गं सायली.. "सायलीचे बाबा म्हणाले.
"नाही.. तुम्ही दोघे छान आवरून आत्ता बाहेर जेवायला जाणार आहात. तुमच्यासाठी टेबल बुक केलं आहे मी. "सायली म्हणाली.
"अगं तू चार दिवस आलीयेस तर तुला खायला घालू दे कि.. आम्ही नाही जाणारे कुठे.. "राधाताईंनी नकार दिला.
"हो बाळा तुझ्यासोबत थांबतो इथे .. आणि आज काही स्पेशल नाहीये डिनरला जायला.."सायलीचे बाबा म्हणाले.
"बाबा नात्यात प्रत्येक दिवस स्पेशल बनवणे हे आपल्याच हातात असतं हे आजच शिकलीये मी.. आणि मी पिझ्झा ऑर्डर केला आहे माझ्यासाठी.. मला काही माहित नाही.. तुम्ही जाणार आहात.. नाहीतर मी बोलणार नाही. "

आता मुलीच्या हट्टासमोर दोघे काही बोलू शकले नाही आणि बाहेर गेले. आज ते हरवलेलं पत्र पुन्हा आपल्यासोबत गोड आठवणी घेऊन आलं होतं.पत्रामुळे सायलीचे आई वडील ३० वर्ष मागे जाऊन जुन्या आठवणीत रमून गेले होते.
आणि इथे सायलीने आपल्या नवऱ्याला फोन लावला..
"हॅलो साकेत.. सॉरी.. मी उगाच चिडले तुझ्यावर.. "
"नाही अगं..माझं पण चुकलं.. मला पण नंतर वाटलं आपण जाऊ कुठेतरी फिरायला.. कुठे जायचं सांग.. लगेच बुकिंग करतो.. "साकेत म्हणाला.
"नाही नाही.. आपण एनिवर्सरीला  फक्त आणि फक्त एकमेकांना वेळ द्यायचा.. मला नाही जायच कुठे.. बास तुझ्यासोबत राहायचं आहे.."
"सायली अगं रोमॅंटिक मूवी वगैरे बघून आलीस कि काय..? "
"हो तसंच समज.. साधारण ८० च्या दशकातला खूप सुंदर सिनेमा पाहिलाय मी आज... येते मी उद्या घरी." सायली म्हणाली.
"अगं रहा थोडे दिवस.. तेवढाच तुला ब्रेक.. " साकेत बोलला.
"नाही.. मला काही नाही पटलं तर यापुढे ते मी तुला लगेच सांगणार पण अस नात्यात ब्रेक घेऊन पळून नाही जाणार.. तुझी आयुष्यभर साथ देणार.. चल भेटू उद्या " म्हणत सायलीने फोन ठेवला.

30 वर्ष जुन्या  प्रेम पत्राने आज सायलीला खऱ्या प्रेमाची आणि संसाराची व्याख्या समजली होती.नकळत ती तिचे आवडते गाणं गुणगुणू लागली आणि साकेतचा विचार करू करू लागली..
"सौ असमानो को और दो जहानो को छोड के आयी तेरे पास.... "

सिद्धी भुरके ©®

कथा आवडल्यास like आणि कमेंट नक्की करा.