मिशा

मौजे येडे पिपळगाव मधील एक धम्माल कथा

सक्काळी सक्काळी कोंबडं आरवल आन आळूख पिळूख देत सर्जेराव उठला.सर्जेराव म्हंजी लै भारी प्रकरण बरं का! म्हणायला पैलवान पण रुबाब फकस्त घरीच.बायकू कुठं दिसना?तवा पोरीला म्हणला,"काय ग चिमणे आय कुठंय तुझी?". आता चिमणी म्हंजी सर्जेरावांची पोरगी बोलालीच,आय मिटींगला गेलीय ,संगीतामावशी न बोलीवल व्हतं".पैलवानाच डोस्क फिरलं,"आयला ह्या संगीच्या ,कसल्या मिटिंगा घिती काय माहित?सर्जा तसाच उठला आन आंघुळ करून त्यानं गण्या शिर्के च्या हाटीलाची वाट धरली. च्या पायचा म्हणून. बघतो त समदी गॅंग हजर. तुका ,रामा, शिरपा , जना .गण्या न लांबन हाळी दिली,"पैलवान या !"त्यो येऊन टेकला तवर रामा बोलला,"ह्या संगीच्या मीटिंग मूळ च्या बी मिळाला न्हाय रे! संगीता गावातली अंगणवाडी कार्यकर्ती आणि खूप समजूतदार असणारी होती.पण ह्या गॅंग ला ती सलायची.समदे च्या डोसून घरी गेले.सर्जेराव बायकोकड बघत म्हणला,"मला वाटलं आता जेवान बी बाहीरच का काय".त्याबरोबर पारू म्हणली, "आता एक दिस च्या नाय मिळाला तर काय बॅरिस्टर नाराज का काय? आण च्या पिऊन तर कुठं हाफ़ीस गाठायचं हाय". मग सर्जा चिडला,"तू लै पराक्रम करायला गेलती न्हवं! बघचाल च तुमी! पारू टेचात म्हणाली. सर्जेराव न जेवता बाहेर पडला.पारावर मंडळी जमली व्हतीच.लगीच बी बी शी चायनल शिरप्यान बातमी फोडली,"संगी आन गावातल्या बाया मिळून दूध डेअरी काढणार हायेत".आता आपुन हातपाय हालवाय पायजे गड्यानो! सर्जा म्हणला अरे आपुन बी करू किं कायतरी.सगळे दोस्त म्हणाले बराबर हाय.संध्याकाळी सर्जा पारू ला म्हणला,"पारे, हे काय लावलं आहे गं! तुमाला जमणार हाय का डेअरी ? पारू हसत म्हणाली,"तरी म्हणलं बातमी फुटली कशी न्हाई? सर्जा परत म्हणाला,"पारे आग नुसता गट चालवता ते येगळ आणि धंदा येगळा".ते बायांच काम न्हाई".पारू मग मात्र चिडली आणि म्हणली ,सा महिन किती सा महीन बघा करून दावतो का नाय".तुमच्याच उनाड मंडळाला काय जमत न्हाय ते बघा".सर्जेराव मिशिवर पीळ देत म्हणला, "पारे दोस्तांना बोलायचं न्हाय आपल्या न्हाय तुमच्या वरचढ काम केलं तर आमी मिश्या काढू आमच्या". "बघा हा!मागणं बदलू नका म्हंजी झालं! सर्जेराव म्हणाला," शब्दात बदल तर ××××" आता ही बातमी वणव्या सारखी अख्ख्या येडे पिपळगावात पसरली. संगीताच्या मार्गदर्शनाखाली डेअरी सुरु झाली.तिकडं सर्जेरावाच्या पुढाकाराने पोल्ट्री सुरु झाली.बाया प्रामाणिक कष्ट करत व्ह्त्या .इकडं पोल्ट्रीत कोंबड्या पार्टी करायला जात व्ह्त्या.अधून मधून सगळे एकमेकांचा अंदाज घेत व्हतेच.आणि आज त्यो सहा महिने झाल्याचा दिस उगवला .बँकिंत संगीता आणि सर्जेराव दोघ बी पोचले.इकडं गावात गणू शिरक्याच्या हाटीलात समदी मंडळी वाट बघत व्हती. चार ची एस टि आली.पयली संगीता उतरली. आणि मंग उतरला आमचा पैलवान पर तोंडाव पटका बांधून.गण्या म्हणाला ,"फटाके तयार हायीत पन तू त्वांड का बांधलं? संगीता फक्त हसली आणि निघून गेली. गण्या ने जोर लावून पटका बाजूला केला आन हसतच सुटला मंग मात्र सर्जा चिडला," भाड्याओ !कोंबड्यांच्या पार्ट्या केल्या ,इकलेल्या पैशाची दारू पिली, सर्जा ने गाण्याला चपलेने बडीवला .गावात पार शोभा झालीच .पुढचा महिनाभर रामा,
 शिरपा,तुका ,गण्या आणि शिरपा तोंडावर पटका बांधून बायकांनी पाळलेल्या जित्राबाचं दूध गुमान डेअरीत घालत हायेत....

*कथा संपुर्ण काल्पनिक*
*लेखक प्रशांत कुंजीर*