सुटलेली ट्रेन भाग 1

लव्ह....
मेघा तिच्या नेहमीच्या ट्रेनने ऑफिसला चालली होती. डाउनलोड केलेली गाणी कधी ऐकावीशी नव्हती वाटत तिला. म्हणूनच मोबाईल सुद्धा ज्यात एफ एमची सोय असेल असाच घेतला होता. त्या मध्ये मध्ये जाणाऱ्या, खरखर करणाऱ्या आवाजात ती जणू मधहोश व्हायची. RJ ची बडबड, आणि मग लागणारी गाणी ऐकत, आपल्या नेहमीच्या ट्रेन मधल्या मैत्रिणींशी गप्पा मारत प्रवास करणं आवडायचं तिला.


तिच्या स्टेशनपुढचं स्टेशन सुटलं, नि ही गझल कानावर पडली.....

'ग़म का ख़ज़ाना तेरा भी है मेरा भी
ये नज़राना तेरा भी है मेरा भी...'

कानात ते शब्द पडले आणि ही अंगअंग शहारली. एक जुनी खपली धरलेली जखम परत भळभळायला लागली. त्या प्रत्येक शब्दागणिक तो गेलेला एकेक क्षण नजरेसमोर आला.... आणि हिचा चेहरा वेडवाकडा झाला.....

"काय ग... काय झालं? बरी आहेस ना?" बाजूनं एकीने विचारलं.

"अं... हो... हो... काही नाही...."

"नक्की ना?"

"हो ग.... डोन्ट वरी...."

म्हटलं तर खरं तिने..... पण काहीतरी होतं.... आत रुतलेलं.....

१० वर्षे मागे गेली ती..... कॉलेजचं दुसरं वर्ष.... अल्लड वयातलं प्रेम.... पण प्रत्येक बाबतीत सावरलेलं.... स्पर्शाने नाही तर भावनेनं ओथांबलेलं......

आकाश.... तिच्याआधी दोन स्टेशन चढायचा ट्रेन मध्ये. डब्बे वेगळे.... पण ट्रेन एकच.... मग स्टेशन वर उतरून जोडीनं कॉलेज..... रोजचा शिरस्ता.... चुकला नाही कधीच..... नुकतेच नोकिया आणि मोटोरोला चे कीबोर्ड वाले मोबाईल सर्रास वापरले जाऊ लागले होते. एफ एम..... तिचं त्यातलं सर्वात आवडतं फिचर!

त्याला सक्त ताकीद होती, गाडीत असताना नो कॉल.... ओन्ली मुसिक! त्यानेही कधी तिला तिच्या या आनंदापासून दुर केलं नाही. वाट बघायचा तो स्टेशनला उतरून. मगच इअरफोन निघायचा तिचा....

त्या दिवशी सकाळपासून रडकी गाणी लागली होती एफ एम वर.... पण तिला आवडायची गाणी.... मनाला भिडणारी..... डायरेक्ट मनाचा वेध घेणारी.... मग ती प्रेमाची असो की विरहाची...... त्यातले शब्द जोपासायची.... जगायची.....

पण त्या दिवशी ही गझल कानावर पडली आणि तेव्हापासून ही गझल तिच्या मनावर घर आणि वार दोन्हीही करुन गेली.... कायमची.....

🎭 Series Post

View all