मिस. किमया

This story based on the girl who changed her dreams for her family....

            मिस. किमया

  "किमया बेटा कुठे आहेस? आपल्याला कार्यक्रमाला जायला उशीर होईल. आवर पटकन. आजच्या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती आहेस तू. तूच उशीर केलास तर चांगलं नाही दिसणार." उत्तमराव बोलले.

  "हो बाबा मी झाले तयार ही काकू बघा ना मला नुसती खाऊ घालत आहे. नीट मेकअप पण करू देत नाही. स्वतः बघा किती छान मेकअप केला आहे." आणि खोलीतून बाहेर येते. तिने मस्तपैकी तयारी केली होती. गर्द जांभळ्या रंगाच्या चुडीदार ड्रेसमध्ये तिचा गव्हाळ वर्ण खुलून दिसत होता. नेहमी जिन्स टाॅप किंवा स्कर्ट घालणारी किमया आज खूपच गोड दिसत होती. "अहो भाऊजी, एका सॅण्डविचवर कसं पोट कसं भरेल पोरीचं.. आणि आजकाल काय ते मेलं डाएटचं फॅड आलंय..!" काकू बोलत होती.

"हे काय बाबा! तुम्ही विसरलात का तुम्ही मिस. किमयाचे बाबा आहात. तुम्ही हा फिरोजी रंगाचा कुर्ता का घातला? तुम्हाला माहित आहे ना मला हा रंग नाही आवडत. आत्ताच्या आत्ता जाऊन तो लाल रंगाचा कुर्ता घाला. काकांनी बघा मी सांगितलेला पिवळाच कुर्ता घातला उठा पटकन." लेकीचा  आदेश ऐकून तिचे  बाबा म्हणजेच उत्तमराव खोलीत जाऊन तिच्या आवडीचा कुर्ता घालून हजर झाले. 

"भावोजी! तुम्ही पण ना! किमू आता मोठी झाली आहे. जरा तरी तिच्याशी शिस्तीत वागत जा. एवढे अतिलाड बरे नव्हे. सासरी गेल्यावर कसं होईल हिचं..? एकतर आईविना लेकरू आहे. तिचा कोणी तिरस्कार केला तर..? जीवाची घालमेल होते...  " काकू बोलली.

"राहू दे गं वहिनी! तिची इतकी काळजी करू नकोस. शहाणं आहे माझं बाळ...! तू काही तिच्या आईपेक्षा कमी नाहीस. आणि लाडाचं बोलतेस तर माझ्या जगण्याचं एकमेव कारण आहे ती. तिचं नाही ऐकणार तर कोणाचं ऐकणार मी....? चल मी आवरून येतो नाहीतर या मिस. किमया  रूसतील पुन्हा...!" उत्तमराव बोलले.
      
    किमया उत्तमराव पाटलांची एकुलती एक मुलगी! आणि भरलेल्या कुटूंबातले शेंडेफळ! किमया जन्माला आली आणि महिन्याभरातच तिच्या आईला म्हणजेच लक्ष्मीला देवाज्ञा झाली. उत्तमरावांच्या घराच्यांनी त्यांना लग्न करण्यासाठी खूप तगादा लावला पण त्यांनी किमयाच्या नशिबी सावत्रपण येऊ नये म्हणून लग्नच केले नाही.  

घरामध्ये आजी आजोबा,  काका काकू आणि बाबा तिला खूप जपत. किमया हळूहळू मोठी होत होती. अभ्यासासोबत नृत्याचीही तिला भारी आवड होती. 

इयत्ता दुसरीत असताना शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात तिने न घाबरता नृत्यातून  गणेशवंदना सादर केली. तिचे नृत्यकौशल्या  हौसेने उत्तमरावांनी तिच्यासाठी डान्स क्लासचा फाॅर्म आणला पण घरातल्या वरीष्ठांना हे पटले नाही.

पाटलांच्या घरातल्या मुलीला नाचाची थेरं शोभणार नाही हे त्यांचे स्पष्ट मत होते. तरीही न जुमानता उत्तमरावांनी तिला कथ्थकच्या क्लासला पाठवायला सुरूवात केली.

पहिले काही दिवस सगळे सुरळीत सुरु होते पण नंतर किमयाचे नृत्य शिकणे हा वादाचा विषय होत होता. एके दिवशी किमयाचे आजोबा म्हणजेच उत्तमरावांच्या वडिलांनी सांगितले, "माझी नात ते नाच वगैरे शिकणार नाही. त्यापेक्षा तिला स्वयंपाक शिकवा आणि ती शाळा, महाविद्यालयात जाऊन शिकली तरी मला काही हरकत नाही. आजपासून निधी त्या शिकवणीला अजिबात जाणार नाही." 

उत्तमरावांचे वडील म्हणजे स्वभावाने खूप कडक! कोणाचेही त्यांच्यापुढे काहीच चालत नसे. त्या दिवसापासून घरामध्ये किमयाचा डान्स हा विषय कायमचाच बंद झाला आणि तिने शाळेत नृत्यात सहभाग घेणे टाळले ते कायमचेच. 

********
    आजचा दिवस
     किमया एका उच्चभ्रू अशा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि नेहमीप्रमाणे शाळेसारखा काॅलेजातही तिने वरचा क्रमांक कधीच सोडला नाही.  आज तिचा सत्कार समारोह  होता. 

तिच्या अभ्याससाठी नव्हे तर तिने लिहीलेल्या पुस्तकासाठी, ज्या पहिल्यावहिल्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले होते. म्हणून आज तिचा जाहीर सत्कार करण्यात आला होता.

तिला ह्या पुस्तकाचे जितके मानधन मिळाले होते ते सारे तिने एका अनाथ आश्रमाला दान दिले होते.  उत्तमराव कौतुकाने लेकीकडे बघत होते. 

आजकालच्या जगात सध्याची तरूण पिढी आपले करिअर आणि एन्जॉयमेन्ट यापलिकडे कसलाच विचार करत नाहीत; त्या वयात आपली लेक दुसर्‍या लोकांचे दुःख समजून आपल्या परीने मदत करण्याचा  प्रयत्न करत आहे ह्याचे उत्तमरावांना भारी अप्रूप वाटत होते. 

तिच्या लहानपणापासून उत्तमरावांना एक गोष्ट सलत होती की घरच्यांच्या मर्जीखातर आपण आपल्याच लेकीच्या कलेला डावलले. 

तेव्हा त्याच छोट्याश्या लेकीने निरागसपणे दिलेले उत्तर,  'बाबा! जाऊदे मी डान्स नाही शिकणार. आजोबा ओरडतील मला. पण मी एक दिवस असं काम करेन ज्या कामामुळे तुम्हाला माझा अभिमान वाटेल आणि जे मला पण करायला आवडेल.' त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी लिहीणारी माझी परी पुस्तक लिहील हे त्यांना कौतुकास्पद होते. 

मनातल्या मनात ते बोलले,  ' आज माझी किमया एक लेखिका झाली आहे. नाही शिकली  नृत्य तर बिघडलं कुठे? ' असे म्हणून डोळ्यात आलेले पाणी हाताने टिपून किमयाकडे  बघितले तर खूप जण तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तर काही जण ऑटोग्राफ घेण्यासाठी तिच्या भोवती गराडा घालून उभे होते.  उत्तमराव  स्वतःच्या मोबाईलमध्ये ह्या सोनेरी क्षणाच्या आठवणी साठवत होते. 

~ ऋचा निलिमा